श्लोक २८ : निर्गुणी भक्तीचे फळ

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

शुभाशुभफलैरैवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।

संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८:९ ॥

 

साधकाच्या मनातील एखादा प्रश्न, त्यावर उपाय असलेला साधनेचा मार्ग आणि त्यानंतर त्याचे महत्व स्पष्ट करण्यास त्याने उत्पन्न होणारी स्थिती सांगणे अशी अध्यायांची मांडणी गीतेत वारंवार दिसून येते. आठव्या अध्यायातील अध्यात्म म्हणजे काय इत्यादी प्रश्नांचे उत्तर दिल्यावर “एव्हढे ज्ञान असण्याची जरुरी आहे का?” या अर्जुनाच्या अनुच्चारीत प्रश्नाचे उत्तर म्हणून सहजपणे करता येणारा उपाय नवव्या अध्यायात राजगुह्ययोग म्हणून सांगितला गेला. आता पुढचे सहा श्लोक या मार्गाची भलावण करणार आहेत. दैनंदिन जीवनात कुठल्याही बाह्य सोपस्कारांचा बडेजाव न करीता आपले नित्यनैमित्तिक जीवन भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करणे हा निर्गुण भगवंताच्या भक्तीचा मार्ग गेल्या दोन श्लोकांतून सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण या साधनेचे फळ सांगताना म्हणत आहेत की “कर्म करीत असताना अनुसंधानात राहणारा (म्हणजे संन्यासयोगयुक्तात्मा) साधक शुभ व अशुभ या दोन्ही कर्मांच्या बंधनांत अडकत नाही आणि (त्यामुळे आपोआपच, कुठलाही प्रयास न करीता) त्यांच्या फळांपासूनसुद्धा मुक्तता प्राप्त करतो. (कर्मबंधनांतून) संपूर्णपणे मोकळा झालेला असा साधक मग माझ्याजवळ येतो.

१. फळाची अद्वितीयता : काही कर्मांची फळे आपण बाह्य इंद्रियांतर्फे जाणू शकतो. उदाहरणार्थ, खूप अभ्यास केल्यावर एखाद्या परीक्षेत चांगले गुण मिळणे, वा नोकरीत जीवापाड कष्ट केल्याने बढती मिळणे, पैसे कमाविणे इत्यादी. परंतु काही कर्मे अशी असतात की ती केल्यानंतर जे फळ मिळते ते सूक्ष्म असते, फक्त कर्त्याच्या मनात त्या फळाचे पडसाद म्हणून एक समाधान उत्पन्न होते. उदाहरणार्थ, कठीण परीस्थितीतही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन योग्य वर्तन करणे. अशावेळी बाह्य जगाला कर्त्याला प्राप्त झालेल्या फळाची जाणीव होतेच असे नाही. परंतु निदान कर्ता इतरांना इतकेतरी सांगू शकतो की माझ्या मनात शांति उत्पन्न झालेली आहे. परंतु सतत भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचे फळ हे या दोन्हीहून निराळे आहे. हे फळ इतके सूक्ष्म आणि गुणातीत आहे, की मिळालेल्या स्थितीचे वर्णन करण्यास साधकाला कुठलेही शब्द सापडत नाहीत! “माझ्या मनात निरंतर शांति आहे”, वा “मी नेहमी बरोबर वागतो” इत्यादी कुठलेही शब्द या स्थितीचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे या निर्गुणी स्थितीला जाणून घेण्यास आपणास थोडे सखोल विचार करणे जरुरी आहे.

२. कर्मबंधनांतून सुटणे याचे वर्णन : कुठल्याही कर्मांत भाग घेण्याआधी सर्वसाधारणपणे आपण एखादे व्यक्तिमत्व धारण करतो आणि त्याला योग्य असे वर्तन करतो. उदाहरणार्थ, घरी आपला मुलगा समोर आला की आपण पालक असे व्यक्तिमत्व अंगावर घेतो, संध्याकाळी मित्रांबरोबर नाक्यावर चहा पिताना स्वतःच्या तारुण्यरुपात विलीन होतो आणि गुरुगृही शिष्य या रुपात राहण्याचा प्रयत्‍न करतो. एकदा स्वतःवर एखाद्या रुपाचे कवच घातले की कसे वाघायला हवे याचे नियम स्पष्ट होतात आणि समोर आलेल्या घटनेला आपण सामोरे जातो. इथे हे लक्षात घ्यायला हवे की दैनंदिन जीवनात स्वतःवर एखाद्या व्यक्तिमत्वाचा मुखवटा चढविण्यास आपली पूर्वकर्मे कारणीभूत असतात हे लक्षात घेणे जरुरी आहे. कुणालातरी आपण स्वतःचा मुलगा वा गुरु मानले आहे या जाणीवेशिवाय ना आपण पालक होऊ शकतो ना शिष्य. कर्मबंधने म्हणजे दुसरे काही नसून आपण हे वारंवार घातलेले मुखवटे आणि घेतलेल्या रुपाशी सुसंगत वागायची आपली धडपड होय. आणि कर्मबंधनांतून सुटका म्हणजे कुठल्याही परिस्थितीला सहजपणे, नैसर्गिकरीत्या सामोरे जाणे होय. आपण अगदी लहान असताना समोर आलेल्या कुठल्याही घटनेला स्वीकारत होतो आणि जसे शक्य असेल तसे सामोरे जात होतो. स्वतःची ही नैसर्गिक अवस्था आपण कोण आहोत याच्या अज्ञानाने उत्पन्न झालेली होती. आता भगवंतज्ञानानंतर (म्हणजेच आपण कोण आहोत हे कळल्यानंतर), परत त्या अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे कर्मबंधनांतून सुटका मिळविणे असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणूनच संतांचे वर्णन करताना “ते लहान मुलासारखे निरागस असतात” हे शब्द वारंवार उच्चारले जातात.

