श्लोक २७/८: साचेबंद साधनेने परमार्थ मिळत नाही

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।

तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्‍तो भवाऽर्जुन ॥ गीता २७:८ ॥

आपणा सर्वांना अनेक वेळा सांसारिक गोष्टींची हाव धरणे योग्य नाही हे पटलेले असते. आणि जीवन परिपूर्णरीत्या जगण्यासाठी स्वतःच्या आयुष्याला एक संपूर्णपणे नवीन वळण लावायला हवे याची खात्री झालेली असते. खरे म्हणजे ही मनापासून झालेली जाणीव आपणास भगवंताकडे पोहोचवायला पुरेसी असते. परंतु आपणास भगवंतप्राप्ती होत नाही. यामागील कारण म्हणजे त्या जाणीवेवरील पडलेली आपल्या मनातील सतत जागृत असलेल्या भितीची सावली. आपल्या मनावर असलेल्या ‘जे आहे तेसुध्दा जाईल आणि नवीन मिळणार नाही’ या विचाराचा पगडा त्या भितीला दर्शवितो. परंतु हा विचार खऱ्या भितीचा एक मुखवटा आहे. आपली खरी भिती ‘माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे की नाही?’ या शंकेला सामोरे जाण्याची आहे. आपल्या संसारातील वस्तू वा व्यक्‍ती जवळ ठेवण्याच्या हव्यासामागे स्वतःच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याची इच्छा आहे. आपणा सर्वांना स्वतःच्या अस्तित्वामुळे कुणाच्यातरी जीवनात मूलभूत फरक पडलेला आहे हे बघायची इच्छा आहे. आणि त्यातूनच आपण आपल्या जगण्याला अर्थ देत असतो. स्वतःला दुसऱ्यांच्या जीवनात महत्वाचे बनवायचे असते म्हणून आपण दुसऱ्या कुणाला स्वतःच्या जीवनात महत्वाचे बनवितो. मग ती व्यक्‍ती आपली पत्नी असेल, पालक असेल, गुरु असेल, वा भगवंत. स्वतः असे वागल्यामुळे आपण दुसऱ्यांना तोच सल्ला द्यायला नैतिकरीत्या मोकळे होतो! हे लक्षात घ्या की स्वतः एका परक्या व्यक्‍तीला गुरु मानून भजण्याच्या क्रियेतच आपण स्वतः दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ करायला मोकळे होत असतो. ज्या मनुष्याच्या मनात स्वतःच्या प्रयत्‍नांमुळे जीवनात फरक पडणार आहे या वस्तुस्थितीवर पूर्ण विश्वास जागृत आहे तो दुसऱ्यांनाही स्वतः प्रयत्‍न करायला सांगेल, एखादे समीकरण मांडून त्यांच्या दुःखांचे निराकरण करण्याचा प्रयत्‍न करणार नाही. असो.

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील सदतीसाव्या श्लोकात अर्जुन आपणा सर्वांच्या मनातील ‘अस्तित्वाला अर्थ आहे की नाही’ या भितीला व्यक्‍त करतो. त्याची बाह्यदर्शनी पृच्छा अशी आहे की ‘जो मनुष्य परमार्थप्राप्तीसाठी प्रयत्‍न करीत असताना ध्येयाला न गाठता देह ठेवतो त्याची काय गती होते? तुलापण मिळविले नाही आणि संसारातील रसही आटला आहे अशा अवस्थेत मृत्यु प्राप्त झाला तर काय होते?’ परंतु त्याला खरे असे विचारायचे आहे की अशा माणसाने आपला जन्म वाया घालविला का? तेव्हा भगवान त्याला सांगतात की जरी त्याने एका जन्मात भगवंतप्राप्ती केली नाही तरी त्याने बरेच काही साध्य केले आहे. त्याच्या तळमळीच्या साधनेमुळे तो आधी स्वर्गसुखाला भोगून मग परत सात्विक कुळात जन्म घेइल आणि आपली उरलेली साधना पुरी करुन माझ्यात विलीन होइल. साधकाच्या मनातील आपला जन्म वाया जाइल या भितीचे महत्व लक्षात गेऊन नंतर आठव्या अध्यायात भगवान परत या विषयाला हात घालतात. अष्टम अध्यायातील तेवीस ते सव्वीस श्लोकांमध्ये ते अर्जुनाला मृत्युसमयी कुठला काळ असल्यावर काय गती होते याचे सविस्तर वर्णन करतात आणि आज विवेचनाला घेतलेल्या सत्ताविसाव्या श्लोकामध्ये असा उपदेश करतात की ‘हे भिन्न काळ जाणून घेतल्याने खरा योगी योग्य काळाची वाट न बघता सदासर्वकाळ माझ्या ध्यानात मग्न राहून काळाच्या बंधनांतून सुटका करुन घेतो. त्याचप्रमाणे तुसुध्दा सतत माझ्या अनुसंधानातच रहा.’

साधनेला देऊन ठराविक रुप । आपण करतो प्रयत्‍न खूप ॥

प्रयत्‍नांतून कधी न मिळे सुख । तसेच राहतो आपण कोरडेठाक ॥

होण्यास भगवंताशी एकरुप । हवी साधना सहज, अरुप ॥

आपण संसारातील गोष्टीमधून मिळणाऱ्या अशाश्वत समाधानाचा कंटाळा येऊन परमार्थाच्या मार्गाला लागलो तरी समाधान ‘मिळवायचे’ असते ही आपली भावना नष्ट झालेली नसते. पदरी पडलेल्या निराशेने आपण समाधान कुठून मिळवायचे हे फक्‍त बदलतो. आधी समाधान व्यावहारिक गोष्टींमधून मिळवायचा प्रयत्‍न करीत होतो आणि आता भगवंताच्या मागे लागतो. म्हणजे काय तर आपल्याहून समाधान खूप दूर आहे आणि तिकडे आपणास पोहोचायचे आहे हा समज अजून तसाच असतो. बहुतांशी साधक मनाची शांति ‘मिळवायचा’ प्रयत्‍न करीत असतात वा कुठल्याही परिस्थितीत मन शांत राहील याची खात्री करण्याच्या फंदात असतात असे दिसून येते. परमार्थाच्या मार्गाने जे प्राप्त होते त्याचा ‘उपयोग’ झाला पाहीजे ही भावना सर्वांच्या मनात असतेच. माझ्या साधनेचा जर ‘फायदा’ होणार नसेल तर का करायची अशी पृच्छा आपल्या गुरुंना करणारे शिष्यच सर्वसाधारणपणे दिसतात. थोडक्यात म्हणजे परमार्थातही आपण एक ध्येय सुनिश्चित करुन ते प्राप्त करण्याच्या खटपटीत पडलेलो असतो. संसारात पैसा-अडका मिळवायच्या मागे असतो आणि परमार्थात मनाच्या शांतिकरीता आसुसलेलो असतो. जेव्हा गुरुंबरोबर असतो तेव्हा काय शांत वाटते, पण आपल्या घरी परत आलो की परत नेहमीच्या भावना जागृत होतात असे सर्व म्हणतात. असे म्हणणे वस्तुस्थितीवर आधारीत असल्याने अजिबात चुकीचे नाही. चुकीचे काय आहे, तर यातून आपण असा निष्कर्ष काढतो की शक्यतो आपण गुरुंबरोबरच रहावे. गुरुंच्या अस्तित्वाने निर्माण झालेली शांतिसुध्दा संसारातील गोष्टींमुळे प्राप्त झालेल्या समाधानासारखीच अशाश्वत आहे हे आपण विसरतो! त्या शांतिचा त्याग करणे योग्य आहे असे किती साधकांना वाटते? गुरुस्थानी ध्यान चांगले लागते, स्वतःच्या घरी चांगले लागत नाही हे जाणविल्यावर ध्यानाची फोलता लक्षात न घेता, गुरुगृही जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्‍न करणे आणि पैशाने वस्तू मिळते हे लक्षात आल्यावर तो मिळविण्यासाठी सर्व शक्‍तीचा व्यय करणे यात तत्वतः काय फरक आहे? ‘गुरु’ या नावाखाली आपण एक नवीन वस्तू जवळ केली आहे आणि त्या वस्तूच्या सान्निध्यात आपण स्वतःच्या कमीपणाला भरुन काढायचा प्रयत्‍न करीत असतो. गुरुंकडून काही शिकायचे असते ही भावना नष्ट होऊन गुरुसान्निध्यात फक्‍त रहायचे, आपोआप बाकी सर्व होते अशी परावलंबी अवस्था आपल्या जीवनात केव्हा निर्माण होते हे कुणालाच कळत नाही. कित्येक साधक आपल्या या परावलंबी अवस्थेबद्दल अभिमान बाळगून त्यातून आपली गुरुभक्‍ती सिध्द करायचा प्रयत्‍न करतात! यापेक्षा अजून दारुण परिस्थिती दुसरी दिसत नाही. असो.

आणि एकदा आपल्या मनाची एक धारणा पक्की झाली की जगाकडे त्या दृष्टीनेच पाहीले जाते. त्यामुळे संतांच्या ‘सतत सद्‌गुरुंजवळ असावे’ या वाक्याचा अर्थ ‘आपल्या गुरुंच्या सान्निध्यात रहावे’ असा व्हायला लागतो. त्याच संतांच्या ‘मज ह्रुदयी सद्‌गुरु, जेणे तारीलो संसारपुरु’ या वाक्याचा अर्थ स्वतःच्या अंतर्स्फूर्तीवर विश्वास ठेवा असा न लागता, सतत माझ्या डोक्यात गुरुंचेच विचार असतात असा लागायला लागतो. मग त्यापुढच्या ‘म्हणऊनि विशेषे अत्यादरु, विवेकावरी’ या चरणांकडे दुर्लक्ष होते. गुरुंशी जवळिक अशी विवेकाची व्याख्या केली जाते! एकदा साधकाला गुरुंना विचारल्याशिवाय विचार करणे अयोग्य वाटू लागले की तो परावलंबी अस्तित्वात फसला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा साधकाचा परमार्थही एक सांसारिक वस्तू होऊन जाते. कारण त्याच्या ध्येयाच्या प्राप्तीकरीता एक ठराविक मार्ग त्याला दिसत असतो आणि त्या मार्गाने चालल्यावर ध्येय मिळणार आहे अशी त्याची खात्री असते. मग कितीही प्रामाणिकपणे त्याने आपली साधना केली तरी त्याला जास्तीतजास्त साधना चालू असतानाच शांति मिळणार आणि उरलेल्या दैनंदिन जीवनाचे बोझच त्याला वाटणार. ठराविक साधना करुन झाली की उरलेला दिवस त्याच्या मनात दुसऱ्या दिवसाच्या साधनेबद्दलच विचार असणार. त्यामुळे संतांकडे दिवसाच्या चोवीस तासात जी असीम शांति असते त्याकडे आशाळभूतपणे बघत (जसे आपण आपल्याला न परवडणाऱ्या गोष्टींकडे बघत बाजारहाट करतो तसेच) त्याचे जीवन व्यतीत होणार.

भगवान अर्जुनाला काय सांगत आहेत? तर सतत माझ्या अनुसंधानात रहा. सतत ‘सत्या’च्या पडछायेत राहून जो जगतो त्याला कधीही अशांतिच्या प्रखर प्रकाशाला तोंड द्यावे लागत नाही! त्याच्या मनाची शांति कुठलाही प्रयत्‍न न करीता जागृत रहाते. मानसिक शांति हे ध्येय नाही तर आपली सहज स्थिती आहे. पाण्याला पाणी होण्याकरीता प्रयत्‍न करावे लागत नाहीत का गर्दभाला स्वतःकरीता वेगळे गाढवपण शोधून आणावे लागत नाही. कुठलाही प्रयत्‍न न करीता प्रत्येकजण स्वरुपात स्थित असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनाची शांति ‘मिळवायची’ नसते तर स्वतःच्या सत्यस्वरुपात राहील्याने ती सतत आपल्याजवळ आहेच हे जाणून घ्यायचे असते. अशी जाणीव उत्पन्न झाली की एक असा स्वयंभू आत्मानंद निर्माण होतो जो कुठल्या गुरुंच्या जवळिकीवर अवलंबून नसतो ना एखाद्या तत्वाच्या कठोर अंगिकाराने निर्माण झालेला असतो. हा आत्मरुपी भगवंताच्या भेटीचा आनंद प्राप्त होण्याकरीता खरा योगी भविष्यातील एखाद्या योग्य काळाची वाट बघत नाही तर आत्ताच वर्तमानकाळात त्याच्यात डुंबत असतो. या आनंदाची प्राप्ती काही निवडक लोकांकरीता राखून ठेवलेली नाही तर आपणा सर्वांचा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपणास सांगत आहेत. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या न्यूनगंडरुपी सुषुप्तीत पडलेल्या आपण सर्वांनी झडझडून उठायची आणि स्वसामर्थ्यावर निःसंदेह विश्वास ठेवायची फक्‍त गरज आहे.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर. दिनांक २९ नोव्हेंबर २००९)