॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
कीं पुढिलांची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।
परि नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ॥ ५ : १४ ॥
गेल्या ओवीतून आपण बघितले की सद्गुरुंचे अनुसंधान मनात नसते तेव्हांच आपण संसारात रमतो. त्यामुळे साधकाला प्रपंचातील दुःखांपासून सुटका मिळविण्याचा एक हमखास मार्ग इथे निर्माण होतो. तो म्हणजे दुःख आले की सद्गुरुस्मरण करावे. परंतु हा इतका सोपा मार्ग प्रत्यक्षात वापरलेला दिसून येत नाही! अर्जुनासारखे अतिशय निष्ठावान भक्तदेखील दुःखात बुडून गेलेले दिसून येतात. इतकेच नव्हे तर अशावेळी काय करावे हेसुद्धा त्यांना सुचत नाही आणि अतिशय दारुण अवस्थेत ते अडकतात. हे असे का होते? ज्याप्रमाणे डोके दुखत असले तर आपण लगेच डोकेदुखीवरील गोळी घेऊन त्या कष्टाचे निवारण करतो तसे भक्तांना दुःखांत अडकल्यावर का करता येत नाही? कोण त्यांना त्या प्रपंचामध्ये अडकून राहण्याची जबरदस्ती करतो? वरील ओवीतून माउली या प्रश्नांचे उत्तर देत आहे असे वाटते. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की ‘(हातचलाखी करून) समोरील व्यक्तीपासून एखादी वस्तू लपविणे हे सर्वसामान्यपणे दिसून येते. परंतु तुझी लीला इतकी अगम्य आहे की सर्वांच्या समोर निरंतर असूनही तू नजरेस वा बुद्धीस गोचर होत नाहीस.’
सद्गुरुंमध्ये आणि इतर शिक्षकांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. जेव्हा प्रपंचामध्ये एखादे गुरु आपणांस विद्या देतात तेव्हा त्यांनी आपणांस शिकविले आहे ही जाणीवही ते आपल्या मनात जागृत ठेवतात. उदा. आईकडून स्वयंपाक शिकल्यावर मुल असे म्हणत नाही की आपोआप जेवण करायला शिकलो! ते आपल्या आईलाच स्वतःच्या कौशल्याचे श्रेय देते. परंतु सद्गुरु स्वतःच्या जीवनातील अनुभवांपासून अशी शिकवण देतात की त्याला वाटू शकते की त्याच्या मनातील समजूत स्वतःच्या बुद्धीने आलेली आहे! अर्थात् ही समजुत चुकीची आहे यात शंका नाही पण इथे सांगायचा मुद्दा असा आहे की शिष्याला जेव्हा ज्ञान होते तेव्हा त्यावेळी त्याचे गुरु शारिरीक रूपात त्याच्या समोर असतीलच असे नाही. नेहमीचेच आयुष्य जगताना अचानक शब्दकोड्यातील सूचनेतील गर्भित अर्थ लक्षात येतो तसे त्या घटनेमागील भगवंताचा हात त्याला दिसू लागतो. त्याकरिता गुरुंचे एखादे बोधवाक्य आठविते असेसुद्धा होईलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. गुरुकृपेने अगदी नवीन, कधीही न ऐकलेला विचार शिष्याच्या डोक्यात येतो. त्यामुळे जगाकडे बघायची त्याची (किंवा तीची) नजर अतिशय वैयक्तिक असते. जरी ‘सगळीकडे भगवान भरलेला आहे’ हे एकच मूळ तत्व असले तरी त्या तत्वाचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या जीवनात वेगळे असते आणि ते अत्यंत व्यक्तिगत, खाजगी असे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसणे हा परमार्थ केवळ गुरुकृपेने होतो. परंतु असे होत असताना शिष्याला असे काही दिसून येत नाही की गुरु आपल्यासमोर बसून हे ज्ञानामृत आपणांस पाजत आहेत! कुठलाही बडेजाव न करता, स्वतःचे अस्तित्व न दाखविता सद्गुरु शिष्यास ज्ञान अर्पण करतात ही त्यांची लीला अतिशय अगम्य आहे! अहो, स्वर्गातील देवदेखील स्वतः समोर येऊन वर प्रदान करतात. म्हणजे काय, तर त्यांना आपले अस्तित्व दाखवायची इतकी उत्सुकता असते! पण इथे सद्गुरु मनातील दुःखाचे निवारण आपल्याच कुठल्यातरी संकुचित व्यक्तिमत्वाचे बंधन आपोआप गाळून करतात! उदाहरणार्थ, अचानक पैशाची आसक्ती कमी होते आणि त्याबरोबरच आर्थिक परिस्थितीमुळे येणारी सर्व दुःखे दूर होतात. किंवा, लौकिकाचा हव्यास थांबतो आणि जग काय म्हणेल याची काळजी कायमस्वरूपी मिटते इत्यादि. आणि हे सर्व होत असताना यामागील सद्गुरुंचा हात सर्वांना दिसतोच असे नाही.
