श्लोक ३२ आणि ३३: निर्गुणी भक्तीची वैश्विकता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शुद्रास्तेऽपि यान्‍ति परां गतिम्‌ ॥ ९:३२ ॥

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥ ९:३३ ॥

जेव्हा एखादी कृती ठराविक आकार घेते तेव्हा आपोआप त्या कृतीला करण्याची क्षमता असणारे आणि नसणारे असे विभाजन निर्माण होते. कितीही सोपी गोष्ट असली तरी ती करु न शकणारे लोक असतातच. भगवद्गीतेतील अध्यायांत विभिन्न पारमार्थिक साधना सांगितल्या आहेत. त्या सर्वांनासुद्धा वरील नियम लागू पडतो. वरील दोन श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण नवव्या अध्यायातील राजगुह्ययोगाची भलाई करताना असे म्हणत आहेत की ही साधना या विश्वातील कुणीही करु शकतो. खऱ्या अर्थाने निर्गुण भगवंताची भक्ति वैश्विक आहे हे स्पष्ट करण्यास भगवान म्हणत आहेत की “माझ्या (निर्गुण) रुपात आश्रय घेण्याची इच्छा असणारे सर्व स्त्री आणि पुरुष, मग भले ते कुठल्याही योनीचे वा जातीचे असो, परम गतीस प्राप्त होतात. (३२) मग ज्यांचे आचरण पुण्यवान आहे अशा सात्विक भक्तांनासुद्धा या मार्गाने गति मिळते हे वेगळे सांगायलाच नको. म्हणून, स्वतःला या नाशिवंत व दुःखी जगात अडकलेले पाहून (आपल्या सध्याच्या व्यावहारीक वा सामाजिक स्थितीकडे लक्ष न देता) माझ्या (निर्गुणी) भक्तीत रममाण हो (३३) .”

समाजातील दुर्लक्षित वर्गांची उन्नती करण्याच्या मार्गांत एक मोठा धोका असतो. तो म्हणजे सध्या जे उच्च स्थानावर प्रस्थापित आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्‍न. कुणालातरी कमी करून दुसऱ्या एकाला मोठे करण्यात सामाजिक असंतुलन नष्ट होत नाही तर कोण कुठे आहे हे फक्त बदलते! भगवद्गीतेत व्यावहारीक गोष्टींत मग्न असलेल्याचा उद्धार करताना, त्याचवेळी पुण्यवान, सात्विक भक्तांनासुद्धा मदत केलेली आहे इकडे लक्ष देणे महत्वाचे आहे! एकाच वेळी सर्वजनांची पीडा हरण करण्याचा मार्ग सांगणे यातून गीतेतील विचारसरणीची सखोलता व व्यापक दृष्टी दिसून येते. असे खरेखुरे वैश्विक तत्वज्ञान असणे अत्यावश्यक आहे कारण परमार्थ हा व्यवहाराच्या पलिकडे आहे. व्यावहारीक गोष्टी निर्गुणी भगवंताला स्पर्शसुद्धा करु शकत नाहीत असे जेव्हा आपण मानतो तेव्हाच त्याच्या भक्तीचा मार्ग लोकांच्या व्यावहारीक पातळीवर अवलंबून नसला पाहीजे हे स्पष्ट होते. लक्षात घ्या की पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी समाजाच्या रुढींवर अवलंबून आहेत. (एका समाजातील पाप दुसऱ्या समाजात पुण्य असू शकते.) आणि म्हणून त्यांच्या सापेक्ष असलेली आपली स्थिती पारमार्थिक दृष्टीकोनातून निरर्थक आहे. म्हणून वरील श्लोकांतून उद्गारलेले साधनेचे वैशिष्ट्य गीतेमध्ये असणे जरुरी आहे, ते जर नसते तर एक विरोधाभास निर्माण झाला असता! असो.

अशा रीतीने हे सिद्ध होते की आपण सर्वजण निर्गुणी भक्ती करण्यास सक्षम आहोत. परंतु असे असले तरी वस्तुस्थिती अशी दिसून येते की फार थोडे भाग्यवान जन्माला येतात जे भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे निर्गुणी भक्तीत रममाण होतात. हे का होते याचे स्पष्टीकरण बत्तीसाव्या श्लोकातील दुसऱ्या चरणात दिलेले आहे. भगवान म्हणत आहेत की व्यावहारीक जगाचा नाशिवंत स्वभाव बघून माझ्या भक्तीमध्ये आयुष्याचे सर्वस्व आहे असे जाण. जोपर्यंत या जगातील प्रत्येक गोष्टीचे नश्वरत्व आपल्या हाडीमासी भिनत नाही तोपर्यंत आपल्याहातून निर्गुणी भक्ती शंभर टक्के होत नाही. आणि भक्तीत एक टक्का जरी उणीव राहीली तरी भगवंत आपल्या पासून दूर राहतो. (श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे की दोऱ्यातील एक धागा जरी सुईच्या भोकातून गेला नाही तरी दोरा पलिकडे खेचता येत नाही त्याचप्रमाणे भगवंतभक्तीत जरासुद्धा व्यावहारीक अपेक्षेंची भेसळ झाली तरी आपण पैलतीरावर पोहोचत नाही) सध्याच्या आपल्या सिद्धार्थावस्थेतून जर भगवान बुद्ध बनायचे असेल तर स्वशरीररुपी रथात बसून आयुष्याचा प्रवास करताना जे नश्वरत्व समोर येत आहे त्यातून व्यावहारीक प्रगतीबद्दलचे संपूर्ण वैराग्य उत्पन्न होणे जरुरी आहे. आणि हे वैराग्य क्षणिक नसून स्थायिक असणे जरुरी आहे कारण क्षणिक वैराग्याने आपण परमार्थाकडे प्रवृत्त होतो हे जरी खरे असले तरीसुद्धा त्या वैराग्याचे मूळ जर आपल्या नसानसात रुजले नसेल तर आपल्या साधनेचा वेल मध्येच खुंटतो, माउलींनी सांगितल्याप्रमाणे गगनावरी जात नाही!

आपणांस असे वाटत असते की अनुभवांनी आपण शहाणे होऊ. परंतु शहाणपणाची आपली व्याख्या या जगातील आपल्या वर्तनात चूक होऊ नये अशी आहे. आपला हा मानदंड मूलभूतपणे चुकीचा आहे. आयुष्यभर आपण अनुभव घेत आहोत की कुठलेही सुख शाश्वत नाही. आत्तापर्यंत एकही गोष्ट आपणांस मिळालेली नाही की जी सर्वकाळ तेच सुख देईल जे तीने पहिल्या प्राप्तीवेळीस आपणांस दिले होते. परंतु यातून आपण असा शहाणपणा शिकतो की दरवेळी नव्या गोष्टीची वा तत्वाची प्राप्ती करणे योग्य आहे! सर्व गोष्टींच्या आणि तत्वज्ञानाच्या पलिकडे आपण जायला हवे ही जाणीव व्यावहारीक अनुभवांमुळे निर्माण होणे जरुरी आहे. या सकारात्मक वैराग्याच्या सुपीक जमिनीत निर्गुणी भक्तीचे बीज भगवंतांनी रोवलेले आहे. आपणांस ते वेगळे कुठूनतरी आणण्याची जरुरी नाही!!

वरील श्लोकांतून भगवान आपणांस सांगत आहेत की सर्वांमध्ये भगवंत प्राप्त करण्याची शक्ति आहे. परंतु आपल्यातील या जन्मजात क्षमतेचा उपयोग करण्यास जी मनःस्थिती लागते ती असणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे एखादा अत्याधुनिक संगणक विकत घेतला आणि तो चालूच केला नाही तर असून नसल्यासारखाच असतो त्याचप्रमाणे आपल्यातील शक्तीचा जर आपण उपयोग केला नाही तर आपण जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहात अडकलेलेच राहणार. चला, आपण डोळे उघडे ठेऊन जगू आणि आलेल्या अनुभवांतून खऱ्या अर्थाने शहणे होऊ, वैराग्यरुपी सख्याची संगत प्राप्त करुन घेऊ. बाकी सर्व भगवान आपोआप बघून घेतील.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s