॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
वक्तृत्वा गोडपणे । अमृताते पारुखे म्हणे ।
रस होती वोळंगणे । अक्षरांसी ॥ ३: १३ ॥
तेराव्या अध्यायातील संक्षिप्त गुरुस्तवनातील गेल्या ओवीतून आपण असे पाहिले की सद्गुरुंच्या अनुसंधानात राहून आयुष्य जगताना आपणांस आपोआप योग्य शब्द सुचतात आणि हातून उचित कर्म सहजपणे घडते. आता, समाजात राहणारी कुठलीहि व्यक्ति एका कोशात राहू शकत नाही. म्हणून अनुसंधानात मग्न असलेल्या साधकाचा इतरांशी संबंध येणर यात शंका नाही. आज विवेचनाला घेतलेल्या या ओवीतून माऊली असा साधक इतरांशी कसा संवाद साधतो हे स्पष्ट करीत आहेत. माऊली म्हणत आहे की “नित्य अनुसंधानात असलेल्या साधकाच्या मुखातून जे शब्द निघतात त्याने (ऐकणाऱ्याच्या मनात) एक नवी उमेद जागृत होते. आणि दररोजच्या रटाळ जीवनातही त्याला नित्यनूतनतेचा रस दिसून तो एक नविन आयुष्य जगायला लागतो.”
लहानपणी आपल्यामधील संवेदनशीलता अतिशय जागृत असते. आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी नविन असल्याने त्यांच्याकडे आपण कुतुहलाने बघतो. त्यांतून काहीतरी शिकून घ्यायचा आपला प्रयत्न अविरत चालू असतो. परंतु जसजसे वय वाढू लागते तसतसे ‘स्वतःला माहीत आहे’ अशी भावना आपल्या मनात (पूर्वानुभवांमुळे) मूळ घेऊ लागते. समोर काय चालले आहे ते पूर्ण माहिती आहे असे वाटल्याने त्यांच्यामधील कुतुहल निघून जाते आणि आपले जीवन सवयीचे व्हायला लागते. मग आपण दैनंदिन आयुष्याला रहाटगाडगे (म्हणजे एकच गोष्ट परत-परत होणे) चालू आहे असे म्हणायला लागतो! खरे म्हणजे दररोज होणाऱ्या घटना ढोबळ दृष्टीने एकसारख्या असल्या तरी त्या सूक्ष्मपणे बघितल्यास दरवेळी वेगवेगळ्या असतात. पण स्वतःला माहित आहे या भावनेने आपण त्यांच्याकडे सूक्ष्म नजरेने पहायचे कष्ट घेत नाही. अशा वर्तनाने मनुष्यातील संवेदनशीलता लोप व्हायला लागते आणि त्याचे मन निबर बनू लागते. आणि मनाचा निबरपणा म्हणजेच मृत्यु होय. निव्वळ देहाच्या चलनवलनावर आपले जिवंतपण सिद्ध होत नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. ज्याचे मन संपूर्णपणे निबर झाले आहे त्याच्या आयुष्यातला रस निघून गेला आहे आणि तो देहाने जिवंत असूनही मनाने मृत्यु पावला आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे! अशा दृष्टीकोनातून बघितल्यास मनाची संवेदनशीलता जितकी जागृत आहे तितकेच आपण जिवंत आहोत असे म्हंटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. जेव्हा अनुसंधानात असलेल्या साधकाच्या नजरेने आपण जीवनाकडे बघायला लागतो तेव्हा आपल्या नेहमीच्या आयुष्यातच एक वेगळे सौंदर्य आपणांस दिसू लागते. आपल्या मनावर चढलेले निबरतेचे कवच झडायला लागते. यातून आपल्या आयुष्यातील मरुन गेलेल्या भागांचे पुनरुज्जीवन होते असे म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे काय, तर स्वतःला अमर बनविणे म्हणजे आपल्या मनाची संवेदनशीलता उत्तरोत्तर वाढवित नेणे असा निष्कर्ष निघतो. आयुष्याकडे कसे बघावे याबद्दल जेव्हा आपण अनुसंधानात राहणाऱ्या साधकाचे मत श्रद्धापूर्वक ऐकतो तेव्हा आपणांस त्याची नजर प्राप्त व्हायला लागते. ‘अरे, मी असा विचार कधीच केला नव्हता’ याची जाणीव आपणांस होऊ लागते. या साक्षात्कारातच आपले नविन जीवन सुरु व्हायला लागते. म्हणूनच माऊली म्हणत आहे की अशा सत्शिष्याच्या मुखातून निघालेल्या वचनांच्या श्रवणाने ऐकणारा आपले आयुष्य नाविन्याने जगू लागतो. स्वर्गातल्या अमृताने मनुष्य आपले नेहमीचेच आयुष्य वृद्धिंगत करतो परंतु सद्गुरुचरणांकित साधकाच्या शब्दांनी तो आयुष्याला एक वेगळेच रूप देतो! जुने कवच टाकून नवी त्वचा प्राप्त केलेल्या सर्पाप्रमाणे त्याचे आयुष्य नुसतेच वाढत नाही. तर एक नवी कलाटणी मिळून ते अधिक अर्थपूर्ण होते. म्हणूनच हे शब्द अमृतालाही फिके पाडतात असे माऊली म्हणत आहे अस वाटते. सत्संगतीने आपण स्वतःच्या आयुष्याचा खरा उपभोग घेतो. म्हणून जितके लवकर आपण परमार्थाच्या मार्गावर पदार्पण करु तितका अधिक आनंद आपणांस मिळतो. ‘हे काय माझे परमार्थ करण्याचे वय आहे का? नोकरीतून निवृत्त झाल्यावर ज्ञानेश्वरी नक्की वाचीन’ असे जे म्हणतात त्यांनी या सत्यतेचे दर्शन घेणे जरुरी आहे. असो.
परंतु माऊली सत्शिष्याच्या वचनांचे इतकेच कौतुक करुन थांबलेली नाही! वरील ओवीत त्यांनी अशा शब्दांना ‘गोडपणे’ असे विशेषणही लावलेले आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. आपणांस झालेला रोग वैद्याच्या काढ्याने बरा होतो आणि आयुष्य परत सुंदर होते हे खरे पण तरी त्या काढ्याला कुणी ‘गोड’ म्हणतो का?! संतांच्या शब्दांनी निव्वळ आपले आयुष्य बदलत नाही तर ते ऐकतानासुद्धा आपल्या हृदयास गुतकुली होत असते! अतिशय प्रेमळ शब्दांनी दुसऱ्याच्या जीवनात नविन अर्थ भरायची कला सद्गुरुंनाच माहिती असते. आणि जो त्यांच्या अनुसंधानात असतो त्याच्या मुखातून तेच बोलत असल्याने हा गुण सत्शिष्याच्या वाणीतही दिसून येतो. सद्गुरु जेव्हा सत्य बोलतात तेव्हा ते सामान्य माणसासारखे कठोर शब्दांत बोलत नाहीत (सर्वसामान्य लोकांना गर्व असतो ‘मी नेहमी परखड बोलतो, दुसऱ्याच्या मनाचा विचार करीत नाही’ याचा!) तर एखाद्या आईप्रमाणे ते आपणांस योग्य मार्ग दाखवितात. हट्टी मुलाला जेवायच्या वेळी ‘आईस्क्रीम मिळणार नाही’ असे सांगतानाही आईच्या मनात मुलाबद्दल प्रेम आणि सहनुभूतीच असते. त्या भावनेंपोटी जे शब्द निघतात त्यांच्यामुळे ऐकणाऱ्याच्या मनावर कधीच ओरखाडे निघत नाहीत. लक्षात घ्या की सद्गुरु सत्य अतिशय सकारात्मक सांगतात. त्यामुळे श्रध्दायुक्त साधकाच्या मनात त्या शब्दांनी स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण न होता आयुष्य बदलविण्याची उभारी निर्माण होते. ‘परखडपणे’ दुसऱ्याचे उणे दाखवून त्यांना धडा देणाऱ्या माणसांपासून सद्गुरु किती वेगळ्या पातळीवर असतात ते माऊलींनी निव्वळ ‘वक्तृत्वा गोडपणे’ या दोन शब्दांत स्पष्ट केले आहे असे वाटते.
अशा रीतीने अनुसंधानात राहणारा साधक सर्व जगाला अतिशय सकारात्मक वळण लावून नवी दृष्टी प्रदान करतो असे या ओवीतून माऊली आपणांस सांगत आहेत. इति.
॥ हरि ॐ ॥