शुद्धतेचा मानदंड, उदारतेची परिसीमा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाय नमः ॥

जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।

अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १: १२ ॥

ज्याप्रमाणे, ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात सद्‌गुरुंच्या गुणांचे वर्णन करणाऱ्या गुरुस्तवनाने झाली आहे त्याचप्रमाणे द्वादश अध्यायाची आहे. गुरुस्तुतीवरील लेखमालेत आता आपण या अध्यायातील नऊ ओव्यांत्मक सद्‌गुरुस्तवनावर विचार करु. स्तवनातील पहिल्या ओवीत माऊली म्हणत आहे “अतिशय शुद्ध रुप असलेल्या गुरुंचा जयजयकार असो. कधीही न संपणाऱ्या आनंदाचा वर्षाव (निरपेक्ष बुद्धीने) केल्यामुळे आपल्या उदारतेचा महिमा सर्व विश्वात पसरलेला आहे (१)

शुद्धता सापेक्ष असते. म्हणजे काय, तर कुठल्यातरी वस्तूला आपण अस्वच्छ समजतो आणि त्यापासूनची मुक्तता याला शुद्धता असे नामकरण देतो. शरीर, बुद्धी आणि मन अशा आपल्या अस्तित्वांपैकी प्रत्येकाची शुचिता भिन्न आहे. म्हणूनच शुचिर्भूत स्नान केल्यावर आपले शरीर स्वच्छ झाले तरी त्यामुळे मनाचा संकुचितपणा आणि बुद्धीवरील कलंक दूर होत नाही. आपल्या या तीन स्तरांवरील अस्तित्वांमध्ये जोपर्यंत आपल्या मनात वासनांचे अस्तित्व आहे तोपर्यंत बाकी दोन्ही पातळींवर केव्हा कलंक लागेल हे सांगता येत नाही. परंतु जेव्हा आपले मन साफ होते तेव्हा आपोआप बुद्धीवरील “मळकटा” दूर होतो आणि स्वशरीरावरील ओढा नष्ट होतो. म्हणून वरील ओवीतील शुद्धता सद्‌गुरुंच्या नितळ मनाचे वर्णन करीत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, सौंदर्याप्रमाणेच शुद्धता बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, घरातील भांडी पतीच्या मते स्वच्छ असली तरी पत्‍नीच्या नजरेत पात्रांच्या कडेला कुठेतरी लागलेली घाण दिसते आणि परत भांडी (न वापरता!) घासायला जातात. पूर्वी टी.व्ही.वर एका साबणाची जाहीरात यायची. एक पांढरा स्वच्छ सदरा घालून माणूस चालताना अचानक एक साबण धरलेला हात आकाशातून येतो आणि त्याच्या शर्टावरून फिरतो. मग तिथे एक अधिक पांढरा पट्टा येतो ज्याच्या तुलनेत आधी स्वच्छ वाटणारे कपडे आता अस्वच्छ दिसू लागतात! शेवटी तोच साबण दररोज वापरा असे सांगणारी आकाशवाणी होते! बघणाऱ्याची नजर बदलली की स्वच्छता बदलते. म्हणून सद्‌गुरुंच्या मनाची पारदर्शकता कुणाच्या नजरेतून बघितली आहे हे जाणणेसुद्धा जरुरी आहे. अर्थात्‌, सर्वात सर्वोच्च नजर गुरुंची शुचिता चोखत आहे हे माऊलींच्या मनात अध्यारुत आहे. म्हणून “प्रत्यक्ष भगवंतांच्या दृष्टीकोनातून बघितले तरीसुद्धा सद्‌गुरुंच्या मनामध्ये जराही खोट आढळत नाही” असे प्रथम चरणातील “शुद्धे” या शब्दातून माऊलींना म्हणायचे आहे असे वाटते.

सद्‌गुरुंच्या या गुणाचा आपल्या जीवनात अतिशय मोठा परीणाम होतो. याचे कारण असे की मनाची शुद्धता म्हणजे काय याबद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना समाजात अस्तित्वात आहेत. सद्‌गुरुंकडे बघून आपणांस मन साफ असणे म्हणजे काय याचा मानदंड मिळतो. लक्षात घ्या की सर्वजणांना हे मंजूर आहे की व्यावहारीक प्रगतीचा लोभ, इंद्रियांचे आकर्षण या गोष्टी मनाला लागलेला कलंक आहे. परंतु त्या डागांपासूनची स्वच्छता म्हणजे काय? असे विचारले तर कपड्यावरील डाग धुवून काढल्याप्रमाणे मनातील सर्व इच्छा जायला हव्यात असे बहुतांशी लोकांना वाटते. या विचारसरणीमुळेच “इतकी साधना करुनही राग कसा येतो?” असे वाटते. किंवा अजून एखादा विशिष्ट पदार्थ भोजनात असावा असे वाटणे हे साधनेत प्रगती न होण्याचे लक्षण आहे अशी भावना मनात निर्माण होते. परंतु, बाह्य डागांप्रमाणे अशा विचारांचा संपूर्ण विनाश झालेला आहे असे संतांच्या चरीत्रांवरुन आढळून येत नाही. कुणाला गव्हाची खीर आवडत होती तर कुणाला सुगंधाचे “वेड” होते असे दिसून येते. संतांच्या जीवनांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की साधनेत प्रगती होणे याचा अर्थ मनातील इच्छा नष्ट होणे असे नसून त्यांचा स्वतःवरील पगडा निघून जाणे असा घ्यायला हवा. ही गोष्ट अतिशय सूक्ष्म आहे, केवळ साधकालाच याची जाणीव होऊ शकते. उदाहरणार्थ, सारखा येणारा राग निघून गेला तर ती गोष्ट सर्वांना कळेल. नेहमीप्रमाणे पण राग आला तरीसुद्धा स्वतःचे मन (एका विशिष्ट पातळीवर) शांत आहे हे फक्त स्वानुभवाने जाणता येते. बाकी सर्वांना फक्त राग दिसतो! अशी शुद्धता ही अशी स्वानुभवानेच कळणारी आहे. माऊलींना ती कळली यातून निव्वळ निवृत्तीनाथच नाही तर स्वतः माऊलीही तितकीच शुद्ध आहे हे स्पष्ट होते. खरे म्हणजे ज्ञानेश्वरीत माऊलींनी स्वतःला लपविले असले तरीही त्यामधील सद्‌गुरुस्तवनांतून आपण ज्ञानेश्वर महाराजांचे रुप बघू शकतो! असो.

वरील ओवीतील बाकीचे अडीच चरण सद्‍गुरुंची उदारता दर्शवित आहेत. स्वतःजवळ असलेली बहुमोल वस्तू कुणा दुसऱ्याला दान करण्यात उदारता दिसून येते. अर्थात, त्या वस्तूचे महत्व घेणाऱ्यालाही आहे हे इथे अध्यारुत आहे. उदाहरणार्थ, भुकेल्या माणसाला गूढ परमार्थ सांगण्याने नाही तर स्वतःचे भोजन देण्याने उदारता दिसून येते. म्हणूनच माऊलींनी सद्‌गुरुंच्या उदारतेचे “अनवरत आनंदे वर्षतिये” असे विस्तृत वर्णन केले आहे. स्वतःच्या कर्मांमागील हेतूंकडे सखोल नजरेने बघितले की एक गोष्ट स्प्ष्टपणे दिसून येते की आपण सर्वजण एकाच गोष्टीच्या मागे धावत असतो. ती गोष्ट म्हणजे ‘आनंद’. पण स्वकष्टांनी मिळविलेला आनंद येताना त्याबरोबर स्वतःची क्षणभंगुरताही घेऊन येते. म्हणूनच आज आपण आनंदी असलो तरी आपली कर्मे थांबू शकत नाहीत! वाघावर स्वार झाल्यावर तो आपणांस खाऊ शकत नाही हे सत्य आहे. पण त्याबरोबरच आता आयुष्यभर त्यावरच बसावे लागणार (कारण उतरलो तर तो खाणार!) याची जाणीवसुद्धा असते. त्याचप्रमाणे स्वकर्मांनी आनंद मिळाला तरी कर्मे करीतच आयुष्य व्यतीत करावे लागणार असे बंधनही त्याबरोबर येते. याउलट गुरुकृपेने पारमार्थिक आनंद मिळाला की तो स्वतःबरोबर शाश्वतताही घेऊन येतो. ज्या गोष्टीकरीता कर्मे करण्यास आपण उद्युक्त होत असतो ती काहीही न करीता कायमस्वरुपी आपल्याबरोबर राहणार आहे याची जाणीव आपणांस खऱ्या अर्थाने निष्कर्मी बनविते. आणि निष्कर्मी होणे ही बाब परमार्थाचा पाया आहे. त्या पायावरच भगवंतांचे देऊळ उभारले जाते. अर्थात, इतकी मौलीक भेट देऊनसुद्धा गुरुंच्या मनात परतफेडीची अपेक्षा अजिबात नसते. त्यातच त्यांची उदारता दिसून येते. दुसऱ्याला आनंद देणे ही बाब त्यांच्या नजरेत एक गुंतवणूक नसते तर दान असते. या जगातील सर्वांना या भेटीचे महत्व असते म्हणूनच सद्‌गुरुंची उदारता कोण घेत आहे यावर अवलंबून न राहता विश्वव्यापी बनते. सृष्टीतील जे कुणी त्यांच्या नजरेसमोर येतात त्या सर्वांचे कायमस्वरुपी कल्याण होऊन जाते. उदारता या शब्दाचा संपूर्ण अर्थ सद्‍गुरुंच्या अस्तित्वाने स्पष्ट होतो असे म्हणायला हवे. त्यांच्या उदारतेची “प्रसिद्धी” यापेक्षा अधिक काय असू शकेल?

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s