(123to128)/14: God is everywhere

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जालेनि जगें मी झांके । तरि जगत्वे कोण फाके ।

किळेवरी माणिके । लोपिजे काई ॥ १२३:१४ ॥

की विरुढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा ।

वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥ १२६:१४ ॥

म्हणौनि जग परौते । सारुनि पाहिजे माते ।

तैसा नव्हे उखिते । आघवे मीचि ॥ १२७:१४ ॥

हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा ।

गांठी बांध वीरा । जीवाचिये ॥ १२८:१४ ॥

आज निरुपणाला घेतलेल्या चौदाव्या अध्यायातील ओव्या आपणास स्वतःची साधनेत प्रगती का कमी होते याचे वर्णन करणाऱ्या आहेत असे वाटते. याचे कारण असे:

भगवंताचे आराधन करीत असताना आपल्या मनात कुठेतरी सुप्त भावना असते की आपले इष्ट दैवत आसपासच्या जगापासून भिन्न आहे. साधनेच्या शेवटी काहीतरी वेगळी अवस्था ‘मिळणार’ आहे ह्या आपल्या अपेक्षेमध्येच भगवंताचे भिन्नत्व दडलेले आहे. स्वतःच्या दैवताला नेहमीच्या, कंटाळवाण्या, कष्टदायक आणि धकाधकीच्या जीवनात बघणे तर सोडाच पण ते ह्या जीवनात पुरेपूर भरलेले आहे ही कल्पनासुध्दा आपणास अयोग्य वाटते. भगवंत म्हणजे कुठलीतरी उच्च अवस्था हे समीकरण आपल्या विचारसरणीत इतके दृढ बसले आहे की रस्त्यातील भिकाऱ्यात आणि त्याला दोन पैसे देण्यास नकार देण्याऱ्या कंजूष माणसात भगवंत आहे, किंबहुना भगवंत त्यांत आहे असे नव्हे तर ते म्हणजे भगवंतच आहेत हा विचार आपणास हास्यास्पद वाटतो. चराचरात ईश्वर भरलेला आहे हे सर्व संतांनी उद्गारलेले वाक्य माहित असूनही त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास आपण कचरतो. आणि हाच अविश्वास आपण प्रत्यक्ष भगवंतांच्या बाबतीतही लावतो. आपल्या सर्वांनाच श्रीरामांच्या देवत्वाबद्दल विश्वास वाटत असला तरी केवळ लोकापवादामुळे त्यांनी केलेल्या स्वपत्नीच्या त्यागाबद्दल संदेह आहेच की नाही? सीतामाईंच्या चारीत्र्याबद्दल जर स्वतःची खात्री होती तर त्यांनी सामान्यलोकांच्या कुजबुजीकडे लक्ष का दिले हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात असतो. किंवा वालीला झाडाआडून मारायची काय गरज होती असे आपण रामायण ऐकताना म्हणतोच. तेव्हा प्रत्यक्ष भगवंतांच्या वर्तनामध्येदेखील प्रत्येकवेळी भगवंत आहेत असे आपण मानत नाही! आपल्या अशा विचारसरणीमागे कुठले तत्व आहे याचा विचार केल्यास असे वाटते की आपल्या सर्वांच्या मनात काय चांगले आणि काय वाईट याचे पक्के निष्कर्ष ठरलेले आहेत. लहानपणापासून योग्य मार्गाने जाण्याबद्दलचे झालेले संस्कार आपल्या मनात इतके दृढ झालेले आहेत की प्रयत्‍न करुनही आपण त्यांच्या पलिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे भगवंतांनी केलेली गोष्ट बरोबरच असणार असे आपण निःसंदेह मानू शकत नाही. ती गोष्ट आपल्या निकषांमध्ये बसत असेल तर बरोबर असणार असे आपण मानतो. नाहीतर हे असे कसे त्यांनी केले हा प्रश्न विचारतो. या जगातील प्रत्येक घटना योग्यच आहे असे कितीजण मानू शकतील? विशेषत: जेव्हा स्वतःवर झळ लागायची वेळ येते तेव्हा हा सारासार विचार कितीजणांच्या डोक्यात येतो? फार थोड्या लोकांच्या. म्हणूनच फार मोजकी माणसे संतपदाला पोहोचतात. जेव्हा स्वतःचे कुटुंबीय तुम्हाला विनाकारण त्रास देतात तेव्हा त्या वागण्यामध्ये भगवंतांचा हात बघणे ज्या साधकांना जमते त्यांना उगाचच कुणीतरी स्वतःचे कौतुक केलेले खपत नाही! खरोखर स्तुती आणि निंदा, घृणास्पद आणि सात्विक, उचित आणि अनुचित अशा एकमेकांशी दंद्वात असलेल्या सर्व गोष्टींना एकसारखे सामोरे जाण्याची क्षमता ज्यांच्यात आहे त्यांचा जन्मच जणू भगवंतप्राप्तीकरीता झाला आहे यात शंका नाही. म्हणजे बाकीच्यांनी या जन्मात भगवंताची आराधना करायची नाही असे म्हणण्याचा हेतु नाही. तर वरील वाक्यात साधनेचे फळ लवकर कुणाला प्राप्त होईल याचे वर्णन करण्याचा हेतू आहे हे कृपया आपण ध्यानात घ्या.

ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठीच जणू भगवंत म्हणत आहेत: ‘(व्यावहारिक) जगामुळे मी दिसत नाही (असे वाटत असेल) तर हे जग कुणाच्या आधारावर उभे आहे (याचा विचार केलास का?). रत्‍नाच्या प्रभेमुळे रत्‍न झाकले जाते का (ते अजूनच उठून दिसते!) किंवा कणसावरील जोंधळ्याच्या दाण्यांची वाढ झाली (की मूळ कणीस दिसणे कमी होते पण) या घटनेमुळे कणीस कमी झाले की वाढले? म्हणून हे जग बाजूला सारुन मला बघायला हवे असे नव्हे तर हे सर्व मीच आहे. हे वीरा, ह्या निश्चयाची गाठ तू आपल्या बुध्दीवर मार (इथे अर्जुनाला ‘वीरा’ ह्या शब्दाने संबोधणे म्हणजे हा निश्चय मनात ठेवणे यातच तुझे खरे शौर्य आहे, वीरपणा आहे असे भगवंतांच्या मनात असावे.)

सारून शेवाळ्याचे आच्छादन । पाविजे नितळ जीवन ।

तसे नव्हे भगवंत दर्शन । स्वीकारा आपुले संपूर्ण जीवन ॥

हे जग मला झाकत नाही असे भगवान म्हणत आहे. त्यांच्या जग या शब्दामध्ये जीवनातील यच्चयावत गोष्टी अंतर्भूत आहेत हे ध्यानात घ्या. केवळ आपण चांगल्या ठरविलेल्या गोष्टीच नव्हे तर सर्व सर्व गोष्टी. त्या खूप चांगल्या, अतिशय वाईट वा निव्वळ कंटाळवाण्या असू शकतील अशा सर्व गोष्टींनी आपले जग बनलेले आहे आणि त्या बाजूला सारुन भगवंतांचे दर्शन घ्यायचे नाही तर त्यात भगवंत पहायचे आहेत. ज्याप्रमाणे रत्‍नाच्या प्रभेला दूर सारुन रत्‍न बघायचे नसते, किंवा तसे आपण बघूच शकत नाही तशी ही घटना आहे. जगात भगवंत बघायचा म्हणजे काय हे आता आपण पाहू.

समजा तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली तर पुढे काय होईल? या प्रश्नाचा कधीतरी गंभीरपणे विचार तुम्ही केला आहे का? बहुतेकांच्या जीवनात भगवंत प्राप्त करणे हीच अंतिम घटना असते. इथे एक बाब ध्यानात ठेवा. काही वस्तूंची कमतरता दूर सारण्यासाठी वा नकोशा वाटणाऱ्या वस्तूंच्या/घटनेच्या विनाशासाठी ज्यांना भगवंत हवा आहे त्यांना भगवंत दिसला तर ते आपल्या इच्छेची पूर्णता करुन घेतील यात शंका नाही. इच्छेची पूर्तता ही त्यांच्या जीवनातील अंतिम गोष्ट आहे, भगवंताचे दर्शन नाही. पण त्यांना भगवंत प्राप्त झाला आहे असे आपण म्हणू शकत नाही कारण नंतर परत दुसरा हव्यास मनात निर्माण झाला तर त्यांना पहिल्यापासून भगवंताची आराधना करावी लागते! भगवंताची प्राप्ती आणि ठराविक वर हातात येण्याकरीता झालेले देवाचे दर्शन यात मूलभूत फरक आहे. पुराणातील सर्व कथांमध्ये बघितल्यास वर देऊन भगवान अदृश्य झाले असे लिहिलेले आढळते. ही भगवंताची प्राप्ती नव्हे. प्राप्ती याचा अर्थ तुमची मालकी. थोड्याकाळाकरीता भाड्याने मिळालेल्या वस्तूबद्दल मालकीहक्क आपण गाजवू शकत नाही. त्याचप्रमाणे वर देऊन अदृश्य झालेल्या भगवंताची प्राप्ती आपणास झालेली आहे असे आपण मानू शकत नाही. तेव्हा आधी हे ध्यानात घ्या की भगवंताची प्राप्ती हवी असेल तर निर्हेतुकपणे साधना केली पाहिजे. आणि हेतुच नसेल तर प्राप्तीनंतर काय हवे याचा विचारच आपल्या मनात उद्भवू शकत नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती हे खऱ्या साधनेचे अंतिम ध्येय असते. आणि जगात भगवंत बघितल्यास या जगाची प्राप्ती होणे हे अंतिम ध्येय बनले पाहिजे. म्हणजे जगापासून आपणाला काही हवे आहे ही भावना वा जगातील काही ठराविक गोष्टी वा व्यक्‍ती आपणाजवळ असाव्यात ही भावना नष्ट झालीच की. सूर्य उगविल्यावर जसा अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे जगातच भगवंत आहे असे जाणविल्यावर जगाबद्दलचा हवेसे-नकोसे या पध्दतीचा संकुचित विचार नाहीसा होतो. त्याकरीता वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. म्हणून जगात भगवंत बघणे म्हणजे तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्याचा संपूर्णपणे स्वीकार करणे होय. घडलेली गोष्ट किती अयोग्य होती वा आपल्यावर अन्याय करणारी होती याबद्दल विचार न करीता आहे ती गोष्ट आहे तशी स्वीकारणे याचाच अर्थ जगात भगवंत पाहणे होय.

या विवेचनाकडे जरा डोळे उघडे ठेवून बघा. स्वीकार करणे याचा अर्थ बाह्यदृष्टीने निष्क्रियता नव्हे. घटनांचा आहे तसा स्वीकार करणे याचा अर्थ पळपुटेपणा नव्हे हे ध्यानात घ्या. कारण घटना केवळ दृष्य स्वरुपातच नसते तर मानसिकही असते. बाह्य घटनेने आपल्या मनात ज्या विचारांचे वादळ उत्पन्न झालेले आहे तेसुध्दा तुम्हाला स्वीकारायला हवे. आतून आलेल्या उर्मीला दडपून पूर्ण स्वीकार होऊ शकत नाही. तेव्हा जगाचा संपूर्ण स्वीकार करणे म्हणजे काय याचा अर्थ गूढ आहे. आलेल्या आपत्तीचा स्वीकार करण्यामध्येच तीचे निवारण करण्यासाठीच्या नैसर्गिकरीत्या उत्पन्न झालेल्या धडपडीचाही समावेश आहे. स्वीकारामध्ये क्रियेचा अभाव नाही. अभाव कशाचा असेल तर फक्‍त खेदाचा. ‘ठीक आहे, अमुक अमुक घडले काय, मग आता मी काय करायला पाहिजे?’ असा विचार संपूर्ण स्वीकारात आहे. स्वतःला झालेले सुख, दुःख वा आलेला कंटाळा तटस्थपणे पहायचे सामर्थ्य स्वीकारात आहे. स्वतःच्या मनातील भावनांकडे रोखून बघायची शक्‍ती स्वीकारात आहे. आपल्यापैकी कितीजण स्वतःमधील भावनांना मान्यता देतात? आपली स्वतःबद्दलची जी एक प्रतिमा आपणच निर्माण केली आहे तीच्याशी विसंगत असलेली भावना मनात आली की आपण अस्वस्थ होतो. म्हणजे काय तर आपली प्रतिमा चुकीची आहे या सत्यपरिस्थितीचा स्वीकार आपण करीत नाही. प्रतिमेविरुध्द आलेल्या भावनांमधून झालेले सत्याचे (म्हणजे भगवंताचे) दर्शन आपण घेऊ शकत नाही.

तेव्हा या जगात भगवंताला बघायचे असेल तर आधी तुमच्या जीवनात घडत असणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार करा. यातून मला पुढे काय मिळणार आहे असे न विचारता झालेली घटना तीच्यामध्येच परिपूर्ण आहे अशी भावना सतत आपल्या मनात जागृत ठेवा. एकदा असे झाले की भगवंत आणि तुम्ही यामध्ये हे जग पडद्यासारखे उभे राहणार नाही.

आता शेवटची गोष्ट म्हणजे या ओव्यांमधूनच आपण सर्व संत आपल्या दैनंदिन जीवनातील वागण्यामध्येच अध्यात्मिक प्रगति का बघतात हे शिकू शकतो. पारमार्थिक प्रगतीचा एकमेव निकष आपले दररोजच्या जीवनातील वर्तन बघणे होय असे सर्व संत सांगतात कारण जेव्हा आपली प्रगती होईल तेव्हाच भगवंताचा हात कुठल्या गोष्टींत आहे याबद्दलची आपली व्याख्या सर्वव्यापक होईल. अंतिमतः जगातील यच्चयावत गोष्टींमध्ये भगवंताची इच्छा दिसू लागेल आणि स्वतःच्या जीवनाला अजून चांगले करायची आपली सततची चाललेली धडपड पूर्णपणे थांबेल आणि मनाला मुक्‍तता लाभेल. प्रत्येक गोष्टींमध्ये आपला लाभ आहे की नाही हे बघण्यात आपण जी शक्‍ती वाया घालवित होतो तो व्यय थांबेल. ही मोकळी झालेली आपलीच शक्‍ती आपल्याला स्वतःचे जीवन अजून परिपूर्णरीत्या जगायला ताकद देईल. आणि आपले वर्तन अजून बदलेल. एकदा हे चक्र सुरु झाले की आपली साधना ‘सहज’ होते. श्वासोश्वासाबरोबर चालणाऱ्या अशा साधनेमध्येच आपल्या प्रगतीची निशाणी आहे. अन्य कुठल्यातरी दिव्य ‘अनुभवां’मध्ये नाही.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ३० नोव्हेंबर २००८)