79/8: Think Big. Aim High.

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

तू मन बुध्दी सांचेसी । जरी माझीया स्वरुपी अर्पिसी।

तरी मातेचि गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९: ८॥

 

सातव्या अध्यायाच्या अंताला भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनात काही प्रश्न उत्पन्न झाले. म्हणून आठव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. त्याने विचारलेल्या प्रश्नांपैकी पहिल्या सर्व प्रश्नांना (ब्रह्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ कुठला इत्यादी) भगवान संक्षिप्त उत्तरे देतात परंतु त्याच्या शेवटच्या प्रश्नाला मात्र सविस्तर उत्तर देतात. तो महत्वाचा प्रश्न म्हणजे `आणि नियता अंतःकरणी । तूं जाणिजसी देहप्रयाणी । ते कैसेनि हे शारंगपाणी । परिसवा माते ॥ ५:८ ॥’ म्हणजे ज्याने आपल्या अंतःकरणावर नियंत्रण मिळविले आहे तो साधक देहांती तुमच्या स्वरुपी कसा विलीन होतो हे मला नीट समजावून सांगा. याला उत्तर देताना माऊली म्हणते की जो घट पाण्यात बुडाला आहे तो फुटल्यावर त्यातील पाणी बाहेरील पाण्यात समरस होऊन जाते त्याचप्रमाणे साधक देहांती भगवंतात विलीन होतो. किंवा थंडी वाजत असताना अंगावर घेतलेले लोकरीचे वस्त्र उष्णता वाढल्यावर आपण काढून टाकतो तेव्हा आपल्या अवयवांना काही इजा न होता ते आहेत तसेच राहतात त्याचप्रमाणे ज्याच्या ह्रुदयातील आत्माराम जागृत झाला आहे, ज्याला स्वसंसवेदनांने वा स्वप्रचीतीने भगवंताचे अस्तित्व संदेहरहित सतत जाणवित आहे, त्याचा देह दैववशाने गेला तरी ती जाणीव जाणे शक्य आहे का? त्या जाणीवेच्या सामर्थ्याने ते भगवंतात विलीन होतात. म्हणून “तू आत्ताच मन आणि बुध्दीने माझ्यावर प्रेम कर, माझ्यात समरस होऊन जा. (याचा अर्थ काय? तर) तुझे शरीरावर आधारीत असलेले संकुचित अस्तित्व मला अर्पण कर मग तू माझ्यातच सामावशील हे मी तुला शपथपूर्वक सांगत आहे.”

 

भगवंतप्राप्तीचे भव्य ध्येय समोर ठेवा

 

कळायला लागल्यापासून आपणांस डोळ्यासमोर एखादे ध्येय ठेवून जीवन जगायची सवय लागलेली आहे. तुम्ही बघा लहानपणी मित्रांबरोबर संध्याकाळी खेळायला मिळेल या आशेत दिवस जायचा, तरुणपणी नाक्यावर जमून तासनतास गप्पा मारण्यात, कुणाएकाची `खेचण्यात’ दिवसाचे सार्थक व्हायचे तर आता जबाबदार गृहस्थ या अवतारात प्रवेश केल्यावर बायको आणि मुलांची, आई-वडिलांची व्यवस्थित काळजी घेण्यात आपण स्वतःला यशस्वी मानत आहोत. सगळे जगच या रस्त्याने जात असल्याने आपल्या या आकांक्षा पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालो तरी स्वतःला फार कृतकृत्य मानायचे धाडस आपण करीत नाही. कारण आपण बघतो की थोड्याबहुत फरकाने सर्व जणांना हे यश लाभले आहे. जी अत्यंत थोडी माणसे यावेगळे ध्येय ठेवून जगतात त्यांना यशस्वी म्हणताना आपणास संकोच वाटत नाही. मग भले त्यांनी सचिन तेंडुलकरसारखे एखाद्या खेळात प्राविण्य मिळविले असेल वा एखाद्या दुर्गम ठिकाणी जाऊन लोकसेवा केली असेल. जगात यशस्वी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या लोकांकडे बघितले की त्यांच्या ध्येयाचे सर्वसामान्य लोकांच्या ध्येयापासून असलेले भिन्नत्व ही एक गोष्ट आणि त्या ध्येयाकरीता बाकी सर्व गोष्टींचा त्याग करण्याची त्यांची तयारी समान आहे हे जाणविते. आपणापैकी बऱ्याच लोकांना असे जगन्मान्य व्हावे असे वाटते खरे पण एकतर आपल्या डोळ्यासमोर भव्य ध्येय योग्यवेळी आलेले नसते वा समोर आलेल्या ध्येयाकरीता सर्वस्वाचा त्याग करण्याची आपली मनःस्थिती नसते. असा काहीकाळ गेला की आहे त्या जीवनात समाधान मानून आपली महत्वाकांक्षा संततीद्वारे पूर्ण करण्याच्या सापळ्यात आपण अडकायचा धोका असतो. आपण जरी या धोक्यापासून बचावलो तरी आता आपल्या जीवनात जे काही मिळवायचे आहे ते बहुतांशी मिळाले आहे अशी भावना निर्माण होऊन जीवनातील नावीन्य निघून जाते हे नक्की. आयुष्याच्या मध्यभागी, म्हणजे साधारण चाळीशीच्या सुमारास आपल्याला दोन नवीन डोळे (चाळीशी) येतात हे खरे पण त्याचबरोबर आपल्या अंतर्गत भावविश्वात `कशाकरीता आपण जगत आहोत?’ ह्या कुशंकेच्या रुपात एक अंधार गोळा व्हायला लागलेला असतो हेही तितकेच खरे असते! एका ध्येयशून्य पर्वात आपण पदार्पण करायची शक्यता खूप असते. ही घटना इतकी प्रचलित आहे की याला मानसशास्त्रात `मिड-लाईफ क्रिसिस’ अशी संज्ञाही दिलेली आहे. परंतु कुठल्याही घटनेचा पाया ती गोष्ट घडण्याआधी घातला गेलेला असतो. परीक्षेत नापास झालो या घटनेचा पाया आधी वर्षभर अभ्यास नीट न करण्यात असतो. त्याचप्रमाणे ध्येयशून्य जगायची अवस्था येण्यास आपली पूर्वजीवनातील लक्ष्ये निवडण्यात चुक केली होती हा पाया असतो. आपल्यापैकी ज्यांना असे वाटत असेल की माझ्या जीवनात अजून एक पोकळी तयार झालेली नाही, त्यांनी जरा विचार करावा की अजून पाच वर्षांनी तुमची परिस्थिती काय होईल. जर तुमचे ध्येय व्यावहारीक असेल तर एकतर आपले ध्येय कधीच मिळणार नाही याची तुम्हाला खात्री होईल वा जीवनात तुम्ही ते लक्ष्य गाठू शकाल. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीनाकधी अशी अवस्था येणारच आहे. केव्हातरी आपण मी जिंकलो म्हणून आनंद मानणार आहोत वा जय आपल्या आवाक्याबाहेर आहे हे मान्य करणार आहोत. त्या दोन्ही शक्यतानंतर आपल्या आयुष्यात `आता पुढे काय’ हा प्रश्न उभा राहणारच आहे हे लक्षात घ्या. तो प्रश्न आल्यावर विचार करु असे म्हणणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणू, आत्ता काय गरज आहे असे म्हणण्यासारखे आहे. जोपर्यंत विहीर खणून होईल तोपर्यंत तहानेने व्याकुळ होऊन आपला प्राण जायची वेळ येते, त्याचप्रमाणे आयुष्यातली पोकळी भरुन काढेपर्यंत आपले जीवनच संपायची पाळी येते.

परमार्थातील परमेश्वरप्राप्तीचे ध्येय हे एकच असे ध्येय आहे की ते मिळाल्यावर आता पुढे काय हा प्रश्न कधीच उद्‌भवू शकत नाही आणि जोपर्यंत भगवंताची भेट होत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती आपल्या आवाक्याबाहेर आहे असे कधीच जाणवित नाही!

याचा अर्थ असा की तुम्ही अगदी व्यावहारिक रीतीनेच जगायचे ठरविले तरीही आपल्या जगण्याला भगवंताचे अधिष्ठान ठेवून जगण्यातच तुमचे खरे हित आहे. परमार्थ हा व्यवहारापेक्षा सूक्ष्म आहे म्हणून त्याचे पाठबळ मिळाले की व्यवहारातील जीवनातही आनंदाचा सुगंध दरवळतोच. व्यावहारिक कर्तृत्वाचा अध्यात्मात फायदा होईलच असे सांगता येणार नाही पण अध्यात्मिक प्रगतीचा फायदा दररोजच्या जगण्यात दिसून येतोच. परमार्थ करणे म्हणजे आपल्या जीवनरुपी वृक्षाच्या मूळाला जोपासण्यासारखे आहे. त्याचा परिणाम व्यावहारिक पाना-फुलांवर दिसून येतोच. पण फुला-पानांवर औषधे मारली तर त्याचा परिणाम मूळांवर दिसून येतोच असे नाही. खरोखर, आपले मूल ध्येय भगवंताची प्राप्ती ठेवण्यातच आपल्या जन्माचे सार्थक आहे. सर्व संतांनी हेच सांगितले आहे. खुद्द भगवंतांनी आज निरुपणाला घेतलेल्या ओवीत हेच सांगितलेले आहे. तुम्हाला संतांच्या शिकवणुकीत फरक आढळला तर तो फक्‍त साधनेमध्ये आढळेल. साधनेच्या ध्येयामध्ये एकमतच दिसून येईल. चला, वेळ आलेली आहे की आपण सर्व संतांच्या सांगण्यावर गंभीरपणे विचार करावा. भगवंत म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे, आपली त्याच्या प्राप्तीकरीता काय करायची तयारी आहे याचा आत्तापर्यंत तुम्ही कधीतरी खोल विचार केला होता का? आता करा. का म्हणून तुम्ही परमेश्वराकडे जाऊ नये असे ठरवावे? त्याला पर्याय म्हणून कुठली वस्तू वा व्यक्‍ती तुमच्या जीवनात आहे? आणि मग असासुध्दा विचार करा की जो पर्याय आपण ठेवला आहे तो कितपत योग्य आहे.

आपल्या जीवनातील लक्ष्ये सतत तपासून बघणे जरुरी आहे. आपल्या सर्वांगीण उन्नत्तीचा तोच एक मार्ग आहे. दुकानात गेल्यावर आपल्या हातात लगेच हवी तशी वस्तू येत नाही. बायका साड्यांच्या दुकानात गेल्यावर तेथील विक्रेत्याला अगदी भंडावून सोडतात. मग शेवटी पसंत पडलेली साडी (जिचा पदर पहिल्या साडी सारखा, रंग पाचव्या साडीसारखा, नक्षीकाम पंचविसाव्या साडीसारखे आणि किंमत दुसऱ्या साडीसारखी असते ती साडी! ती मिळेपर्यंत अशी वस्तू या जगात अस्तित्वात आहे की नाही याबद्दल सर्वांना संदेह असतो!!) विकत घेतात. मग आपण जन्माला आल्यावर पहिल्याच क्षणी नजरेत पडलेली व्यावहारिक प्रगतीच का कवटाळून बसलेलो आहोत? जरा अजून पुढे बघा की. आपली ध्येये पारमार्थिक न ठेवता व्यावहारिक ठेवण्यामागे केवळ जन्मापासून ओळखीचे आहे, खूप लोकांनी तीच निवड केलेली आहे याशिवाय तुम्हाला दुसरे कारण सापडते का? बाकी सर्व जीवनात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुढाकार करणारे आपण, जीवनाच्या मूळ ध्येयातच आपले स्वातंत्र्य का वापरत नाही? तेव्हा जगाचा विचार कशाला? स्वतःच्या घरात मोठ्याने देवाचे नाव घेताना मग शेजारी काय म्हणतील हा विचार कशाला?!!

आता शांतपणे विचार करा की आपल्या जीवनातील मुख्य घटना भगवंतप्राप्ती असावी ह्यामध्ये काय चुक आहे? एकदा तुमची पूर्ण खात्री पटली की देवाच्या सान्निध्यात जगण्यातच जीवनातील खरे सुख दडलेले आहे, खरे ध्येय लपलेले आहे की मग तुमची अवस्था वरील ओवीचा अर्थ ऐकण्याच्या योग्यतेची होईल. मग तुम्ही खरा विचार करु शकाल की मन आणि बुध्दी स्वतःजवळ ठेवावी की भगवंताला अर्पण करावी. एखादी गोष्ट व्यवस्थित, जशी उच्चारली आहे तशी ऐकायला येण्याससुध्दा आपली खूप तयारी करावी लागते. वरील ओवी नीट ऐका. जरा मोठ्याने म्हणा `मन बुध्दी साचेसी, माझीया स्वरुपी अर्पिसी’. एकदा नीट ऐकून झाले की मगच विचार येतो की काय असेल याचा अर्थ? हा विचार जेवढा स्पष्ट प्रगट होऊ लागेल तेव्हढी तुमची खरी साधना सुरू झाली असे समजा!

 

अर्पण करणे म्हणजे काय?

 

ज्ञानेश्वरीतील ओव्या खूप गूढ आहेत! `माझिया स्वरुपी अर्पिसी’. बघा किती सूक्ष्म विचार मांडला आहे. मला अर्पण कर असे म्हटले नाही. माझ्या स्वरुपाला अर्पण कर असे म्हटले आहे. म्हणजे श्रीकृष्णरुपातील भगवंताला तुमच्या कुठल्याही देणगीची आवश्यकता नाही. त्याचे स्वरुप जे आहे, त्याला तू मन आणि बुध्दी अर्पण कर. कुठले हे स्वरुप? आपल्याला स्वतःचे स्वरुप माहिती नाही (भगवान रमण महर्षींचा नेहमीचा उपदेश म्हणजे `तू कोण आहेस?’ याचा विचार कर) मग भगवंताचे स्वरुप कुठून माहिती असणार? म्हणजे अर्पण करायला जरी आपण तयार असलो (पहिल्या भागातील विवेचनानंतर एवढी तयारी झालेली असेलच!) तरी कुणाला अर्पण करावे हा प्रश्न उरतोच. याशिवाय जे अर्पण करायचे आहे ते काही बँकेतील पैशासारखे जड नसून सूक्ष्म (मन आणि बुध्दी) असल्याने अर्पण करणे म्हणजे काय हे सुध्दा स्पष्ट होत नाही. यावर आता थोडा विचार करु.

`सत-चित-आनंद’ असे भगवंताच्या स्वरुपाचे वर्णन आहे आणि आपल्या मनाची आणि बुध्दीची धडपड जेव्हा पूर्णपणे थांबते तेव्हा आपल्याला ज्या शांततेचा लाभ होतो तो भगवंताच्या स्वरुपाच्या सान्निध्यात गेल्यामुळे आलेला असतो. म्हणजे याचा अर्थ असा की भगवंताच्या स्वरुपाचे ज्ञान आपणास जेव्हा संपूर्णपणे मानसिक स्तब्धता जाणविते तेव्हा होत असते.

हे कसे हे आता बघू. जरा निरखून पहा की तुम्हाला आत्तापर्यंत जेव्हा आनंद झालेला आहे त्याची कारणे वेगवेगळी असतील पण आनंदामध्ये काहीच फरक नव्हता. मूळ भावना एकच होती. म्हणूनच आपण तीला एकच नाव दिलेले आहे. नाहीतर पैशाच्या प्राप्तीनंतरची अवस्था, प्रिय व्यक्‍तीच्या निकटच्या सहवासानंतरची अवस्था, पोटभरुन जेवण झाल्यानंतरची अवस्था अशी वर्णने आपण केली असती. तसे न करता , कुठल्याही घटनेने आनंद झाला असेच आपण म्हणतो, कारण जाणविलेली भावना एकच असते. ह्या एकत्वाचे कारण काय आहे? जेव्हा परीसाचा स्पर्श लोखंडाला होतो तेव्हा त्याने तो स्पर्श कौतुकाने केलेला आहे का लोखंडाला घाव घालण्याकरीता केलेला आहे यामुळे फरक पडत नाही. घटनेचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे लोखंडाचे सोने होणे (म्हणूनच आपण बघतो की कृष्णाने मारलेल्या दैत्यांनासुध्दा त्याच्या प्रिय भक्‍तांप्रमाणेच मोक्ष प्राप्त झाला! भगवान श्रीकृष्ण आपल्या जीवनातील परीस आहेत. त्यांच्याजवळ जा, आयुष्याचे सोने होईल.). त्याचप्रमाणे आपण जीवनात तात्पुरती ठरविलेली ध्येये गाठली की मनाची धावाधाव थोडावेळ थांबते, बुध्दी विश्रांति घेते आणि त्या दोघांच्या अनुपस्थितीत झालेल्या अवस्थेला आपण आनंद असे नाव देतो. आणि अशावेळी आपले मन आणि बुध्दी जाते तरी कुठे? आपण आपल्या शयनकक्षात जाऊन विश्रांति घेतो, मन आणि बुध्दीची बेडरुम कुठली आहे?! आपले स्वरुप, आत्मरुप ह्यात ते विलीन होत असतात. भगवंत आपल्या जीवनात आत्मरुपातच असल्याने (उदाहरणार्थ, `…जयजय स्वसंवेद्या, आत्मरुपा’ ज्ञा.॥१:१॥) त्यावेळी आपले मन आणि बुध्दी भगवंताच्या स्वरुपापाशी होते असे मानण्यास काय हरकत आहे? याचा अर्थ असा की आपल्या सबंध आयुष्यात आपण वेळोवेळी स्वतःचे मन आणि बुध्दी (आपल्या नकळत) भगवंताच्या स्वरुपी अर्पण केलेली होती आणि त्या प्रत्येकवेळी भगवंत आणि आपण यात काहीही भेद नव्हता (आपले रुप `आनंद’ झाले होते). तेव्हा वरील ओवीची सत्यता आपण अनेकवेळा पडताळून पाहिली आहे. फक्‍त आपल्यालाच माहित नव्हते की काय होत होते ते. आपल्या जीवनात आत्तापर्यंत आलेल्या आनंदाच्या क्षणांतच वरील ओवीची मेख दडलेली आहे. स्वतःच्या अपेक्षा पूर्ण झाल्याने मनाची व बुध्दीची जी अवस्था होते तीलाच आपण भगवंताच्या स्वरुपी अर्पण करणे असे म्हणू शकतो. याचा अर्थ असा की व्यवहारात राहूनदेखील आपण भगवंताला मन आणि बुध्दी अर्पण करीत असतो. फक्‍त असे क्षण क्वचित येतात एवढेच. जर सतत भगवंताचे सान्निध्य हवे असेल तर आपल्या अपेक्षा एवढ्या सूक्ष्म बनविल्या पाहीजेत की त्या सतत पूर्ण होत राहतील. थोडक्यात सांगायचे म्हणजे, वरील सर्व विवेचनामुळे आलेल्या सर्व घटनांचा ही भगवंताचीच इच्छा आहे असे म्हणून `विना आक्रोशे’ स्वीकार करणे हा एक मार्ग आपल्या समोर स्पष्ट होत आहे. कुठल्या भगवंताची इच्छा आहे असे आपण मानले पाहिजे? तर आपल्या आत्मरुपी भगवंताची, भगवान श्रीकृष्णाच्या स्वरुपाची, म्हणजे आपलीच की हो! इथे दुसरा कुणी नाही. काय गंमत आहे बघा. अर्पण करायला भगवंत शोधायला गेलो आणि स्वतःला अर्पण करता करता भगवंताला आपल्यात ओढून त्यालाच अर्पण केले. काय सुंदर शब्द आहेत बघा. `माझीया स्वरुपी अर्पिसी’. मग उरते काय? आपण आणि भगवंत याचे ऐक्य. म्हणून `मातेचि गा पावसी’. हे इतके शाश्वत सत्य आहे की हे शपथपूर्वक भगवंत सांगत आहे, `हे माझी भाक’. आपल्या एखाद्या मित्राने शपथपूर्वक कितीही अतिरंजित गोष्ट सांगितली तरी आपण त्यावर विश्वास ठेवतो. इथे प्रत्यक्ष भगवंत शपथ घेऊन आपल्याला जे सांगत आहेत त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. आणि खरा विश्वास ठेवणे म्हणजे काय? तर त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्‍न करणे होय. जर तुम्ही आत्तापर्यंतचे विवेचन नीट ऐकले असेल तर तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. नाहीतर तुम्ही शब्दांना स्वतःच्या पूर्वनियोजित अस्तित्वाच्या चश्म्यातूनच बघत आहात, ऐकत आहात. काढून टाका त्या आत्तापर्यंत दगडावरच्या रेषेसारख्या दृढ असलेल्या तुमच्या यशस्वीतेच्या सर्व जगन्मान्य पूर्वकल्पना आणि नाविन्यपूर्वक आयुष्य जगायला सुरुवात करा. माउलींचे प्रेम बघायला शिका, अनुभवाला घ्या. तुमच्या सर्व प्रयत्‍नांना आमच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २३ फेब्रुवारी २००८ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)