श्लोक २६ आणि २७ : एकलक्ष भक्तीची व्याख्या

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६:९ ॥

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥ २७:९ ॥

गेल्या तीन श्लोकांतून निर्गुण भगवंताच्या एखाद्या ठराविक अवतारावर लक्ष केंद्रीत झाल्यावर भक्ताला कुठले फल प्राप्त होते याचे वर्णन केल्यावर आता निर्गुण भगवंताच्या भक्तीकडे भगवान वळले आहेत. वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्णांनी अशा भक्तीची व्याख्या केली आहे. गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण भगवंताच्या एखाद्या ठराविक रुपावर लक्ष केंद्रीत करतो तेव्हा आपोआप आपणांस भक्ती म्हणजे काय हे स्पष्ट होते. ते म्हणजे त्या रुपाला आवडेल असे वर्तन करणे. त्यामुळे वैष्णव भक्त तुलसी घेऊन भगवंताकडे जातात तर शैव बेलपत्राशिवाय शिवमंदीरात जात नाहीत. आपण सर्वजण स्वतःच्या मनातील प्रेमाला बाह्यजगात व्यक्त करण्यास उद्यमशील असतो. त्यात भक्तीचे असे मर्यादीत रुप समोर आले की त्याने आपले जीवन जगण्यास एक सुनिश्चित आकार मिळतो. रामनवमीला भजन करणे वा शिवजयंतीला रात्री जागरण करणे इत्यादी. नियमबद्ध चाकोरीचे जीवन जगणे सोपे असल्याने सगुण रुपाचे ध्यान करणे सर्वसामान्य साधकांना आकर्षित करते. याउलट जो भगवंत सर्व जीवांत भरुन आहे त्याला या जगातील सर्व गोष्टी एकसारख्याच आवडतात. त्यामुळे कुठलीही एक ठराविक क्रिया वा वस्तू त्याला प्रिय आहे असे आपण म्हणू शकत नाही (कारण कुठल्याही क्रियेच्या विरुद्ध क्रियासुध्दा त्याला प्रिय आहेत!). अशा परिस्थितीत आपल्यामधील सर्वव्यापी भगवंताबद्दलचे उफाळून येत असणारे प्रेम व्यक्त कसे करावे याबद्दल साधकाच्या मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून सर्वव्यापी भगवंताच्या भक्तीचे रुप दर्शविणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीशंकरांनी स्वर्गातील गंगेचा स्त्रोत डोक्यावर झेलून जगाला पेलेल असा एक छोटा स्त्रोत सोडला, त्याचप्रमाणे आपल्या हृदयात गुरुकृपेने निर्माण झालेल्या ज्ञानोत्तर भक्तीच्या गंगेला बुद्धीरुपी माथ्यावर झेलून दैनंदिन कृतींतून बाहेर सोडणे असे या भक्तीचे रुप होते. सगुण रुपाची भक्ती प्रत्येक भक्ताच्या जीवनात एकच रुप घेते कारण त्या विशिष्ट रुपाला जे आवडते तसे प्रत्येकजण वागायचा प्रयत्‍न करतो. याउलट साधकाच्या जीवनातील निर्गुण भगवंताच्या भक्तीरुपी गंगोत्रीचे रुप व्यक्तीप्रमाणे भिन्न असते, त्याचे दररोजचे जीवन जसे असेल त्याप्रमाणे त्याची अंतर्गत भक्ती बाह्य रुप धारण करते.

परंतु वरकरणी वेगवेगळ्या दिसणाऱ्या भक्तींमध्येही समानता आहे. वरील श्लोकांतून भगवान प्रथम भक्तींतील विभिन्नता दर्शवून मग त्यांतील समान धागा सांगत आहेत. ते म्हणत आहेत की “ (माझ्या निर्गुण रुपावर प्रेम ठेऊन) जो कोणी मला एखादे पान, फुल, फळ वा (अतिशय मूल्यहीन) उदक अर्पण करतो त्या प्रत्येक वस्तूला, मी त्या कृतींमागील प्रेमाकडे लक्ष ठेऊन, आनंदाने स्वीकारतो (२६). (खरे म्हणजे) स्वतःच्या दैनंदिन जीवनातील खाणे, पिणे, नित्यकर्म करणे इत्यादी जे आपले वर्तन असते तेच जर (आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाचा आधार न घेता) भगवंताच्या अनुसंधानात केले तर ती (आपोआपच) माझी भक्ती होते (२७) .”

