श्लोक (१ आणि २)/४: कर्मयोगाचा इतिहास

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 श्रीभगवानुवाच –

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ ।

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ गीता १:४ ॥

एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: ।

स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ गीता २:४ ॥

 ईश्वरप्राप्तीची आस मनात ठेवून जीवन व्यतीत करणाऱ्या साधकांनी व्यवहारात कसे वागावे याबद्दलचा सल्ला गेल्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला. सर्वसाधारणपणे कर्मयोग म्हणून नावाजलेल्या या साधनेच्या मार्गाचे एका श्लोकात वर्णन करायचे झाले तर आपण भगवद्गीतेच्या तृतीय अध्यायातील तीसाव्या श्लोकाकडे बघू शकतो. या श्लोकात भगवंत असे म्हणत आहेत की “मनात माझे अखंड अनुसंधान ठेवून हातून घडणारी सर्व कर्मे मला अर्पण कर आणि हे करत असताना मनात आशेला थारा देऊ नकोस व ‘मी, माझे’ या ममत्वाचा त्याग करुन कुठलीही चिंता न करता (अर्जुना, तू) युद्ध कर. (गीता ३०:३)” यातून कर्मे करीत असताना बाह्य कृती कशा असाव्यात यांचे वर्णन न करता मानसिक स्थितीवरच नजर ठेवलेली आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. स्वतःच्या मनात उठणाऱ्या भावना कशा असतात यावर भगवंताच्या जवळीकीची जाणीव होते वा होत नाही हे यातून स्पष्ट होते. वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वर निरंतर आपल्याजवळ आहे, परंतु या परीस्थितीची आपणास जाणीव असणे जरुरी आहे. आणि कर्मयोग केल्यास अत्यंत सहजतेने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निरंतर राहते असे भगवंतांचे स्पष्ट मत आहे.

आता, चतुर्थ अध्यायाच्या सुरुवातीला परत भगवान श्रीकृष्ण आपल्या या सल्ल्याची आठवण अर्जुनास करुन देत आहेत. भगवान म्हणत आहेत की: “हा (कर्म)योग मी स्वतः विवस्वानाला (म्हणजे सूर्याला) सांगितला आणि त्याने तो मनुला सांगितला. मनुने तो पुढे इक्ष्वाकुला कथन केला (१). अशा रीतीने परंपरेने हा योग त्यानंतर राजर्षींना प्राप्त झाला. (परंतु) शत्रूंना नामोहरम करणाऱ्या अर्जुना, पुढे कालाच्या ओघात या मार्गाचे महत्व नष्ट होऊन आजकाल तो कुठेही आढळत नाही (२).” आयुष्यातील इतकी महत्वाची गोष्ट (निरंतर शांति, समाधान) सहजपणे प्राप्त करुन देणारा मार्ग हातात असूनही निव्वळ दुर्लक्षाने तो केव्हा दूर जातो हे कळतसुद्धा नाही. केवळ एक-दोघांकरीता नव्हे, तर सर्व मानवजातीला हे विधान लागू पडते असे भगवान वरील श्लोकातून म्हणत आहेत. असे का होते यावर आपण विचार करु.

दृश्य जगातील प्रत्येक वस्तू ज्या अणू-रेणूंपासून बनलेली असते ते स्वतःच शाश्वत नसल्याने त्यांच्यावर आधारीत असलेली कुठलीही वस्तू कशी शाश्वत असेल? परंतु “या जगात कुठलीही गोष्ट निरंतर अस्तित्वात असू शकत नाही” हे कारण कर्मयोगाला लागू पडत नाही कारण आपण वर बघितले की कर्मयोग हा बाह्य वस्तूंवर अवंबून नाही तर स्वतःच्या मानसिक धारणेवर अवलंबून आहे. त्यामुळे, मनातील विचार का शाश्वत रहात नाहीत हे इथे बघणे जरुरी आहे. आपल्या कुठल्या भावना निरंतर जागृत असतात? असा विचार करता असे जाणविते की ज्या विचारांबाबत आपणा स्वतःला सत्यता जाणविलेली असते त्या कायम टीकतात. एकदा आगीत हात भाजल्यावर नंतर आयुष्यभर आपण आगिशी खेळत नाही! याउलट लहानपणी आपणास आदरणीय असणाऱ्या पालकांनी ‘आगीशी खेळू नकोस’ म्हणून सांगितले तर त्याचा प्रभाव फार काळ टीकत नव्हता. दीवाळीत न फूटलेल्या फटाक्यांची होळी आपण बिनधास्तपणे करायचोच. त्यामुळे कर्मयोगासारखे अत्यंत सहज आणि आपोआप हस्तगत झालेले ज्ञान आपल्या मनातून का जाते, तर त्याच्या सत्यतेबद्दल आपण स्वतः खात्री करुन घेतलेली नसते म्हणून. भगवान श्रीकृष्णांनी सूर्याला सांगितलेली साधना आपल्या हातात आली आहे असे लोकांना जेव्हा कळले तेव्हा निश्चितच त्या मार्गाचा धिक्कार कुणी केला नसणार. स्वतः भगवानसुद्धा असे म्हणत नाहीत की नास्तिकांनी या मार्गाचा विनाश केला. ते म्हणत आहेत की कालांतराने हा मार्ग लोप पावला. सांगणाऱ्या माणसाबद्दल आदर असल्याने आपण एखादी गोष्ट मानली तरी तो स्वीकार काही काळापुरताच असतो. जेव्हा त्या व्यक्तींचा आदर कमी होतो वा त्यांच्या एव्हढा आदर ठेवावा अशी दुसरी व्यक्ती वा तत्व जवळ आले की आपली त्यांच्या वक्तव्यांवरील निष्ठा आपोआप कमी होऊ लागते. कर्मयोगाच्या मार्गाबाबत अशी कुठली दुसरी वस्तू वा व्यक्ती वा तत्व आहे जे आपणास या मार्गापासून आपल्या नकळत दूर करु शकते हे आपण बघायला हवे.

ही गोष्ट म्हणजे आपले इंद्रियांवरील ममत्व होय. लक्षात घ्या की कर्मयोगाने भगवंताचे अस्तित्व (ज्याचे दृश्य रुप मनाचे समाधान आहे) निरंतर प्राप्त होते. परंतु मनाला तात्पुरते समाधान देणारे इतर मार्ग आहेत त्यांचे काय? हे मार्गसुद्धा सर्वसामान्य माणसाला कर्मयोगा इतकेच आपलेसे वाटतात. कारण सध्या असणारे समाधान पुढे जाऊ शकेल अशी शक्यता असली तरी आपल्याबाबतीत ते घडेल असे कुणी मानत नाही! म्हणूनच धूम्रपानाचे धोके माहीत असूनही सिगारेट ओढणारी माणसे आहेत. ‘मी काही इतक्या सिगारेटी ओढत नाही’ अशी पळवाट सांगून ज्याप्रमाणे धूम्रपान चालू असते त्याचप्रमाणे इंद्रियांचे (यात आपले मनदेखील आले!) लाड पुरविल्याने आपणास भविष्यात दुःख होऊ शकते हे माहित असले तरी आपण तिकडे दुर्लक्ष करतो. लोकांच्या या वृत्तीनेच या योगाचा ऱ्हास झाला आहे. यात बिचाऱ्या काळाचा दोष नाही. भगवंतांचा हा उद्देश स्पष्ट करण्यास श्री ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या श्लोकावर भाष्य करताना माउली म्हणते की “जे प्राणिया कामीं भर । देहाचिवरी आदर । म्हणोनि पडिला विसर । आत्मबोधाचा ॥ ज्ञा. २०:४॥, तैसी वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । ते मूर्ख केवीं पावती । मज ईश्वराते ॥ ज्ञा. २५:४॥” तात्पुरत्या सुखामध्ये जो झोपी जातो त्याला दुःखाची जाग येणारच. परंतु जोपर्यंत झोप आलेली आहे तोपर्यंत या वस्तुस्थितीची फार थोडेजण पर्वा करतात. म्हणून कर्मयोग लोप पावला.

यावरुन असे सिद्ध होते की निव्वळ दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन आपण काही मानसिक धारणा ठेवायचा प्रयत्न केला तर तो काही काळच यशस्वी होऊ शकतो. यामध्ये आपल्यावर प्रभाव पाडणारी शक्ती किती मोठी आहे याचा संबंध नाही हे लक्षात घ्या. प्रत्यक्ष भगवंतांच्या सांगण्यामुळे जरी आपण बदलायचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न शाश्वत नसतो! स्वतःमध्ये कायमचा मूलभूत बदल करायचा असेल तर स्वतःच विचार करुन जो बदल घडवायचा आहे त्याची सत्यता पटवून घेतली पाहीजे. मग त्यानंतर तो बदल आपोआप होतो. एकदा एखाद्या द्रव्यात विष आहे हे कळले की मग आपण ते कधीही प्राशन करीत नाही तशी ही गोष्ट आहे. याउलट आईने सांगितले म्हणून ते द्रव्य पिऊ नये अशी लहानपणी धारणा असेल तर भविष्यात मोठे झाल्यावर त्या द्रव्याचा मोह पडतोच! स्वतःला पटलेल्या गोष्टीनुसार आपले जीवन जगणे सहजपणे होते. परमार्थाचा मार्ग स्वतःनेच चालावा लागतो. दुसऱ्या कुणाच्या (म्हणजे सद्‌गुरुंच्या आशिर्वादाच्या) पाठीवर बसून, आपण आहे तसेच राहून, रस्ता पार करु ही अपेक्षा अध्यात्मामध्ये फार घातक ठरते. असे वर्तन केल्यास, ज्याप्रमाणे या जगातून कर्मयोग लोप पावला त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून साधना कधी लोप पावली हे कळणारसुद्धा नाही.

 ॥ हरिः ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: