शिष्याच्या प्रगतीबद्दल जागरुकता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आधारशक्तीचिया अंकी । वाढविसी कौतुकी ।

हृदयाकाशपालखी । परिये देसी निजें ॥ ५: १२ ॥

चतुर्थ ओवीतील शेवटच्या चरणांत ‘साधकांचे लळे पाळिसी तू’ असे म्हणून माऊलींनी सद्‌गुरुंना आई आणि शिष्याला बालक अशा रुपांत बघितले होते. आता पुढच्या तीन (पाच, सहा आणि सात) ओवींतून गुरु-शिष्यांबद्दलचे हे रुपक अतिशय सार्थक कसे आहे हे ते स्पष्ट करणार आहेत. विवेचनाला घेतलेल्या वरील ओवीतील आधारशक्ती या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे कुंडलिनीशक्ती असा केला जातो. त्यानुसार मग हृदयाकाश या शब्दाचा अर्थ शरीरातील चक्रे असा होऊन निजविणे म्हणजे जीव-शिवाचे ऐक्य असा होऊ शकतो. परंतु या लेखमालिकेची भूमिका सर्वसाधारण साधकाच्या जीवनात गुरुस्तुतील ओव्यांचे प्रतिबिंब कसे असेल हे स्पष्ट करण्याची आहे. म्हणून कुंडलिनी शक्ती इत्यादी तांत्रिक गोष्टींबद्दल न बोलता या ओवीचा एक निराळा अर्थ सांगायची इच्छा होत आहे. असे वाटते की माऊली वरील ओवीतून म्हणत आहे की “स्वतःच्या पाठबळाच्या मांडीवर बसवून (आधारशक्तीचिया अंकी) अतिशय कौतुकाने शिष्याचे लालनपोषण गुरु करतात. जेव्हा शिष्याला विश्रांतीची आवश्यकता असते तेव्हा इतर कुठल्या मनोरंजक गोष्टींपासून त्याला दूर ठेऊन स्वस्वरुपानुसंधानाच्या ध्यासात त्याच्या संकुचित व्यक्तिमत्वाचा विनाश करतोस (हृदयाकाशपालखी निजविसी) .” या अर्थामधील दोन गोष्टी स्पष्ट करणे जरुरी आहे. त्या म्हणजे:

१. ‘पाठबळाची मांडी’ म्हणजे काय? परमार्थाचा मार्ग अतिशय व्यक्तीगत असतो. म्हणजे काय, तर स्थूलरुपाने होणारी बाह्य साधना सार्वजनिक असली तरी ज्याने साधकाची खरी प्रगती होते ते चिंतन-मनन प्रत्येकाची खासगी गोष्ट असते. चिंतन-मननाने मनात उमटलेल्या विचारांना जीवनात कसे उतरवायचे हे स्पष्ट होते. कायम इतर लोकांच्या मतांप्रमाणे वागत, रुळलेल्या मार्गावर चालायची सवय असलेल्या साधकाला जर सर्वांपासून वेगळे वर्तन करायची सद्‌बद्धी उत्पन्न झाली तरी त्या अंतर्स्फूतीनुसार वर्तन करणे त्याला कठीण होते. परंतु नित्यनैमित्तिक साधना केली तरीही अशावेळी आणिबाणीच्या प्रसंगी साधक कसा वागतो यावर त्याची पुढची प्रगती ठरत असते! ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो पण पुढील इयत्तेत जायला मिळते का नाही हे एका तीन तासाच्या परीक्षेवर ठरते तशी ही गोष्ट आहे. वरील उदाहरणातील विद्यार्थ्याला माहीत असते की अमुक वेळेस परीक्षा होणार आहे, परंतु साधनेत असा प्रसंग केव्हा येईल हे सांगता येत नाही! ‘संत असे सदा सावधान’ असे नाथमहाराज म्हणतात ते याच कारणाने. परीक्षेचा प्रसंग चालता-चालता अचानक समोर आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो असा असू शकतो, रीक्षावाल्याने सुटे पैसे परत द्यायला नकार देण्याचा असेल वा घरी आजारपण असताना साधना कशी करतो असा असू शकेल. सद्‌गुरु दिवसाचे चोवीस तास जागृत असल्याने ते आपली केव्हा परीक्षा घेतील याचा नेम नाही. परंतु अतिशय कृपाळूपणे ते अशाक्षणी आपल्या मनात सद्‍बुद्धीसुद्धा उत्पन्न करतात (वरील उदाहरणातील विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेत प्रश्नाबरोबर उत्तरही छापले असण्यासारखी ही गोष्ट आहे!). साधकाला फक्त त्याप्रमाणे वर्तन करायचे की नाही हे स्वातंत्र्य असते! ते वागण्याचे धैर्य जागृत व्हायला सद्‌गुरुंचे स्मरण अत्यावश्यक असते. दैनंदिन जीवनातील अणीबाणीच्या प्रसंगी साधनेला सुसंगत वर्तन करण्यास सद्‌गुरुंच्या स्मरणाने उत्पन्न होणारे हे धैर्य म्हणजे “आधारशक्तीची मांडी” असे आपण म्हणू शकतो. सद्‌गुरुंनी शिष्याला आपल्या या मांडीवर कायम बसविलेले आहे आणि त्यामुळेच त्याची प्रगती होते असा अर्थ आपण या ओवीतून घेतला तर वावगे ठरणार नाही.

२. ‘हृदयाकाशपालखी निजविसी’चा अर्थ. साधकाच्या जीवनात चिंतन-मननाला अनन्यसाधारण महत्व असले तरी ते करायला जी शक्ती लागते, ज्या एकाग्रतेची आवश्यकता असते ती साधकाकडे सतत असू शकत नाही. किंबहुना दिवसात फार कमी वेळ ती उपलब्ध असते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. म्हणून दिवसातील बाकीच्या वेळी आपण कसे वागतो यावरही सद्‌गुरुंचे लक्ष असते. ते साधकाच्या मनात भगवंतनामाच्या अनुसंधानाचा नाद अशावेळी जागृत ठेवतात. स्वतःमधील भगवंताच्या अस्तित्वात (म्हणजेच स्वतःच्या सामाजिक व्यक्तिमत्वविरहीत अस्तित्वात) सतत रममाण होणे होणे म्हणजे हृदयाकाशात विहंगम संचार करणे होय. ज्याप्रमाणे पाळण्याच्या झोक्यांनी बालकाला गुंगी येते त्याचप्रमाणे निरंतर स्वरुपाच्या ध्यासाने साधकाच्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा लोप व्हायला लागतो. समोर येणाऱ्या घटनेकडे त्याची दृष्टी यातून मला काय मिळणार आहे अशी न होता, याला योग्यरीतीने तोंड कसे द्यायचे हे बघण्याची होते. लहान बालक जितका जास्त झोपेल तितकी त्याची वृद्धी लवकर होते त्याचप्रमाणे दररोजच्या जीवनात आपण जितके स्वतःच्या व्यक्तिगत आकांक्षांकडे दुर्लक्ष करु तितकी आपली परमार्थात प्रगती होते! आपल्या गुरुंनी एकच मंत्र सर्वांना दिला असला तरी त्यांनी दिलेली साधना प्रामाणिकपणे केल्याने जे धैर्य उत्पन्न होते त्याचा आधार घेऊन आपल्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा विलोप करणारी साधना अतिशय व्यक्तिगत असते. ती आपल्या शिष्याने करावी हे सद्‌गुरुंना अपेक्षित असते! म्हणून नियमितपणे गुरुपोनिर्दिष्ट साधना करताना मनात येणाऱ्या स्फुरणाशी सुसंगतपणे आपले बाकीचे जीवन व्यतीत करणे हे शिष्याचे कर्तव्य ठरते. जेव्हा स्वतःमध्येच मन रमते तेव्हा साधक दुसऱ्यांची मान्यता मिळविण्याच्या धडपडींपासून मुक्त होतो. त्यानंतर आपोआप संसाराचे भय नष्ट होते. अर्थात्‌ इथे स्वतःमध्ये रमणे याचा अर्थ स्वतःच्या अमूर्त अस्तित्वात विलीन होणे होय, स्वार्थीपणाने आपल्या सामाजिक व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची धडपड करणे नव्हे हे लक्षात घेणे जरुरी आहे. असो.

अशारीतीने या ओवीकडे बघितले तर सद्‌गुरुंचे साधकाच्या दैनंदिन जीवनातील महत्व स्पष्ट होते. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s