विषयासक्तीपासून मुक्ती

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।

ते तुझिये कृपादृष्टी । निर्विष होय ॥ २:१२ ॥

जमिनीत पाणी आहे की नाही हे त्यावरील हिरवळीवरुन दिसते. त्याचप्रमाणे बाराव्या अध्यायातील पहिल्या ओवींत सद्‌गुरुंची उदारता स्पष्ट केल्यावर आता पुढील ओव्यांतून आपल्या जीवनात सद्‌गुरुंच्या दानाचे रुप कसे दिसायला लागते हे आता माऊली सांगत आहे. ज्याप्रमाणे शेतकरी जमिनीत बी पेरायच्या आधी शेत नांगरुन, त्यातील तणांचा नाश करतो ज्यायोगे पेरलेले बी उगण्यास अडथळा येत नाही. त्याचप्रमाणे साधकाला सूक्ष्म आनंदाचे दर्शन देण्याआधी सद्‌गुरु साधकाला अशा आनंदाचे ग्रहण करण्याची क्षमता बहाल करतात. म्हणजे काय तर त्याच्या मनातील स्थूल आनंदांच्या आकर्षणांचा विनाश करतात. माऊली या प्रक्रियेचे वर्णन करताना म्हणत आहे की “विषयांच्या आकर्षणरुपी सर्पांनी ज्या विचारशक्तीला जखडून ठेवले होते, ती बुद्धी तुमच्या कृपाकटाक्षाने (पूर्वग्रहविरहीत होऊन) मोकळी झाली आहे.

गेल्या वेळी आपण बघितले की परमार्थामध्ये “शुद्धता” या शब्दाचा अर्थ अतिशय सूक्ष्म आहे. मनातील वासनांचा विनाश न करीता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे मनोबळ असणे म्हणजेच वासनामळांपासूनची शुद्धता होय असे स्पष्ट झाल्यावर आता आपण वरील ओवीतून आनंद या शब्दाचा पारमार्थिक अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु. साधनेत भगवंतांच्या जवळीकीचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे मनाची प्रसन्नता. ज्याप्रमाणे घरातील प्रवेशद्वाराला उंबरठा असतो त्याचप्रमाणे साधकाच्या मनातील ‘अनवरत आनंद’ आहे. आता, ढोबळ नजरेने बघितले तर असे दिसून येते की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसुद्धा आनंद मिळविण्यासाठीच अथक कष्ट करीत आहे. कुणीही आपल्याला दुःख मिळावे याकरीता प्रयत्‍नशील नाही! या वस्तुस्थितीमुळे पारमार्थिक वाटचालही इतर मार्गांसारखीच आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. साधक आणि व्यावहारीक माणूस दोघेही आनंदाच्या प्राप्तीसाठीच झटत असले तरी त्यांच्यांमध्ये मूलभूत फरक आहे. तो म्हणजे आनंद या शब्दाची त्यांच्या मनातील व्याख्या. सर्वसाधारणपणे बघितले तर व्यावहारीक माणसाच्या मनात ‘आपल्या इच्छांप्रमाणे घटना घडणे’ ही आनंदाची व्याख्या दिसून येते. कुणाला पैसे हवे असतात त्याला श्रीमंत होण्यात आनंद मिळतो, रोगी माणसाला निरोगी होण्यात, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागावे लागणाऱ्याला स्वतः निर्णय घेण्यात तर पालकांना पाल्याच्या प्रगतीत आनंद मिळतो. असा आनंद मिळविण्यास ते सतत कार्यरत असतात. याउलट परमार्थामध्ये जगातील प्रत्येक गोष्टीमागील भगवंतांचे अस्तित्व दिसण्यात आनंद मानला जातो. काय घडले आहे इकडे दुर्लक्ष असते आणि कोण घडवित आहे इकडे ध्यान असते. जेव्हा लहान मुल बोबडे बोल बोलत असते तेव्हा आई त्याच्या उच्चारांकडे दुर्लक्ष करुन बोलण्याच्या प्रयत्‍नांवर प्रफुल्लित होते तशी ही गोष्ट आहे. मग त्याने एखाद्या आदरणीय व्यक्तीला एकारान्त संबोधित करण्याची चूक केली तरी कुणी काही बोलत नाही. त्याप्रमाणेच या जगात ज्या काही घटना होतात त्या मनातील इच्छांनुसार नसल्या तरी साधकाच्या मनाट आनंद स्थिर असतो कारण त्या सर्वांमागील खऱ्या कर्त्याचे दर्शन होणे ही आनंदाची व्याख्या सत्शिष्याच्या मनात ठामपणे स्थिर असते.

अर्थात्‌, ही वस्तुस्थिती कळल्यावर कुणीही म्हणू शकतो की आजपासून मीसुद्धा भगवंतांच्या दर्शनातच आनंद आहे असे ठरविन, आणि त्याशिवाय दुसरे काहीही महत्वाचे मानणार नाही. शेवटी मी काय महत्वाचे ठरवायचे आहे याचा निर्णय मीच घेणार, हो ना? नाही! आपण स्वतःच्या आयुष्यात काय महत्वाचे ठरवायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य फार थोड्या भाग्यवंतांकडे आहे. आपली विचारशक्ती विषयांच्या आकर्षणांनी इतकी बद्ध आहे की असे महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता ती हरवून बसली आहे. तळघरातील कोठडीत खांबाला बांधलेला कैदी ज्याप्रमाणे तुरुंगाबाहेरील मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे आयुष्यभरच्या सवयींनी बद्ध झालेली आपली बुद्धी विषयविरहीत गोष्टीत आनंद बघू शकत नाही. म्हणूनच परमार्थामध्ये वासनांपासूनची मुक्ती मिळवा असे सर्वप्रथम सांगितले आहे. परंतु इच्छा अतिशय मायावी आहेत! महिषासुर, शुंभ, निशुंभ दैत्यांप्रमाणेच त्या आपले रुप सतत बदलत असतात! म्हणून त्यांच्यापासून मुक्त होण्याचे आपण जितके प्रयत्‍न करु तितके आपण त्यांच्या जाळ्यात अधिकच गुरफटत जातो. सद्‌गुरुंना शरण जाऊन ‘तुम्ही काय करायचे ते करा’ अशी प्रार्थना करणे हा एकच मार्ग स्वतःच्या बुद्धीला मोकळे करण्याचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे नवजात अर्भकाची कावीळ कुठल्यातरी औषधाने नाही तर सूर्याच्या किरणांत शांतपणे पहुडण्याने नष्ट होते, त्याचप्रमाणे आपली विषयाकर्षणरुपी पिवळी नजर साफ होण्यास गुरुंची कृपादृष्टी होणे अत्यावश्यक आहे. एकदा ही नजर आपल्यावर पडली की आपोआप विषयरुपी सर्पांनी आपल्याल बुद्धीला घातलेली घट्ट मिठी ढिली होते. मगच जखडलेली बुद्धी स्वतंत्र होते आणि मगच आपण स्वतःच्या जीवनाला योग्य ती दिशा देऊ शकतो.

व्यावहारीक कला शिकविणारे गुरु आणि सद्‌गुरु यांत हा फार मोठा फरक आहे. असे गुरुही प्रगती होण्यास मदत करतात परंतु त्यांच्याशिवायही (जरा जास्त कष्ट करुन!) आपण ती कला शिकू शकतो. परंतु परमार्थामध्ये सर्वप्रथम पाऊल उचलण्यास (म्हणजे आपल्या जीवनात काय महत्वाचे आहे याचा स्वतंत्र निर्णय घेण्यास) सुद्धा सद्‌गुरुंशिवाय शक्य होत नाही. मग अंतिम साध्य गाठण्याची गोष्टच सोडा! माऊलींच्या गुरुस्तवनांत सद्‌गुरुंचे जे काही कर्तृत्व सांगितले आहे त्यामागे एक गोष्ट अध्यारुत आहे. ती म्हणजे आपण स्वतः करु शकणाऱ्या गोष्टींत मदत करुन ते वेळ वाचवितात असे नसून त्यांच्याशिवाय ती घटना होणे असंभव आहे. म्हणून माऊलींनी वरील ओवीतून सद्‌गुरुंना “निव्वळ तुमच्या कृपेनेच मी विषयांच्या आकर्षणांपासून मुक्त होऊ शकतो” अशी प्रांजळ कबुली सर्व साधकांच्या वतीने दिली आहे असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s