श्लोक १८ आणि १९ : भगवंताचे सर्वव्यापी अस्तित्व – भाग २

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।

प्रभव: प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥ १८ ॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्यत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च ससच्चाहमर्जुन ॥ १९ ॥


गेल्या लेखातून आपण भगवंतांचे अमूर्त अस्तित्व सर्व जगाला कसे व्यापून आहे हे बघितले. आता, वरील दोन श्लोकातून, या निर्गुण अस्तित्वाचे अजून काही गुण भगवान अर्जुनास सांगत आहेत, त्यांच्यामुळे आपल्या जीवनावर कुठले दूरगामी परिणाम होतात हे आपण बघू. भगवान म्हणत आहेत की : “
सर्व कर्मांचे उद्दीष्ट्य (गति), त्या कर्मांना पोसणारा (भर्ता), त्यांचा स्वामी (प्रभु), कर्मे बघणारा (साक्षी), कर्मे करताना जी जागा लागते ती जागा (निवास), कर्मांत अडचण आली तर ज्याला शरण जावे अशी शक्ति (शरणं), सर्वांना कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करणारा (सुहृत), ज्याच्यामुळे हे सर्व चराचर उत्पन्न झाले आहे असा (प्रभवः) आणि ज्याच्यातच ते विलीन होणार आहे असा ( प्रलयः), ज्याच्यातच हे विश्व स्थिर आहे (स्थानं) आणि ज्याच्याकडे सर्वकर्मांची फले साठविलेली आहेत (निधानं), आणि विश्वाच्या उत्पत्ती केल्यानंतरही ज्याच्यात काहीच बदल झालेला नाही (बीज-अव्ययम्‌), ज्याच्या तेजाच्या आधारावर सूर्य बाष्पीभवन करु शकतो (तपाम्यमहं) आणि वरुणदेव पाऊस पाडतो (वर्षं). अशारीतीने बाष्परुप पाणी साठविणारा आणि परत देणारा (निगृह्णाम्युत्सृजामि), भक्तांना अमरत्व देणारा (अमृतं) आणि व्यावहारीक जीवांना मृत्यु देणारा (मृत्युश्च), एखादी वस्तू अस्तित्वात आहे अशी भावना देणारा (सत्‌) आणि (कालांतराने) ती नाहीशी झाली अशी जाणीव उत्पन्न करणारा (असत्‌) सर्वकाही मीच आहे अर्जुना. (श्लोक १८,१९)

वरील श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण असे सांगत आहेत की सर्व कर्मे, ती करण्याचे स्थळे आणि त्यांची फले इत्यादी सर्व त्यांच्यातूनच उत्पन्न होतात आणि त्यांच्यातच विलीन होतात. परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या सर्व साधकांना या सत्याचे (बौद्धीक) ज्ञान असते. यात नवीन असे काही नाही. परंतु प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात या वस्तुस्थितीचे दर्शन आपणास होत नाही. त्यामुळेच आपण म्हणू शकतो की “मी अभ्यास केला आणि त्यामुळे मार्क्स्‌ चांगले मिळाले पण ते मी भगवंताला अर्पण केले” वा “आज गाडी चालविताना मी सावधान असल्याने अपघात झाला नाही. माझ्याऐवजी दुसरा कुणी असता तर नक्की अपघात झाला असता” किंवा “आज मी स्वयंपाक चांगला केला आहे, तरीसुद्धा तो कुणाला आवडला नाही तर भगवंताची इच्छा”. या सर्व प्रचलित असलेल्या वाक्यामधून असे दिसून येते की कर्म करताना आपली भावना “ती मी करीत आहे” अशी आहे. निव्वळ त्यामुळेच स्वतःच्या कर्मांची फले भगवंतांना आपणास अर्पण करावी लागतात! म्हणजे काय, तर साधक सर्व काही भगवानच आहे हे मानतो आणि त्याचवेळी आपल्या कर्मांचे कर्तृत्वसुद्धा स्वतःकडे घेतो. यामुळे आपोआपच त्यांची फले स्वतःची आहेत अशी त्याची समजूत होते व ती परत भगवंताला अर्पण करण्याची पाळी येते. जर भगवान स्वतः ही कर्मे आपल्या देहाचे उपकरण वापरुन करवून घेत आहे अशी समज असेल, तर केलेल्या कर्मांची फले परत त्यालाच अर्पण करण्याचा आपणास अधिकार रहात नाही! विचारातील ही मूलभूत विसंगती साधकाला भगवंतापासून दूर ठेवते.

साधकाच्या जीवनात ही विसंगती असण्याचे एक मुख्य कारण म्हणजे परमार्थाचे नक्की काय कार्यक्षेत्र आहे याबद्दलची अनभिज्ञता. सर्वसाधारणपणे आपण परमार्थाचे नियम जीवनातील प्रमुख, ढोबळ गोष्टींना लावतो. उदाहरणार्थ, अतिशय कठीण परीक्षेत यशस्वी होणे, अचानक आलेल्या संकटाला सामना देणे इत्यादी. परंतु दररोजचे दात घासताना, मित्रांबरोबर फिरायला जाताना, ब्रेड आणायला दुकानात असताना इत्यादी क्षुल्लक गोष्टींत आपण परमार्थाची जाणीव ठेवणे जरुरी मानत नाही. जीवनात महत्वाच्या गोष्टी क्वचित येत असल्याने होते काय तर, परमार्थाचे कार्यक्षेत्र आपले दैनंदिन जीवन रहात नाही. दुपारचे जेवण करत असताना भगवद्गीतेतील श्लोकांचा काय उपयोग? अशी आपली विचारसरणी होते. या वैचारीक दृष्टीकोनाचा दुष्परिणाम म्हणजे आपला “दैनंदिन कर्मे मी करीत आहे” हा अहंकार नष्ट न होता हळूहळू वाढायला लागणे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवान दूर आहेत. माउलींच्या शब्दांत सांगायचे म्हणजे “मजही शरण रिघिजे । आणि जिवित्वेंचि असिजे । धिक बोलीं यियां न लजे । प्रज्ञा केवीं ॥ ज्ञा. १४०२:१८॥” वैचारीक गोंधळामुळे उत्पन्न झालेल्या स्वतःच्या अशा अहंकाराचा संपूर्ण विनाश करण्यास हे दोन श्लोक अतिशय उपयुक्त आहेत. आपल्या जीवनातील यच्चयावत क्रिया परमार्थाच्या कार्यक्षेत्रात आणणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे असे यांच्यामुळे असे लक्षात येते. जोपर्यंत आपण व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी विभागणी करीत आहोत तोपर्यंत आपणास आत्मशांतिचा अनुभव येणे अशक्य आहे. वरील श्लोकांमध्ये भगवंतांनी फक्त महत्वाची कर्मे मी करतो असे न म्हणता सर्व कर्मे मी पोसतो असे सांगितले आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे.

आपले सर्व अस्तित्व आणि कर्तृत्व भगवंतांनी सांभाळलेले आहे, यात स्वतःचा कार्यभाग काहीही नाही अशी जाणीव जेव्हा आपल्या विचारसरणीत मूळ घेऊ लागते तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचे ओझे आपल्या मनावरुन उतरते आणि आपण स्वच्छंदपणे या विश्वात विहार करु लागतो. आपण जीवनात काहीही केलेले नाही या ज्ञानामुळे आपल्यात एक नैसर्गिक नम्रता येते. विचारसरणीवरील अहंकाराचा काळा चष्मा गेल्यामुळे सर्व चराचरात भरलेला भगवानरुपी प्रकाश दिसायला लागतो. आपल्या मनात ओसंडून वाहणारा आनंद भरतो. फक्त काही महत्वाच्या गोष्टी भगवंतांना अर्पण करुन दैनंदिन जीवनात स्वकर्तृत्वाचा झेंडा फडकविणाऱ्यांना ही स्थिती प्राप्त होणे असंभव आहे. या श्लोकांवरील भाष्यात अशा सर्वसाधारण साधकांच्या अवस्थेचे वर्णन करताना माउली म्हणते की “म्हणोनि अर्जुना मी नसे । ऐसा कवण ठाव आहे । परी प्राणियांचे दैव कैसे । जे न देखती माते ॥ ज्ञा. ३००:९॥” आणि परमार्थाचे कार्यक्षेत्र मर्यादीत ठेऊन जीवन जगणाऱ्या साधकांबद्दल माउली म्हणते की “आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंविण ॥ ज्ञा. ३०६:९॥

व्यावहारिक जीवन आणि साधना या दोन्हींकडे समान लक्ष ठेवणाऱ्या साधकांची शेवटी काय अवस्था होते याचे वर्णन पुढील दोन श्लोकांत भगवंतांनी केलेले आहे. ते आपण पुढच्या वेळी बघू. आज एव्हढेच.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s