श्लोक ३: परमार्थावरील अश्रद्धेचे परीणाम

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मसास्य परंतप ।

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ श्लोक ३:९ ॥

मागील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अव्यय आनंद देणारी विद्या तुला अतिशय सहजतेने प्राप्त होईल असे अर्जुनाला सांगितले. परंतु सहजपणे सामोऱ्या आलेल्या गोष्टीला धारण करण्याससुद्धा योग्यता लागते, तीच्याशिवाय हातातोंडाशी आलेला घासपण वाया जाऊ शकतो. उदाहरणार्थ, गंगा स्वर्गातून पृथ्वीवर यायला तयार झाली तरी त्या पवित्र स्त्रोताला झेलायची क्षमता पृथ्वीमध्ये नव्हती. त्यामुळे भगीरथाला शंकरांना प्रसन्न करुन घ्यावे लागले कारण फक्त भगवान श्रीशंकरांकडेच गंगेला झेलायची ताकद होती. अगदी त्याचप्रमाणे, पारमार्थिक ज्ञानाची गंगा आपल्या जीवनात अवतरायला आतुर असली तरी तीचे ग्रहण करण्यास इंद्रियसुखाबद्दल वैराग्य असणे जरुरी आहे. वरील श्लोकातून भगवान श्रीकृष्ण ही वस्तुस्थिती स्पष्ट करीत आहेत. ते म्हणत आहेत: अरे शत्रूंना नेस्तनाबूत करणाऱ्या (अर्जुना), पारमार्थिक तत्वांवर श्रद्धा नसलेले मानव जन्म-मृत्युच्या रहाटगाडग्यात अडकून बसतात व त्यांना कधीही माझी प्राप्ती होत नाही.

वरील श्लोकात भगवान अश्रद्धाळू मानवांबद्दल नाही तर, ज्यांची श्रद्धा परमार्थावर नाही त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कारण गीतेमधील सतराव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की प्रत्येक मनुष्य आपल्या परीने श्रद्धायुक्तच आहे आणि एखाद्या मनुष्याची श्रद्धा कुठल्या गोष्टीवर आहे यावर त्याचे व्यक्तिमत्व बनते. म्हणजे काय तर या जगातील सर्व व्यक्ती श्रद्धामयच आहेत. मग प्रश्न असा पडतो की परमार्थावर श्रद्धा नाही अशा लोकांची श्रद्धा कुठल्या गोष्टींवर असते? एकदा परमार्थावरुन, म्हणजेच आपल्या सद्‌गुरुंपासून नजर हटली की काय दिसते हे इथे पहायला हवे. माऊलींच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘तू जयाप्रति लपसी । तयां विश्व हें दाविसी । प्रकट तै करिसी । आघवेंचि तू ॥ ज्ञा. ४:१४ ॥’ (अर्थ: ज्यांची नजर सद्‌गुरुंवर नसते त्यांनाच विश्व दिसायला लागते, कारण सद्‌गुरु प्रगट झाल्यावर सर्व जीवन सद्‌गुरुमयच झालेले असते.) याचा अर्थ असा की एकतर आपल्या जीवनात परमार्थ असतो नाहीतर भौतिक वा पारलौकीक सुखाची गोडी असते. त्यामुळे वरील श्लोकातील ‘पारमार्थिक धर्मावर अश्रद्धा असणारा’ मानव म्हणजे इंद्रियसुखाची गोडी मनात बाळगणारा मानव असे स्पष्ट होते. आता, ध्यास ही बाब मानसिक आहे, बाह्य कर्मांतून मनातील आस्थेचे दर्शन होईलच असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ठगाने मैत्री केली तरी ती नंतर फसवण्याकरीताच असते, वा कसायाने जनावराची उत्तम काळजी घेणे ही घटना त्याच्या मनातील प्रेम दाखवित नाही तर व्यावहारीक कुशलता दर्शविते. या दृष्टीने बघितल्यास श्लोकातील इशाऱ्याचा अर्थ असा होतो की आपल्या कर्मांमागील हेतूंवर भगवंतांची प्राप्ती होणार का नाही हे ठरते, बाह्य कर्मे कुठली केली त्यावर नाही. उदाहरणार्थ, निव्वळ आपल्या गुरुंचा श्रद्धापूर्वक आदर करणारा साधक परम ज्ञानाचे ग्रहण करण्यास समर्थ राहीलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्या श्रद्धेचे कारण काय आहे यावर लाभ अवलंबून आहे. (सद्‌गुरुसान्निध्यात आवडीने दीर्घकाळ राहीलेले साधकसुद्धा पारमार्थिक अनुभूतीरहित का राहतात याचे हे स्पष्टीकरण आहे असे वाटते.) आपल्या इच्छांवर काय लाभ होणार आहे हे अवलंबून आहे असेच पसायदानातील ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हे चरण सांगत आहे. साधकाने एखाद्या इशाऱ्यासारखे हे उद्‌गार ध्यानात ठेवायला हवे. असो.

परंतु श्लोकातील ‘अप्राप्य’ या शब्दाचा निव्वळ ‘प्राप्ती होणार नाही’ असा अर्थ नाही, तर भगवंताची ‘प्राप्ती होणे कधीही शक्यच नाही’ असा आहे. याचे कारण असे की साधनेचे सर्व मार्ग शेवटी साधकाला प्रेममय, सहिष्णु बनवितात. ‘हे विश्वचि माझे घर’ अशा अवस्थेत सर्वच साधक पोहोचतात व त्यायोगे भक्त या नात्यातच विलिन होतात. आणि भगवंतभक्ति म्हणजे आस्थेची, प्रेमाची अशी जीवंत ज्योत जी अहंकाराच्या वा व्यावहारीक अपेक्षांच्या धुराने आच्छादित नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्या मनात व्यावहारीक गोष्टींवर प्रेम आहे, आस्था आहे तोपर्यंत भक्तीचे बीज आपल्या ह्रुदयात रुजत नाही. आणि जिथे भक्ती नाही तिथे भगवंत कसे येतील? भगवंत आणि भक्त यांच्या उत्कट नात्याचे वर्णन करताना या अध्यायावरील विवेचनातच माऊली म्हणतात: भगवान एकवेळ वैकुंठी नसतील, योगी लोकांनासुद्धा गंवसणार नाहीत पण जो साधक निव्वळ त्यांच्या नामांतच सर्व विश्व बघतो त्याच्यापाशी ते निश्चितच सापडतील (पहा: ओवी क्र. २०७,२०८). इथे मुद्दा असा आहे की भगवंताच्या निव्वळ नामावर प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच त्यांच्या निर्गुण रुपाच्या आस्थेने मन दयार्द्र होणे होय. (भगवंताच्या एका ठराविक रुपाबद्दल आपुलकी वाटणे आणि त्यांच्या नामातच जिव्हाळा वाटणे यात फरक आहे. तो म्हणजे भगवंतांचा कुठलाही अवतार हा त्यांच्या नामाच्या पूर्ण शक्तीचा निव्वळ एक थिजलेला पैलू आहे आणि नाम त्यांच्या निर्गुण रुपाचे पूर्ण प्रतिबिंब आहे!) आणि जेव्हा निर्गुणी भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होते तेव्हा त्रिगुणांत गुरफटलेल्या जगाबद्दल आपोआप तटस्थता येते. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की जेव्हा इंद्रियांवर अवलंबून असलेल्या आनंदापासून साधकाची नजर जेव्हा दूर होते तेव्हाच त्याच्या जीवनात खऱ्या भगवद्भक्तीचा सूर्योदय होतो. आणि या भक्तिप्रकाशातच परमार्थाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकाच्या पहिल्या चरणात पारमार्थिक तत्वांवर प्रेम नसणाऱ्या मानवाला मी कधीही सापडणे शक्य नाही असे म्हणत आहेत.

