॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
तूं जयाप्रति लपसी । तयां विश्व हे दाविसी ।
प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥ ४ : १४ ॥
चौदाव्या अध्यायाच्या गुरुस्तवनातील प्रथम ओवीत माउलींनी सद्गुरुंना प्रज्ञेच्या किरणांनी युक्त असलेल्या सूर्याची उपमा दिली होती. सूर्य उगवल्यावर आपल्यांस आजूबाजूच्या वस्तू दिसायला लागतात आणि तो मावळल्यावर अंधारात गुडूप होतात. त्यामुळे जर साधकाच्या मनात अशी भावना निर्माण झाली की सद्गुरु जीवनात आल्यावर त्यांच्या प्रज्ञाकिरणांनी आपणांस संसारात कशी प्रगती करायची हे कळू शकेल तर ही समज संपूर्णपणे उलटी आहे असे वरील ओवीतून माउली आपणांस सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत ‘सद्गुरु जेव्हां जीवनातून लोप पावतात तेव्हा शिष्याला प्रपंचाचे ज्ञान होऊ लागते. जेव्हा ते त्याच्या जीवनात प्रगट होतात तेव्हा विश्वातील सर्व गोष्टींत त्यांचेच रूप दिसू लागते.”
प्रत्येक साधनेचे दोन भाग असतात. ते म्हणजे सगुण साधना आणि निर्गुण साधना. जेव्हा साधक भगवंताची प्राप्ती होण्यासाठी बुद्धीपूर्वक प्रयन करतो तेव्हा तो सगुण साधना करीत असतो. मग त्या साधनेचे रूप ध्यान करणे, ज्ञानेश्वरी वाचणे, पूजा करणे इत्यादि काही असो. हे सर्व सगुण आहेत कारण या प्रत्येकांत साधकाला जाणिव असते की आपण साधना करीत आहोत. या जाणिवेतच असे स्पष्ट होते की साधक आणि भगवंत यामध्ये अंतर आहे, द्वैत आहे. म्हणून ही साधना सगुणी होते. परंतु जेव्हा साधक आपल्या दैनंदिन जीवनात मग्न असतो तेव्हा जर त्याच्या कृतींमध्ये सद्गुरूंचे अनुसंधान असेल तर त्या सर्व क्रिया (मग त्या कुठल्याही असोत) साधनेचे रूप घेतात. मग ती क्रिया स्वयंपाकखोलीत असो, कचेरीत असो वा मित्रांबरोबर नाक्यावर गप्पा मारण्याची असो. सर्व सगुणी साधनांचा हेतू हाच असतो की साधक अशा निर्गुणी साधनेने ‘स्वकर्म कुसुमांनी सर्वात्मक भगवंताची पूजा’ दिवसाचे २४ तास दररोज करत राहील! या पूजेने संतोष पावून ‘आत्मराजा’ला आनंद होऊन तो साधकाला वैराग्य प्रदान करतो (पहा ज्ञानेश्वरी अध्याय १८, ऒव्या ९१७-९१८). या वैराग्याचा पाया भगवंतप्रेम असल्याने ते दाहक नसून सर्वसुखदायक असते! या दृष्टीने बघितल्यास दृष्य साधनेंतील भिन्नता फक्त त्यांच्या सगुण रूपातच दिसते. सर्व साधनेच्या निर्गुणी रूपामध्ये ऐक्य दिसून येते. वेगवेगळ्या पंथांच्या भाषेनुसार या निर्गुणी साधनेला नाम भिन्न असले (नामसाधनेत ‘अजपाजप’, योगसाधनेत ‘सहजसमाधि’, ज्ञानमार्गात ‘स्थितप्रज्ञ’ इत्यादि) तरी या सर्व शब्दांतून साधकाच्या सर्व क्रिया साधनारूप झाल्या आहेत हेच सूचित केले जाते. आपल्या हृदयातील सद्गुरु आणि निर्गुणी भगवंताचे आपल्या जीवनातील प्रतिबिंब एकच असल्याने निर्गुणी साधनेत निरंतर राहणे म्हणजेच सद्गुरुंचे अनुसंधान कायम ठेवणे हे स्पष्ट होते, म्हणून वरील ओवीतील अंतिम दोन चरणांतून माउलींनी साधकाच्या या उच्च अवस्थेचे वर्णन केले आहे असे वाटते.
आता आपण पहिल्या दोन चरणांतून माउलींनी काय सांगितले आहे यावर विचार करु. साधकाचे जीवन निर्गुणी साधनेत व्यतीत झाले नाही तर काय होते याचे वर्णन यातून केले आहे. जेव्हा आपण सद्गुरुंच्या अनुसंधानात न राहता कर्म करतो तेव्हा ते कर्म करणारा कर्ता आपणांस येऊन चिकटतो. म्हणजे काय, तर स्वतःच्या मुलाबरोबर असताना आपण स्वतःला पालक या नात्यात घालून क्रिया करतो. कचेरीत एक कर्मचारी आणि पालकांसमोर एक मुलगा असे आपले अस्तित्व व्हायला लागते. आपल्या या विभिन्न रूपानुसार आपल्यासमोर विश्व आकार घेऊ लागते. त्या ठराविक अस्तित्वाशी संबंधच नाही अशा घटना, व्यक्ती वा वस्तू आपल्या जीवनातून लोप पावतात. उदाहरणार्थ, जेव्हा घरी कुटुंबियाबरोबर गप्पा मारत असतो तेव्हा आपण कुठल्या ऑफिसमध्ये कुठल्या पदावर काम करीत आहोत याचा संबंध नष्ट होतो, आपले किती मित्र आहेत व त्यांच्यांशी आपले काय संबंध आहेत हे विलिन होते इत्यादि. आपल्या आयुष्यात प्रत्येकवेळी आपण जे व्यक्तिमत्व धारण केले आहे त्यानुसार विश्व रूप घेते हे लक्षात घेणे जरुरी आहे. माझे जग असे जेव्हा म्हंटले जाते तेव्हा बोलणारा या सर्व विश्वांना सामुदायिकपणे आपलेपणा देत असतो. पण प्रत्येक क्रियेमध्ये त्यातील ठराविक गोष्टींशीच आपला संबंध येत असतो. जर आपल्या मनात भगवंताचे वा सद्गुरूंचे अनुसंधान नसेल तर प्रत्येक क्षणी आपल्यासमोर एक वेगळे विश्व तयार होत असते. ही वस्तुस्थिती पहिल्या दोन चरणांतून दर्शविली आहे.
अशा रीतीने माउलींनी वरील ओवीतून आपल्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. यातील कुठल्या परिस्थितीत आपण रहायला हवे याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायला हवा. अर्थात, सर्व साधकांना हे ठाऊक आहे की अनुसंधानात राहणेच योग्य आहे. पण अनुसंधानाशिवाय जगणे कसे निरर्थक आहे हे जोपर्यंत पूर्ण कळत नाही तोपर्यंत साधक कायम अनुसंधानात राहू शकत नाही. वरील ओवीतील पहिल्या दोन चरणांतून आपण स्वतःला हे समजवू शकतो की अनुसंधान नसले तर आयुष्य जगणे किती दुःखदायक होऊ शकते. कारण की जर आपण क्षणोक्षणी वेगवेगळ्या विश्वांत रममाण होत असलो तर साहजिकच त्यांत आपण कुठले चांगले, कुठले वाईट असा भेदभाव करू लागतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या घटनांना तोंड देण्याआधीच त्यांबद्दल आपले मत तयार होते. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये कंटाळा येतो असे ठरविले की तिथे जाण्याआधीच आपल्या मनात विषाद आलेला असतो इत्यादि. या पूर्वकल्पित भावनांचे ओझे घेऊन जीवन जगायला लागले की त्यातील सहजता निघून जाते आणि आपले जीवन साचलेल्या पाण्याप्रमाणे गढूळ व्हायला लागते. प्रत्येकाने या गोष्टीवर सखोल विचार करून नित्यानुसंधान असण्याला पर्याय नाही हे पटवून घेतले पाहिजे. पूर्णपणे पटले, की त्यानुसार वर्तन करण्याखेरीज आपणांस चैन पडणार नाही. यातूनच पुढच्या प्रगतीचा मर्ग दिसू लागतो. इति.
॥ हरि ॐ ॥