श्लोक ७/४: आपल्या जीवनातील भगवंत

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ गीता ७:४ ॥

भगवान श्रीकृष्णांनी उद्गारलेला श्रीगीतेमधील हा श्लोक सर्वप्रसिद्ध आहेत. भगवान अर्जुनाला असे म्हणत आहेत की: “जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म फोफावतो तेव्हा तेव्हा मी स्वतःचे रुप रचतो (अवतार घेतो). ” आज आपण वरील श्लोकाचे स्वतःच्या दैनंदिन जीवनात पडलेले प्रतिबिंब बघायचा प्रयत्‍न करु.

सर्वात प्रथम गोष्ट बघण्यासारखी म्हणजे भगवंतांनी असे म्हटले आहे की ‘मी माझे रुप रचतो’. इथे सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की भगवान अवतार घेतात. परंतु प्रत्येक अवतार त्याच्या कार्यानुसार भिन्न असतो. त्यामुळे माझ्या स्वतःच्या जीवनात भगवंताचा अवतार कसा असेल हे बघणे महत्वाचे आहे. आपणा सर्वांना भगवान श्रीविष्णूचे दशावतार माहीत आहेत. त्याशिवाय आपल्या परमभक्तांच्या रक्षणाकरीता घेतलेले निरनिराळे अवतारसुद्धा माहीत आहेत (उदाहरणार्थ, हत्तीचा पाय मगरीने पकडल्यावर त्याच्या करुण हाकेला उत्तर म्हणून आलेले भगवान. ध्रुवबाळाच्या तपस्येने प्रसन्न होऊन प्रगट झालेले भगवान इत्यादि). परंतु भगवंतांच्या अवतारांना इतकेच मर्यादीत ठेवले तर स्वतःच्या जीवनात भगवान दिसण्याची शक्यता शून्य आहे असे वाटते. कारण ना आपले पापकर्म वाल्याकोळ्याइतके प्रचंड आहे ना आपली भगवंताच्या प्राप्तीची तळमळ ध्रुवबाळाइतकी आहे. स्वतःला या वस्तुस्थितीची जाणीव असल्यामुळे सर्वसाधारणपणे वरील श्लोक वाचल्यावर स्वतःला या आयुष्यात भगवान दिसतील अशी खात्री आपल्यात निर्माण होत नाही. परंतु आपली अशी विचारसरणी योग्य नाही असे वाटते. त्यावर आपण प्रथम विचार करु.

असे बघा, डास मारायला आपण काही शस्त्र काढत नाही, टाळीनेच त्याचा समाचार घेतो. अशावेळी माझ्याकडे माझ्या शत्रूचा नाश करण्यास आपले तळहात हेच शस्त्राचा आपल्या जीवनातील अवतार आहे. किंवा स्वतःला जेवायला हवे ही जाणीव झाल्यावर प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षमतेप्रमाणे स्वयंपाक करते. त्यामधील कुणी अतिशय चांगला स्वयंपाकी असेल तर त्याच्या जेवणाची चव अतिशय रुचकर असते तर ज्याला भोजन स्वतःला आरोग्यदायी ठेवण्यास उपयोगी आहे याची प्रखर जाणीव असते त्याचा स्वयंपाक स्वादीष्ट नसला तरी जीवनसत्वांनी परिपूर्ण असतो आणि जो मनुष्य स्वतःच्या जिव्हेला प्राधान्य देतो त्याचे जेवण मसालेदार असते. स्वयंपाक करणे या एकाच घटनेचे अशारीतीने प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे अवतार निर्माण होत असतात. अगदी त्याचप्रमाणे स्वतःच्या तळमळीच्या/भक्तीच्या/जरुरीच्या पातळीनुसार प्रत्येकाच्या जीवनात भगवंताचे अवतार विभिन्न असतात. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पराकोटीच्या भक्तीने श्रीकालीमाता क्षणोक्षणी त्यांच्यासमोर प्रगट व्हायची. आणि त्याचवेळी ज्यांची मातेवरील भक्ति इतकी प्रखर नव्हती त्यांच्याकरीता श्रीरामकृष्ण परमहंसच भगवंताचे अवतार होते!! (जरी स्वतः श्रीरामकृष्ण परमहंसांनी सांगितले की मला अवतार समजू नका तरी त्यांची श्रद्धा डळमळीत झाली नाही.) आणि ज्यांची भक्ति याहीपेक्षा कमी होती त्यांना श्रीरामकृष्ण परमहंस भगवंताचे अवतार वाटले नाहीत! सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या स्वतःच्या जीवनात भगवान दिसणार नाहीत असा आपला जो समज आहे तो चुकीचा आहे. शंख,चक्र गदा पद्म घेतलेल्या चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार नाही हे कदाचित सत्य असेल (तेसुद्धा खात्रीने आपण म्हणू शकत नाही!) पण असे जरी असले तरी त्यामुळे भगवंताचे कुठलेच दर्शन होणर नाही ही आपली भावना चुकीची आहे असे वाटते. या गोष्टीवर सखोल विचार करायला हवा. कारण एकदा आपल्या मनाची अशी पूर्ण खात्री झाली की स्वतःच्या जीवनातसुद्धा भगवान कुठल्यातरी रुपात दिसू शकतो की आपली जीवनाकडे बघायची नजर बदलेल. प्रत्येक क्षणी समोर येणाऱ्या व्यक्तिंकडे वा घटनांकडे आपण हे भगवंताचे रुप आहे का याचा शोध घेण्याच्या नजरेतून बघायला लागू! जीवनाकडे बघण्याची आपली नजर अशा रीतीने सकारात्मक होईल. आणि स्वतःकडे ही नजर सतत असणे साधनेकरीता अत्यावश्यक आहे. यातूनच स्वतःमध्ये आमुलाग्र बदल घडायची शक्यता निर्माण होते.

आता इथे असा प्रश्न उद्भवतो की जरी अशा सकारात्मक नजर जवळ असली तरी स्वतःच्या जीवनातील एखादी व्यक्ति/घटना/तत्व/विचार भगवंतानी माझ्याकरीता घेतलेला अवतार आहे हे ओळखायचे कसे? याचे उत्तर म्हणून आपण या श्लोकांतील बाकीचा भाग बघायला हवा. या शंकेचे समाधान करण्य़ासाठी भगवतांच्या अवतारांचा आपल्यावर काय परीणाम होतो हे सांगितले आहे. ते म्हणत आहेत की ज्यायोगे (म्हणजे ज्याच्या भेटीने, संयोगाने) आपल्या मनातील धर्म जागृत होतो ते ते सर्व आपल्या जीवनातील भगवान आहेत! या अर्थाला आधार म्हणून आपण भगवान श्रीदत्तगुरुंचे चरित्र बघू शकतो. त्यांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले हे प्रसिद्ध आहे. त्यामधे एक गुरु म्हणजे आकाशात मासा घेऊन उडणारी घार होती. ती गोष्ट अशी आहे: पंजातील माश्यामुळे अवतीभोवती इतके कावळे जमले की त्यामुळे एका ठिकाणी बसणे तीला अशक्य झाले. शेवटी कंटाळून जेव्हा तीने स्वतः शिकार केलेला मासा टाकून दिला तेव्हा सर्व कावळे त्या पडलेल्या माशाकडे गेले आणि ती निवांत बसली. हे श्रीदत्तगुरुंनी बघितले आणि त्यांना अशी जाणीव झाली की आपणसुद्धा जीवनात व्यावहारिक गोष्टींना जवळ करतो आणि चिंतेचे कावळे आपणांस स्वस्थ बसून देत नाहीत. एकदा या नश्वर गोष्टींची ममता सोडली की शांतता आपोआप येते! हा विचार मनात आल्याक्षणी त्यांनी जमिनीवरच त्या घारीला साष्टांग नमस्कार घातला आणि तीला आपले गुरु केले, स्वतःच्या जीवनातील भगवंताचा अवतार समजले! जर प्रत्यक्ष भगवान दत्तगुरु असे करतात तर ज्या कारणांनी आपली जीवनातील नश्वर गोष्टींबद्दलची ममता कमी होते त्या सर्वांना आपण भगवंतांचे अवतार का मानू नये? महाभारतातील कथेत कुंतीने भगवंताकडे ‘माझ्या जीवनात सतत दुःखे असावीत, कारण त्यांच्या अस्तित्वाने मला तुझी आठवण होते’ असे दान मागितले याचे कारण आता स्पष्ट होते!

वरील विचारसरणीचा एक परीणाम म्हणजे एकच व्यक्ती वा घटना आपल्या आयुष्यभर भगवंताचा अवतार बनत नाही. जेव्हा त्या व्यक्तीमुळे आपण परत संसारात अडकायला लागतो तेव्हा त्या व्यक्तीमधील भगवान आपल्याकरीता नाहीसा झाला आहे असे आपण समजायला हवे! स्वतःला असे सतत बदलत ठेवायची क्षमता आपण जागृत ठेवली तर वेगळी साधना करायचे कारणच उरणार नाही आणि आपले जीवन ‘सहज’ होईल.

॥ हरिः ॐ ॥

One Response to श्लोक ७/४: आपल्या जीवनातील भगवंत

  1. राजेंद्र वारघडे म्हणतो आहे:

    विषय खूप छान आहें.मात्र तो तुमच्या मनातील दिशेला जायला हवा होता.अर्थात हा तुमचा दोष नाही मात्र मी मोठ्या अपेक्षेने वाचला आणी हे जाणवलं क्षमस्व पण आपल्या जीवनातले त्याचे अस्तित्व अनुभवाने शब्द बध्द व्हावेत ही अपेक्षा आणी त्यासाठी आपले विचार नाही ,कर्म नाही ,तरीही यशाची गोडी मिळते व त्यातून नं हरवणारा व मरणापर्यंत विसरला नं जाणारा अनुभव मिळतो ते प्रसंग हाच त्याचा आपल्या जीवनातील अवतार ,उदा.आपण एखादी कथा हुडकत असतो मात्र मिळत नाही मात्र अचानक एखादी कथा मिळते आणी आपण तीच हुडकत होतो याची आठवण येते हाच तो त्याचा आपल्या जीवनातील अवताराचा प्रसंग मात्र तो कथां रुपात वाचायला मिळावा ही अपेक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: