श्लोक (५ आणि ६)/४: भगवंत अवतार कसे घेतात?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

श्रीभगवानुवाच:

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ गीता ५:४ ॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ ।

प्रकृति सामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ गीता ६:४ ॥

कर्मयोगाची महती स्पष्ट करण्यास जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सांगितले की मी स्वतः हा योग भगवान सूर्यदेवांना प्रथम सांगितला आणि हळूहळू संपूर्ण जगात तो पसरविला गेला. भगवंतांच्य़ मुखातून हे शब्द ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात असा संदेह निर्माण झाला की श्रीकृष्णांचा जन्म तर अलिकडील आहे आणि सूर्यदेवांचा जन्म कधी झाला हे आमच्या पूर्वजांनासुद्धा ठाऊक नाही, मग भगवंतांनी स्वतः हा योग विवस्वतांना सांगितला हे कसे घडले? मनात अजिबात भीड न ठेवता अर्जुनाने हा प्रश्न भगवंतांना मोकळेपणाने विचारला. यावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे उत्तर दिले आहे ते आपण आज पाहू. भगवान म्हणत आहेत की :‘माझे अनंत जन्म आत्तापर्यंत होऊन गेले आहेत आणि त्याचप्रमाणे तुझेसुद्धा अनेक जन्म झालेले आहेत. मला आत्तापर्यंत झालेल्या सर्व जन्मांची संपूर्ण आठवण आहे परंतु हे शत्रूंचा नाश करणाऱ्या अर्जुना, तूला (स्वतःच्या पूर्वजन्मांचे) विस्मरण झालेले आहे (श्लोक ५). जरी माझे मूळ स्वरुप कधीही जन्म न पावलेले (स्वयंभू), कधीही नष्ट न होणारे आणि सर्व भूतांवर प्रभूत्व असले तरी माझ्याच मायेच्या शक्तीने मी प्रकृतीच्या चौकडीत जन्म घेतो (असे दिसते)(श्लोक६) ’. वरील श्लोकांत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘परंतप’ म्हणजे वैऱ्यांना त्रास देणारा, नष्ट करणारा असे संबोधित केले आहे आणि स्वतःला सर्व भूतांचे ईश्वर असे म्हटले आहे. या दोन शब्दांतून भगवान श्रीकृष्ण आपणा सर्वांना एक सूक्ष्म बोध देत आहेत असे वाटते, तिकडे आपण प्रथन लक्ष देऊ.

असे बघा, या जगात (म्हणजे प्रकृतीच्या अंगणात) अर्जुनाचे कर्तृत्व कमी नाही याची पूर्ण जाणीव भगवंतांना आहे. परंतु ज्या काही गोष्टी प्रकृतीच्या पातळीवर दिसतच नाहीत त्यांच्या बाबतीत अर्जुन पूर्णपणे अनभिज्ञ आहे हे त्यांना ‘तू स्वतःच्या पूर्वजन्मांना विसरला आहेस’ या शब्दांतून इथे सुचवायचे आहे असे वाटते. जंगलामध्ये सिंह राजा असतो यात वाद नाही पण गगनातील विश्वात त्याच्या या पराक्रमाचे कितपत महत्व आहे?! त्याचप्रमाणे, जेव्हा आपण गुरुंचा आशिर्वाद घेऊन परमार्थाच्या मार्गावर पदार्पण करतो तेव्हा आपल्या व्यावहारीक कर्तृत्वाची इथे काहीही किंमत नाही हे आपण ओळखायला हवे. संसारातील आपले अस्तित्व एका वेगळ्या पातळीवर आहे आणि परमार्थाची वाटचाल एका वेगळ्याच विश्वात चालू आहे. अध्यात्मिक विश्वाचा आणि संसाराचा संबंध अजिबात नाही असे नाही, (गगनाचा आणि पृथ्वीचा संबंध आहेच की!) पण तो अत्यंत सूक्ष्म रुपाने असल्याने सहजा सहजी दिसत नाही. म्हणूनच साधनेकरीता अत्यंत कडक नियम शरीरावर/मनावर लादणाऱ्यांमध्ये क्वचितच खरी पारमार्थिक प्रगती दिसून येते (या प्रगतीचे एक आपोआप उमटणारे दृष्य लक्षण म्हणजे साधकाच्या मनात कारणविरहीत उद्भवलेली शांतता. कितीजणांत ही आढळते?!) . असे साधक अजून स्वतःला ‘परंतप’ याच पातळीवर ठेवतात आणि भगवान म्हणत आहेत की असे साधक ईश्वराच्या मूळ स्वरुपाबद्दल अज्ञानीच आहेत! म्हणूनच अनुग्रह देताना गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून ‘आज तूझा परत जन्म झाला आहे’ असे सांगतात. अर्जुनाकडे स्वतःचा मोठेपणा सोडून भगवान श्रीकृष्णांचे शब्द नवजात बालकाप्रमाणे ऐकायची समज होती म्हणून निव्वळ गीता ऐकून त्याच्या मनातील मोह संपूर्ण नष्ट झाला. असो.

दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे ‘भूतानामीश्वरोऽपि’ या शब्दाचे महत्व. लक्षात घ्या की भगवतांचे अस्तित्व अनेक पातळींवर आहे. त्यांनी भक्तांच्या संरक्षणासाठी घेतलेले अनंत अवतार त्यांच्या अस्तित्वाचे विविध पापुद्रे दर्शवितात. असे बघा की शहरातील एखाद्या उंच इमारतीचे जमिनीवरील मजले सहज दृष्टीस पडतात पण तीचा जमिनीत गाडलेला पाया अजिबात दिसत नाही. पण तो पाया त्या इमारतीचा एक मुख्य हिस्सा आहे ही वस्तुस्थिती आपल्या अज्ञानाने बदलत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचे सर्व अवतार ज्या पायावर उभे आहेत तो आपणास दिसला नाही म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. राहण्याकरीता, वा व्यवसाय चालवावयास इमारतीचे दृष्य मजलेच उपयुक्त असतात पण या गोष्टींकरीता निरुपयोगी असलेल्या पायाशिवाय त्यांचे अस्तित्वच डळमळीत होते. परंतु ज्याने ती इमारत भांधलेली आहे त्यालाच त्या पायाची संपूर्ण माहिती आहे आणि त्याबद्दल खरे प्रेम आहे. भगवंतांनी स्वतःला या जगातील सर्व भूतांचा ईश्वर असे संबोधित केले आहे ते याच कारणासाठी. या शब्दातून ते स्वतःच्या अमूर्त अनादी अस्तित्वाला आपले खरे रुप म्हणत आहेत कारण त्याच्या आधारावरच श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतार उभे आहेत. याउलट आपले भूतकाळातील सर्व जन्म इमारतीच्या पायासारखे आपणास अदृष्य आहेत. ज्या भगवंतांनीच ही संसाराची इमारत बांधलेली आहे त्यांना फक्त वर्तमान जन्मकाळातील घडामोडीच ज्ञात आहेत असे नाही तर आत्तापर्यंत झालेल्या सर्व घटनांची त्यांना आठवण आहे.

यातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवंतांचे स्वतःच्या मूळ स्वरुपाशी असलेले तादात्म्य. त्यांनी असे म्हटले नाही की माझ्या आधीच्या एका जन्मात मी कर्मयोगाचा उपदेश केला होता, ते म्हणाले की ‘मी’च तो उपदेश केला होता. म्हणजे काय, तर आपल्या ‘श्रीकृष्ण’ या अवतारात ते स्वतःला बघतच नाहीत. हा अवतार म्हणजे त्यांच्या मूल रुपाचा एक अविष्कार आहे. ज्याप्रमाणे आपण ‘मी’ अमुक एक गोष्ट केली असे म्हणतो तेव्हा आपले लक्ष मस्तकावरील दररोज अनंत उगवणाऱ्या आणि गळून पडणाऱ्या केसांकडे नसते तर स्वतःच्या मूळ अस्तित्वाकडे असते त्याचप्रमाणे भगवान जेव्हा स्वतःकडे बघतात तेव्हा त्यांना फक्त स्वरुपच दिसून येते. अर्जुनासमोर उभे असलेले श्रीकृष्णरुपी अस्तित्व त्यांच्या खिजगणतीतच नाही असे वाटते! म्हणून ते अत्यंत सहजतेने असे म्हणू शकतात की ‘मी’च भगवान सूर्यदेवांना कर्मयोगाचा उपदेश केला होता.

या विचाराचा संपूर्ण पाठपुरावा केला तर साधकांकरीता एक महत्वाची सूचना मिळू शकते. कारण, असे म्हणतात की देवाने स्वतःच्या प्रतिमेप्रमाणेच आपणा सर्वांना निर्माण केले आहे. म्हणजे आपणा सर्वांचे अस्तित्वसुद्धा कधीही जन्म न पावलेल्या रुपापासून सध्याच्या जन्मापर्यंत अनेक पातळीवर उभे आहे. अगदी या जन्मामध्येसुद्धा आपण स्वतःला पालक, चाकर, मालक, पति/पत्नी, मित्र, शत्रू इत्यादी अनेक रुपात बघत आहोत. त्यामुळे होते काय तर जेव्हा ‘मी’ असे स्वतःला संबोधित करतो तेव्हा दरवेळी संदर्भानुसार वेगवेगळ्या रुपाला मी जवळ करीत असतो. परंतु परमार्थाचा मूळ हेतू म्हणजे हाच आहे की भगवान श्रीकृष्णांप्रमाणेच आपणसुद्धा दरवेळी एकाच, अत्यंत स्थिर असलेल्या, कधीही न बदलणाऱ्या रुपात स्वतःला बघायला शिकले पाहीजे. तिकडे स्वतःचे किती लक्ष आहे हे साधकाने क्षणोक्षणी बघायला हवे. कमीतकमी आपले तसे अस्तित्व आहे याची जाणीवतरी आपणास स्वानुभवाने व्हायला हवी. ती तरी झाली आहे काय? का आपण स्वतःच्या नित्यनूतन अस्तित्वांमध्येच गुंग आहोत आणि अजून नवनवीन स्वप्रतिमा तयार करीत आहोत? यावर कधीतरी विचार केला पाहीजे. दृढतेने अशा एका विचारावर आयुष्य व्यतीत केले तर आपले जीवन आमुलाग्र बदलू शकते.

अशा रीतीने श्रीगीतेच्या एकेक शब्दांमध्ये स्वतःला जागे करण्याची शक्ती आहे! परंतु जो निद्रेमधील गोड स्वप्ने बघण्यातच आनंद मानत आहे त्याला कोण काय सांगणार?

॥ हरिः ॐ ॥

2 Responses to श्लोक (५ आणि ६)/४: भगवंत अवतार कसे घेतात?

  1. Seema Deshmukh म्हणतो आहे:

    I also trying to study Gita but battle for bread keeps me away from it. Can you answer my questions???

  2. Shreedhar म्हणतो आहे:

    I will definitely try!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: