॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
जी तूंचि तूं सर्व यया । मा कोणा बोधु कोणा माया ।
ऐसिया आपेंआपु लाघविया । नमो तुज ॥ ६ : १४ ॥
गेल्या ओवीतून माउलींनी आपणांस असे सांगितले की गुरु स्वतःला लपवून शिष्यास ज्ञान प्रदान करतात. हे वाचून एखादा राजा प्रसन्न होऊन इनाम देतो किंवा आपण एखाद्या लहान मुलाला खिशातून चॉकलेट काढून देतो त्याप्रमाणे गुरु ज्ञान वाटत आहेत अशी समजुत निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, तर सद्गुरु आणि ज्ञान या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि आपल्यापासून वेगळी असलेली गोष्ट सद्गुरु सत्शिष्यास प्रदान करतात अशी भावना वाचकाच्या मनात निर्माण होऊ शकते. हे जाणून वरील ओवीतून श्रीज्ञानेश्वर महाराज असे म्हणत आहेत की ‘खरे म्हणजे (जे ज्ञान होते ते) सर्व काही तूच आहेस. तरीसुद्धा कुणास तुझे दर्शन होते आणि कुणी संसारात रममाण होतो. ही लीला सहजपणे करणाऱ्या तुमच्या अस्तित्वाला प्रणाम असो.’
ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा सूर्यास दर्शविते, त्याचप्रमाणे हे सर्व जग अमूर्त भगवंताचे दर्शन आपणांस देत असते. परंतु सबंध विश्वातील काही निवडक गोष्टीच आपल्या इंद्रियांमार्फत आपणांस गोचर होतात. उदाहरणार्थ खाली मान घालून रस्त्यावरून चालताना आपल्या डोक्यावरील आकाशात एखादा सुंदर पक्षी उडत असेल तर तो पक्षीही भगवंताचेच रूप आहे पण आपल्या विश्वात त्याच्या अस्तित्वाचा पत्ताही लागत नाही. ज्याप्रमाणे घाटात ट्रेनने जाताना आपणांस फक्त आपल्या खिडकीतून जे दिसू शकते तेव्हढेच दिसते, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात आपण निर्गुण भगवंताच्या विश्वरूपाचा एखादा हिस्साच बघू शकतो. आपण देहरूप धारण केल्याने आपोआप आलेली ही मर्यादा आहे. परंतु आपल्या मर्यादेत जे काही येते त्या सर्वाची आपणांस जाणीव होतेच असे नाही! कारण इंद्रियांनी संवेदना दिली तरी त्या संवेदनांचा स्वीकार करणारे आपले चित्त त्याक्षणी जागृत असतेच असे नाही. उदाहरणार्थ, जर आपले मन दुसरीकडे असेल तर आपल्या डोळ्यापुढची गोष्टसुद्धा कधीकधी दिसत नाही. त्यामुळे आपल्या इंद्रियांच्या आणि चित्ताच्या मर्यादेनुसार जे आपणांस जाणविते तेव्हढेच आपले विश्व बनते. अशारीतीने देह धारण केल्याने आपोआपच अपार, अमर्यादित आणि निरंतर अशा निर्गुण भगवंताचे रूप आपल्याकरीता सिमीत होऊ लागते. हे आपल्या सर्वांच्या जीवनातील शाश्वत सत्य आहे. या वस्तुस्थितीचा आणि वरील ओवीचा काय संबंध आहे? हे आता आपण पाहूया.
भगवंताचे दर्शन होण्यास इंद्रियांबरोबर आपल्या चित्ताची सावधानता जरुरी आहे हे आपण वर बघितले. आता, आपल्या चित्ताचे लक्ष कधी कुठे असेल हे सर्वसाधारण माणसाच्या ताब्यात नसते. त्यामुळे मनात एखादा विचार आला की मगच त्याचे अस्तित्व कळते तो यायच्या आधी त्याची जाणीव नसते. उदाहरणार्थ, पाच मिनिटांनी आपल्या मनात कुठला विचार येणार आहे हे आत्ताच ठामपणे कुणीही सांगू शकत नाही! आपण त्याबद्दल केवळ एक अंदाज करू शकतो. यातून असे स्पष्ट होते की आपल्या मनातील विचार कोण, कधी आणि कसे आणतो याबद्दल आपण संपूर्णपणे अनभिज्ञ असतो. हे विचार कुठून येतात याचे उत्तर असे आहे की आपल्या हृदयातील सद्गुरु स्वतःचे दर्शन अशा विचारांनी देत असतात. कारण का, तर ज्या ठिकाणाहून मनात विचार येतात ती जागा ‘स्वसंवेदनांचे झाड पेरल्याचे ठिकाण आहे’ आणि ती जागा सद्गुरुच आहेत असे माऊलींनी आपणांस सांगितलेले आहे ( पहा … स्वसंवेदद्रुमबीज प्ररोहण अवनी ॥ ज्ञा.१०-१८॥). म्हणजे काय, तर हे सर्व जग भगवंताचे रूप आहे आणि आपल्या चित्तात त्या अफाट विश्वाचे जे संकुचित प्रतिबिंब पडलेले जाणविते ते सद्गुरुंचे दर्शन आहे. म्हणूनच माऊली वरील ओवीत म्हणत आहे ‘तूंचि तूं सर्वां यया’ !
आता वस्तुस्थिती अशी असेल की सद्गुरु आणि भगवंताखेरीज या जगात काहीच नाही तर आपण सर्वजण मुक्तच असायला हवे! आणि मुक्त असू तर मनात कारणविरहीत, स्वयंभू असे समाधान हवे. पण तसे दिसून येत नाही! हे का? याचे उत्तर वरील ओवीच्या पुढील दोन चरणांतून केले आहे. ते असे: असे समजा की सद्गुरु एखाद्या सिनेमागृहातील प्रोजेक्टरप्रमाणे आपल्या मनात एकापाठोपाठ विचार दाखवित आहेत पण आपण त्यातील एखाद्या विचारात वा घटनेत गुंतून रहात आहोत. उदा. मी सुशिक्षित आहे, मला अमुक एका गोष्टींचे ज्ञान आहे या जाणीवेत आपण अडकलो की त्या ज्ञातेपणाचा अहंकार आपणांस समोर घडणाऱ्या (स्वतःचे अज्ञान दर्शविणाऱ्या) काही गोष्टी बघू देत नाही. किंवा मी चांगला शिक्षक आहे अशी सम्जुत झाली तर माझ्याकडून शिकू न शकणारे विद्यार्थी मी साफ नजरेने पाहू शकत नाही. ‘तेच वाईट विद्यार्थी आहेत’ असा शिक्कामोर्तब मी त्यांच्यावर करतो आणि स्वतःबद्दलची ‘उत्तम शिक्षक’ ही प्रतिमा बदलत नाही! सद्गुरुंनी दाखविलेल्या गोष्टींना असा सोयीस्कर आकार दिल्याने हळूहळू आपल्या मनातील जग आणि सद्गुरूंनी दाखविलेली खरी वस्तुस्थिती यांतील तफावत वाढत जाते. एकाच सूर्यातून सुरुवातीला अगदी चिकटून असलेले दोन किरण हळूहळू फाकत जातात आणि पृथ्वीवर येतात तेव्हा त्यांच्यांत हजारो किलोमीटर अंतर होऊ शकते. त्याचप्रमाणे साधकाची सुरुवातीला थोडीशीच चूक असलेली दृष्टी कालांतराने परमार्थापासून लाखो मैल दूर होते आणि तो आपल्याच विश्वात गुंगून जातो. त्यालाच सत्य मानू लागतो. या परीणामालाच माया म्हणतात. याउलट जे सद्गुरुंनी समोर आणलेल्या विश्वानुसार आपले जीवन जगत राहतात त्यांना सत्यतेचा बोध सतत होत असतो! अशा रीतीने सर्व काही भगवंत आणि सद्गुरुंनी भरलेले असूनही ‘कोणा बोधु कोणा माया’ अशी अवस्था आपोआप होऊ लागते!
वरील विवेचनावरून असे लक्षात येते की सद्गुरु आपल्याला कळेल असे सत्यतेचे दर्शन सतत आपणांस घडवित आहेतच. पण आपणच, भूतकाळात कधीतरी बघितलेल्या सत्यावर उरलेले जीवन चालवायची इच्छा ठेऊन जगत असल्याने ढळढळीत समोर असलेल्या गोष्टी बघण्यास असक्षम होत आहोत. आपली भूतकाळातील आवडलेल्या गोष्टींवर उर्वरीत आयुष्य जगण्याची ही दारुण सवय मोडण्यास सद्गुरुंनाच शरण जायला हवे. त्याशिवाय पर्याय नाही. तेच डोळ्यांत ज्ञानांजन घालून आपली दृष्टी नीट करु शकतात. म्हणूनच माऊलींनी वरील ओवीचा अंत ‘नमो तुज’ या शब्दांनी केला आहे असे वाटते. इति.
॥ हरि ॐ ॥