श्लोक २२ : निरंतर शांति – निष्काम भक्तीची खूण

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ २२:९ ॥

भगवंताच्या सर्वव्यापी अस्तित्वाला जाणणाऱ्या भक्तांचे दोन प्रकार असतात आणि त्यातील व्यावहारीक इच्छांचा लोप न झालेल्या भक्तांची उन्नती कशी तात्पुरती असते हे आपण २० आणि २१व्या श्लोकांच्या विवरणात बघितले. आता या श्रीमद्भगवद्गीतेतील अतिशय प्रसिद्ध श्लोकातून निव्वळ भगवंतभक्तीला प्राधान्य देऊन जगणाऱ्या भक्तांबद्दल बोलताना भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: “बाकी कुठलीही इच्छा महत्वाची न मानता निव्वळ माझ्यावर प्रेम ठेऊन दैनंदिन जीवन जगणाऱ्या भक्तांची काळजी (‘क्षेम’) आणि जवळीक (‘योग’) मी स्वतः सांभाळून घेतो (गीता २२:९).”

आपल्या जीवनातील बहुतांशी घटना नियमबद्ध असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर दात घासणे, भूक लागल्यावर खाणे इत्यादी. परंतु बऱ्याचवेळा आपणास समोरील प्रसंगाला तोंड देण्यास विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, घरातील व्यक्तींची मर्जी सांभाळणे, कचेरीत सहकाऱ्यांशी कितपत संबंध ठेवणे इत्यादी. आपण या दुसऱ्या प्रकारच्या गोष्टींवर प्रतिक्रिया कशी देतो यातून आपले व्यक्तिमत्व दृष्यरुपात समोर येते. उदाहरणार्थ, घरात मनासारखे न घडल्यावर जर आपण आरडाओरड करत असलो तर आपण रागीट आहोत आणि जर तसे न होण्यामागचे कारण संतुलितपणे शोधत असलो तर समजुतदार आहोत इत्यादी (जर आपल्या वर्तनातून कुठलाही निष्कर्ष निघत नसेल तर आपण बेभरवशी आहोत असे म्हणायला हरकत नाही). त्यामुळे, विचार करुन तोंड द्याव्या लागणाऱ्या घडामोडींत स्वतःचे वर्तन कसे होते हे बघितले तर आपण आपले व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो.

जोपर्यंत देह अस्तित्वात आहे तो पर्यंत मनात इच्छा येणे साहजिक आहे. त्यामुळे साधकाने निष्काम होणे म्हणजे मनात कुठलीच इच्छा नसणे अशी अवस्था होणे नसून, मनातील इच्छा आपल्या वर्तनाला आकार देणे थांबणे होय. ही गोष्ट ओळखणे कठीण आहे. परंतु निष्काम भक्तीची दृष्य खूण आहे ती म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा लोप. भगवंताचे सर्वव्यापी रुप जाणून त्याच्या भक्तीत रममाण होणाऱ्याचे व्यक्तिमत्व नाश व्हायला लागते कारण निर्गुण, विश्वव्यापी भगवंताचे ध्यान करणे आणि संकुचित व्यक्तिमत्व बाळगणे या दोन गोष्टी इतक्या परस्परविरोधी आहेत की त्या एकत्र नांदणे असंभव अहे. त्यामुळे साधकाला आपली भक्ती निष्काम आहे की नाही हे कळण्याचा मार्ग म्हणजे स्वतःवर आपल्याच व्यक्तिमत्वाचा पगडा कितपत आहे हे बघणे. आता स्वव्यक्तिमत्वाचा नाश होणे म्हणजे काय? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपण स्वतःला सांभाळणारच, ज्यायोगे आपले व्यक्तिमत्व आहे असे वाटणारच. “व्यक्तिमत्व नष्ट होणे” याचा अर्थ असा की आपले व्यक्तिमत्व नक्की काय आहे हे कळायला मार्ग शिल्लक न राहणे. आपण वर बघितले की विचार करुन वागावे अशा घटना जोपर्यंत आपल्या जीवनात अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपण स्वतःचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो. त्यामुळे भगवंताचे निरंतर अनुसंधान ठेवणाऱ्या साधकांच्या जीवनात विचार करुन वागावे अशी घटना रहात नाही हे स्पष्ट होते. एखादे लहान बालक जसे प्रत्येक गोष्टीला सहजपणे सामोरे जाते त्याप्रमाणे अशा भक्ताची अवस्था असते (आणि लहान बालकाचे व्यक्तिमत्व काय आहे हे तो मोठा होईपर्यंत कळत नाही).

त्यामुळे निष्काम भक्त एखाद्या बालकाप्रमाणे जीवनाला सामोरे जातो हे स्पष्ट होते. दैनंदिन जीवनात बालकावस्थेत राहण्याचा परीणाम म्हणजे स्वतःला अनुकूल गोष्टी घडतीलच याचा भरंवसा नष्ट होणे. किंबहुना तशा घडणार नाहीत याचीच जास्त शक्यता असते. म्हणूनच ही अवस्था सर्वसाधारण साधक टाळत असतो. आपणा सर्वांना “आधी संसार सांभाळ आणि मग तुझा काय परमार्थ आहे तो कर” असा सल्ला हितचिंतकांकडून अनेकवेळा मिळतो याचे मूळ कारण हेच आहे. स्वतःचे जीवन अनिश्चिततेत जगणे कुणाला पसंत आहे?! म्हणूनच बहुतांशी साधक परमार्थाचे तत्व संपूर्णपणे जाणूनसुद्धा स्वतःला सांभाळून भक्ती करतात. परंतु, क्वचित एखादा साधक भगवंतभक्तीतील हा शेवटचा अडथळासुद्धा ओलांडून स्वतःचे जीवन बेदरकारपणे भगवंतभक्तीत संपूर्णपणे झोकून देतो. लहान बालकाला ज्याप्रमाणे सांभाळण्यास पालक जबाबदार असतात त्याचप्रमाणे या बालकावस्थेतील प्रौढाला कुणीतरी सांभाळणे अत्यावश्यक असते. (याचे एक पराकोटीचे उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. ते कालीमातेच्या भक्तीत इतके भान विसरायचे की दिवसेंदिवस खाणे खायचे विसरायचे! त्यांचा भाचा हृदयनाथ जबरदस्तीने त्यांच्या मुखात कधी एक-दोन चमचे दूध वा भात घालायचा म्हणून त्यांचा देह अस्तित्वात राहीला.) या विवेचनावरुन परमभक्ताची कुणीतरी दुसऱ्याने काळजी घेणे जरुरी आहे हे स्पष्ट होते. या वस्तुस्थितीमुळेच वरील श्लोकातून भगवान असे आश्वासन देत आहेत की जेव्हा भक्त निष्काम भक्तीत स्वतःला विसरतो तेव्हा लहान अर्भकाची सर्व काळजी जशी आई (अतिशय प्रेमाने) घेते त्याहीपेक्षा अधिक काळजी घ्यायला मी स्वतः पुढे येतो.

परंतु ‘अनन्य भक्ताचे आयुष्य सुरळीत जाईल याची काळजी मी घेतो’ या भगवंतांच्या आश्वासनामध्ये एक मेख आहे. ती म्हणजे सुखी असणे म्हणजे काय याची व्याख्या. सर्वसामान्यपणे स्वतःचे शरीर तंदुरुस्त असणे, आपल्या कुटुंबियांचे कल्याण होणे आणि भविष्याची तरतूद असणे अशा स्थितीला आपण सुखी असणे म्हणतो. परंतु खरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनातील अस्वस्थता निघून जाणे हे आपण सुखी होण्याचे कारण आहे. याचा अर्थ असा की जीवनात सर्व ठीक आहे ही आपली समजूत होण्याचे मूळ कारण स्वतःच्या मनातील शांतता आहे. म्हणून जो साधक कुठलीही पर्वा न करता निव्वळ भगवंतभक्तीत स्वतःला झोकून देतो त्याची काळजी घ्यायला भगवान त्याच्या मनात निरंतर शांती ठेवतात. अशावेळी कदाचित इतर लोकांच्या दृष्टीत साधकाचे जीवन अतिशय खडतर दिसत असण्याची शक्यता आपण नाकारु शकत नाही. म्हणजे काय तर ज्या साधकाची काळजी स्वतः भगवान घेत आहे त्याला एखादवेळेस दोन वेळचे अन्न मिळत नसेल, कदाचित त्याच्या घरी त्याला कुणी मान देत नसेल आणि त्याच्या मनाप्रमाणे या जगात काहीच घडत नसेल. परंतु तरीसुद्धा त्याच्या मनात कायम शांति असणार यात शंका नाही! भगवंताचे ‘योगक्षेम वहाम्यहम्‌’ या वचनाचा संदर्भ भारतीय जीवन विमा निगम सारखा बाह्यबाबतीत नसून संपूर्णपणे अंतर्गत आहे. आपले जीवन सुरळीत आहे याची जाणीव फक्त त्या भाग्यवान साधकाला असते. त्याच्या कुटुंबियांनासुद्धा तसेच वाटेल याची जबाबदारी भगवान इथे घेत नाहीत हे जाणणे जरुरी आहे! याचे एक उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांच्या पत्‍नी श्रीसंत शारदामाता होय. कित्येक वर्षे त्या दक्षिणेश्वराच्या मंदिरात अतिशय कठीण परिस्थितीत राहल्या. जिन्याखालच्या खोलीत दिवसभर रहायचे, तिथेच अनेक लोकांचा स्वयंपाक करायचा, आणि अनेक महिन्यांतून कधीतरी एकदा श्रीरामकृष्णांबरोबर एकट्याला थोडा वेळ मिळणे अशी त्यांनी अनेक वर्षे काढली. पण नंतर त्या स्वतः त्या काळाबद्दल म्हणाल्या की “तेव्हा इतकी प्रतिकूल स्थिती असतनासुद्धा माझ्या हृदयात एक आनंदाने भरलेला हंडा असायचा, जो निरंतर ओसंडून वहायचा. त्यामुळे मी दुःखात आहे या भावनेचा स्पर्शसुद्धा तेव्हा मला कधी झाला नव्हता.” भगवंतांची भक्तांची काळजी घेण्याची पद्धत अशी आहे! भक्‍ताच्या ते मनात आनंदाचा घडा निरंतर भरलेला ठेवतात मग भले त्याचे बाह्य जीवन लौकीकरीत्या सुरळीत असेल वा नसेल. त्यांच्या अशा ‘क्षेम’ घेण्यातच आपोआप ‘योग’ होतो. बाह्य जीवन मनासारखे झाले तरी ‘योग’ होईल याची खात्री आपण देऊ शकत नाही. पण या देवदत्त शांतीतच योग भरलेला आहे (म्हणूनच पुढे बाराव्या अध्यायातील बाराव्या श्लोकात भगवान म्हणतील की सर्व गोष्टींमधील श्रेयस्कर गोष्ट म्हणजे ‘निरंतर शांति’ होय).

थोडक्यात सांगायचे झाले तर अनन्य भक्तांचे जीवन सुखरुप होते यात शंका नाही. पण हे सुख संपूर्णपणे अंतर्गत असून फक्त त्या भक्ताचा त्यावर मालकीहक्क असतो. त्याच्या बाह्यजीवनात कुणी कितीही जवळ असले तरी त्याला ते सुख मिळेल असे भगवान कुठेही म्हणाले नाहीत हे लक्षात ठेवणे जरुरी आहे! आपण भक्तीत मग्न राहीलो तर प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घेईल असा समज असणाऱ्यांनी प्रामाणिकपणे विचार करायला हवा की आपल्याला अशा सुखाबद्दल खरोखर ओढ आहे का?

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s