अनुभूतींचे मूळ

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।

सोहंसिद्धीचे लळे । पाळिसी तू ॥ ४:१२ ॥

आवकाशातील सर्वात विचित्र वस्तू म्हणजे कृष्णविवर (ब्लॅकहोल). येथील गुरुत्वाकर्षण इतके जबरदस्त असते की बाहेरुन येणारी प्रकाशकिरणे देखील परावर्तित होऊन परत जाऊ शकत नाहीत! त्यामुळे तिथे नक्की काय होत आहे हे दिसण्याचा मार्गच नसतो. परंतु जसजसे आपण कृष्णविवरापासून दूर जायला लागतो तसतसे तेथील गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी व्हायला लागतो आणि एक जागा अशी येते की तेथील गोष्टी आपण बघू शकतो. याला इव्हेंट होरायझन किंवा कृष्णविवराचे क्षितीज असे म्हणतात. तिथे जे काय दिसते यावरुनच आपण मूळ कृष्णविवराबद्दल काही अंदाज बांधू शकतो.

हे सर्व इथे सांगायचे कारण असे की परमार्थातील अंतिम स्थिती कृष्णविवरासारखी आहे! तिथे गेल्यावर काय होते हे जाणून घेण्यास आपली इंद्रिये इतकी असक्षम बनतात की नक्की काय अनुभव आला आहे हे कळण्याची आपली सर्व उपकरणे निष्क्रीय होतात. त्यामुळे सहजसमाधी अवस्थेत नक्की काय होते हे अजून कोणीही सांगू शकलेले नाही. (वेदसुद्धा नेति,नेति अशा शब्दांनी केवळ नकारात्मक वर्णन करतात). परंतु या शब्दातीत अवस्थेचे क्षितीज आपण बघू शकतो. म्हणजे काय, तर अतिशय प्रखर साधना केल्यानंतर ईश्वरप्राप्ती होण्याच्या जरा आधी आपणांस खास अनुभूती यायला लागतात. ज्याप्रमाणे राजाचे आगमन होण्याआधी भालदार-चोपदार ललकाऱ्या देत येतात तशा या अनुभूती होय. त्यांची प्राप्ती ही साध्य अवस्था नसली तरी साधकाला आपल्या देहाचे भान ठेऊन अनुभवता येणारी ही सर्वोच्च स्थिती होय. ज्याप्रमाणे सूर्योदयाआधी क्षितीजावर निरनिराळ्या छटांनी आभाळ नटते, त्याचप्रमाणे स्वरुपदर्शन होण्याआधी जीवनवेल अनुभूतींच्या कळ्यांनी बहरुन जाते. “फुले वेचितां बहरु कळीयांसी आला” अशी अवस्था येते! क्षणोक्षणी, पदोपदी येणाऱ्या अनुभवांनी साधकाचे मन वेडावून जाते, उन्मनी बनते. बाराव्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनातील आज विवरणाला घेतलेल्या चतुर्थ ओवीपासून सप्तमीपर्यंत माऊली या ईश्वरप्राप्तीच्या क्षितीजावरील काही ठळक अनुभवांचे वर्णन करीत आहे असे वाटते. वरील ओवीत माऊली म्हणत आहे “साधनेचे साध्य, म्हणजे सर्वव्यापी भगवंतांच्या रुपाचे निरंतर सान्निध्य प्राप्त होण्याचा सोहळा तुझ्या भक्तांना तूच प्रेमाने दाखवितोस. (इतकेच नव्हे तर) मी आणि भगवंत एकच आहे (सो अहं) याची खात्री व्हावी हा साधकाचा हट्टही तूच पुरवितोस.”

आपण सर्व जीवनात आनंद मिळविण्याचा प्रयत्‍न करीत असतो. पण जरा सूक्ष्म नजरेने बघितले तर असे दिसून येते की नुसता आनंद मिळून आपले समाधान होत नाही तर आपण आनंदी आहोत याची जाणीव झाल्यावरच समाधान मिळते! खिशात दोनहजार रुपयाची नोट असल्याने आपले मन शांत होत नाही तर आपल्याकडे ही नोट आहे याची जाणीव झाल्यावर पैसे मिळविण्याची खटपट थांबते! परमार्थातही ही गोष्ट लागू पडते. मी आणि ईश्वर एकच आहे हे शाश्वत सत्य आहे असे बौद्धीकपणे कळून आपले जीवन समृद्ध बनत नाही तर ईश्वर माझ्याबरोबर कसा आहे याची अनुभूती आल्यावर मन स्तब्ध होते. आपल्या मनाचा हा हट्ट असतो की जे खरे आहे ते आपणांस स्पष्टपणे दिसावे. या वस्तुस्थितीचे रुपक म्हणजे श्रीभगवद्गीतेतील अकरावा अध्याय होय. दशम अध्यायामध्ये अर्जुनाला संपूर्ण कळून चुकले होते की भगवान या सृष्टीत भरुन आहेत. पण ते विश्वरुप स्वतःच्या डोळ्यांनी दिसावे ही मागणी त्याला करावीशी वाटली हे याच वस्तुस्थितीचे द्योतक आहे! त्याप्रमाणेच शिष्याच्या मनातील आपण आणि ईश्वर एकच आहोत हे अनुभवायला हवे ही इच्छा सद्‌गुरु पूर्ण करतात असे माऊली म्हणत आहे.

परंतु साधकाची ही मागणी पूरी करण्याआधी ते साधनेद्वारे त्याची मनोभूमिका तयार करतात. जेव्हा तो तयारीचा होतो तेव्हाच सद्‍गुरु त्याच्या मनातील भगवान आणि आपण एक आहोत याची निःसंदेह खात्री देतात. खरे म्हणजे ईश्वर आणि आपण एकच आहोत हे आपल्या जन्मापासूनचे सत्य आहे. पण जोपर्यंत आपले मन या परिस्थितीला समर्थपणे झेलू शकत नाही तोपर्यंत आपल्या मनात सद्‌गुरु एक सूक्ष्म संदेह ठेवतात! पुराणात कथा आहे की भगीरथाच्या तपस्येने गंगा स्वर्गाहून खाली पृथ्वीवर यायला तयार झाली पण पृथ्वीमध्ये इतकी ताकद नव्हती की त्या पवित्र स्त्रोताला झेलू शकेल. भगवान शंकर, ज्यांनी आपले मन साधनेने निर्मळ केले होते तेच फक्त या प्रचंड आवेगाने येणाऱ्या प्रवाहाला झेलण्यास समर्थ होते! त्यांनी गंगेला सहजपणे स्वीकारले आणि धरणी सहन करु शकेल असा एका छोटाश्या झऱ्याच्या रुपात सोडले. अगदी त्याचप्रमाणे, ज्यावेळी साधकाची पूर्ण प्रगती होते तेव्हाच सद्‍गुरु त्याच्यावर भगवंतसान्निध्यजाणीवरुपी गंगेचा स्त्रोत सोडतात. त्यांना माहीत असते की ईश्वरसान्निध्याच्या जाणीवेने त्याचा अहंकार वाढून केलेल्या साधनेवर पाणी फिरणार नाही तर उलट मन कृतज्ञतेने भरुन तो साधनातीत होईल.

लक्षात घ्या की सोऽहं सः असे म्हणत आयुष्यभर साधना केली तरी या शब्दांमागील सत्याची जाणीव व्हायला गुरुंची कृपा लागते. ही कृपा ते करतातच पण त्याचवेळी ते अशी काळजीही घेतात की या इच्छापूर्तीने साधकाला त्रास न होता त्याची अधिक उन्नतीच होईल. गुरुमाऊली आपल्या शिष्याचे नुसतेच लाड करीत नाही तर लाड पुरविताना आपला बालक लाडावणार नाही याची काळजीही घेते! “लळे पाळिसी तू” या शब्दांत गुरुंच्या मनातील ही सावधानताही अध्यारुत आहे असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