श्लोक २९ : भगवंतांच्या समदृष्टीचे महत्व

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्‌ ॥ २९:९ ॥

गेल्या श्लोकातून निर्गुण भगवंतांच्या भक्तीचे फळ म्हणजे माझी निरंतर संगती असे भगवंतांनी सांगितले. सर्वसाधारणपणे आपण स्वतःला आवडणाऱ्या व्यक्तीसच जवळ ठेवतो. त्यामुळे भगवंतांची जवळीक साधण्यास आधी स्वतःचे वर्तन त्यांना आवडेल असे करायला हवे का? हा प्रश्न साधकाच्या मनात उद्भवू शकतो. म्हणजे काय, तर निर्गुणी भक्तीरुपी साधना सुरु करायच्या आधी आपणांस कुठलीतरी पूर्वतयारी करायला हवी का या संदेहाचे निराकरण करण्यास भगवान वरील श्लोकातून त्यांची जगाकडे पहायची दृष्टी कशी आहे हे सांगितले आहे. भगवान म्हणत आहेत की “मला सर्व लोक समान आहेत. ना मी कुणाचा द्वेष करतो ना कुणी मला अधिक प्रिय आहेत. परंतु जे माझे भक्त आहेत त्यांनाच मी प्राप्त होतो.” ते म्हणत आहेत की आपण सध्या जसे आहोत तसेच्यातसे त्यांना स्वीकाराह्य आहोत. त्यांच्या जवळ आपण पोहोचणार का नाही याबद्दलचा निर्णय ते घेत नाहीत तर आपण स्वतःच भक्त आहोत का नाही यावर घेत असतो.

इथे काही साधकांच्या मनात असा संदेह येऊ शकतो की जर भक्ती केल्यावरच भगवान प्रसन्न होत असतील तर एखाद्या व्यावहारीक व्यक्तीमध्ये आणि भगवंतांमध्ये तत्वतः काय फरक आहे? ज्याप्रमाणे दुकानातील एखादी वस्तू योग्य किंमत दिल्यावर आपणांस प्राप्त होते त्याप्रमाणे भगवंतांची आपल्याबद्दलची प्रीती आपण स्वतःच्या भक्तीची किंमत देऊन मिळवितो का? या मूलभूत शंकेला वरील श्लोकातून उत्तर मिळत आहे असे वाटते. (अव्यक्त) भगवंतांचे सर्वांवर एकसारखेच प्रेम आहे पण हे प्रेम इतके सूक्ष्म आहे की त्याची जाणीव होणे सोपे नसते. कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमात दुसऱ्या व्यक्तीला पहिल्याच्या मनातील प्रेमाची जाणीवच नसते तशी ही गोष्ट आहे. किंवा वीजेचे व्होल्टेज जर खूप कमी असेल तर वीज मोजण्याचे यंत्र वीज नाही असे दर्शविते तशी ही बाब आहे. वा जमिनीतील पाण्याचा जिवंत स्त्रोत विहीर खणली नसेल तर कळू शकत नाही त्याप्रमाणे भगवंतांच्या आपल्यावरील प्रेमाचा झरा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या कवचाने झाकलेला असल्याने कळत नाही. त्यामुळे साधकाच्या मनातील शंकेचे उत्तर असे आहे की भक्ती केल्याने भगवंतांचे प्रेम प्राप्त झाले असे होत नसून भक्तीने आपल्यावरील असलेल्या भगवंतांच्या निरंतर प्रेमाची जाणीव होते. आणि जेव्हा या प्रेमाची जाणीव होते तेव्हा आपोआप साधक कृतज्ञ होऊन भगवंतांशी जवळीक साधतो. भगवंतांच्या घराचे द्वार सदा उघडेच आहे पण जोपर्यंत आपले हृदय व्यावहारीक सृष्टीतून विरक्त होत ना तोपर्यंत आपणच तिकडे वळत नाही. “मेरा घर खुला है । खुलाही रहेगा । तुम्हारे लिये ॥” असे भगवान या श्लोकातून सांगत आहेत असे आपण म्हणू शकतो. जरा विचार करा की जर आपण कुणावर एकतर्फी प्रेम करीत असलो तर काही काळाने समोरील व्यक्तीच्या दुर्लक्ष करण्याने आपले प्रेम हळूहळू कमी व्हायला लागते. परंतु आपण स्वतः जन्मोन्‌जन्मे भगवंतांकडे दुर्लक्ष करुन आपल्याच विश्वात मग्न आहोत तरी भगवंतांचे आपल्यावरील प्रेम आहे तसेच आहे! कारण वरील श्लोकात असे म्हटलेले नाही की विश्वाच्या सुरुवातील माझे सर्वांवर एकसारखे प्रेम होते आणि आता जे भक्त आहेत फक्त त्यांवरच आहे! भगवंतांची समदृष्टी विश्वौत्पत्तीपासून आहे तशीच आहे. ती कालातीत आहे, निरंतर आहे, शाश्वत आहे.

भगवान किती जगावेगळे आहेत हे अशा रीतीने दिसायला लागते. परंतु निव्वळ या विचाराने भगवंतांचे थोरपण पूर्णपणे स्पष्ट होत नाही! कारण अशा अपेक्षविरहीत प्रेमाची व्यावहारीक उदाहरणेही आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या आईचे आपल्या मुलावरील प्रेम किंवा पृथ्वीची सर्वांना आधार देण्याची तयारी वा वृक्षाची सर्वांना सावली देण्याची क्षमता इत्यादी. परंतु भगवंतांचे प्रेम या उदाहरणांपेक्षा वेगळ्याच जातीचे आहे कारण ते नुसते अस्तित्वात नाही तर सक्रियसुद्धा आहे. त्यांच्या या खेचण्याचे प्रमाण म्हणजे व्यावहारीक जीवनातील आपली कुठलीही इच्छा पूर्ण झाली तरी त्याने उत्पन्न झालेले समाधान कालानुसार नष्ट होणे हे होय. आपली शक्ती मर्यादीत असल्याने आपण कितीही अफाट कष्ट केले तरी त्यांनी मिळणारे फळ ठराविक काळाने नष्ट होते. वारंवार मिळालेल्या लाभाची हानी झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला की साधक आपोआप अढळ फळाबद्दल विचार करायला उद्युक्त होतो. अशाश्वततेने वारंवार पोळल्यावर प्रत्येक जीवाच्या मनात कधी ना कधी शाश्वत समाधानाला महत्व देण्याचा विचार येणार आहे! आणि या विश्वात असे एकच अचल ध्रुवपद आहे. ते म्हणजे भगवंतांचे पादकमल. त्यामुळे भगवंतचरणांची ओढ प्रत्येकाला लागणार आहे यात शंकाच नाही. (फक्त ती किती जन्मांनंतर लागणार आहे इतकाच प्रश्न आहे.) जगातील जीवांच्या कर्मांकडे दुर्लक्षकरुन त्या सर्वांना आपल्याकडे निरंतर ओढण्याच्या क्रियेने भगवान पूर्णपणे अद्वितीय होतात!

त्यामुळे असे स्पष्ट होते की वरील श्लोकातील “निव्वळ माझे भक्तच माझ्याजवळ येतात” या शब्दांत असे आश्वासनही आहे की मी सर्वांना माझी भक्ती करण्याशिवाय पर्यायच ठेवणार नाही. जो मनुष्य संवेदनशील असेल तो लवकर माझ्या संकेतांना ओळखेल आणि जे मनाने निबर असतील त्यांना मी आधी संवेदनशील करीन आणि मग ते माझ्याकडे येतील. स्थूलात रमलेल्या मानवांना सूक्ष्माची ओढ लावण्याचा भगवंतांचा उपाय म्हणजे व्यावहारीक संकटे. म्हणूनच महाभारतामध्ये कुंतीने भगवंताकडे माझ्यावर निरंतर संकटे येऊ देत (ज्यायोगे मझ्या मनातील तुझे स्मरण तीव्र होईल) असे मागणे मागितले होते. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणायचे की जीवनात आणिबाणीचा प्रसंग आल्याशिवाय खरी साधना सुरु होत नाही. अर्थात काही साधक (उदाहरणार्थ, सिद्धार्थ) जन्मापासूनच इतके संवेदनशील असतात असा प्रसंग दुसऱ्यावर आला तरी ते स्वतः सावध होतात. ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी सागरालाच मिळतात त्याप्रमाने आपण सर्व निर्गुणी भक्तीतच रममाण होणार आहोत असे वरील श्लोकातून भगवान सांगत आहेत. स्वतःच्या जीवनात आपण व्यावहारीक इच्छेंचे किती बांध घातलेले आहेत यावर आपली अस्तित्वसरीता संगमापासून किती दूर आहे हे ठरते. अशा रीतीने आपण सर्वजण तात्विकरीत्या निर्गुणी भक्तीला पात्र आहोत. परंतु ती केव्हा सुरु होणार आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या उलट प्रमाणात (म्हणजे जेव्हढे व्यक्तिमत्व कमी तितकी भक्ती जास्त आणि जेव्हढा स्वतःबद्दलचा अहंकार जास्त तेव्हढी भक्ती कमी) अवलंबून आहे. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s