१४०५/१८: परम अर्थ काय आहे?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

म्हणोनि मी होऊनी मातें । सेवणे आहे आयितें ।

ते करी हातां येतें । ज्ञानें येणे ॥ १४०५:१८ ॥

पंढरपूरच्या आषाढी वारीचा अंतिम टप्पा असलेल्या वाखरीतील महाआरतीच्या गर्दीत एक खेडवळ बाई म्हणाली ‘आता ग्यानोबाचा रथ संपूर्ण चांदीचा झाला आहे. पण त्यांच्या हयातीमध्ये त्यांना एकवेळच्या जेवणाचीसुध्दा भ्रांत होती. ते गेल्यानंतर सर्वजण त्यांच्या नावाचा उदो-उदो करतात पण त्यांना स्वतःला काहीही ऐश्वर्य भोगता आले नाही.’ खरोखर, माउलींना जे शारीरीक हाल सोसावे लागले तेवढे कष्ट खूप कमीजणांच्या जीवनात आढळून येतात. पण फक्‍त श्री ज्ञानेश्वरांचीच गोष्ट कशाला, बहुतांशी संतांची चरित्रे वाचल्यानंतर असा प्रश्न पडतो की त्यांच्या काळामध्ये त्यांना महत्व देणारी माणसे इतकी कमी कशी होती? परमार्थ हस्तगत करुनही जगामध्ये इतकी अवहेलना त्यांना का सहन करावी लागली?

दुसऱ्यांच्या भल्यासाठी संत त्यांचे भोग स्वतःच्या अंगावर घेतात या भाबड्या उत्तराने आंतरीक समाधान होत नाही आणि संतांच्या सहवासात आलेल्या व्यक्‍तींनी आपणहून त्यांचा मान का राखला नाही या प्रश्नाचे ‘संत स्वतःच्या संसारातील प्रगतीबद्दल उदासीन असतात’ हे उत्तर असूच शकत नाही. जवळ-जवळ प्रत्येक संताचे व्यावहारिक जीवनातील अपयश बघितले तर असे वाटते की समाजामध्ये पुढे येण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींचा अभाव संतांजवळ असणार. परमार्थ हस्तगत करण्यासाठी जे साहित्य लागते ते व्यावहारिक जगामधील प्रगतीला बाधक असणार आणि म्हणूनच संतांची थोरवी त्यांनी देह ठेवल्यानंतरच जास्त प्रगट होत असणार. कारण त्यांच्या थोरपणाचा महीमा यशस्वीपणाने गाणारे स्वतः संत नसल्याने समाजात नाव मिळवितात व त्यामुळे संतांना मान मिळायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, माउलींचा रथ चांदीने मढवायला ज्या पैशांची गरज लागते ते मिळवायला आणि जमा झालेल्या रकमेचा योग्य विनियोग करायला आपणासारख्या व्यावहारिक लोकांचीच जरुरी असते! असो. साधनेत प्रगती होण्यासाठी कुठल्या गुणांची गरज हे सांगायला श्रीमद्भगवद्गीतेमधील सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्तींचे विवेचन करण्यात आलेले आहे. ज्या साधकात दैवी संपत्ती ठासून भरलेली असते त्याची अध्यात्मिक प्रगती फार लवकर होते असे भगवंत अर्जुनास सांगतात. व्यावहारिक जगात जी बुध्दी आणि जी हुशारी उपयोगी पडते त्यांचा ठाव दैवी संपत्तीमध्ये सापडत नाही. त्यामुळे भगवंताची प्राप्ती करण्याचे उपजत सामर्थ्य ज्या भक्‍तात आहे त्याची व्यावहारिक दृष्टीकोनातून प्रगती होण्याची फारशी शक्यता दिसत नाही.

एकदा ही गोष्ट स्पष्ट झाली की एक महत्वाचा प्रश्न मनात निर्माण होतो. तो म्हणजे ‘मग अध्यात्माच्या मागे कशाला लागावे?’ कारण आपण संत होऊ असे काही आपणास वाटत नाही (ज्यांना आपण संत होऊ असे वाटते ते निश्चितच संत होऊ शकत नाहीत हे लक्षात घ्या!!) तेव्हा परमार्थ न मिळण्याची शक्यताच जास्त आणि तो न मिळू शकणारा अर्थ प्राप्त करण्याच्या धडपडीत व्यावहारिक प्रगती खुंटणार म्हणजे दोन्ही बाजूंनी आपली कुचंबणाच होणार. पारमार्थिक साधनेवर पाय ठेवायला आपण घाबरतो त्याचे मुख्य कारण हे आहे.

इथे बरेच सज्जन मधला मार्ग शोधायचा प्रयत्‍न करतात. आज प्रसिध्दीला असलेल्या अनेक संतांकडे बघितले तर असे आढळून येते की त्यांची विचारसरणी अशी आहे की ‘जे आहे ते सांभाळून शक्यतो समाजाच्या उपयोगी पडा. देव प्रत्येक मनुष्यात असल्याने समाजसेवा हा देवाकडे नेणारा मार्ग आहे.’ परंतु अशा बाह्य उपचारांनी मिळणारा देव द्वैतामध्येच असणार यात शंका नाही. म्हणजे काय, तर बाह्य साधनांनी जो देव मिळतो तो स्वर्गातील देव असणार. लोकोपयोगी कार्ये करुन आपण जास्तीतजास्त स्वर्गात जाउ शकू. पण माऊली स्पष्टपणे सांगते की ‘मज येता पैं सुभटा। या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्ग नरक या वाटा । चोरांचिया ॥३१५:९॥ स्वर्गां पुण्यात्मके पापे येइजे। पापात्मके पापे नरका जाइजे। मग मातें जेणें पाविजे। ते शुध्द पुण्य ॥३१६:९॥’ लोकोपयोगी कार्य म्हणजे वरवर पुण्याचे कवच घातलेले पाप आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आपण कधीच कुणाच्या उपयोगी पडू नये. समाजसेवेचा अट्‌टाहास धरण्यात परमार्थ नाही एवढेच ध्यानात ठेवले पाहीजे. श्रीसंत एकनाथांनी काशीहून आणलेली गंगाजलाची कावड तहानेने मरायला टेकलेल्या गाढवाच्या मुखात घातली हे परोपकारी कार्यच झाले पण या कथेमध्ये ते गाढव सहजपणे त्यांच्या नजरेस पडले हे फार महत्वाचे आहे. स्वतःकडे जास्तीचे पाणी आहे म्हणून ते जगभर तहानलेल्या गाढवांचा शोध घेत बसले नव्हते की ज्यांना जीवन प्रदान करुन आपल्याजवळच्या पाण्याचा सदुपयोग करता येइल! लोकोपयोगी कार्य करण्याच्या अट्‌टाहासात आपण कधी बाह्य उपचारांमध्ये फसतो हे कळत नाही. घरातील मोलकरणीच्या संसाराची जरी तुम्ही सहज काळजी (कुणाला न सांगता) घेतली तरी पुरेसे आहे. मग उरलेला वेळ अमूर्त भगवंताच्या प्राप्तीकरता मोकळा होईल. खरे म्हणजे दोन अतिरेकी गोष्टींमधील मधला मार्ग शोधणे म्हणजे त्या दोन्ही गोष्टींना चुकून तिसरी गोष्ट प्राप्त करणे आहे. त्यायोगे तुम्ही दोन्ही ध्येयांना चुकता. कुठल्याही तडजोडीमध्ये टोकाच्या गोष्टींचा विनाश करण्याची प्रचंड विध्वंसक शक्‍ती आहे हे फार कमी लोकांना कळते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असो. या जगात ज्यांना समाजसेवा करण्याचा सोस आहे त्यांनी आपला मार्ग निवडला आहे आणि स्वतःचा मार्ग निवडण्याचे त्यांचे स्वातंत्र्य आपण मान्य करायलाच हवे. फक्‍त या मार्गायोगे ना त्यांना परमार्थ मिळणार आहे ना व्यावहारिक प्रगती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

तेव्हा अध्यात्मिक मार्गावर का पदार्पण करावे हा प्रश्न अजून उरलेलाच आहे! परमार्थ काय आहे हे जर आपण जाणून घेतले तर ज्यांना या ध्येयाबद्दल आस्था आहे ते या मार्गाला लागतील. ज्याप्रमाणे वैद्यकीय पेशात खूप पैसे मिळतात ही जाणिव झाली की त्यामुळे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवायच्या प्रयत्‍नांना लागतात तशी ही गोष्ट आहे. आज प्रवचनाला घेतलेल्या ओवीमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराज आपणास ‘परमार्थ म्हणजे काय?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देत आहेत. महाराज म्हणत आहेत: ‘मी झाल्यावर मला ओळखणे सहज होते. स्वतः भगवान होणे शक्य करणारे फक्‍त ज्ञान (म्हणजे परमार्थ) आहे.’

नको कुंडलिनी जागृती । नको समाजप्रबोधनाची वृत्ती ।

नकोच ती व्यावहारिक प्रगती । हवी फक्‍त सहज, निर्मळ दृष्टी ॥

जीवनात आपोआप स्वतःसमोर आलेले प्रसंग सहजरीत्या जगणे म्हणजे परमार्थ आहे. इथे ‘सहज’ हा शब्द फार महत्वाचा आहे. आपल्या मनात इतक्या इच्छा सुप्तपणे दडलेल्या असतात की आपली कुठलीही क्रिया सहज नसते. आपली बुध्दी प्रत्येक क्रियांआधी त्या क्रियेचे मूल्यमापन करुन शेवटी परीणाम काय होतील हे बघते आणि जर होणारे परीणाम योग्य वाटले तरच कार्य करण्यास परवानगी देते. बुध्दीचे कार्यक्षेत्रच भूतकाळातील घटना असल्याने (कारण घटना पूर्ण झाल्याखेरीज बुध्दीचा वापर करता येत नाही) सहज राहण्यामध्ये बुध्दीला तिलांजली देणे अध्यारुत आहे. (जो मनुष्य बुध्दी सोडून निव्वळ अंतर्स्फूर्तीवर विसंबून असतो त्याची व्यावहारिक प्रगती होणे कसे शक्य आहे?) परंतु मनात उत्पन्न होणाऱ्या भावनाही भूतकाळातील अनुभवांवर अवलंबून असतात. त्यामुळे कुठली भावना अंतर्स्फूर्ती आहे आणि कुठली बुध्दीचे कार्य आहे हे कळणे फार कठीण होते. इथे कुठलेही समीकरण उपयोगी पडत नाही. म्हणूनच अध्यात्म करणे हे एक शास्त्र नाही तर कला आहे. ज्याप्रमाणे कसे चित्र काढावे हे शिकू शकलो तरी पांढऱ्या शुभ्र कागदावर काय चित्र येइल हे आधी सांगता येत नाही त्याचप्रमाणे सहज जगायचे आहे हे कळले तरी वर्तमानकाळात तसे जगायचे कसे हे कळत नाही.

परंतु परीस्थिती एवढी निराशाजनक नाही. आपणा सर्वांच्या जीवनात एक गोष्ट आपण सहजपणे, कुठल्याही तऱ्हेने बुध्दीचा उपयोग न करता करतो. ती म्हणजे प्रेम करणे. प्रेम या शब्दामध्येच अपेक्षेचा अभाव आहे. जी गोष्ट एखादी अपेक्षा ठेवून केली जाते ती व्यवहारातच जमा होते. उदाहरणार्थ, सर्वसाधारण साधकाची गुरुभक्‍ती हा एक व्यवहारच असतो कारण गुरुंनी ‘अनुभव’ द्यावा ही अपेक्षा मनात असतेच. केवळ आपण आपल्या क्रियेला एखादे भव्य नाम दिले म्हणून क्रिया बदलत नाही हे लक्षात घ्या. गुरुंनी सांगितलेली साधनासुध्दा जर भगवंतप्राप्तीच्या आशेने केली असेल तर त्या साधनेचे रुपांतर व्यवहारात होते. ज्या गोष्टी आपण प्रेमात पडल्याने करतो फक्‍त त्याच व्यवहारात जमा होत नाहीत. म्हणूनच आपल्या जीवनातील प्रेमामध्ये आपणास सहज जगण्याचे रहस्य समजायची वाट दडलेली आहे. ज्या मानवाच्या जीवनात प्रेम जास्त आहे तो भगवंताच्या जवळ आहे असे का म्हटले जाते याचे उत्तरच जणू माउलींनी आज आपणास दिले आहे!

इथे काहीजणांच्या मनात अशी शंका येइल की आम्ही कधी प्रेमात पडलोच नाही त्यामुळे आमच्या जीवनात प्रेम दिसत नाही. एखाद्या व्यक्‍तीच्या प्रेमात पडणे म्हणजे प्रेम नव्हे. आपल्या मनातील प्रेमाला बाहेर व्यक्‍त करण्यासाठी ती व्यक्‍ती कारणीभूत झाली असे फारतर तुम्ही म्हणू शकता. त्या व्यक्‍तीने वा तत्वाने वा घटनेने तुमच्या मनात प्रेम उत्पन्न केलेले नाही तर तुमच्यामध्ये सुप्त असलेले प्रेम बाहेर काढलेले आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाद्वारे गुप्तधन बाहेर काढले जाते त्याप्रमाणे एखाद्या व्यक्‍तीच्या वा तत्वाच्या वा घटनेच्या द्वारे आपल्यामधील प्रेम बाहेर येते. खरे म्हणजे प्रेम हा आपला स्थायीभावच आहे. म्हणूनच आपण सर्वजण स्वतःच्या प्रेमात पडलेलो आहोत! कुठल्याही परीस्थितीत आपल्या व्यक्‍तीमत्वाला जपायचा आपला प्रयत्‍न बाकी दुसरे काही न दर्शविता आपल्यातील सुप्त प्रेमाची जाणीव करुन देत आहे हे ध्यानात घ्या. आपल्या प्रेममयी वृत्तीला बाहेर येण्याचा आधार म्हणजे आपले स्वतःचे व्यक्‍तीमत्व आहे आणि म्हणून कुठल्याही कारणाशिवाय प्रत्येकाला स्वतःबद्दल प्रेम आहे. कालवशात आपण मूळ प्रेमाला विसरुन ते बाहेर येण्याच्या उपकरणाला म्हणजे आपल्या व्यक्‍तीमत्वाला जपायचाच प्रयत्‍नात गुंगून गेलो आहोत. पण जरा विचार केलात तर तुमच्या ध्यानात येइल की आपले व्यक्‍तीमत्व प्रेमाला व्यक्‍त करण्यास जेवढी मदत करत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विरोध करीत आहे. सहज जगणे हा आपला मूळ स्वभाव आहे आणि स्वतःच्या देहाच्या आणि मनाच्या मागण्यांमध्ये गुंतल्याने आपण सध्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वागू शकत नाही. ही गोष्ट पूर्णपणे कळणे म्हणजे ज्ञान होणे होय. या ज्ञानामध्ये वा परमार्थामध्ये आपणास संपूर्णरीत्या बदलविण्याची शक्‍ती आहे. एखाद्या सशाने अचानक सिंह व्हावे त्याप्रमाणे आपले अस्तित्व अचानक व्यापक होऊन या जगातील सर्व जीवांबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्न होते. आपण स्वतः भगवंतमय होऊन परमेश्वर होतो. अशावेळी आपणास जे भगवंताचे ज्ञान सहजरीत्या होइल त्याची गोडी ज्याला आहे त्यानेच परमार्थ शोधायचा प्रयत्‍न करावा. परमार्थ कुणी आणि का करावा याचे हे उत्तर आहे.

साधकाला एकदा ही स्थिती प्राप्त झाली की भगवंतप्राप्ती हे ध्येय रहात नाही तर सहजस्थिती होते. आम्ही साधना कशी करतो व किती प्रेमाने करतो इत्यादी विषय आयुष्यातून निघून जातात. ते चविष्ट संवादाचा विषय बनत नाहीत! स्वरुपात निमग्न राहून सहजरीत्या जगात वावरण्यामागील सौंदर्य बघण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे त्यानेच परमार्थ करावा. इतरांनी केलेले सर्व उपाय व्यवहारातच जमा होतील, मग बले तुम्ही त्यांना कितीही आकर्षक नावे द्या!

॥ हरि ॐ ॥

(कोल्हापूर, दिनांक १० जानेवारी २०१०)