सर्व गोष्टींत जर भगवान आहे तर एखादी गोष्ट निषिद्ध कशी असू शकेल? या वस्तुस्थितीचा परीणाम म्हणजे जेव्हा आपणास निःसंदेहपणे असे जाणवते की निर्गुण भगवंत सर्व चराचराला व्यापून आहे त्यावेळी आपल्याला एक अमर्याद स्वातंत्र्य प्राप्त होते. ते म्हणजे स्वजीवनात कसेही वर्तन करणे. त्यामुळे साधकाचे वर्तन निर्बंध होऊ शकेल असा संदेह उत्पन्न होऊ शकतो. परंतु जर आपले ज्ञान निव्वळ बौद्धीक नसेल तर या अनिर्बंध स्वातंत्र्याबरोबरच त्या मोकळीकीचा फायदा घेऊ इच्छीणारे आपले संकुचित व्यक्तिमत्वदेखील नष्ट होते. उदाहरणार्थ, लहानपणी असे वाटायचे की जवळ पैसे असते तर दररोज चॉकलेट, आईसक्रीम खाल्ले असते. आज त्या गोष्टींचे आकर्षण असलेले व्यक्तिमत्व नाहीसे झाले असल्याने पैसे असूनही त्या वस्तू दररोज खाल्ल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे, मनमानी करण्याची इच्छा कोणाची असते? आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाची. भगवंतज्ञानाच्या गंगेत न्हाल्याने आपल्या अस्तित्वावर जमलेला व्यक्तिमत्वाचा मळ नष्ट होतो. त्यामुळे स्वव्यक्तिमत्वाला पुष्टी देणे हा हेतू भक्ताला निरर्थक दिसायला लागतो. म्हणून कसेही वागायचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्याच्या हातून अयोग्य वर्तन होत नाही. म्हणजे काय? तर जेव्हा ज्ञानोत्तर भक्ती असलेल्या साधकाला एखाद्या घटनेत भाग घ्यावा लागतो तेव्हा त्या घटनेशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट त्याला महत्वाची वाटत नाही. उदाहरणार्थ, आज मी असा वागलो तर उद्या माझी प्रतिमा काय होईल वा काल मी एका विशिष्ट पद्धतीने अशा घटनेला सामोरा गेलो होतो मग आज मला तसेच वागायला हवे इत्यादी विचारांचे महत्व त्याच्या मनातून नष्ट होते. याचा अर्थ असा की निर्गुण भगवंताचे खरे ज्ञान साधकास कुठल्यातरी एका साच्यात बद्ध होऊ देत नाही. प्रत्येक क्षणी समोर आलेल्या घटनेला नाविन्याने सामोरे जाणे या शब्दांचा अर्थ आपणास कळायला लागतो. तो म्हणजे आपले आधीचे ज्ञान विसरणे नव्हे तर पूर्वकल्पनांचे आपल्यावरचे वर्चस्व नष्ट होणे. स्वतःच्या पूर्वकर्मांबद्दलचे वैषम्य व भविष्यकाळाबद्दलची काळजी या दोन गोष्टींचा आपल्यावरील ताबा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त असतो. ही मुक्तता अतिशय बेजबाबदार व्यक्तीतही असते. परंतु भक्ताच्या मुक्ततेचा पाया भगवंतभक्तीचा असतो, स्वतःची मनमानी करण्याचा नसतो. त्यामुळे त्याच्या मनात निरंतर शांति असते ज्याचा अभाव बेजबाबदार व्यक्तींत दिसून येतो. ही आपोआप उत्पन्न झालेली स्वयंभू शांति म्हणजे भगवंतांनी आपली सेवा स्वीकारली याची पावती आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे.

स्वतःला आपण सर्वसाधारणपणे सुखी समजतो, पण आपल्यापैकी कितीजणांनी काहीही न करीता, कुठल्याही भौतिक वा मानसिक कारणाशिवाय आलेली आनंदाची उर्मी अनुभवलेली आहे? गाडी चालविताना, स्वतःच्या आजारी मुलाची काळजी घेताना वा शारीरीक कष्ट करताना सुद्धा जेव्हा मनात आनंदाचा घडा भरभरुन वहायला लागतो तेव्हा आपण भगवंतभक्तीत रममाण असतो. याउलट जर पूजा करतानासुद्धा जर मनात कारणविरहीत आनंद भरलेला नसेल तर आपण निर्गुण भगवंताला विसरलेलो आहोत. जोपर्यंत आपल्या मनात भगवंतसान्निध्याची ही शांतिरुपी रोकडी पावती पोहोचलेली नाही तोपर्यंत आपले निर्बंध वर्तन म्हणजे स्वव्यक्तिमत्वाचेच एक रुप आहे, स्वतःला फसविणे आहे, आणि ज्या ज्ञानावर आपले असे मुक्त वर्तन उभारलेले आहे ते ज्ञान पोकळ आहे. निर्गुण भगवंताच्या भक्तीची ही मेख गीतेतील या अध्यायात उघडपणे मांडलेली आहे. या अध्यायाच्या अंतिम श्लोकात या साधनेचे पुनरुच्चारण होईल तेव्हा आपण परत एकदा यावर विचार करु. आज इतकेच.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s