अनुसंधानातील ताकद – ३

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

भावाचे अवतरण । अवतरविती खूण ।

हाता चढे संपूर्ण । तत्वभेद ॥ ४:१३ ॥

श्रीगुरुचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय ।

तैं येवढे भाग्य होय । उन्मेषासी ॥ ५:१३ ॥

गेल्या ओवीतून सद्‌गुरुंच्या नित्यस्मरणाने आपल्या मनाची निबरता निघून जाऊन संवेदनशीलतेचा उन्मेष आपले जीवन नव्याने जगायची प्रेरणा देतो हे बघितले. आता या ओवीतून अनुसंधानात मग्न असलेल्या शिष्याचे आयुष्यात कुठल्या रीतीने नाविन्य येते हे माऊली स्पष्ट करीत आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की “(अनुसंधानात असलेल्या शिष्याच्या) मनात सत्‌भावाचे आगमन होते. सद्भावाच्या अस्तित्वाची सर्वांत मोठी खूण म्हणजे दैनंदिन आयुष्यातील घटनांतच त्याला तत्व दिसू लागते (तत्वभेदात तो रममाण होतो).”

सर्वसाधारण साधकाच्या मनात आपली साधना कमी पडत आहे हा विचार दिसून येतो. स्वतःवरील जबाबदाऱ्यांमुळे वा मनात असलेल्या विविध आकर्षणांच्या प्रभावामुळे आपले बहुतांशी आयुष्य साधनेविरहित चालले आहे याची खंत सर्वसामान्यपणे आढळून येते. बहुतेकांच्या मनात गुरुभक्ति कशी करायला हवी याचा आदर्श म्हणजे स्वामी रामदासांचा परम शिष्य कल्याणस्वामी समोर असतात. गुरुंनी ‘उडी मार’ म्हटल्यावर कोरड्या विहीरीत आपण उडी मारू शकणार नाही याची जाणीव असल्याने आपल्या शिष्यत्वाबद्दलचा न्यूनगंड मनात बाळगणारे सर्वत्र दिसतात. आणि पारमार्थिक प्रगतीमध्ये निव्वळ अहंगंडानेच नव्हे तर न्यूनगंडानेही अडथळा येत असल्याने शिष्याच्या प्रगतीचा वेग अशा नकारात्मक भावनेने मंदावतो. याची जाणीव झाली की साधकाच्या मनात स्वतःच्या कमीपणाची भावना अजून प्रबळ होते आणि हे दुष्टचक्र चालूच राहते. या सर्वाचे मूळ आपल्या मनात ‘साधना म्हणजे काय’ याबद्दल असलेली सिमीत भावना होय. आपल्या साधनेचे रूप गुरुपोनिर्दिष्ट साधना (ध्यान करणे, नाम घेणे इत्यादि) त्यांनी एकदा सांगितलेल्या पद्धतीने करणे इतकेच जर असेल तर ज्या दिवशी अशी साचेबद्ध साधना करताना आपले मन एकाग्र होत नाही त्या दिवशी आपली साधना झाली नाही अशी भावना मनात येणे साहजिक आहे. आणि समजा एका दिवशी एकाग्रतेने केली तर पुढच्या दिवशी आपण कालच्या एकाग्रतेचा संदर्भ घेऊन आजची साधना तेव्हढीच चांगली झाली का याबद्दल निष्कर्ष काढायला उद्युक्त होतो! परंतु जेव्हा शिष्य निव्वळ साचेबद्ध साधनेलाच सर्वस्व न मानता दिवसाच्या बाकीच्या वेळात सद्गुरुंच्या अनुसंधानात रममाण होतो तेव्हा दैनंदिन आयुष्यातील सर्व घडामोडी साधना सुरु ठेवायची संधी देत आहेत याची जाणीव त्याला व्हायला लागते. त्यामुळे स्वतःबद्दलच्या न्यूनगंडातून तो आपोआप मुक्त होतो. एखाद्या किचकट शब्दकोड्याच्या संकेतावरून योग्य शब्द शोधल्यावर जो आनंद होतो तसा आनंद शिष्याच्या जीवनात क्षणोक्षणी यायला लागतो. अतिशय सूक्ष्म अशा त्या आनंदात तो स्वतःची साधना निरंतर सुरु ठेवतो आणि या जगात आत्तापर्यंत जीवापाड सांभाळलेल्या स्वतःच्या प्रतिमांना जपत आपले पुढील आयुष्य व्यतीत करायला हवे या बंधनातून तो मुक्त होतो. सद्‌भावाचे त्याच्या आयुष्यात आगमन होते. खरे म्हणजे हा सद्भाव आपल्यात कायमचाच आहे पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या संकुचित व्यक्तिमत्वांना प्राधान्य देत आपण आपले आयुष्य जगत असतो. अनुसंधानात आपल्या या सवयीला मोडून टाकायची ताकद आहे.

एकदा आपण अनुसंधानात मग्न राहून आयुष्य जगणे सुरु केले की कुठल्याही बिकट परिस्थितीत आपणांस योग्य मार्ग दिसू लागतो. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की बिकट अवस्था क्षणात दूर होते! आपल्या प्रारब्धात जे लिहीलेले आहे त्याप्रमाणे घटना घडतच असतात पण कुठल्याही घटनेला योग्य रीतीने सामोरे जाऊन आपण तीचा जास्तीत जास्त उपशम करतो. वरील ओवीतील ‘संपूर्ण’ या विशेषणाने गोचर झालेला अर्थ निव्वळ पुस्तकी ज्ञान होते इतका मर्यादित नाही तर दैनंदिन जीवनात कार्यरत होऊ शकेल असा सर्वव्यापक असतो असे माऊलींना सांगावयाचे आहे असे वाटते! या सर्व जगात भगवंत भरलेला आहे असे एखादा पंडित शास्त्राचा आधार घेऊन सांगू शकतो पण गुरुंच्या अनुसंधानानेच आपणास या सत्यतेला प्रत्यक्षपणे कसे उपयोगात आणायचे हे कळते. ‘तत्वभेद’ संपूर्णपणे आपल्या रक्तात भिनवून घ्यावयाचा असेल तर अनुसंधानाला पर्याय नाही. आणि एकदा अनुसंधानात असलो की ‘विपाये आठविता चित्ता । दे आपुली योग्यता॥’ या माउलींच्या उक्तीप्रमाणे आपण गुरुंच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगायला लागतो.

अशा रीतीने आपण आपले आयुष्य जेव्हा सद्‌गुरुंच्या स्मरणात व्यतीत करतो तेव्हा नेहमी योग्य शब्द आपल्या जिभेवर हजर असतात, आपल्या शब्दांनी कोणी दुखावत नाही, आणि ऐकणाऱ्याच्या जीवनात एक उत्क्रांति घडून येते. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या मनात सद्भाव जागृत होऊन सर्व शास्त्रांचे ज्ञान निव्वळ पुस्तकात न राहता आपल्या दैनंदिन जीवनात कार्यरत व्हायला लागते. यापेक्षा अधिक सुंदर घटना आपल्या जीवनात घडू शकेल काय? म्हणूनच या स्तुतीच्या अंतिम चरणांत माऊली म्हणत आहे की ज्याने सद्गुरु चरणांपाशी आपले मन ठेवले आहे त्याच्या जीवनात “तैं येवढे भाग्य होय, उन्मेषासी’! इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: