श्लोक २३-२५ : एकलक्ष भक्तीची आवश्यकता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्‍ते श्रद्धयाऽन्विताः

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥ गीता २३:९ ॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चयवन्ति ते ॥ गीता २४:९ ॥

यान्ति देवव्रता देवान्‌ पितृन्‌ यान्ति पितृव्रताः ।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌ ॥ गीता २५:९ ॥

नवव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकातून भगवंतांचे खरे रुप जाणून भक्ति करणाऱ्या साधकांना कुठले फल मिळते हे सांगितले. वरील श्लोकांतून इतर सर्वसाधारण भक्तांना काय मिळते याबद्दल सांगताना भगवान म्हणत आहेत: “(माझ्या अनंत रुपांपैकी) काही ठराविक रुपांवर परमभक्ती करणारेही खरे म्हणजे माझेच भक्त आहेत, परंतु त्यांची भक्ति विधीपूर्वक नसते (२३). (खरी गोष्ट अशी आहे की) कुणाचीही भक्ती केली तरी ती माझीच भक्ती असते. पण या वस्तुस्थितीबद्दल भक्त अनभिज्ञ असल्याने त्यांची साधना अपुरी राहते (२४). म्हणून, असे भक्त ज्या ज्या इष्ट देवतेची भक्ती करतात, त्या त्या देवतेच्या लोकांत त्यांना गति मिळते. फक्त मला जाणून भक्ति करणारेच माझ्यापर्यंत पोहोचतात (२५).”

आपणास या श्लोकांतून भगवान साधनेचे लक्ष्य साधकाच्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे सांगत आहेत. भगवंताकडे जाण्यास प्रत्येक साधक उत्सुक असला तरी भगवंताचे कुठले रुप त्याच्या मनात आहे हे महत्वपूर्ण आहे. लक्षात घ्या की जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात परमार्थ म्हणजे काय, किंवा भगवंताचे रुप कसे आहे याबाबत सुनिश्चित कल्पना असतात. उदाहरणार्थ, कोण म्हणते की दीनदुबळ्यांना मदत करणे म्हणजेच भगवंताची पूजा होय, तर कुणी स्वतःकडे दुर्लक्ष करुन कुटुंबातील व्यक्तींची योग्य काळजी घेण्यात साधनेची परमावधी मानतो. कुणाला समोरील व्यक्तीच्या समाधानात भगवंत दिसतो तर कुणी आपले (व्यावहारीक) कर्म कुशलतेने करण्यात भगवंताची भक्ती आहे असे मानतो. या वस्तुस्थितीचा एक परीणाम म्हणजे सिनेमातील नटांपासून राजकारणी व्यक्तीपर्यंत प्रत्येकजणांची भगवान म्हणजे काय याबद्दलची व्यक्तव्ये वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवणीत छापून आलेली दिसतात. जर या सर्वांनासुद्धा भगवान म्हणजे काय हे कळले असेल तर यांच्यात आणि संतांमध्ये काय मूलभूत फरक आहे? किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या प्रसिद्ध कवीने लिहीलेल्या भक्तीगीतात आणि श्रीसंत तुकारामांच्या अभंगात काय फरक आहे? असे प्रश्न साहजिकपणे निर्माण होतात. वरील श्लोकांतून भगवान आपणास हा फरक सांगत आहेत असे वाटते. प्रत्येकजण आपापल्या मतिनुसार देवाची साधना करीत असला तरी पूर्ण ज्ञान नसलेले साधक जास्तीतजास्त त्यांच्या इष्ट देवतेच्या स्थानापर्यंतच पोहोचू शकतात. आपणांस जर भगवान श्रीकृष्णांपाशी जायचे असेल निव्वळ संतांच्या सांगण्यावरच आपण विश्वास ठेवायला हवा. कारण केवळ त्यांचीच वक्तव्ये ज्ञानोत्तर भक्तीवर आधारीत असतात.

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, वरील श्लोकांतील चेतावणी निव्वळ भगवान श्रीकृष्णांच्या निर्गुण रुपाकडे दुर्लक्ष करुन इतर देवतांना भजणाऱ्या भक्तांसाठीच आहे असे नव्हे तर भगवंताच्या खऱ्या रुपाकडे लक्ष ठेऊन सुरु केलेल्या साधनेत मग्न असलेल्या साधकांनाही आहे. कारण अशा साधनेच्या मार्गात क्षणोक्षणी क्षुद्र अपेक्षेंचे अनंत फाटे फुटत असतात. वरकरणी समांतर दिसत असलेले हे मार्ग हळूहळू वळण घेऊन काही काळाने वेगळ्याच स्थानाला घेऊन जातात. प्रसिद्धीची अपेक्षा, गुरुकृपेने झालेल्या ज्ञानाबद्दलचा अभिमान, आपलाच मार्ग योग्य आहे अशी खात्री इत्यादी भावना साधकाच्या जीवनात अतिशय सूक्ष्मपणे शिरतात आणि नंतर इतक्या प्रभावी होतात की साधना व्यवस्थित चालू ठेवणारे साधकसुद्धा सर्वोच्च पदाला न पोहोचता वेगळ्याच ठीकाणी स्थिर होतात. अशी मूळ लक्ष्याहून भिन्न असलेली स्थिती वरकरणी कितीही लोभनीय असली तरी त्यामधील अवस्था शाश्वत नसते. उदाहरणार्थ, आज सर्व जगानी आपल्याला मान दिला तरी उद्या तेव्हढाच मान मिळेल याची खात्री नसते, आपल्या ज्ञानाइतकेच (किंवा जास्त) ज्ञान असलेले इतर साधक असण्याची शक्यता असते इत्यादी. साधकाच्या अवस्थेची अशाश्वतता त्याच्या मनात अशांति किंवा भय निर्माण करते आणि मग त्याचे लक्ष सद्यपरीस्थितीची अस्थिरता नष्ट करण्याकडे वेधले जाते व भगवंतापासून विचलित होते.

अशा रीतीने अतिशय प्रामाणिकपणे गुरुपोनिर्दिष्ट्य साधनेत मग्न असलेले साधकही सर्वोच्च पदापासून वंचित राहण्याचे मूळ कारण वरील श्लोकांतून सुस्पष्ट होते. साधनेच्या राजमार्गापासून निघालेले अनंत मानसिक फाटे सुरुवातीला इतके समांतर असतात की त्यांच्यात आणि साधनेत फार फारक दिसत नाही. त्यांच्यातील फरक नजरेसमोर आणून, तिकडे दुर्लक्ष करुन, मूळ मार्गावर चालत राहणे नुसते अवघड नाही तर अशक्य आहे. निव्वळ सद्‌गुरुकृपेनेच साधकाला मार्गातील धोक्यांची निरंतर जाणीव होऊ शकते. ज्या लहान बालकाचा हात आईने धरलेला असतो (बाळाने आईचा हात धरुन उपयोग होत नाही!) तो रस्त्यांतील सर्व अडथळ्यांपासून वाचून सुखरुप घरी पोहोचतो त्याचप्रमाणे ज्या भाग्यवान साधकाचा हात गुरुंनी धरलेला आहे त्यालाच सर्वोच्चपदाची प्राप्ती होते. अंतःस्फुरणेतून सद्‌गुरु सतत शिष्याला योग्य मार्गाची जाणीव देत असतात. ज्या साधकांचे लक्ष अशा ईशारांकडे असते तो मार्गातील विश्रांतिस्थळात अडकून रहात नाही व अंतिम साध्य हस्तगत करतो. वरील श्लोकांतून भगवान आपणांस स्वतःच्या जीवनातील गुरुंचे महत्वसुद्धा सांगत आहेत असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s