श्लोक (४० आणि ४१)/३: प्राथमिक बोध स्थिर कसा होतो?

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।

एतैर्विमोहयत्येष ज्ञाननावृत्य देहिनम्‌ ॥ गीता ४०:३ ॥

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।

पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ गीता ४१:३ ॥

श्री भगवद्गीतेच्या तृतीय अध्यायात अर्जुनाने अत्यंत समर्पकपणे या वस्तुस्थितीवर आधारीत प्रश्न विचारलेला आहे की ‘ज्ञानी माणसेसुद्धा पापाचरण करण्यास उद्युक्त होतात हे कसे घडते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना गेल्या दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी आपणास असे सांगितले की ज्ञानाला वेढून असलेले काम आणि क्रोध साधकाला परत संसारात गुंतवितात. या दोन शत्रूंमधील क्रोध हा कामनांपासूनच निर्माण झालेला असलेल्याने ज्ञानाचा शत्रू आपल्या वासनाच आहेत असे भगवतांचे म्हणणे आहे. इथे ‘या वासनांचे दहन कसे करावे?’ हा प्रश्न साहजिकच उद्भवतो.

श्री रामकृष्ण परमहंस गंमतीत म्हणायचे की ‘गंगास्नानाने सर्व दुष्कृतांचा नाश होतो हे आपल्या पापांनासुद्धा माहित असल्याने आपण गंगेत प्रवेश करण्याआधी ते जवळच्या झाडांवर चढतात आणि स्नान करुन बाहेर आलो की ती सर्व पापे परत आपल्या शरीरात प्रवेश करतात!’ आपणा सर्वांना या संसाराचे मिथ्यत्व अनेकवेळा जाणवलेले असते (म्हणजे गंगास्नान झाले!) परंतु काही काळाने आपण परत आपल्या संकुचित विश्वात गुरफटून जातो आणि साधनेला परत दुय्यम स्थान देतो (पापे परत आपल्यामध्ये घुसली!). मधल्या काळात आपल्यामधील इच्छा-आकांक्षाचा समूह कुठे दडून बसलेला होता? वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण जीवनातील वासना कशाचा आश्रय घेतात हे आपणास सांगून त्यांचे निराकरण कसे करावे याचा उपदेश करीत आहेत. भगवान म्हणत आहेत की ‘(आपल्या कामनांचे) यांचे आश्रयस्थान म्हणजे आपली इन्द्रिये, मन आणि बुद्धि होय. यांचा वापर करुनच आपल्या इच्छा झालेल्या ज्ञानाला झाकून ज्ञानी मानवाला परत संभ्रमात पाडतात (४०). म्हणून हे शक्तिशाली युवराजा, आपल्या इन्द्रियांना संयमित ठेवून मनातील कामनांचा त्याग कर. कारण त्यांच्यामुळेच झालेल्या बोधाचा विनाश होतो आणि जीवनातील सत्य झाकले जाते (४१).’ याचा अर्थ असा की व्यावहारिक इच्छा व वासना वैराग्यप्राप्तीच्या क्षणी आपल्या इन्द्रियांत आणि मन व बुद्धीने तयार केलेल्या संकुचित व्यक्तिमत्वात दडून बसतात. जेव्हा बोधगंगेतून बाहेर येऊन आपण स्वतःच्या या अस्तित्वाच्या छायेखाली येतो तेव्हा त्या परत आपल्या मानगुटीवर बसतात आणि आपणास नाचवितात. श्री रामकृष्णांच्या गंमतीमध्येसुद्धा खोल अर्थ दडलेला आहे! याशिवाय वरील श्लोकांमध्ये दोन सूक्ष्म तत्वे दडलेली आहेत. त्यांचे ज्ञान झाल्याशिवाय आपल्या साधनेची कर्मठपणापासून सुटका होत नाही म्हणून आपण त्यांच्यावर विचार करु. पहिला मुद्दा असा की व्यावहारिक जीवनाचे फोलपण संपूर्णपणे पटल्यानंतरच इन्द्रियांचे दमन करणे योग्य आहे. आणि दुसरा मुद्दा असा की नुसतेच आपल्या इन्द्रियांना काबूत आणून उपयोग होत नाही, याशिवाय आपल्या मनातील कामनांचा प्रभावदेखील कमी झाला पाहिजे.

स्वतःच्या जीवनाचा फोलपणा जाणविणे हा एक अत्यंत आणीबाणीचा प्रसंग असतो. आपल्या मनात ज्या भावनांची उभारी असते त्या सर्वांचा एका क्षणात नायनाट करण्याची शक्ति या प्रसंगात असते. आणि ज्याप्रमाणे शेतात तणांना जाळल्यानंतर तिथे नवीन पीक उगवते त्याप्रमाणेच आपल्या जीवनाला एक नवीन वळण लावण्याची संधी या विनाशात दडलेली असते. सर्व संतांच्या जीवनाकडे बघितल्यावर त्यांनी अशा क्षणाला अत्यंत सकारात्मक तोंड दिलेले दिसून येते. युवराज सिद्धार्थास रस्त्यात दिसलेल्या घटनांमुळे मनात वैराग्य उत्पन्न होऊन त्याने आपल्या पूर्वजीवनाचा त्याग केला आणि ते भगवान बुद्ध झाले. अचानक झालेल्या मृत्यूच्या दर्शनाने मदुराईतील एका सतरा वर्षाच्या मुलाने आपल्या घरातून पलायन करुन अण्णामलाईत एका गुहेत आश्रय घेतला व ते श्री रमणमहर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. स्वामी स्वरुपानंदांना अचानक अनाकलनीय रोग होऊन देहत्याग होतो की काय अशी परीस्थिती निर्माण झाली आणि त्यांनी गुरुमंत्राचा आधार घेतला. सद्य जीवन बदलण्याची अत्यंत तळमळ निर्माण झाल्याशिवाय इन्द्रियांवर संयम ठेवायचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. लक्षात घ्या की ओल्या मातीचा लेप अंगाला कितीही चेपून लावला तरी कालांतराने तो सुकतो आणि गळून पडतोच. जीवनाकडे बघण्याचा मनातील दृष्टीकोनामध्ये मूलभूत बदल होणे हा कुठल्याही साधनेचा पाया आहे. स्वतःच्या मनात भगवंताशी सान्निध्य साधणे हे एकच ध्येय निर्माण होणे म्हणजे प्राथमिक बोध होणे होय. हा झालेला बोध निरंतर राहण्यासाठी गुरुकृपेचा ओलावा आपल्या बरोबर हवा. गुरुकृपा जन्मजात आपल्या बरोबर असतेच. परंतु इन्द्रियांच्या आकर्षणांच्या दडपणाखाली हा कृपेचा स्त्रोत दडला गेलेला असतो. तो परत दिसण्यासाठी इन्द्रियांपासून अलिप्त होणे जरुरी असते. आपल्या इंद्रियांमध्ये आपले मन आणि बुद्धीसुद्धा अंतर्भूत असल्याने मनातील कामनांकडे दुर्लक्ष करणे हा उपाय भगवान आपणास सांगत आहेत. एकदा मन-बुद्धी-इंद्रिये यांचा आपल्या विचारसरणीवरील ताबा कमी झाला की स्वयंभू स्वरुपाचे ज्ञान स्पष्ट व्हायला लागते. एकदा हृदयात स्वरुपानुसंधान स्थिर झाले की मग साधकाला पदच्युत व्हायचा धोका नसतो. तेव्हा ‘आणिबाणीचा प्रसंग->इंद्रियांवर ताबा->मनाकडे दुर्लक्ष->बुद्धीच्या कुबडीला लाथ->जीवनातील सर्व घटनांची आक्रोशरहित स्वीकृती->अखंडित शांति’ हा प्रवास सर्व साधकांना लागू पडतो असे भगवान सांगत आहेत. बाह्य दृष्टीने साधना भिन्न दिसल्या तरी तात्विकरीत्या त्या सर्व एकच आहेत. जय श्रीराम!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: