अनुसंधानातील ताकद – १

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जयांचेनि आठवें । शब्दसृष्टी आंगवे ।

सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ २:१३ ॥

प्रथम ओवीतून सद्‌गुरुंवर विश्वास ठेवल्यानेच आपल्या मनातील पूर्वग्रह निघून जातात आणि नविन समजुतीयुक्त आयुष्याला सुरुवात होते असे माउलींनी सांगितले. आता गुरुंवर पूर्ण विश्वास बसलेल्या साधकाच्या दैनंदिन जीवनात कसा फरक होतो हे पुढील तीन ओवींतून ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहेत. वरील ओवीतून माउली म्हणत आहे की “मनात गुरुंचे अनुसंधान ठेवल्याने शब्द आपोआप स्फुरायला लागतात. जणू काही सगळा शब्दकोश हाताशी असल्यासारखे होऊन योग्य शब्द समर्पकपणे बोलले जातात.” वरील ओवीकडे आपण दोन दृष्टीकोनातून बघू शकतो. एक म्हणजे माऊलींनी स्वतःच्या जीवनात या वस्तुस्थितीचा घेतलेला अनुभव आणि दुसरा म्हणजे आपणा सर्वांच्या आयुष्यात या ओवीचे उठलेले प्रतिबिंब.

पहिल्या नजरेने बघितले तर श्रीज्ञानेश्वरीतील पहिल्या बारा अध्यायांतील विवेचन हे माऊलींच्या दृष्टीने या ओवीला दर्शविते. श्रीज्ञानेश्वरीत माऊली स्वतःला ‘निवृत्तिदासु’ या नांवाने संबोधित करतात. आता एखाद्या राजाचे अनेक तऱ्हेचे सेवक असतात. कुणी त्याला गरम पाणी आणून देतो तर कुणी अंगरक्षक म्हणून काम करतो. कोण त्याच्यासाठी स्वयंपाक बनवितो तर कुणी त्याचे अन्न त्याच्याआधी चाखून त्यात विषबाधा नाही याची खात्री करतो. परंतु स्वतःला श्रीनिवृत्तीनाथांचे दास म्हणवून घेताना यापैकी कुठलाही सेवक माऊलींच्या मनात अध्यारुत नाही. राजाने एखादा नव्याने केलेला नियम सर्व राज्यात फिरुन दवंडी पिटणारा अशा सेवकाची प्रतिमा माऊलींच्या मनात ‘निवृत्तीदास’ हा शब्द वापरताना असावी असे वाटते. म्हणजे काय, तर माझ्या तोंडातून आलेले सर्व शब्द माझ्या गुरुंनी माझ्यासमोर खाजगीत उद्गारलेले आहेत आणि ‘जा आता सर्वांना सांग’ अशी आज्ञा मला केली आहे असे या एका शब्दातून माऊली आपणांस सांगत आहेत. अर्थात्‌, संपूर्ण ज्ञानेश्वरी आधी उच्चारायची निवृत्तीनाथांना गरज नव्हती. त्यांनी आपल्या कृपेचा वरदहस्त माऊलींच्या माथ्यावर ठेवला आणि मग त्यांच्या मुखातून योग्य शब्द प्रसवायला सुरुवात झाली. वरील ओवीतून माऊली आपणांस या वस्तुस्थितीची परत एकदा आठवण करुन देत आहेत असे वाटते. श्रीमद्‍भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात खास करुन या सत्यतेला परत सांगायची गरज माऊलींना भासली कारण या अध्यायात क्षेत्र-क्षेत्रज्ञयोग आणि नंतर सांख्ययोग (जो दुसऱ्या अध्यायात अत्यंत संक्षिप्तपणे सूचित केला होता) सांगितला आहे. अतिशय सूक्ष्म ज्ञान प्रचलित शब्दांत सांगायचे त्यांचे कौशल्य या अध्यायात पणाला लागले आहे असे म्हंटले तर अयोग्य होणार नाही. म्हणून माऊलींनी आपणांस त्यांची असामान्य, अलौकिक प्रतिभा कोणाच्या कृपेने पूर्णपणे जागृत झाली हे परत एकदा सांगितले आहे असे वाटते. हा झाला पहिला दृष्टीकोन.

आता आपणासारख्यांच्या नजरेने पहायचे झाले तर हे अगदी स्पष्ट आहे की आपण गीतेवर भाष्य लिहायचे धाडस आयुष्यात करणार नाही! मग आपल्या जीवनात या ओवीचे प्रतिबिंब कसे बघायचे? इथे असे सांगावेसे वाटते की भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ निव्वळ अभ्यासासाठी लिहिलेले नाहीत. ते दैनंदिन जीवनातील घटनांकडे बघण्याची आपली नजर बदलविण्यास लागणारी विचारशक्ती देण्यास निर्मित केले आहेत. याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आणि त्यावरील चिंतन-मननाने जे काही आपणांस सुचते त्यानुसार या जगात अहोरात्र वागणे ग्रंथकर्त्यांना अपेक्षित आहे. हे जाणून प्रामाणिक साधक असे प्रयत्‍न निश्चितपणे करायला लागतो. परंतु हे त्याला शक्य होतेच असे नाही. याचे कारण असे की जगात वावरताना सामोऱ्या आलेल्या घटनांमध्ये तो स्वतः इतका गुंतून जातो की जे समोर घडत आहे त्याचे तटस्थपणे निरीक्षण करणे त्यास जमत नाही. स्वतःच्या एखाद्या व्यक्तिमत्वाच्या चष्म्यातून तो त्यांच्यांकडे बघतो आणि त्याला त्यांच्यातील सत्यता न दिसता स्वतःला सोयीस्कर अशी घटना दिसायला लागते. आणि जेव्हा काय चालले आहे हेच कळत नाही तेव्हा त्यावरची आपली प्रतिक्रिया योग्य असू शकत नाही! परंतु जेव्हा आपण सद्‌गुरुंच्या अनुसंधानात राहून जगात वावरायला लागतो तेव्हा आपल्या अवतीभोवती चाललेल्या गोष्टींपासून आपण आपोआप वेगळे होतो आणि म्हणून त्यांचे खरे निरीक्षण आपण करु शकतो. एव्हढेच नव्हे तर साधकाचे गुरु अनुसंधानाच्या रूपात जागृत असल्याने तेच त्याच्या बुद्धीला कार्यरत करून योग्य असा विचार मनासमोर ठेवतात. आणि जे मनात असते तेच शब्दांतून बाहेर येत असल्याने भक्ताच्या मुखातून अतिशय योग्य असे शब्द बाहेर येतात, वा योग्य कृती घडते. “विपाये आठविता चित्ता । दे आपुली योग्यता” असे सद्‌गुरूंच्या बाबतीत माऊलींनी जे उद्गार काढलेले आहेत त्यांचे सत्यत्व अशा वेळी आपल्या शब्दांतून वा कृतींमधून या जगात प्रगट होते असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. या नजरेने पाहिले तर असे वातते की श्रीनिवृत्तिनाथ निव्वळ माऊलींच्या हातून गीतेवर भाष्य लिहून घेऊन थांबलेले नाहीत, तर खरे म्हणजे जो कुणी साधक आपल्या सद्‌गरुंच्या अनुसंधानात राहून आयुष्य जगायचा प्रयत्‍न करतो त्याच्या शब्दांतून आणि कृतींतून ते अजून त्या ग्रंथाचा अर्थ जगासमोर मांडतच आहेत! “देवी जैसे कां स्वरूप तुझें । तैसे हे नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥” असे भगवान श्रीशंकरांनी भवानीआईला का सांगितले त्याचे स्पष्टीकरणच या ओवीत माऊलींनी दिले आहे असे वाटते. दैनंदिन आयुष्यात निरंतर सद्‌गुरुंच्या अनुसंधानात राहण्यात काय ताकद असते हे या ओवीतून आपण शिकू शकतो. एकदा हे महत्व पटले तर आपोआपच आपण अनुसंधानात विलीन होऊ, स्वतःच्या आयुष्याला कृतार्थ करु. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: