श्लोक (३८ आणि ३९)/३: ज्ञान होण्यात साधनेचा अंत नाही!

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च ।

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ गीता ३:३८ ॥

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।

कामरुपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ गीता ३:३९ ॥

अर्जुनाच्या ‘ज्ञानी मनुष्यसुद्धा संसारात कसा परत गुरफटतो?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणून गेल्या श्लोकातून आपण असे बघितले की मानसिक इच्छा आणि (त्यांचेच अंतिम रुप) क्रोध हे दोन शत्रू जेव्हा साधकावर विजय मिळवितात तेव्हाच तो आपल्या योग्य मार्गातून पदच्युत व्हायचा धोका असतो. यातून असे सिद्ध होते की निव्वळ ज्ञान मिळविण्यात साधकाच्या साधनेची फलश्रुती होत नाही. साधकाने असे ज्ञान मिळविले पाहिजे की त्याने काम आणि क्रोध यांचा निःपात सातत्याने (कधी-कधी नव्हे, तर प्रत्येकवेळा!) होऊ शकेल. असे झाले तरच साधकाची साधना ज्ञानातच सफल होईल. ही वस्तुस्थिती वरील श्लोकातून भगवान स्पष्टपणे सांगत आहेत: ‘ज्याप्रमाणे आगीबरोबर धूर असतो, आरश्यावर धूळ असते आणि उदरातला गर्भ गर्भाशयाने आवृत्त असतो त्याचप्रमाणे ज्ञान इच्छेने वेढलेले असते (३८). अरे कुंतीपुत्रा, ज्ञानाबरोबर नेहमीच (जाणण्याची) इच्छा असते जी कधीही समाधान न होणाऱ्या आगीसारखी असते(३९)’.

लक्षात घ्या की श्रीमद्भगवद्गीतेत ज्ञान हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे. उदाहरणार्थ, चतुर्थ अध्यायातील छत्तीस आणि सदतीस श्लोकांतून भगवान अर्जुनाला असे म्हणतात की ‘तू सर्व मानवांमधील सर्वात जास्त पापी असलास तरी ‘ज्ञान’ तुला वाचवेल कारण ज्याप्रमाणे अग्नीत तृण भस्म होतात त्याप्रमाणे ज्ञानाग्नीत सर्व कर्मांचा विनाश होतो.’ याउलट बाराव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात भगवान म्हणतात की ‘प्रयत्नांपेक्षा (त्यांच्यामुळे झालेले) ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा (त्यामुळे लागलेले) ध्यान उत्तम अहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग उच्चतम आहे कारण त्याने कधीही न ढळणारी शांति येते.’ परंतु हे सांगायच्या आधी चवथ्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की ‘श्रद्धावंत असल्याने ज्याने इंद्रियांवर ताबा मिळविला आहे त्याला ज्ञान प्राप्त होते आणि एकदा ज्ञान मिळाले की विनाविलंब पराकोटीची शांतीचा लाभ होतो.’ या उदाहरणांतून गीतेमधील विसंवाद स्पष्ट होत नाही, तर शब्दांचे तोकडेपण सिद्ध होते. व्यवहारातसुद्धा आपण ‘बरे वाटले’ हे शब्द संदर्भानुसार वेगवेगळ्या अर्थाने वापरतो (भूक लागली असेल तर भोजनाने बरे वाटते, सकाळी निद्रा व्यवस्थित झाल्याने बरे वाटते, आवडत्या संघाचा खेळात विजय झाल्याने बरे वाटते इत्यादी) त्याचप्रमाणे ज्ञान हा शब्द आपण संदर्भानुसार घेतला पाहीजे. इथे संदर्भ कुठला आहे? तर अर्जुनाच्या साधक मार्गातून पदभ्रष्ट का होतो या प्रश्नाचा. याचा अर्थ असा की साधकाला झालेले ज्ञान चतुर्थ अध्यायात वापरेलेल्या ज्ञान या शब्दाप्रमाणे शाश्वत नसून बाराव्या अध्यायातील ज्ञानाप्रमाणे प्राथमिक ज्ञान आहे. साधनेच्या प्रयत्नांमुळे जेव्हा आपण अज्ञानाच्या अंधारातून पहिल्यांदा ज्ञानाच्या उजेडात येतो तेव्हा आपली जी अवस्था असते ती अतिशय नाजूक असते. खूप दिवस आजारी असलेला मनुष्याचा ताप उतरला तर त्याचा आजार गेला असे आपण म्हणतो पण त्यानंतर काही दिवस आपण त्याच्या तब्येतीची अधिक काळजी घेतो (नाहीतर गेलेला आजार दुप्पट परत येतो!) त्याप्रमाणे प्रथम ज्ञानाची अवस्था असते असे इथे भगवान म्हणत आहेत. अजून संसारातील आकर्षणांचा संपूर्ण विनाश झालेला नाही आणि भगवंताच्या सान्निध्याचे ज्ञान झालेले आहे अशा अवस्थेचे हे वर्णन आहे. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक त्यावरील मडके काढल्यावरही काही काळ फिरतच असते त्याप्रमाणे आपल्या मनातील इच्छा आणि आकांक्षा ज्ञान झाल्यावरही काही काळ आपणास वेढून असतात. अशावेळी आपण अत्यंत सावध असायला हवे. ज्याप्रमाणे धूर आग पूर्ण प्रज्वलित होईपर्यंतच असतो, वा आरसा धूळ साफ करेपर्यंतच घाण असतो वा गर्भ जन्म होईपर्यंतच गर्भाशयात असतो त्याचप्रमाणे ज्ञान इच्छा-आकांक्षांच्या लेपामध्ये काही काळच असते. हे लेप अविनाशी नसून प्रयत्‍नांनी निघून जाणारे असतात. म्हणून साधकाने ‘या जगात भगवंत भरलेला आहे याचे ज्ञान मला झाले’ या भावनेत सुखी न राहता सध्या झालेले ज्ञान चिरकाल कसे राहील इकडे लक्ष द्यायला हवे. वरील श्लोकांतून भगवंत आपणा सर्वांना हा सावधानीचा इशारा देत आहेत. नंतरच्या श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानावरील इच्छेचे आवरण कसे काढायचे हे सांगतील. ते आपण पुढच्या वेळी बघू. इति.

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

One Response to श्लोक (३८ आणि ३९)/३: ज्ञान होण्यात साधनेचा अंत नाही!

  1. Shrinivas Deshpande म्हणतो आहे:

    Ram Krishna Hari,
    Wiling to have such attidude itself is honesty.
    Very nice to see your presence here.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: