सुख कसे मिळते?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जय जय आचार्या । समस्त सुरवर्या ।

प्रज्ञाप्रभासूर्या । सुखोदया ॥ १:१४ ॥

जानेश्वरीतील गुरुस्तवनांवर नजर टाकली असता असे दिसून येते की यात कधीही श्रीनिवृत्तिनाथांच्या रंगरूपाचे वर्णन केलेले नाही. निवृत्तिनाथ काळे होते का गोरे होते, त्यांना सुगंधाची आवड होती का नव्हती इत्यादि स्थूल गोष्टींशी माऊलींना काही घेणे-देणे असावे असे दिसून येत नाही. गुरुंंमधील गुरुतत्वाचीच निःसीम आवड त्यांना आहे असे वाटते. म्हणूनच सर्व स्तवनांतून गुरुंमधील ती अमूर्त शक्ति बाह्य जगात कशी प्रगट होते याचेच वर्णन केलेले आढळून येते. चवदाव्या अध्यायातील गुरुस्तवनातही, ज्यावर आपण आता विचार करणार आहोत, हेच आढळून येते. यातील पहिल्या ओवीत माउली म्हणत आहेत की ‘ज्यांचा आचार बाकीच्यांना अनुकरणीय आहे, जे सर्व देवतांचे इष्ट दैवत आहेत, ज्यांच्या सहवासाने भक्ताच्या मतित ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि जे भक्ताच्या आयुष्यात खऱ्या सुखाचा उदय करवितात त्यांचा जयजयकार असो. 

१. आचार्य : या शब्दाने श्रीनिवृत्तिनाथ हे निव्वळ ज्ञान देणारे नसून स्वतःच्या (आणि शिष्यांच्या) आचरणातून ते ज्ञान प्रगट होत आहे का नाही इकडे लक्ष देणारे आहेत असे सूचीत होते. परमार्थ हा निव्वळ शाब्दिक कसरतींचा खेळ नसून नेहमीच्या आयुष्यात आपल्या वर्तनातून तो सहजपणे प्रगट व्हायला हवा अशी श्रीनिवृत्तिनाथांची विचारसरणी असणार असे वाटते. ‘हे नव्हे केवळ बोलाचे शास्त्र । आहे संसार जिणते शस्त्र ।’ असे माऊलींनी जे म्हंटले आहे त्याचा पाया आपण इथे बघू शकतो!

२. समस्त सुरवर्या : माऊलींनी आपले गुरु सर्व देवतांना वंदनीय आहेत असे म्हंटले आहे. जरा विचार केला की असे दिसून येते की देवलोकाला महत्व मनुष्यलोकाने येते. जर सगळेच देव असते तर देव असणे ही सामान्य स्थिती झाली असती! मानव नाहीसा झाला तर त्याबरोबर देवसुद्धा आपले देवपण हरवून बसतील. म्हणूनच गीतेमधील पंधराव्या अध्यायात मायेला संसारवृक्षाची उपमा देताना असे म्हंटले आहे की मनुष्यलोकाची फांदी वरील (स्वर्गलोकादि) शाखांचे मूळ आहे (पहा ज्ञा. १७५-१७६, अध्याय १५). त्यामुळे ज्याच्या हातात मनुष्यलोकाला परब्रह्मामध्ये विलीन करण्याची शक्ति आहे तो देवांनाही आपोआप वंदनीय ठरतो यात अतिशयोक्ति नाही! स्वतःच्या गुरुंचे महत्व सर्व देवतांपेक्षा मोठे आहे याची निरंतर जाणीव ज्याला आहे त्याची स्थिती उच्च आहे यात शंका नाही. श्रीरामकृष्ण परमहंसांना स्वतःबद्दल अजिबात अभिमान नव्हता. अतिशय सामान्य लोकांपासून ते आपणांस भिन्न मानायचे नाहीत. तरीसुद्धा ते शिष्यांना विचारायचे की ‘माझ्याबद्दल तुझे मत काय आहे?’ जितकी शिष्याच्या मनात त्यांच्या देवत्वाची जाणीव असेल तितकी त्याची प्रगती झाली असे त्यांचे म्हणणे असायचे. लक्षात ठेवा की प्रामाणिकपणे केलेल्या गुरुस्तुतीने गुरुंचे महत्व सिद्ध होत नाही तर शिष्याची पातळी स्पष्ट होते! असो. माऊलींच्या मनात याची स्पष्ट जाणीव आहे की आपले गुरु सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेत.

३. प्रज्ञाप्रभासूर्या : ज्याप्रमाणे सूर्याच्या उजेडाने आपणांस विश्व दिसते त्याचप्रमाणे बुद्धीच्या अस्तित्वाने आपणास जगात काय करायला हवे याचे ज्ञान होऊ लागते. म्हणून ज्याची बुद्धी क्षीण आहे त्याचे वर्तन योग्य असेलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. भगवंताने आपणा सर्वांना विचारशक्तिचे देणे दिलेले आहे. परंतु विविध पूर्वग्रहांमुळे (कुणाला अहंगड असतो, तर कुणाला न्यूनगंड. कुणाला विषयांचे आकर्षण असते तर कुणाच्या मनात ममता भरलेली असते इत्यादि) आपण आपल्या जन्मजात देणगीचा योग्य वापर करू शकत नाही. खिशात पैसे असूनही त्याची जाणीव नसल्याने भिक्षा मागत फिरणाऱ्या माणसासारखी आपली अवस्था असते. अनेकजन्मांच्या पूर्वसंचितांनी बुद्धीवर आलेले सर्व मळ धुवून काढण्याची क्षमता गुरुंकडे असते. त्यांनी असे केले की आपल्यातील सुषुप्तावस्थेत असलेली बुद्धि पूर्णपणे कार्यरत होते. विमूढतेचा अंधःकार निघून जातो. गुरुकृपेच्या या वैशिष्ट्याला माऊलींनी प्रज्ञासूर्याची प्रभा आणणारा असे संबोधिले आहे. साधकाने हे लक्षात ठेवायला हवे की जेव्हा त्याच्या मनात योग्य विचार येतील तेव्हा तो अहंकाराच्या सावलीतून गुरुकृपेच्या प्रकाशात आलेला आहे! कर्तेपणाची भावना नष्ट करण्यास या वस्तुस्थितीला ओळखणे जरुरी आहे! लक्षात ठेवा की देवाने सर्वांना एकसारखी बुद्धि दिलेली आहे, जे गुरुकृपेने या देणगीचा योग्य विनियोग करतात ते बुद्धिमान दिसू लागतात पण हुशार बनण्याची क्षमता तत्वतः सर्वांमध्येच आहे. गुरुसेवा केली की या अंतर्गत क्षमतेचा पूर्ण फायदा घेता येतो.

४. सुखोदया : वरीलप्रमाणे योग्य बुद्धीचा उदय झाला की आपली सर्व कर्मे आपोआप होत आहेत आणि स्वदेहाकडून झालेल्या सर्व क्रियांचा नियंता कोणी दुसरा आहे ही वस्तुस्थिति स्पष्ट व्हायला लागते. त्याने आपला स्वकर्मांवर आधारीत असलेला अहंकार विलीन होऊ लागतो. आता, तेराव्या अध्यायात माऊलींनी सुखाची व्याख्या अहंकाराचा लोप झालेली स्थिति असे केले आहे. त्याचवेळी, याशिवाय जीवनातील बाकी सर्व अवस्था म्हणजे दुःख असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते (ज्ञा. ओवी १२७-१३२, अध्याय १३). त्याचा संदर्भ घेऊन आपण या शब्दाकडे बघितले तर असे म्हणू शकतो की खऱ्या सुखाचा अनुभव साधक प्रज्ञेचा सूर्य उगवल्यावरच घेऊ शकतो. त्यामुळे माऊलींनी सूर्याच्या आगमनाला जो शब्द वापरतात तोच शब्द चवथ्या चरणांत सुखप्राप्तीला वापरला आहे असे वाटते! गुरुकृपेने बुद्धी कार्यरत झाली की मगच सुखाचा उदय होतो असे आपण समजले तर वावगे ठरणार नाही.

अशा रीतीने या ओवीतील प्रत्येक चरणांतून त्यांनी आपल्या गुरुंमधील शक्ति भक्ताच्या जीवनात कशी कार्यरत होते याचे वर्णन केले आहे असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: