7/14: An aspect of gurukrupa

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

जाणो जगीं आप वोलें । तें तुझिया बोलां सुरस झाले ।

तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वीयेसी ॥ ७:१४ ॥

 

ज्ञानेश्वरीच्या बहुतांशी अध्यायांच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वरांनी त्यांच्या सद्‌गुरुंना, निवृत्तिनाथांना, नमन केले आहे. निव्वळ गुरुकृपेमुळे श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करणे शक्य आहे याबद्दल माऊलींच्या मनात असलेल्या खात्रीमुळे त्यांनी आपले पूर्ण कवीत्व पणाला लावून गुरुंची स्तुती केली आहे. अतिशयोक्‍ति अलंकार हे कवींचे भूषण असते. त्यामुळेच इंग्रजीमध्ये ‘poetic liberty ‘ असा वाक्‌प्रचारही रुढ आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कवी या नात्याने आलेल्या ह्या स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घेतला आहे हे ठायोठायी दिसून येते. विशेषतः गुरुस्तवनामध्ये तर ह्या अलंकाराचा बहर आलेला दिसतो. परंतु संतमंडळींच्या प्रत्येक वाक्यामागे एक शाश्वत सत्य दडलेले असते. तेव्हा गुरुस्तुतीतील अतिशयोक्‍त भावनांमागे देखील गुरुकृपेचा एकेक गुण दडलेला आहे हे आपण ध्यानात घेऊन स्तुतीपर ओवींवर जाणीवपूर्वक विचार करायला हवा. आज आपण चौदाव्या अध्यायातील अशीच एक ओवी निरुपणाला घेतली आहे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: ‘या जगातील सर्व पाण्याला तुझ्या बोलांनीच गोडपणा आलेला आहे. पृथ्वीला (सर्व जीव-जंतूंना आधार देण्याची) सहनशक्‍ती तुमच्यामुळेच आली आहे.’ साधकाला स्वप्रचीतीद्वारे अनुभवाला आलेल्या गुरुकृपेचा कुठला पैलू या ओवीतून प्रगट होतो ते बघायचा आता आपण प्रयत्‍न करु.

 

सर्वांभूती सहिष्णूता हा गुरुकृपेचाच प्रभाव आहे

 

खरे म्हणजे आपले व आपल्या गुरुंचे नाते जन्मोजन्मींचे असते. त्यामुळे आपल्यावर गुरुकृपा कुठल्यातरी गुरुंच्या अनुग्रह प्राप्त झाल्यावरच होते असे आपण म्हणू शकत नाही. याबाबत गोष्ट सांगायची म्हणजे एकदा श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या ‘एम’ नावाच्या शिष्याला अचानक विचारले ‘तुला ‘ज्येष्ठातील वादळ’ आठविते का?’ त्यांच्या ह्या प्रश्नाने एम ना त्यांच्या लहानपणी ज्येष्ठ महिन्यात झालेले एक प्रचंड वादळ आठविले. त्यावेळी घरात ते एकटेच होते व त्यांना त्या वादळाची आत्यंतिक भिती वाटली होती. म्हणून त्यांनी देवासमोर जाऊन मला वाचवा अशी प्रार्थना केली आणि त्यांना अचानक एका शक्‍तीचे अस्तित्व जाणवून आपण एकटे नाही असे वाटले व सर्व भय पळून गेले होते. वरील प्रश्न विचारताना असलेल्या श्री रामकृष्णांच्या अर्थपूर्ण चेहऱ्याकडे पाहून त्यांची पूर्ण खात्री झाली की त्यावेळी प्रत्यक्ष रामकृष्णांनीच त्यांना धीर दिला होता! आपल्यावरही गुरुकृपा अशीच होत असते. परंतु त्या अखंड असलेल्या गुरुकृपेचे स्वतःला जाणविण्यासारखे दृष्यरुप पहायचे झाले तर आपली गुरुपोदिष्ट साधना सुरु केल्यावर आपल्यात पडलेला फरकच आपण पाहू शकतो. त्यामुळे वरील ओवीचा विचार करताना आधी आपले साधनेपूर्वीचे जीवन कसे होते ते आधी पाहू.

आपण सर्वजण मध्यमवर्गीय आहोत. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला मध्यमवर्गीय माणसे आवडतात, त्यांचे पुण्य प्रचंड नसते हे जरी खरे असले तरी त्यांचे पापसुध्दा कमीच असते! साधनेला सुरुवात करायच्या आधी आपले जीवन सर्वसाधारणपणे ठराविक नैतिक चौकटीत बांधलेले असते. कुठल्या गोष्टी करणे योग्य आहे आणि कुठल्या अयोग्य आहेत याची पूर्ण जाणीव आपणांस असते आणि शक्‍यतो आपण त्या चौकटीतच जगत असतो. नाही म्हणायला मधून मधून मित्रांबरोबर ‘धमाल’ करताना ते नियम आपण मोडत असतो यात शंका नसली तरी आपल्याला त्यावेळीसुध्दा जाणीव असते की आपण काहीतरी निषिध्द कर्म करीत आहोत. (खरे म्हणजे या जाणीवेमुळेच ती कर्मे करताना जास्त आनंद होत असतो!!) आता प्रत्येकजण आपापल्या संस्कारानुसार कुठली कर्मे योग्य व कुठली अयोग्य असे ठरवित असल्याने आपल्यासारखेच मानदंड सर्वांचे असतातच असे नाही. आपल्या ह्या साचेबध्द जगण्याने साहजिकच जगातील सर्व व्यक्‍तींचे दोन भाग पडतात. एका भागात अशा व्यक्‍ती असतात की ज्यांचे जीवन आपल्यासारख्याच साच्यात आहे आणि दुसऱ्या भागातील लोक असे की ज्यांचे नीती-नियम आपल्याहून भिन्न आहेत. स्वतःची नीतीमत्ता चुकीची आहे असे कुणालाच वाटत नसल्याने साहजिकच आपण समविचारी लोकांकडे सहानुभूतीने व बाकीच्यांकडे संशयित वृत्तीने पहायला लागतो. थोडक्यात म्हणजे परमार्थाच्या मार्गावर चालायला सुरुवात करण्याआधी आपल्याला पूर्ण खात्री असते की जगातील कुठल्या व्यक्‍ती चांगल्या आहेत, कुणाशी संबंध वाढवायला हवेत आणि कुणापासून दूर राहणे चांगले. सर्वांभूती सहिष्णूता असावी हे तत्वतः आपण जरी मानले तरी ते आचरणात आणणे आपणांस शक्य नसते.

परंतु एकदा साधनेच्या मार्गावर तुम्ही चालायला लागला की आपले ध्यान सतत परमेश्वराकडे लागायला लागते. प्रत्येक गोष्टीचा विचार आपण ‘यामुळे मला भगवंताकडे जायला मदत होईल का?’ ह्या दृष्टीने करायला लागतो. आपल्या जीवनातील कुठले कर्म योग्य व कुठले अयोग्य हे ठरविण्याचा मानदंड आता एकच होतो. तो म्हणजे ‘ज्या गोष्टींमुळे मला साधना करायला हुरुप येतो त्या गोष्टी चांगल्या. बाकीच्या वाईट.’ ह्या मानदंडामुळे आधीच्या बऱ्याचशा गोष्टींबद्दलची आपली आत्मीयता कमी होऊ लागते. एखादी व्यक्‍ती दुसऱ्या मार्गाने भगवंताच्या जवळ जात असली तरी तीच्याबद्दल आपणांस आदरच वाटू लागतो. मग समाजात वागायचे तीचे नियम आपल्याहून भिन्न असले तरी आपणांस त्या व्यक्‍तीबद्दल प्रेम वाटू लागते. काही काळाने तर तुम्हाला असे स्पष्ट दिसून येते की भगवंत एखाद्या प्रचंड चुंबकासारखा जगातील सर्व व्यक्‍तींना त्याच्याकडे ओढत आहे. सर्वचजण आपापल्या परीने भगवंताच्याच कुठल्यातरी रुपाची आराधना करीत आहेत हे जेव्हा साधकाला स्वसंवेदनांनी जाणविते (निव्वळ बौध्दीकरीत्या नाही) तेव्हा त्याच्या मनात सर्वांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. ज्या ध्येयाला आपण प्राधान्य दिलेले आहे तेच ध्येय (भगवंताची भेट) सर्वांचे आहे, फक्‍त प्रत्येकाच्या मनातील भगवंताचे रुप भिन्न आहे आणि म्हणूनच प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे हे जाणविते. अशा वेळी साधकाच्या मनात कुणाबद्दलच अढी रहात नाही. सर्वांकडे अत्यंत आपुलकीने तो पाहू लागतो. आपल्या साधनेमुळे आपली दृष्टी बदलली आहे याची त्याला पूर्ण खात्री असल्याने आपल्या गुरुंना तो वारंवार नमन करु लागतो. वरील ओवीमध्ये साधकाची हीच अवस्था वर्णन केलेली आहे.

याचे कारण असे की तुम्ही बघा की जगातील यच्चयावत जीवजंतूंच्या शरीरात पाण्याचेच प्रमाण सर्वाधिक असते. उदाहरणार्थ मानवाच्या शरीराचा जवळ जवळ ७५ टक्के हिस्सा पाणी असते. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याला जीवन असेही नाम आहे तेव्हा ‘आप वोलें’ (ओले पाणी) या शब्दांतून जिवंत प्राणी सूचित होतात असे वाटते. तेव्हा या जगातील सर्व पाणी या रुपकातून आपण जगातील सर्व जीव-जंतू बघू शकतो. ‘ते तुझिया बोला सुरस झाले’ या शब्दांमधून मग ‘तुझ्या कृपेमुळे मला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली’ असा अर्थ प्रकट होतो. साधनेपूर्वी आपले जीवन ज्या साच्यावर, ज्या नियमांवर आपण जगत असतो ते नियम म्हणजे जणू आपल्या जीवनाचा पाया असतात. आपल्याला ‘आधार देणारी पृथ्वी’ या शब्दांनी आपले हे नियम सूचित होत आहेत असे आपण मानू शकतो. तीची सहनशक्‍ती वाढणे म्हणजे त्या नियमांनुसार जगणे हेच आपले कर्तव्य आहे ही आपली भावना हळूहळू निघून जाणे होय. ज्या माणसांचे जीवन आपल्या नियमांच्या विरुध्द गोष्टींवर आधारित आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला नैसर्गिक रोष आपोआप निघून जाणे म्हणजेच आपल्या ‘पृथ्वी’ला मृदूपणा येणे होय.

वरील सर्व विवेचनामुळे आज निरुपणाला घेतलेल्या ओवीद्वारे ‘सर्वांभूती प्रेम उत्पन्न होणे, त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटणे, सहिष्णूता निर्माण होणे’ या गुरुकृपेच्या एका पैलूलाच श्रीज्ञानेश्वर महाराज नमन करीत आहेत असे वाटते. अर्जुनाला अकराव्या अध्यायात विश्वरुप दर्शन होऊन सर्वांभूती देव आहे हे जाणविले, नंतर बाराव्या अध्यायात भक्‍ती निर्माण होऊन तेराव्यातील ज्ञानी माणसाची लक्षणे त्याच्या दिसू लागली आणि मग चौदाव्या अध्यायात ही ओवी आली आहे हे ध्यानात घेतले तर सर्वांभूती सहिष्णूता असणे ही साधनेतील किती उच्च पातळी आहे हे दिसून येते. आपणा सर्वांना ही दैवी अवस्था उपभोगायची संधी मिळावी अशी प्रार्थना माऊलींकडे करुन आपण थांबू.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये ऑगस्ट २००६ मध्ये दिलेल्या प्रवचनावर आधारित.)