आता काहीजण इथे असे म्हणतील की आम्हांला याची जाणीव आहे की गुरुंनी दिलेली साधना आम्ही केली म्हणूनच आम्हांला हे ज्ञान झाले. त्यामुळे झालेल्या ज्ञानाचे श्रेय आम्ही सद्गुरुंना देत नाही असे कसे? याचे उत्तर असे की आपण अशा पद्धतीने गुरुंना मानतो ते केवळ त्यांनी साधना काय करावी आणि कशी करावी हे शिकविले म्हणून. त्यानंतर आपण प्रामाणिकपणे साधना केली आणि त्यामुळे आपणांस ज्ञान प्राप्त झाले हा विचारसुद्धा शिष्याच्या मनात असतो. एखाद्या माळ्याला कुणी उत्तम बीज दिले आणि दहा वर्षांच्या त्याच्या मेहनतीने त्याला त्या वृक्षाचे फळ मिळते तेव्हा तो त्या बी देणाऱ्याबद्दल जसा विचार करतो तसाच हा विचार आहे. या विचारात स्वतःच्या कष्टांची जाणीव आहे आणि त्यालासुद्धा महत्व आहे. परंतु सद्गुरुंची कृपा केवळ साधना काय करावी हे शिकविण्यापुरती मर्यादीत नसते हे इथे शिष्य विसरलेला असतो. कुठल्याही परिस्थितीत नेटाने साधना करण्याचे धैर्यसुद्धा गुरुंनीच दिलेले असते! त्यानंतर अचानक येणारे ज्ञानसुद्धा गुरुंच्या मनात द्यायचे असल्याने समोर येते. आणि इतकेच नव्हे, तर समोर आलेल्या ज्ञानावर ‘हे महत्वाचे आहे, यावरच आपले आयुष्य व्यतीत करणे जरुरी आहे’ हा विश्वाससुद्धा गुरुंनीच दिलेला असतो त्यावर अशा शिष्यांचे दुर्लक्ष झालेले असते. म्हणूनच सद्गुरुंनी स्वतःला त्याच्यापासून लपविलेले असते असे म्हणायला काहीच हरकत नाही!
शेवटी सद्गुरु असे स्वतःला का लपवितात यावर विचार करू. याचे कारण असे की गुरुंच्या मनात अशी इच्छा असते की आपल्या कृपेच्या ओझ्याखाली शिष्य दबून राहू नये. त्यंना शिष्याच्या मनात प्रेम हवे असते, निव्वळ कृतज्ञता नको असते. जेव्हा शिष्य संपूर्णपणे प्रेममय बनतो तेव्हाच त्यांचे काम पूर्ण झाले असे ते मानतात. फक्त प्रपंचातील कर्मबंधनांतून पूर्ण सुटका करून त्यांचे काम पूर्ण होत नाही! तर यापलिकडे जाऊन ही सुटका त्यांच्या कृपाप्रकाशात आपली आपणच करून घेतली आहे अशी भावनादेखील ते शिष्याच्या मनात उत्पन्न करतात. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे “मोटके गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥४९:९॥”. यानंतर जेव्हा शिष्य आपल्या गुरुंबद्दल विचार करतो तेव्हा त्याची नजर एखादा विद्यार्थी शिक्षकाकडे बघतो तशी नसते तर एखादे मूल आईकडे बघते तशी असते! प्रेममय असते. त्यांच्यामुळेच आपले पूर्ण जीवन सुखकारक बनलेले आहे या जाणीवेबरोबर येणारे सद्गुरुंच्या उपकाराचे ओझे त्याच्या मनावर नसते. लक्षात घ्या की सद्गुरु आपणांस ज्ञान प्रदान करताना त्याबरोबर आपोआप निर्माण होणाऱ्या उपकाराच्या ओझ्याला बाजूला सारून देतात. ही सूक्ष्म वस्तुस्थिती वरील ओवीतील ‘आपणपें चोरें’ या केवळ दोन शब्दांतून माउली आपणांस सांगत आहेत असे वाटते. इति.
॥ हरि ॐ ॥