३. शंकानिरसन : कुठल्यातरी रुपात स्वतःला घातल्याने वर्तनांत एक सातत्य येते. त्यामुळे या स्थितीचे वर्णन ऐकल्यावर कित्येक साधकांच्या मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की समाजात जर सहजपणे मी वागायला लागलो तर माझे वर्तन स्वैर होईल. अनिर्बंध होईल. मग माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचे काय होईल? परंतु या प्रश्नात एक मूलभूत चूक आहे. ती म्हणजे स्वैर वागणारा कोण आहे? लक्षात घेणे जरुरी आहे की बेजबाबदारपणे वागणे याची व्याख्या सापेक्ष आहे, व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, लहानपणी पुस्तके वाचण्यात वेळ घलवून पैसे न कमाविणे हे स्वैर वागण्याचे नाही, तर अभ्यासूवृत्तीचे लक्षण आहे. परंतू हीच गोष्ट मोठेपणी केली तर जबाबदारी टाळणे आहे! त्यामुळे, स्वैर वर्तन करण्यास जरुरी असलेला एखाद्या व्यक्तिमत्वाचा पायासुद्धा नष्ट झालेला असल्याने, माझ्या व्यक्तिमत्वांचा नाश झाला तर मी स्वैर वागेन हे म्हणणे मूलभूतरीत्या चुकीचे आहे. म्हणूनच आपण बघतो की ज्यांच्या मनात स्वतःचे व्यक्तिमत्व सुस्पष्ट नसते अशी जंगली जनावरे स्वैर वर्तन करीत नाहीत. अर्थात, सहजपणे वागण्याचा पाया भगवंताचे अनुसंधान असणे हे महत्वाचे आहे. कामचोरपणाला वा स्वतःच्या शरीर-मनाला जपण्याला महत्व देऊन सहजपणे वागत आहे असे म्हणणे म्हणजे स्वतःला फसविणे आहे. सहजपणाने वागणे आपोआप झाले पाहीजे, प्रयत्‍न करुन नाही! आपण सहजपणे वागत आहोत याची जाणीव कधीकधीच होते, इतरवेळी आपण नुसते आपोआप वागत असतो. अशावेळी साधक नेहमी भगवंताला अपेक्षित असलेले वर्तन सहजपणे करत असतो म्हणून ही अवस्था होणे म्हणजे भगवंताजवळ असणे होय.

४. कर्मबंधनातून सुटका हे साधनेचे फळ आहे का? : अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहील्याने आपण कर्मबंधनांतून सुटतो असे शब्द ऐकल्यावर असे वाटू शकते की हे साधनेचे फळ आहे आणि आता काही करायचे शिल्लक राहीले नाही. पण ही भावना चुकीची आहे! सतत अनुसंधानात राहील्याने होते काय? तर आपल्या पूर्वकर्मांचे उरलेले भोग समोर येतात आणि त्यांना निर्द्वंदपणे सोसून आपण त्यांच्या बंधनातून सुटतो. यानंतर जी आपली अवस्था होते तीला “कर्मसाम्य” दशा म्हणतात. अशी अवस्था येणे हा या साधनेचा एक टप्पा आहे. हे या साधनेचे फळ नाही हे लक्षात घेणे जरुरी आहे. कारण कर्मसाम्यता प्राप्त झालेल्या क्षणानंतरसुद्धा आपले आयुष्य सुरु आहेच आणि नवी कर्मे आपल्याहातून घडत आहेतच. त्यांच्या बंधनातसुद्धा न अडकणे जरुरी आहे! याकरीता कर्मसाम्य अवस्था आली तरी अनुसंधानात राहणे जरुरी आहे. त्यामुळे असे म्हणायला हवे की ही साधना करीत राहणे हेच या साधनेचे खरे फळ आहे! या गोष्टीला न विसरणे अत्यावश्यक आहे. अनुसंधानात असणे ही साधना संपून मुक्ततेचे फळ मिळत नाही, तर ती निरंतर चालू राहणे हे या साधनेचे फळ आहे. कर्मबंधनांपासूनची मुक्ती हे एक आपोआप निर्माण झालेला परीणाम आहे! म्हणूनच जेव्हा माउलींनी सर्व साधकांकरीता पसायदान मागितले तेव्हा सुरुवातीच्या सर्व मागण्यांचा एका वाक्यात सारांश म्हणून असे मागितले आहे की “साधक भौतिक आणि पारलौकीकरीत्या पूर्ण होऊन निर्गुणी भक्तीत नित्य रममाण राहो ( … पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखी । निरंतर ॥ ज्ञा. पसायदान ॥)”. अशा रीतीने भगवंताजवळ जाणे (म्हणजेच नित्यानुसंधानात राहणे) हे निर्गुणी भक्तीरुपी साधनेचे खरे फळ आहे असे स्पष्ट होते. म्हणूनच वरील श्लोकाच्या अंतिम चरणांत तू माझ्याजवळ येशील असे आश्वासन भगवंतांनी दिले आहे! इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s