अपरोक्ष ज्ञानाची देणगी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

प्रत्यक्‌ज्योतीची ओवाळणी । करिसी मनपवनाची खेळणी ।

आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी ॥ ६:१२ ॥

माऊली शिष्याला बालक आणि गुरुला माता या रुपांत बघत आहेत. वरील ओवीतून माऊली हे रुपक कसे सार्थ आहे हे आपणांस सांगत आहे. या ओवीतील प्रत्यकज्योती आणि मनपवन या शब्दांचा अर्थ ‘शरीरातील चक्रे’ आणि ‘निरोध’ असा केला जातो. परंतु आपण दैनंदिन जीवनात माऊलींच्या गुरुस्तुतीचे प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्‍न करीत आहोत. या दृष्टीने बघितले तर असे वाटते की माऊली म्हणत आहे की ‘प्रत्यक्ष (म्हणजे अपरोक्ष) ज्ञानाचा प्रकाश शिष्याच्या जीवनात आणून, गुरु आपल्या शिष्याची बुद्धी आणि स्फूर्ती (मन आणि पवन) एक करतात. त्याला अशा सहज अवस्थेत जगताना (म्हणजे आत्मबोधात राहताना) पाहून स्वतः प्रफुल्लित होतात (बाळलेणी आईच्या आनंदाकरीता घातली जातात, बाळाला त्याची जाणीवही नसते!).”

ज्ञानाचे परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन विभाग केले जातात. एखाद्या वाळवंटात चालताना जेव्हा आपण दुरुन एका ठिकाणी हिरवळ बघतो तेव्हा तिथे पाणी आहे याचे परोक्ष ज्ञान होते. प्रत्यक्ष तिथे जाऊन तळ्यातील पाणी प्राशन करतो तेव्हा त्या पाण्याचे अपरोक्ष ज्ञान होते. परमार्थात अपरोक्ष ज्ञानालाच ज्ञान समजले जाते कारण या ज्ञानात संदेहाचा लवलेश नसतो. निःसंदेह ज्ञान शाश्वत असते. त्यातून घसरण्याची संभावनाच नसते. तसे बघायला गेले तर आपणा सर्वांना भगवंताशी अनन्य नाते जोडण्यातच आयुष्याचे भले आहे याचे ज्ञान आहे. हो ना? पण यातील ‘अनन्य’ या शब्दाबद्दल आपल्या मनात शंका आहे. म्हणूनच आपण पैसा, नातेवाईक, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी इतर गोष्टीसुद्धा जवळ ठेवतो. याचे कारण असे की आपल्या मनात अपरोक्ष ज्ञानाचा उजेड अजून पडलेला नाही, संतांनी सांगितलेले आहे म्हणजे खरेच असणार अशा परोक्ष ज्ञानात आपण आहोत. अपरोक्ष ज्ञानाचा उदय होण्यास गुरुकृपाच लागते कारण ते अचानक, स्वतः कुठलाही प्रयत्‍न न करीता आपल्यासमोर प्रगट होते. श्रीरामदासस्वामींच्या जीवनात ‘शुभमंगल सावधान’ या शब्दांनी आणि गौतम बुद्धाच्या जीवनात रथातून संध्याकाळचा फेरफटका मारताना पडला. तो केव्हा आणि कसा होईल यावर कुणाचे नियंत्रण नसते. श्रीरामकृष्ण परमहंसांचे योगानंद नावाचे शिष्य होते. लहानपणापासूनच वैराग्य जागृत असूनही केवळ आईचे मन सांभाळालायला त्यांने लग्न केले. पण त्यानंतरही ते आणि पत्नी वेगळेच रहात होते. एकदा जेवताना त्यांच्या मातोश्रींनी याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की केवळ तुझ्याकरीता मी लग्न केले आहे, नाहीतर मी संन्यासच घेणार होतो. तेव्हा त्यांच्या मातोश्रींनी वाढता-वाढता सहज म्हटले की ‘असा कुणी दुसऱ्याकरीता कधी लग्न करतो का?’ स्वतःच्या आईच्या मुखातून हे शब्द ऐकल्यावर आपल्याला संपूर्णपणे जाणणारे केवळ आपले गुरु आहेत या ज्ञानाचा अपरोक्ष प्रकाश त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यावरील आईबद्दलच्या प्रेमाचा बंध तुटला. मग त्यांनी आपल्या पत्‍नीची परवानगी घेऊन संन्यास घेतला. सांगायचे असे की, एकदा गुरुकृपा झाली की अगदी नेहमीच्या, सामान्य गोष्टींतून पारमार्थिक ज्ञान व्हायला लागते. अर्थात, सर्वसाधारण साधक परोक्ष ज्ञानाच्या मध्यरात्रीतच आपले जीवन व्यतीत करत असतो. गुरुंनी दिलेली साधना वर्षोनुवर्षे करुन त्याला अपरोक्ष ज्ञानाच्या उषःकालापाशी यावे लागते. तरीसुद्धा त्या ज्ञानाचा सूर्योदय स्वतः करण्याची क्षमता त्याच्यात नसते. निव्वळ गुरुकृपेनेच त्याचे डोळे उघडतात आणि मग नेहमीच्याच घटना त्याला वेगळे अर्थ दर्शवायला लागतात. त्याचे सर्व आयुष्यच निराळ्या प्रकाशात न्हाऊन निघते. जीवनातील हा प्रकाश म्हणजेच प्रत्यक्‌ज्योतीची ओवाळणी असे समजले तर वावगे होणार नाही.

एकदा दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटनेकडे बघायची दृष्टी बदलली की आपोआप साधकासमोर कसे वागायला हवे हे स्पष्टपणे दिसू लागते. सर्वसाधारणपणे आपल्यासमोर आलेल्या घटनेला कसे तोंड द्यायला हवे याबद्दल अनेक विचार असतात. त्यातील सर्वथा चांगला दिसणारा मार्ग आपण निवडतो. आपल्या जीवनातील हे अनेकत्व कर्मबंधन उत्पन्न करण्यास कारणीभूत असते. परंतु प्रत्यक्‌ज्योतीच्या प्रकाशात आयुष्य व्यतीत करणाऱ्या मानवाच्या जीवनातून हे अनेकत्व नाहीसे होऊन निव्वळ एकच मार्ग दिसणे सुरु होते. जेव्हा आपले मन आणि बुद्धी एकच गोष्ट सांगायला लागते तेव्हा त्यानुसार वर्तन करणे अपरिहार्य होते. ज्याप्रमाणे नेहमीचा श्वास घेणे साहजिक असते त्याचप्रमाणे त्याचे सर्व कार्यक्रम सहज होतात. मन आणि पवन एकत्र होणे म्हणजे नित्य अनुसंधानाने आपल्या जीवनातील सर्व द्वैत नष्ट होऊन एकच मार्ग नजरेला दिसणे होय.

अशा अवस्थेत केलेल्या कर्मांचा अहंकार साधकाच्या मनात उत्पन्न होत नाही. कर्मबंधन हे कर्त्याच्या मान्गुटीवर बसत असल्याने आपोआप झालेल्या अहंकारविरहीत (म्हणजेच कर्ताविरहीत) कर्मांचे बंधन कोणावर पडणार?. अशी अवस्था आली की साधक आपल्या स्वरुपात विलीन होण्यास मुक्त होतो. प्रारब्धाने समोर आलेल्या घटनांना अंतर्स्फूर्तीने तोंड देतो आणि चित्ताने स्थिर असतो. आपल्या चित्तातील अशी अचल स्थिरता म्हणजे आत्मबोध म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या अवस्थेत साधक सुखी असतो. हे सुख सर्वसाधारण सुखापासून भिन्न असते. जेव्हा आपण इंद्रियांद्वारे मिळालेल्या संवेदनांनी सुखी असतो तेव्हा आपण केवळ सुखी नसतो तर स्वतःच्या सुखी असण्याची जाणीवही आपणांस असते. (चांगले भोजन झाले आहे, वा अतिशय मुलायम कपडे घातलेले आहेत याची जाणीव असते). म्हणजे काय, तर सुख आणि सुखाची जाणीव ठेवणारे आपले अस्तित्व या दोन गोष्टींमध्ये आपण विभागलेले असतो. परंतु सहज अवस्थेतील सुख आणि साधक यांचे एकत्रीकरण झालेले असते. म्हणून आपण सुखी आहोत याची जाणीवही साधकाला नसते. (लक्षात घ्या की सुखी असणे आणि आपण सुखी आहोत याची जाणीव होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.) ज्याप्रमाणे लहान बालकाला आपल्या शरीरावरील अलंकारांची जाणीव नसते, ती आईलाच असते त्याचप्रमाणे सहज अवस्थेतील साधकाची आनंदीत स्थिती गुरुमाऊलीच ओळखू शकतात. म्हणून साधकाच्या आत्मसुखाला माऊलींनी ‘बाळलेणी’ असे संबोधलेले आहे. केवळ या एका शब्दातून साधकाची अद्वैत अवस्था स्पष्ट करण्याचे शब्दकौशल्य फक्त माऊलींतच दिसून येते! असो.

अशा रीतीने या ओवीतून माऊली आणि बालक हे रुपक गुरु-शिष्याला किती चपखलपणे लागू होत आहे हे माऊली स्पष्ट करीत आहे. पुढील ओवीत माऊली हेच रुपक अजून पुढे नेणार आहेत. त्यावर आपण नंतर विचार करू. आज इतकेच!

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s