श्लोक १६ आणि १७ : भगवंतांचे सर्वव्यापी अस्तित्व

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाऽहमहमौषधम्‌ ।

मन्‍त्रोऽहमहमेवाज्यमहमग्‍निरहं हुतम्‌ ॥ १६:९ ॥

पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ १७:९ ॥

गेल्या दोन श्लोकांतून आपण असे बघितले की दैवीगुणसंपन्न साधक वेगवेगळ्या मार्गांनी भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या जीवनात निरंतर जागृत ठेवायचा प्रयत्‍न करीत असतात. वरकरणी इतके विभिन्न दिसणारे उपाय एकाच भगवंताकडे कसे नेतात असा इथे प्रश्न उद्भवतो. याचे उत्तर देण्यास वरील दोन श्लोकांतून भगवान आपणास स्वतःचे असे रुप दाखवित आहेत जिथे या जगातील सर्व मार्ग एकवटलेले आहेत. पृथ्वीवरील निरनिराळ्या नद्या आपापल्या मार्गांनी एकाच समुद्राला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात तशी ही घटना आहे. साधकाच्या प्रयत्‍नांनुसार जाणविलेले भगवंताचे अस्तित्व विभिन्न असेल, पण हे सर्व अवतार एकाच भगवंताची रुपे आहेत. वरील उदाहरणाचा आधार घेऊन आपण असे म्हणू शकतो की भगवंतांच्या सर्वव्यापी अस्तित्वाच्या समुद्राच्या कुठल्या किनाऱ्याला आपण पोहोचतो एव्हढेच साधनेच्या मार्गावर अवलंबून आहे. भगवंत भिन्न होत नाहीत तर त्यांचे दृष्य रुप प्रत्येक साधकाला पटेल असे निरनिराळे होते. भगवंतांचे असे सर्वव्यापक मूल रुप स्पष्ट करण्यास वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की “मीच क्रतु नावाची (अतिशय कठीण) यज्ञक्रिया आहे, (निव्वळ तेव्हढेच नव्हे, तर) स्मृतीमध्ये सांगितलेल्या सर्व होम क्रिया मीच आहे. सर्व प्राण्यांना जीवन प्रदान करणाऱ्या सर्व वल्ली व खाद्यपदार्थ मीच आहे. (ज्यांच्या उच्चारणांनी अन्न शुद्ध होऊन देवादिकांना अर्पण करण्याजोगे पवित्र होते ते) मंत्रही मीच आहे. (देवांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण केलेला) अग्निही मीच आहे आणि तो प्रज्वलित ठेवण्यासाठी वापरलेले घृतही मीच आहे. (एव्हढेच नव्हे तर) मनात भगवंताबद्दल आस्था ठेऊन नेवैद्य प्रदान करण्याची क्रियासुद्धा मीच आहे (श्लोक १६). या सर्व जगाला उत्पन्न करणारे माता आणि पिता मीच आहे, त्यांना उत्पन्न करणाराही (पितामह) मीच आहे. कुठल्याही शिकण्याचा शेवट (म्हणजे सर्वप्रकारचे ज्ञान) मीच आहे, पवित्र ओंकार हे माझेच रुप आहे, त्यामुळे ऋक, साम आणि यजुर्वेदही मीच आहे (श्लोक १७).” थोडक्यात सांगायचे झाले तर या जगात भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, वा स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी वा इतर कुठल्यातरी व्यावहारीक कारणासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात वा ज्या क्रिया केल्या त्या सर्व मीच आहे असे भगवान इथे स्पष्टपणे सांगत आहेत. कुंडाच्या पाण्यात उभे राहून आपण आंघोळ करुन शुद्ध होतो आणि तेच पाणी सूर्याला अर्पण करतो त्याहून हा प्रकार व्यापक आहे. कारण या उदाहरणात निदान आपले शरीर आणि सूर्य हे कुंडाचा भाग नाहीत. परंतु इथे तेसुद्धा भगवंतच आहेत!

वरील श्लोकांतून असे स्पष्ट होते की सर्व विश्व व विचार (आत्तापर्यंत जे काही म्हटले आहे ते आणि भविष्यात जे कळणार आहे ते सर्व विचार) हे भगवंताचे रुप आहे. साधकाच्या जीवनात हे ज्ञान निव्वळ बौद्धीक नसून ते स्वप्रचितीच्या स्तरावर आले आहे हे कळायचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या आयुष्यात पडलेला मूलभूत फरक. विश्वव्यापी भगवंतसान्निध्याची खात्रीची खूण म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार मूळापासून नष्ट होणे. माउलींच्या शब्दांत सांगायचे म्हणजे:

मजही शरण शरण रिघीजे । आणि जीवत्वेंचि असिजे । धिग्‌ बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥ज्ञा.१४०२:१८।

आपले संकुचित व्यक्तिमत्व नष्ट झाले आहे हे कळण्यास आपला दैनंदिन जीवनातील व्यवहार बघायला हवा. एकदा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव लोप पावली की प्रत्येक क्षणी जे योग्य आहे तसे वर्तन करण्याशिवाय आपणासमोर पर्याय रहात नाही. तसे म्हटले तर सर्वच दर वेळी शक्य तितके योग्य वागायचाच प्रयत्‍न करीत असतो. पण आत्तापर्यंत “योग्य म्हणजे काय” याची व्याख्या आपल्या संकुचित व्यक्तिमत्वावर आधारीत होती, सापेक्ष होती. समोरील प्रसंगाची जी स्वाभाविक मागणी असते तिकडे आपले लक्ष नसते तर आपल्या जीवनात हवे तसे कसे घडेल इकडे आपले ध्यान असते. जेव्हा ही स्वकेंद्रित वृत्ती लोप पावते तेव्हा भगवंत जवळ आला आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा या दृष्टीकोनातून आपले वर्तन कितपत “योग्य” आहे हे आपण बघायला हवे.

आपणास या श्लोकांत दडलेली मेख कळली हे कळायचा दुसरा निकष आहे. तो म्हणजे आपणांत सर्वांभूती सहिष्णूता येणे. ही सहिष्णुता “जगाचे भले करणे” या वृत्तीहून भिन्न आहे हे लक्षात घ्यायला हवे. कारण या मनःस्थितीत जे आहे तसे ( न बदलता) स्विकारणे आहे. हे कसे, हे आपण बघू. आपले सर्व अवयव एकसारखे सुंदर वा शक्तिशाली नसले तरी आपणास कल्पना असते की शरीर सुस्थितीत असण्याकरीता त्यांना असेच असायला हवे. उदाहरणार्थ आपण नखांना ओठांसारखे मुलायम करायचा कधीही प्रयत्‍न करीत नाही. नखांच्या काठीण्यातच त्यांची उपयुक्तता आहे याची आपणांस जाणीव असते. त्याचप्रमाणे, जेव्हा वरील श्लोकांतील भगवंत दिसू लागतो तेव्हा प्रत्येक जीव आपापल्या परीने विश्वाची रचना सांभाळत आहे हे दिसायला लागते. त्यामुळे साधकाच्या मनातील सहिष्णुतेत माधुर्य येते. म्हणजे काय, तर स्वतःच्या मनातील सहानुभूतीच्या आधारावर साधक दुसऱ्याला “सुधारवायचा” प्रयत्‍न करीत नाही, तर समोरील व्यक्ति जशी आहे तशी स्विकारतो. आपण सर्व स्वतःला आहे तसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असल्याने संतांच्या सान्निध्यात आपणास आपोआप एक शांति लाभते. म्हणून असा साधक आणि विश्व यात एक परम सुखद नाते आपोआप निर्माण होते. त्याचेच वर्णन करताना भगवान पुढे म्हणणार आहेत की “यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः (गीता श्लोक १५/१२)”. दैवीगुणसंपन्न साधकांच्या साधना विभिन्न असल्या तरी ते एकाच भगवंताची आराधना करीत आहेत कारण प्रत्येकात स्वव्यक्तिमत्वाचा लोप आणि सहिष्णुता हे गुण दिसतात. अशा रीतीने सर्व साधनमार्गांतील एकात्मता वरील श्लोकांतील भगवंतांच्या रुपामुळे स्पष्ट होते. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s