श्लोक २० आणि २१: निष्काम भक्तीची आवश्यकता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्‌वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥ गीता २०:९ ॥

ते तं भुक्त्‌वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ गीता २१:९ ॥

परमार्थाचे ज्ञान होण्यास भगवंताचे खरे रुप जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच नवव्या अध्यायातील सोळाव्या श्लोकाच्या “अहं क्रतु ..” पासून एकोणीसाव्या श्लोकातील “ .. सदसच्चाहमर्जुन” पर्यंत भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचे सर्वव्यापी रुप प्रगट केले आहे. भगवंताच्या कुठल्यातरी विशिष्ट रुपालाच सर्वस्व न मानता या विराट रुपाची पूर्ण कल्पना असलेले साधक विरळाच आढळतात. ज्या साधकांना या रुपाची ओळख नाही त्यांची दिशाभूल कशी होते हे आपण पुढे बघूच (श्लोक २३ ते २५), परंतु इथे, वरील दोन श्लोकांतून, निव्वळ ज्ञान असणेसुद्धा पुरेसे असत नाही हे भगवंतांनी सांगितले आहे. भगवंताच्या विश्वव्यापी रुपाची जाणीव असणारे साधकसुद्धा प्रपंचात कसे अडकतात हे सांगताना भगवान म्हणत आहेत की “(मला संपूर्ण जाणून घेऊन मग) सोमरसाचा आस्वाद घेणारे, ज्यांच्या पापांचा क्षय झाला आहे असे साधक जेव्हा वेदांच्या सांगण्यानुसार माझी भक्ति करताना स्वर्गाची इच्छा धरतात तेव्हा त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन तेथील उपभोग प्राप्त होतात (२०). स्वर्गलोकातील अनंत भोगांचा लाभ घेण्याने त्यांची (जमा केलेली) पुण्ये खर्च होतात आणि ते मृत्यूलोकात परत येतात. अशारीतीने वेदांनुसार कर्मकरणारे आपल्या इच्छांनुसार (स्वर्ग आणि पृथ्वी अशा) निरंतर येरझाऱ्या घालत असतात (२१) .”

जगात सूक्ष्म गोष्टीचा आनंद जाणणारे क्वचित आढळतात. उदाहरणार्थ, शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपटातील गाणी जास्त लोकप्रिय असतात, पौष्टीक खाण्यापेक्षा चमचमीत आहार आवडतो आणि सखोल विचार शांतपणे सांगणाऱ्यांपेक्षा भावनिकपणे, टाळ्या पडतील असे बोलणारे चतुर वक्ते आवडतात. ही गोष्ट पारमार्थिक साधकांनाही लागू पडते. बरेचसे साधक गुरुंकडे एखाद्या साचेबद्ध साधनेच्या शोधात येतात. स्वतःला ठराविक नियमांमध्ये बांधून, समविचाराच्या व्यक्तींच्या सान्निध्यात काल व्यतीत करणे यामध्ये साधनेची परीसीमा आहे अशी त्यांची विचारधारणा असते. या दृष्टीकोनाने साधकांचे विश्व सिमीत होते आणि सीमारेखा असलेल्या प्रांगणात विश्वरुपी भगवंताला बघणे अशक्य आहे. परंतु काही साधक साधनेला एका चौकटीत वावरायचे बंधन न घालता स्वतःच्या संपूर्ण जीवनाचे प्रांगण बहाल करतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना म्हणजे साधनेचे रुप आहे अशी त्यांची खात्री असते. वेदांमधील भक्ती म्हणजे बाकी काही नसून आपल्या संपूर्ण अस्तित्वाला भगवंतात विलीन करणे आहे याची जाणीव त्यांना असते. परंतु असे साधकसुद्धा संसारचक्रात अडकून पडू शकतात असे भगवान या दोन श्लोकांतून सांगत आहेत.

आपल्या मनात कुठल्या इच्छा दडलेल्या आहेत हे कळणे अशक्यप्राय आहे कारण मन स्वतःच्या कामना दडविण्यात अतिशय चलाख आहे. परंतु सुप्त इच्छा जेव्हा जागृतावस्थेत यायला लागतात तेव्हा आपले वागण्यातील संतुलन जाते. आणि ही गोष्ट लपून रहात नाही. इच्छांच्या या वैशिष्ट्यामुळे आपणापुढे स्वतःच्या लपलेल्या इच्छांना जाणण्याचा एक मार्ग उपलब्ध होतो. तो म्हणजे स्वतःच्या दैनंदिन वर्तनाकडे तटस्थेपणे पाहून जेव्हा एखाद्या प्रसंगात आपले संतुलन जाते तेव्हा आपली कुठलीतरी इच्छा कार्यांन्वित झाली आहे असे निःशंकपणे समजणे. संतुलन जाणे म्हणजे काय, तर त्या प्रसंगाला योग्य तऱ्हेने सामोरे न जाता भावनिकपणे तोंड देणे होय. अचानक प्रेमाचा खूप पुळका येणे वा प्रचंड राग येणे या दोन्ही गोष्टींतून समदृष्टीचा विनाश दिसून येते हे जाणणे जरुरी आहे. जेव्हा आपली अशी अवस्था होते तेव्हा आपण भगवंतभक्तीला विसरून आपल्या व्यक्तिमत्वात अडकलेलो असतो. आणि एकदा संकुचित व्यक्तिमत्वाचा स्वीकार केला की स्वतःच्या देह वा मनाने केलेल्या कर्मांच्या बंधनांना आपण टाळू शकत नाही. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रांत गुंतण्याखेरीज आपणास पर्याय रहात नाही. सबंध आयुष्य भगवंतभक्तीत व्यतीत करुनही जर शेवटी काही इच्छा राहीली असेल तर परत जन्म घ्यावा लागतो ही गोष्ट आपणांस पुराणातील भरतराजाची कहाणी सांगते. परम भगवंतभक्ती असूनही हरीणाच्या पिल्लावर प्रेम असल्याने त्याला परत दोन जन्म घ्यावे लागले (एक हरीणाचा आणि दुसरा जडभारताचा). लक्षात घ्या की आपल्या आयुष्यात साधनेचे उपचार कठीण नसले तरी निव्वळ साधनेच्या मार्गावर निरंतर राहणे ही आपल्यावरची जबाबदारी सांभाळणे कठीण असते. परमार्थाचा मार्ग खडतर आहे तो याच कारणानी. कारण सर्वसाधारणपणे, साधना सुरु करताना जो उत्साह असतो तितकाच उत्साह दहा-बारा वर्षांनंतर रहात नाही! उदाहरणार्थ, पहिल्यांदा वारी करताना आपले मन खूप तरल आणि संवेदनाशील असते. त्यामुळे पहिल्या वारीत आपले सर्व लक्ष साधनेकडे असते. एकदा वारीची सवय झाली की मनाची तशी अवस्था रहात नाही! “अतिपरिचयात्‌ अवज्ञा” हा नियम साधनेला (आणि गुरुंना) सुद्धा लागू पडतो.

स्वतःचे मन साधनेविषयी निबर झाले की मगच मनात इच्छांचा वावर सुरु होतो. त्यामुळे जीवनात ऐहिक वा पारलौकीक इच्छांचा प्रवेश होऊ नये यासाठी आपणापुढे एक उपाय निर्माण होतो. तो म्हणजे आपली साधना नित्यनूतन बनविणे. नवीन गोष्ट आवडीने शिकताना आपले सर्व मन त्या ठिकाणी एकाग्र होते आणि बाकी सर्व गोष्टींना विसरते. ही अवस्था आपल्या जीवनात साधनेच्या बाबतीत निरंतर जागृत ठेवणे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. साधनेचे बाह्य उपचार जरी तेच तेच असले तरी ते करतानाची आपली मानसिक स्थिती नित्यनूतन असते याची जाणीव ज्या साधकाला असते तो साधक आपल्या नित्यनैमित्तिक साधनेला सतत नव्या नजरेने पाहतो. ही वस्तुस्थिती आपल्या मानसिक स्थितीकडे तटस्थपणे पाहील्याखेरीज दिसत नाही. आणि स्वतःकडे त्रयस्थासारखे पाहणे म्हणजेच प्रपंचातून मुक्त होणे आणि त्याचाच अर्थ म्हणजे भगवंताचे स्मरण करणे. माउलींनी हरिपाठात म्हटलेले आहेच की प्रापंचिक इच्छांचा लोप म्हणजे हरिनाम घेणे होय. पहा: नामपाठ मौन प्रपंचाचे ॥ज्ञा. हरि. ९॥

सांगायची गोष्ट अशी की एकदा भगवंताच्या सर्वव्यापी अस्तित्वाची जाणीव झाली आणि त्यायोगे भगवंतभक्ति निर्माण झाली तरी त्यानंतर आपण स्वतःचे आयुष्य कसे जगतो यावर आपली गति अवलंबून असते. जो साधक आपल्या इच्छांकडे (मग त्या कितीही उदात्त असू दे) दुर्लक्ष करीत नाही त्याच्या भक्तीचा विनियोग आपोआप इच्छापूर्तींकरता होतो. या परीणामावर साधकाचे नियंत्रण नसते! आणि भक्तीच्या अशा वापराने जे सुख लाभते ते शाश्वत नसून तात्पुरते असते. त्यामुळे कालांतराने साधक परत भक्तीपूर्वीच्या पदावर येतो. लक्षात घ्या की जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याकरीता फक्त भक्ती पुरेशी नसून, “निव्वळ भक्ती, बाकी काही नाही” ही अवस्था होणे आवश्यक असते. आपणा सर्वांना स्वजीवनात असे सावध राहणे जरुरी आहे. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास हातून जाण्याचा धोका आहे. आपण पुढच्या श्लोकात शंभरटक्के भक्ती करण्याऱ्यांना आपोआप, इच्छा न करीता कुठले फल मिळते हे पाहू.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s