श्लोक ३/४: ऐसी कळवळ्याची जाती !

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥ 

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ गीता ३: ४ ॥

 

आपणा सर्वांच्या जीवनात ‘प्रेम’ ही एक अत्यंत नाजूक भावना आहे. एकदा स्वतःच्या भौतिक गरजा भागल्या की मानसिक पोकळीला भरुन काढण्यासाठी आपले जे कळत-नकळत प्रयत्न चालू असतात त्या सर्वांच्यामागे आपली प्रेम शोधण्याची धडपड आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रेम शोधण्याचे हे सर्व प्रयत्न बाह्य जगात चालू आहेत असे दिसून येते. एका ठिकाणी शांत बसून आत्मपरीक्षण करण्याऐवजी सर्वसाधारणपणे आपण एखादी व्यक्ती, एखादे तत्व वा विचार किंवा कुठलीतरी क्रिया यांमधून स्वतःच्या जीवनाला निव्वळ ‘उदरभरणाच्या’ पातळीपेक्षा अधिक उच्च अवस्था द्यायचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच कुणी एखादे सामाजिक कार्य करण्यास उद्युक्त होते, कुणी लेखन वा गायनादी कलांमध्ये घुसते तर कुणी ‘देव म्हणजे काय आहे?’ अशा ‘पारमार्थिक’ मार्गात जीवन व्यतीत करण्यास उताविळ होते. परंतु या सर्व क्रियांमागे स्वतःच्या जीवनातील कुठलीतरी पोकळी भरुन काढण्याची आपली धडपडच दिसून येते. अशांपैकी काही भाग्यवंतांना अचानक अशी क्रिया वा व्यक्ती वा तत्व मिळते की त्याच्यानंतर अजून काही वेगळे करावे असे त्यांना वाटणे बंद होते आणि ‘आता जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला’ असे वाटू लागते. या समाधानी भावनेत जे सुख आहे ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही. वास्तविकपणे, एखाद्या त्रयस्थाच्या नजरेने पाहील्यास, अशावेळी त्यांचे जीवन आधीपेक्षा अजून गुंतागुंतीचे आणि शारीरीकरीत्या कष्टदायक झालेले असते. उदाहरणार्थ, परमार्थात गुरु भेटले की त्यांच्या आदेशानुसार वागण्याची, त्यांनी सांगितलेली साधना मनःपूर्वक करण्याची बंधने येतात. गाण्यामध्ये रस उत्पन्न झाल्यास रीयाज करण्यासाठी नियमितपणे वेळ काढावा लागतो इत्यादी. या नवीन प्राप्त झालेल्या मानसिक समाधानासाठी आधीच्या जीवनाला त्यांना अजून कष्टदायकच बनवावे लागते. (म्हणूनच, बाकीच्यांना कळत नाही की अचानक हा मनुष्य या नव्या वेडावर इतके कष्ट का घेत आहे?!) आणि सुरुवातीचा आवेग कमी झाला की त्यांना स्वतःलासुद्धा आपण घेत असलेल्या नवीन कष्टांची जाणीव होते. एकदा ही जाणीव झाली की या नवीन जवळ केलेल्या गोष्टीवरील आपली आत्मीयता वाढते आणि त्याचबरोबर अशी एक अपेक्षा निर्माण होते की आपण जो ‘त्याग’ या गोष्टीकरीता करीत आहोत त्याच्या प्रमाणात आपणास काहीतरी मिळावे. उदाहरणार्थ, गुरुंकडून मानसिक शांतीची अपेक्षा निर्माण होते, तर गाण्यात सफाई यावी, वेगवेगळे राग ओळखता यावेत असे वाटू लागते. जेव्हा या अपेक्षा उदयास येतात तेव्हा त्या ठराविक वस्तू वा व्यक्ती वा तत्वाबाबत आपला परत ‘एक गोष्ट द्यायची आणि त्याबदल्यात दुसरी घ्यायची’ असा व्यवहारच चालू झाला. हो की नाही? आणि व्यवहारात प्रेम नसते हे वेगळे सांगायची जरुरी नाही.

लोकांचा जीवनातील प्रवास कसा सुरु आहे हे बघा. व्यवहारात आयुष्य घालवणे आयुष्याचे ध्येय नाही हे पटले की त्यापेक्षा कुठल्यातरी उच्च पातळीवर जाण्यासाठी आपण प्रेम शोधतो आणि जेव्हा स्वतःच्या प्रेमास लायक अशी वस्तू मिळते तीच्याशी परत मानसिक अपेक्षांच्या द्वारे परत व्यवहारच सुरु करतो! अर्थात, याचा दृष्य परीणाम म्हणजे परत काहीकाळाने मनात अस्वस्थता निर्माण होते आणि कळत नाही की आत्तापर्यंत स्वतःच्या आयुष्याला सुंदर बनविणाऱ्या वस्तूत कमीपणा कुठून आला! ही गोष्ट फक्त इतरांच्या जीवनात घडते असे नाही! आपल्या स्वतःच्या जीवनात जर असेच घडत असेल ( आणि हे प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःकडे बघून ठरवायचे आहे. इथे दुसरे कुणी – ईश्वर वा सद्‌गुरु – आपल्या मदतीला येईल अशी आशा धरणे रास्त ठरणार नाही.) तर या दुष्टचक्रातून कसे बाहेर पडायला हवे याचा विचार करणे आपले पहिले कर्तव्य आहे आणि ‘परमार्थ, साधना’ इत्यादी गोष्टींबाबत नंतर विचार करायला हवा.

इथे मूळ प्रश्न असा आहे की मनातील अपेक्षांचा ऱ्हास केव्हा आणि कसा होईल? या करीता अपेक्षा कशा अस्तित्वात येतात याकडे बघणे जरुरी आहे. जरा विचार केल्यास असे लक्षात येईल की आपण अपेक्षा तेव्हाच ठेवतो जेव्हा आपणास गोष्टीची माहिती झालेली आहे असे वाटायला लागते. कारण मी जी अपेक्षा ठेवलेली आहे ती पूर्ण करण्यास दुसरी व्यक्ती वा तत्व समर्थ आहे हे कुठल्या आधारावर मी ठरविणार? माझ्या लहान मुलाने वयाच्या दहाव्या वर्षापासून मला पैसे द्यावे ही अपेक्षा मी ठेवत नाही पण त्याने माझे ऐकावे ही अपेक्षा ठेवतो. यामध्ये त्या लहान मुलाच्या मर्यादेंची आणि क्षमतेंची जाणीव मला आहे हे सहजपणे लक्षात येते. सर्वसाधारणपणे मी अशाच अपेक्षा ठेवतो ज्या दुसरा पूर्ण करु शकेल याची मला खात्री असते. उदाहरणार्थ, बँकेत गेल्यावर माझ्या खात्यातील पैसे मिळतील ही अपेक्षा मी ठेवतो आणि गुरुंकडून भगवंतांचे दर्शन होईल अशी आशा ठेवतो. त्यामुळे मनात अपेक्षा येण्याचे मूळ कारण दुसऱ्याबद्दल मला माहिती आहे अशी खात्री होणे हे आहे. पूर्ण माहितीच्या खात्रीवर माझ्या अपेक्षा अवलंबून असतात. माहितीप्रमाणे जीवन जगणे म्हणजे एका साच्यात जीवन जगणे होय, जीवनातील नावीन्य निघून जाणे होय. जर माझ्या जीवनात क्षणोक्षणी नाविन्य असेल तर अपेक्षा ठेवण्यास पुरेशी माहिती मला कधीच मिळणार नाही! याचा अर्थ असा की गेल्या पंचवीस वर्षे भेटत असलेल्या व्यक्तीबद्दलसुद्धा जर मी ती कशी वागेल याबद्दल ठाम मते बनविली नाहीत, तीला संपूर्णपणे नवीनरीत्या वागण्याचे स्वातंत्र्य दिले, तर तीच्या वर्तनाबद्दल माझ्या मनात अपेक्षा येणारच नाहीत – कारण आत्तापर्यंतच्या वागण्यावरच त्या अपेक्षा अवलंबून होत्या. तेव्हा आपल्या सर्व अपेक्षांचे मूळ दुसऱ्यास स्वातंत्र्य न देण्यात आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. त्यामुळे जीवनातील अपेक्षांचे ओले घोंगडे खांद्यावर घेऊन फिरण्याचा ज्याला कंटाळा आला आहे त्याने दुसऱ्यांना कसेही वागण्याचे स्वातंत्र्य देणे जरुरी आहे. मनातील अपेक्षांना मूळापासून नष्ट करायचे असेल – ‘मी माझ्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करीन’- असा दडपा-दडपीचा मार्ग अवलंबायचा नसेल तर वरील विवेचनाशिवाय पर्याय नाही.

ही गोष्ट निव्वळ तात्विकरीत्या पटून जीवनात काहीही फरक होत नाही. आपल्या रक्तात वरील गोष्टीची सत्यता इतकी भिनायला हवी की ‘दुसऱ्यास कसेही वागायला मोकळीक देणे’ ही भावना स्वतःच्या वागण्याचा सहजपणे एक पैलूच व्हायला हवा. नाहीतर, दुसऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आपण स्वतः किती त्याग करतो आहे या जाणीवेच्या ओझ्याखाली आपण गुदमरुन जाऊ!

भगवंतांच्या वरील श्लोकातून त्यांनी अर्जुनाला अशी संपूर्ण मोकळीक दिलेली दिसून येते असे वाटते. ते म्हणत आहेत की: ‘असा नष्ट झालेला पुरातन (कर्म)योगच मी तुला आत्ता सांगितला आहे. कारण तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस. मी जे काही कर्मयोगाबद्दल सांगितले आहे ते सर्वात जपून ठेवलेले माझे गुपित आहे (३)’. गीतेमध्ये अर्जुनाला जो उपदेश केला गेला आहे तो ‘त्याने ऐकलाच पाहीजे’ अशी अपेक्षा न ठेवता भगवान श्रीकृष्णांनी केला आहे हे लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच अठराव्या अध्यायात ते अर्जुनाला विचारतात की माझे बोलणे ऐकून झाल्यावर तू आता काय करणार आहेस? तेव्हा आपणहून अर्जुन म्हणतो की मी आता युद्ध करायला तयार आहे! त्याला आपणहून काहीही म्हणायला मोकळीक देणे भगवंतांच्या प्रेमाची खरी खोली दाखविते. संत तुकाराम म्हणतात ‘ऐसी कळवळ्याची जाति । करी लाभाविण प्रीती ॥’ अहो, अत्यंत तळमळीने अतिशय योग्य सल्ला दुसऱ्याला मनापासून देण्यात प्रेम दिसून येत नाही तर त्याचबरोबर आपण दिलेल्या या सुंदर सल्ल्याप्रमाणे न वागण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देण्यात खरे प्रेम दिसून येते. प्रत्येकाला आपले आयुष्य कसे जगावे याचा निर्णय घ्यायचा अधिकार प्रत्यक्ष भगवंताने दिलेला आहे. ‘त्याच्या भल्याकरीताच सांगतो आहे’ असे म्हणून तो अधिकार आपण हिरावून घेण्याच्या जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःला भगवंतापेक्षा मोठे ठरवित आहोत हे लक्षात घेतले तर स्वतःची ही धारणा नष्ट होण्यास पुरेसे आहे!

॥ हरिः ॐ ॥

One Response to श्लोक ३/४: ऐसी कळवळ्याची जाती !

  1. Ashok R. Inamdar, C4/11 Shivtara Garden,DP Road, Kothrud Pune 411038 म्हणतो आहे:

    pratyek kshan sarvsadharan mazyasarakhi manas –(mhanaje Khara tar mich)– pudhacha kshan mazya manasarakhach janar/ ghadanar ase gruhit dharatat- to. Tyabaddal Jagala swatantra/ vegale samajanne aavshyak aahe patale. mi lekhak nahi tyamule Abhipray mi kay denara. Pan yevdhech mhanen ki sanwad karayala aavdel. —Ashok inamdar—Pune/Banglore

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: