ओव्या (२८० ते २८२)/११: आत्मरुप बुध्दीने जाणणे अशक्य आहे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

परी या तुझिया रुपाआंत । जी उणीव एक असे देखत ।

जे आदि मध्य अंत । तीन्ही नाहीं ॥ २८०:११ ॥

येऱ्हवीं गिवसलें आघवाठायीं । परी सोय न लाहेचि कहीं ।

म्हणोनि त्रिशुध्दी हे नाहीं । तीन्हीं एथ ॥ २८१:११ ॥

एवं आदिमध्यान्तरहिता । तू विश्वेश्वरा अपरिमिता ।

देखिलासि जी तत्वता । विश्वरुपा ॥ २८२:११ ॥

भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आपले विश्वरुप अर्जुनाला दाखवितात. स्वतःच्या लहानपणी यशोदामैय्याने तोंडात काय आहे असे विचारल्यावर भगवंतांनी आपल्या मातेला सबंध विश्व स्वतःच्या मुखातील एक घास आहे असा दृष्टांत दिला होता. परंतु अर्जुनाला दिसलेले भगवंतांचे विश्वरुप त्याहून भव्य आहे. माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘तो हा अकरावा अध्याय । जो देवाचा आपणपे विसंबता ठाव । परी अर्जुन सदैवाचा राव । जे एथही पातला ॥१३:११॥’ याचा अर्थ असा की ‘अर्जुन नशिबवान लोकांचा राजा असल्याने ज्या ठिकाणी स्वतः भगवंत विलीन होऊन विश्रांती घेतात ते अत्यंत गुह्य आणि गुप्त स्थानसुध्दा त्याने या अकराव्या अध्यायात पाहीले.’ आपण गुरुकृपेने आपले आत्मरुप बघू शकतो आणि यामध्ये आपल्या आयुष्याचे सार्थक होते. परंतु अर्जुनावरील गुरुकृपेला तोड नाही. त्याने भगवंतांचे आत्मरुप बघितले! असे माउली म्हणत आहे.

इथे काही सज्जन अशी शंका घेतील की: ‘आत्मरुप म्हणजे सत्यरुपी भगवंतांशी मिलन असल्याने सर्वांचे आत्मरुप एकच असले पाहीजे. भगवंतांचे आत्मरुप आणि अर्जुनाचे स्वरुप यामधील भिन्नत्व सत्याच्या एकत्वाचे खंडन करत आहे असे दिसते. ज्या पायावर सर्व संत आपल्या शिष्यांना सांगतात की माझ्यात आणि तुमच्यात काही फरक नाही तो पायाच भिन्न व्यक्‍तींच्या विभिन्न स्वरुपांच्या अस्तित्वाने डळमळीत होतो!’

या प्रश्नाचे उत्तर असे आहे की मूलतः सर्वांचे विश्रांतिस्थान एकच आहे यात संदेह नाही. ज्या ठिकाणाहून भगवंत आले त्याच आदिस्थलापासून आपली निर्मिती झालेली आहे. परंतु असे असले तरी त्या स्थानाचे ‘ज्ञान’ होणे आपल्या मर्यादेवर अवलंबून आहे. अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी आपली जेव्हढी तहान तेव्हढेच पाणी आपण पिऊ शकतो. साचलेले पाणी हा एकच प्रकार असला तरी ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्याच्या खोलीवर त्याची व्याप्‍ती अवलंबून असते. लहानशा डबक्यात लहान मुलाने जोरात पाय आपटला तर ते पाणी सगळीकडे उडते, याउलट खोल डोहामध्ये हत्तीने मस्तीपूर्वक आंघोळ केली तरी पाणी जलाशयाबाहेर जात नाही! तेव्हा एकाच सत्यामधून आपण आलो असलो तरी आपल्या व्यक्‍तिमत्वाच्या स्थलात किती सत्यरुपी पाणी जमू शकते हे भिन्न असते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की स्वतःची प्रगती कुणीही करुन घेऊ शकतो पण स्वतःची प्रगती करुन नंतर बाकीच्यांना आपल्या बरोबर घेऊन जायची ताकद फक्‍त ‘ईश्वरकोटी’ लोकांनाच शक्य आहे. याचे उदाहरण म्हणून ते सांगायचे की ‘गवताची लहानशी काडी पुराच्या पाण्यात तरंगते यात शंका नाही, पण एक मूंगीजरी तीच्यावर चढली तर ती मुंगीसकट बुडते. पण झाडाचा ओंडका स्वतःबरोबर त्याच्यावरील हत्तीलासुध्दा तारतो!’ सत्यस्थिती एकच असली तरी तीचे भगवंतांमधील दृष्य रुप अर्जुनाच्या जन्मजात क्षमतेपेक्षा अतिशय भव्य होते. तेव्हा विश्वरुपाच्या दर्शनाद्वारे भगवंतांना झालेले ज्ञान अर्जुनाला झाले असे आपण म्हणू शकतो. दुसरे उदाहरण म्हणजे खंडाळ्याच्या घाटातून आगगाडीने जाताना आपण आपल्या खिडकीतून जो नजारा बघत असतो तो इंजिनाच्या चालकासमोर असलेल्या मोठ्या खिडकीपेक्षा फारच संकुचित असतो. पण तरीसुध्दा एकाच विहंगम दृष्याचे दर्शन आपण आणि चालक घेत असतो यात शंका नाही. आपले नशिब चांगले असेल तर रेल्वेच्या ड्रायव्हर आपणास त्याच्याजवळ बसवितो. अशावेळी आपल्याला एक वेगळेच दृष्य दिसायला लागते. गीतेच्या अकराव्या अध्यायात अर्जुनाला या भवसागराच्या चालकाने स्वतःजवळ बोलावून वेगळा नजारा दाखविला असे आपण म्हणू शकतो!

स्वतःच्या जागेवरुन उठून जगन्नियंताच्या ठिकाणी जाण्याचे भाग्य अर्जुनाशिवाय आणि कुणाला लाभले आहे? म्हणून माउली संजयाच्या मुखातून आपले आश्चर्य व्यक्‍त करते: ‘लक्ष्मीहून अधिक जवळची व्यक्‍ती दुसरी असू शकेल काय? शेषाहून अधिक कुणी सेवक असेल काय? गरुडाहून कुणी दुसरा योगी असू शकेल काय? शुकाचार्यांपेक्षा कुणी आपल्या देहावर ताबा मिळविला असेल काय? पण त्यांच्यापैकी कुणालाही विश्वरुप दिसले नाही आणि अर्जुनाला मात्र काही कष्ट न करीता दिसले!! (पहा: ओव्या १६५ ते १७४, अध्याय ११)’ सद्‌गुरुकृपेची परमावधी अकराव्या अध्यायात दिसून येते. महाभाग्यवान अर्जुनाला विश्वरुपाचे जे दर्शन झाले त्याचे वर्णन करीत असताना तो म्हणतो की ‘… नांतं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरुपम्‌ ॥ गीता १६:११॥’ आज प्रवचनाला घेतलेल्या ओव्यांतून माउली या सोळाव्या श्लोकाच्या उत्तरार्धावर भाष्य करताना म्हणत आहे: ‘पण तुझ्या या (विश्व)रुपात मला एक उणीव दिसत आहे. ती म्हणजे या रुपात सुरुवात, मध्य आणि अंत या तीन्ही गोष्टी नाहीत(२८०). मी सगळीकडे नीट निरखून बघितले तरी यांचा ठावसुध्दा दिसत नाही म्हणून या तीन गोष्टींचा तुझ्यात अभाव आहे हे त्रिवार सत्य आहे(२८१). अशा आदी, मध्य आणि अंत यांचा अभाव असलेल्या जगन्नियंता, हे अमर्यादरुपा, तू कसा आहेस ते मी खरोखर बघितले आहे(२८२).’

घटनेचा होतो जेव्हा अंत । येते ती तेव्हाच कवळित ।

नसे ज्याला आदिमध्य अंत । कसे घुसणार त्याच्या अंतरंगात? ।

गुरुकृपेचा आधार आहे ज्याला । भगवंत कळणार फक्‍त त्याला ॥

भगवंताच्या अमूर्त रुपाचे वर्णन करतना सर्वजण तू ‘अनादि’ आहे असे म्हणतात. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये अर्जुन तुझ्यामध्ये आदि, मध्य आणि अंत दिसत नाही असे म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटत नाही. परंतु माउलींनी आपल्या भाष्यामध्ये अर्जुनाच्या मुखातून या घटनेला ‘ तुझ्या रुपातील उणीव’ असे विशेषण दिले आहे ते अत्यंत गूढ आहे असे वाटते. साधनेतला अर्जुनाचा (आणि त्याच्यामार्फत आपणा सर्वांचा!) हताशपणा या शब्दातून प्रगट होत आहे असे वाटते. ते कसे हे बघायचा आज आपण प्रयत्‍न करु.

आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्याकरीता कसला आधार असतो? ना आपल्याकडे मोठ्या माणसांची शिफारसपत्रे असू शकतात ना पिढीजात संपत्तीचे पाठबळ असते. शारिरीक कष्ट करण्याच्या तयारीतही आपण मजूरांच्या मानाने कमजोरच असतो आणि अनैतिक मार्गांचा वापर करण्यातही आपण फारसे तरबेज नसतो. मग आयुष्यात काही मिळविण्याकरीता नशिबाशिवाय आपल्या हातात काय आहे तर ‘बुध्दी’. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला शाळेत चांगले गुण मिळविण्याच्या धडपडीला सामोरे जावे लागते. जी एकच गोष्ट आपणास जीवनात पुढे नेऊ शकते तीच्याबद्दल आपल्या मनात किती आत्मीयता असेल याचा आपण अंदाजसुध्दा बांधू शकत नाही. आपल्या बुध्दीवरील असलेल्या प्रेमयुक्‍त विश्वासामुळेच आपण कुठलीही गोष्ट तीला पटल्याशिवाय करत नाही. बुध्दीच्या कसोटीवर उतरलेल्या गोष्टींनाच जीवनात ठेवायची सवय आपल्या रक्‍तातच जणू भिनलेली आहे. परंतु या जगातील सर्व गोष्टींप्रमाणेच बुध्दीला मर्यादा आहेत. इथे कुणी जास्त बुध्दीमान आहे आणि कुणाची बुध्दी नीट चालत नाही असे म्हणण्याचा उद्देश नाही. कारण या मर्यादा बुध्दीच्या नसून ठराविक व्यक्‍तींच्या आहेत.

बुध्दीची मर्यादा, जी कुठल्याही व्यक्‍तीवर अवलंबून नाही, अशी आहे की बुध्दीला फक्‍त भूतकाळातील गोष्टींवर सत्ता गाजविता येते. कुठलीही घटना पूर्ण झाल्याशिवाय आपणास तीचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर बाद झाल्यावरच आपण त्याच्या खेळाबद्दल मत व्यक्‍त करु शकतो. नाहीतर आत्तापर्यंत अमुक तऱ्हेने तो खेळला आहे असे म्हणतो आणि त्यात तेव्हापर्यंतच्या खेळाचेच आकलन झालेले असते. म्हणूनच आनंद झाला आहे या घटनेचे जेव्हा बुध्दीला आकलन होते तेव्हा आनंद होऊन गेलेला असतो आणि त्याची आठवण फक्‍त शिल्लक असते. शिळ्या कढीला उत आणण्यासारखे आपण त्या आठवणीलाच वारंवार उजाळा देऊन आनंद झाला असे म्हणत असतो!

सांगायची गोष्ट अशी की आपण सर्वांनी स्वतःच्या बुध्दीला सर्वेसर्वा मानले आहे. आपल्यावर अहोरात्र सत्ता गाजवित असणाऱ्या बुध्दीच्या नैसर्गिक मर्यादेने आपण भूतकाळातील घटनांचेच सतत चर्वण करीत असतो. कुरणात चरायला गेलेली गाय सकाळी घाईघाईत गवत खाऊन नंतर मध्यान्ही शांतपणे झाडाखाली बसून रवंथ करीत बसते तसे आपण जीवनातल्या वर्तमानकाळाला भूतकाळात ढकलून मग त्यावर विचार करीत बसतो. आणि असे करण्यात जो पटाईत आहे त्याने स्वतःच्या जीवनावर ताबा मिळविला आहे असे जाहीर करतो!

आपल्या या सवयीने परमार्थातही भगवंताची प्राप्ती करुन घेणे याचा आपण असा अर्थ काढतो की आपल्या जीवनात एक दिव्य अनुभव येईल आणि नंतर परीकथेतील राजकन्येप्रमाणे आपण सदासर्वकाळ सुखी राहू! भगवंत मिळविणे आणि घरात एक नवीन दूरचित्रवाणीचा संच आणणे यामध्ये काही फरक असेल असे आपणास वाटत नाही. ज्याप्रमाणे त्या संचाची किंमत मोजून आपण तो मिळवितो त्याचप्रमाणे गुरुसेवा, गुरुपोनिर्दिष्ट साधना करुन आपण भगवंत मिळवू असेच आपली बुध्दी आपणास सांगते. परंतु ज्या भगवंताला अंतच नाही, तो आपणास मिळाला हे कळणार कसे? गोष्टीला अंत झाला की मगच बुध्दी त्यावर आपले कार्य करुन त्याची चिरफाड करण्यास सुरुवात करते. अंत नसलेली गोष्ट बुध्दीच्या आवाक्यात येणे शक्यच नाही. जी बुध्दी आपल्यावर सत्ता गाजवित आहे तीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आपणास कशी कळणार? ही जाणीव झाल्यावर आपल्या मनात हताशपणा येणार की नाही?!

म्हणून अर्जुन म्हणत आहे ‘भगवंता तुला आदि मध्य आणि अंत नाही ही तुझी उणीव आहे!’ तू कसा आहेस हे माझ्या आकलनशक्‍तीच्या बाहेर झालेले आहे आणि म्हणूनच तुझे विश्वरुप दिसण्याकरीता तुझ्याच कृपेची जरुरी आहे. तू स्वयंभू माझ्या जीवनात आलास तरच मला तुझे दर्शन होईल. माझ्या कुठल्याही प्रयत्‍नांनी (मग ते कितीही ‘पारमार्थिक’ असोत!) तू मला दिसणार नाहीस याची पूर्ण खात्री मला झालेली आहे. तू स्वतःला का असे बनविले आहेस? असा टाहोच जणू अर्जुनाने या ‘उणीव’ शब्दातून फोडला आहे. प्रख्यात तत्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती म्हणायचे की सत्यदर्शन होण्यासाठी कुठलाही मार्ग असूच शकत नाही. ते आपोआप प्रगट होते. त्याच्या या संपूर्ण प्रणालीला माउलींनी अतिशय सुंदरपणे केवळ ‘तुझिया रुपा आत, एक उणीव असे देखत’ या शब्दांतून नाजूकतेने व्यक्‍त केले आहे!! उगाच माउलींना ‘ज्ञानेश्वर’ असे संबोधिलेले नाही! श्रीज्ञानेश्वरीत नाही असे कुठले तत्व या जगात आहे? आज एव्हढेच!!

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे संकेतस्थळ

(बंगलोर, दिनांक २१ मार्च २०१०)