इथे श्लोकामध्ये अर्जुनाला परंतप का म्हटले आहे हे आपोआप स्पष्ट होते. असे बघा, जीवनात एकच खरे शौर्य आहे. ते म्हणजे स्वतःच्या इंद्रियांचे दमन करुन स्वतःमध्ये जन्मजात असलेल्या पारमार्थिक ज्ञानाला कार्यरत होण्यास संपूर्ण मुभा देणे, आणि त्यातून उत्पन्न झालेल्या प्रेमप्रकाशामध्ये आयुष्याची वाटचाल करणे. आपण सर्वजण जन्मजातच असे शौर्यवान आहोत. परंतु या शौर्याचा उपयोग करायची गरज आपणांस भासत नाही व न वापरल्याने आपला हा गुण सुप्त अवस्थेत गेला आहे. गीतेमधील अर्जुन म्हणजे आपल्यासारखा साधक आहे. त्यामुळे वरील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण ‘परंतप’ या नावाने केवळ अर्जुनालाच नव्हे तर आपणा सर्वांना संबोधित आहेत आणि त्यायोगे आपल्यामध्ये सध्या सुप्त असलेल्या या शौर्यालाच जागृत करीत आहेत असे वाटते. भगवंतांना माहिती आहे की एकदा हे शौर्य आपल्यात जागृत झाले की भौतिक आकर्षणांच्या दलदलीतून झडझडून उठून भक्तिच्या मार्गावर चालण्याशिवाय आपणांस दुसरा पर्यायच राहणार नाही!

शेवटी व्यावहारीक श्रद्धा मनात ठेवणाऱ्या साधकांची नक्की काय गति होते हे भगवान सांगत आहेत. ते म्हणत आहेत की असे साधक जन्म-मरणाच्या फेऱ्यांतच अडकून राहतात. काळाच्या तोंडात टाकलेले भक्ष्य अशा रुपातच त्यांचे अगणित जन्म व्यतीत होतात. कारण आपल्या जीवनात आनंद असावा या भावनेला त्यांनी एका नाशिवंत गोष्टीशी जोडलेले असते. ज्याक्षणी आनंद जोडलेल्या व्यक्तीचा वा गोष्टीचा क्षय होईल त्याचक्षणी अशा मानवाच्या जीवनात नव्या शोधाचा जन्म होईल. अशा रीतीने ते सतत नव्या गोष्टींच्या शोधात मग्न राहणारच आहेत आणि या जन्म-मृत्यूचा खेळातून त्यांची सुटका नाही. चुकून घरात शिरलेल्या पक्ष्याला जशी बाहेर जायची वाट सापडत नाही व तो एका काचेच्या दारावरुन दुसरीकडे ठोकर खात स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्‍न निकराने करीतच राहतो, त्याचप्रमाणे असा गृहस्थ नवनवीन वस्तूंवर ममत्व वाढवित शाश्वत आनंदाची अपेक्षा करीत राहतो. या दुष्टचक्रातून साधकाला सोडविण्यास भगवान त्याच्या जीवनात दुःखाचे प्रसंग आणतात. कारण प्रत्येक दुःखदायक प्रसंगामध्ये आपणांस भौतिक जगापासून दूर ओढण्याची क्षमता आहे. परंतु व्यावहारीक जगात रमलेला मनुष्य या भगवद्‌कृपेला नावे ठेवतो आणि आयुष्यात कधीही दुःख येऊच नये अशाच प्रयत्‍नात राहतो. त्यामुळे त्याला भगवान अप्राप्य राहतात. इंद्रियांच्या आकर्षणातून सुटायचे असेल तर सुखद क्षणांची अपेक्षा न करणे व आलेल्या दुःखाच्या क्षणांतून सावध होणे जरुरी आहे. असे केले नाही तर शाश्वत आनंद आपल्यापासून कोटीएक जन्म झाले तरी दूरच राहील.

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: