श्लोक ४/४: सद्‌गुरुंना निःसंकोच शंका विचारावी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥ 

अर्जुन उवाच

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ गीता श्लोक ४:४ ॥

 

तृतीय अध्यायातील कर्मयोगाची महती स्पष्ट करण्यास भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्या योगाची उत्पत्ती चतुर्थ अध्यायातील पहिल्या दोन श्लोकांतून सांगितली. त्यातील विवस्वताला (म्हणजे सूर्यदेवांना) सर्वात पहिल्यांदा हा योग मी सांगितला असे त्यांचे वक्तव्य ऐकून अर्जुनाच्या मनात जी शंका उत्पन्न झाली ती वरील श्लोकातून तो अतिशय मोकळेपणाने विचारत आहे असे दिसून येते. अर्जुन म्हणत आहे की: ‘तुमचा जन्म तर अलिकडेच झाला आहे आणि भगवान सूर्यदेवांचा जन्म तर फार पुरातन आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः कर्मयोगाचा उपदेश विवस्वतांना केला होता हे मी कसे समजू?’ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या प्रश्नाचे जे उत्तर देतील ते आपण नंतर बघूच, परंतु येथे अर्जुनाच्या या प्रश्नाचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे.

जरा विचार केल्यावर असे स्पष्ट होते की एखादी गोष्ट किती लोकांनी केली आहे यामुळे श्रेष्ठ ठरत नाही. वस्तूचे वा तत्वाचे मूल्यमापन अंगभूत गुणांवर ठरत असते, ते स्वयंभू असते. उदाहरणार्थ, लांच घेऊन काम करणे जवळजवळ सर्वच सरकारी कर्मचारी करत असले तरी ती घटना योग्य ठरत नाही. अगदी पंतप्रधानांनी जरी लांच घेतली तरी ते योग्य ठरणार नाही. तेव्हा विवस्वताने कर्मयोगाचे पालन केले यावरुन या योगाचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. परंतु असे जरी असले तरी प्रत्येक गोष्टीची अंगभूत योग्यता जाणून घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे असतेच असे नाही. आणि समजा एखाद्याची बौद्धीक पातळी जरी स्वतः विचार करुन जाणण्याइतकी उच्च असली तरी त्याच्याकडे संपूर्ण तपासणी करण्यास वेळ असेल असे नाही. म्हणून सर्वसाधारणपणे आपण एखाद्या मान्यवर व्यक्तीने गोष्ट केली की तीचे अनुकरण करतो (या तत्वावरच बहुतांशी जाहीराती आधारलेल्या असतात!). तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सूर्यदेवांचे जे उदाहरण दिले त्यामागील कारण अर्जुनाचा कर्मयोगावर पटकन विश्वास बसावा हे आहे. एकदा अर्जुनाचा कर्मयोगावर विश्वास बसला की ती मानसिक खात्री त्याला आपोआपच दैनंदिन व्यवहारात कर्मयोगाचे पालन करण्यास उद्युक्त करेल. परंतु असे होण्यास संपूर्ण श्रद्धा असणे अतिशय जरुरी असते. एखादी सूक्ष्म शंका जरी मनात राहीली असेल तरी अर्जुनाच्या हातून कर्मयोगाचे तंतोतंत पालन होणार नाही. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘शिवणकामाचा दोरा अनेक बारीक तंतू गुंफून बनविलेला असतो. सुईच्या भोकातून दोरा घालताना त्यातील एक धागा जरी बाहेर राहीला तरी नंतर दोरा आपण खेचू शकत नाही. त्याचप्रमाणे मनात सगळ्यात छोटी अशी शंका वा आसक्ती जरी असली तरी आपण भगवंताचे दर्शन घेऊ शकत नाही.’ भगवान श्रीकृष्णांनी विवस्वताने हाच योग केला होता असे शास्त्रात सांगितले आहे असे सांगितले असते तर गोष्ट वेगळी होती. पण मी स्वतः हा योग विवस्वताला सांगून त्याकडून करवून घेतला असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा अर्जुनाच्या मनात शंकेची जी पाल चुकचुकली तीला दूर करणे अत्यावश्यक होते. नाहीतर कालांतराने या संशयाचे भूत भगवान श्रीकृष्णांवरील अर्जुनाचा विश्वाससुद्धा उडवू शकले असते. अर्जुनाला याची जाणीव असल्याने त्याने अत्यंत नम्रपणे आपल्या मनातील खळबळ भगवंतांसमोर माडलेली आहे. त्याच्या प्रश्नाची भाषा बघितली तर वरील अत्यंत क्षुल्लक शंका विचारण्यामागील अर्जुनाच्या मनातील हेतू हाच होता हे स्पष्ट होते. आणि ही अत्यंत महत्वाची बाब आहे. यातून असे दिसते की अर्जुनाचे शंका विचारणे म्हणजे भगवंतांच्या बोलण्यामधील चूक दाखविणे असे नसून स्वतःच्या प्रगतीतील संशयरुपी अडथळा दूर करणे आहे. म्हणून हा प्रश्न अत्यंत रास्त आहे.

वरील विवेचनावरुन असे स्पष्ट होते की साधकाने सद्‌गुरुंसमोर कुठलाही प्रश्न, कुठलीही शंका विचारणे जरुरी आहे. आपला संशय किती पोरकट आहे वा किती खोल विचारानंतर उपस्थित झाला आहे याचा इथे संबंध येत नाही. परंतु संशय सांगण्यामागील हेतू निर्मल असणे जरुरी आहे. जर आपल्या मनातील शंका विचारण्यामागील भावना साफ असेल तर प्रश्न विचारुन झाल्यावर जे उत्तर मिळते ते आपल्या कल्पनेच्या कितीही बाहेर असले, कितीही चमत्कारीक वाटले तरी त्यावर आपण सकारात्मक विचार करतो. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘जे उत्तर मिळणार आहे त्याचा आदर मनात ठेऊन प्रश्न विचारणे योग्य आहे’. सर्वसामान्यपणे प्रश्नकर्त्याच्या मनात ‘मला हा किती योग्य प्रश्न पडला आहे’ या भावनेचाच इतका प्रादुर्भाव असतो किती त्याचे निराकरण करणारे उत्तर लगेच समोर आले (आणि खरे उत्तर नेहमीच विचार न करता एका क्षणात येते!) की त्याकडे ‘मला अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचे इतके सोपे आणि सरळ उत्तर कसे असू शकेल?’ या दृष्टीनेच बघितले जाते! एकदा या भावनेचा प्रादुर्भाव मनात झाला की प्रश्न विचारण्याने संवाद साधत नाही तर वाद घातला जातो! एकदा का वाद घालण्याच्या निसरड्या वाटेवर मन गेले की साधकाचे पाय घसरायला वेळ लागत नाही. म्हणूनच नारद भक्तीसूत्रांतील चौऱ्यात्तरावे सूत्र ‘वादो नावलम्ब्यः ।’ असे आहे. परंतु प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरुन असे दिसते की अर्जुन वरील प्रश्नातून भगवान श्रीकृष्णांशी संवाद साधायचा प्रयत्न करीत आहे, वाद घालायच्या भानगडीत पडण्याचा इथे धोका अजिबात नाही. आणि म्हणून हा प्रश्नच नव्हे तर अर्जुनाचे सर्वच प्रश्न अत्यंत योग्य आहेत. आणि योग्य गोष्टीचे फलही अतिशय योग्यच असते. त्यामुळे अर्जुनाला आता जे उत्तर मिळेल त्याने केवळ त्याच्या मनातील शंकेचे निवारण होईल असे नाही तर आपणा सर्वांनाच अत्यंत धीर मिळेल. कारण भगवान आता अर्जुनाला असे आश्वासन देणार आहेत की जेव्हा धर्माच्या अस्तित्वावर घाला येतो तेव्हा मी स्वतः येऊन त्याचे संरक्षण करतो आणि असेच मी सतत करत राहीन! यावर आपण नंतर विचार करु. आज इतकेच!

॥ हरिः ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: