श्लोक (४२ आणि ४३)/३: मन-बुद्धी पलिकडील अस्तित्व

॥ ॐ सच्चिदानंद सद्‌गुरु श्री माधवनाथाय नमः ॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ गीता ३:४२ ॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्‌वा संस्तभ्यात्मानमात्मना ।

जहि शत्रुं महाबाहो कामरुपं दुरासदम्‌ ॥ गीता ३:४३ ॥

गेल्या दोन श्लोकांमधून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा सल्ला दिला. ‘या जगातील सर्व गोष्टी नश्वर आहेत, नष्ट पावणार आहेत’ हे ज्ञान अंतरमनात एका क्षणामध्ये खोल बिंबते. अचानक प्राप्त झालेले हे पारमार्थिक धन जर आयुष्यभर जतन करुन ठेवायचे असेल तर मनातील कामनांचा विनाश व्हायला हवा. नाहीतर उधार घेतलेली वस्तू जशी परत मालकाला परत करावी लागते त्याप्रमाणे हे स्वयंभू ज्ञान परत अनंतात विलीन होते आणि साधक परत व्यावहारीक गोष्टींत रस घ्यायला लागतो. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करुनि ठाके उभा । तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ॥ ज्ञा. १६:४४४ ॥ (जो काम, क्रोध आणि लोभ यांचा संपूर्णपणे नाश करुन जीवन जगतो त्यालाच झालेल्या पारमार्थिक लाभावर राज्य करता येते – इतर लोकांकरता ते तात्पुरते असते, उसने असते!) परंतु कामरुपी शत्रू अत्यंत मायावी असल्याने आपण स्वतःच्या प्रयत्नांनी तो काबूत येऊ शकत नाही. आपल्या मनातील इच्छांचे जे रुप आपणास भासते त्या सर्वांवर ताबा मिळविला तरी ‘स्वतःच्या मनाकडे आपण कसे छान दुर्लक्ष करु शकतो’ अशी नवी भावना उत्पन्न होते आणि त्यातून परत नूतन इच्छा निर्माण होतात. खरे म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांची जाणीव होणे हेच कामनाविरहित होण्यास घातक आहे. ज्याप्रमाणे लहानपणातील आपले शरीर स्वतःला जाणीव न होताच यौवनात येताना बदललेले असते त्याप्रमाणे आपल्या मनातील इच्छांचा सहजपणे नायनाट झाला पाहीजे. असे झाले तर मग साधकास कधीतरी अचानक जाणविते की ‘अरे आपल्या इच्छा थोड्याबहुत कमी झालेल्या दिसत आहेत!’ आयुष्यभर ध्येय ठरवून त्याच्या प्राप्तीकरीता प्रयत्न करण्याची आपणास जी सवय लागलेली आहे ती इथे अजिबात उपयोगी येत नाही. सतत स्वतःला ध्येयाच्या आठवणीत ठेवणेच इथे उपयुक्त ठरते. मनातील इच्छांमुळे मी भगवंताच्या सान्निध्यापासून दूर होत आहे याची सतत आठवण ठेवणे पुरेसे आहे. त्यापेक्षा अजून काहीही प्रयत्न केले तर ते आपणास नव्या बंधनांत गुरफटून टाकतात. भगवंताच्या जवळीकीचे स्मरण ठेवणे म्हणजेच अनुसंधान राखणे होय. सतत अशा अनुसंधानात जो राहतो तोच साधक काम आणि त्यातून उत्पन्न होणारा क्रोध यांचा विनाश करु शकतो.

भगवंताचे अनुसंधान राखण्याशिवाय गत्यंतर नाही हे पटले पण ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणायचे? या प्रश्नाचे उत्तर खरे म्हणजे साधकाने स्वतःच शोधायला हवे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी माणसांच्या स्वभावांवर जी म्हण आहे ती आपल्या साधनेलासुद्धा लागू पडते कारण आपल्या प्रवृत्तींवर साधना अवलंबून असते. परंतु असे असले तरी काही गोष्टी ध्यानात ठेवणे सर्वांनाच हितकारक असते. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताचे आपल्या जीवनातील खरे महत्व ओळखणे ही होय. एखादी वस्तू वा व्यक्ती वा तत्व आपणास मह्त्वाचे वाटले तर त्याच्या प्राप्तीकरीता जेव्हढा शक्य आहे तेव्हढा त्याग करायला आपली तयारी आपोआप होते. या आपल्या मनाच्या सवयीचा उपयोग करुन घ्यायचा असेल तर भगवंताचे सान्निध्य आपल्या अस्तित्वास किती उपयुक्त आहे हे जाणून घेणे जरुरी आहे. वरील दोन श्लोकांतून भगवान अर्जुनाला हीच गोष्ट समजावून सांगत आहेत असे वाटते. भगवान श्रीकृष्ण तृतीय अध्यायाचा समारोप करताना म्हणत आहे की :‘इंद्रिये महत्वाची आहेत असे सर्व मानतात (म्हणूनच इन्द्रियसुखांखेरीज जीवनात काही दुसरे महत्वाचे वाटत नाही). परंतु इन्द्रियांपेक्षा मन (ज्यामध्ये इन्द्रियांनी घेतलेल्या विषयभोगाचे प्रतिबिंब उमटते) श्रेष्ठ आहे. मनापेक्षा महत्वाची बुद्धी (जी मनात प्रगट झालेल्या सर्व भावनांमध्ये ‘चांगले-वाईट’ याचा निवाडा करु शकते) आहे. परंतु या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे आपल्यामधील भगवंताचे अस्तित्व आहे (जे आपल्या बुद्धीला मनातील अनंत विचारांमध्ये नक्की काय बघावे हे दाखवित असते!) (४२) (आपल्या जीवनातील) भगवंताच्या सान्निध्याचे हे महत्व आहे हे जाणून घेऊन स्वतःच्या बुद्धीचे मर्यादीत्व साधकाने जाणायला हवे आणि (या ज्ञानाच्या आधार घेऊन) इन्द्रियांवर भगवंताच्या अनुसंधानाने ताबा मिळवायला हवा. या मार्गाने कामरुपी महाघोर शत्रूचा – जो आपले खरे रुप कधीच दाखवित नाही – संपूर्णपणे नायनाट होतो (४३)

लक्षात घ्या की खुद्द भगवंतांनीसुद्धा मनातील इच्छांना ‘दुरासदम्‌’ म्हणजे समजायला, जाणून घ्यायला, त्यांचे रुप कळायला, अत्यंत कठीण असे म्हटले आहे. आपणच आपल्या मनातील सर्व इच्छा ओळखणे स्वतःच्या पाठीवर आपल्याच पायाने चालण्याइतके असंभव आहे! आपण जेव्हा अत्यंत तटस्थ राहून जीवन जगतो तेव्हा आपोआप आतून स्वतःबद्दल खरी माहिती होते. हे ज्ञान आपल्यामधील भगवंतानी पुढे आणलेले असते आणि ते आपल्या त्यावेळच्या मनःस्थितीला पचेल इतकेच असते. जेव्हा अशा स्वयंभू उद्भवलेल्या ज्ञानाला आपण (शक्य तितके!) आचरणात आणतो तेव्हा आपली मनःस्थिती अजून प्रगल्भ होते आणि मग परत तटस्थ राहिल्यावर ज्ञानाचा पुढचा भाग आपणास दिसायला लागतो. आयुष्यभर आपणास स्वतःबद्दलचे ज्ञान असे हप्त्या-हप्त्याने मिळत असते! म्हणून आपले अनुसंधान निरंतर राहणे अत्यावश्यक असते. या सर्व प्रक्रियेमध्ये बुद्धीचा जरासुद्धा वापर करणे झालेल्या ज्ञानाला दूषित करते आणि साधक जर अशा अस्वच्छ ज्ञानावर अवलंबून राहून आचरण करु लागला तर त्याची परत अधोगती व्हायला लागते, जी आधीच्या अधोगतीपेक्षा भिन्न असते. डोंगराच्या एका बाजूने वर चढून दुसऱ्या दरीत कोसळण्यासारखा हा प्रकार होतो. या सर्व प्रकारात आधीची अधोगती टळलेली असल्याने साधकाला स्वतःच्या नवीन पतनाची जाणीवसुद्धा लगेच होत नाही! हे सर्व धोके टाळायचे असतील तर स्वरुपानुसंधानापलिकडे जीवनात काहीही महत्वाचे नाही असे साधकाने कायमचे ठरविले पाहीजे. प्रगती-अधोगती यांच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास हा एकच मार्ग आहे. इति तृतीय अध्याय संपूर्ण.

॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: