Shloka25/14: Don’t Act, Just React!

 

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

सुरुवातीचे नमन

 

नेहमीच्या तीन ओव्या म्हणून आपण सुरुवात करु.

 

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।

जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १:१ ॥

 

जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाप्य कल्पतरो ।

स्वसंविद द्रुमबीजप्ररो । हणावनि ॥ १०:१८ ॥

 

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहींलोकी ।

भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १७९९:१८ ॥

 

ह्यातील पहिली ओवी ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे, दुसरी अठराव्या अध्यायातील गुरुंच्या नमनातील आहे व तिसरी पसायदानातील, म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांनी ईश्वराला मागितलेल्या दानातील आहे. लिहून झालेली ज्ञानेश्वरी परमेश्वराला अर्पण करुन त्याबदलात त्यांनी जे मागणे मागितले ते म्हणजे पसायदान. त्यातील ही ओवी आहे. सर्वसाधारणपणे आपण देवाजवळ आपल्याला जे आत्यंतिकरीत्या हवे आहे तेच मागतो. काही कारणाने दुसरी एखादी गोष्ट मागणे बरोबर आहे असे आधी ठरविले तरी परमेश्वराचे दर्शन झाल्यावर जी गोष्ट त्यावेळी आपल्याला हवी आहे तीच आपण मागू शकतो. तेव्हा, परमेश्वराकडे आपण काय मागतो ह्यावरुन आपल्या जीवनात कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे कळते. तुम्ही दुसऱ्यांना काहीही सांगा, समाजात कितीही आव आणा पण आपले खरे व्यक्‍तिमत्व जर जाणून घ्यायचे असेल तर देवाजवळ आपण एकटे असताना काय मागतो याचा आपण विचार करावा. त्यात आणि अगदी प्राणापलिकडे कष्ट करुन आपण देवाकरीता काही केले असल्याने देव प्रसन्न झाला तर मनासारखी गोष्ट मागायला आपल्याला काहीच संकोच वाटणार नाही व आपल्याला अगदी आत्यंतिक आवडणारी वस्तूच आपण त्याच्याकडे मागू. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यात काय-काय आवडते यावरुनच माणसे आपले व्यक्‍तिमत्व ठरवित असतात. असा सर्व विचार केला तर ज्ञानेश्वरांचे व्यक्‍तिमत्व जाणून घ्यायला त्यांनी पसायदानात काय मागितले हे आपण बघायला हवे.

त्यातूनसुध्दा ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर जीवनाची इतिकर्तव्यता झाली आहे असे श्री ज्ञानेश्वरांना वाटले होते. म्हणूनच भावार्थदीपिका लिहून झाल्यावर त्यांनी लगेच समाधी घेण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. केवळ भावंडांच्या आग्रहाकरीता ते अजून सहा वर्षे जगले. म्हणजे स्वतःच्या जीवनातील सर्वांत महत्वाची गोष्ट परमेश्वराला अर्पण करुन ते काय मागतात यामध्ये त्यांची खरी आवड प्रगट होते असे मानण्यास काहीच हरकत नाही.

वरील ओवीत परमेश्वराजवळ ते मागतात की या जगातील सर्व लोक तिन्ही लोकांतील आपल्या इच्छा पूर्ण करुन मग आदिपुरुषाचे ध्यान अखंड करीत राहोत. त्यांनी स्वतःकरीता काहीही मागितले नाही. या जगातील सर्व लोकांकरीता त्यांनी मागणे मागितले आहे. त्यांचे व्यक्‍तिमत्व किती थोर होते हे यातून स्पष्ट होते. आता ही गोष्ट सांगायची काही वेगळी जरुरी आहे असे नाही पण ह्या ओवीवरुन त्यांच्या थोरपणाचा एक पैलू आपणांस दिसतो. जगातील `चांगली’ माणसे व `वाईट’ माणसे यांच्यात भेदभाव न करीता सर्वांकरीता सर्वसुखाची मागणी करणे व त्याही पुढे त्यांच्या पूर्ण मोक्षाची इच्छा धरणे किती उदात्त आहे हे अगदी थोडा विचार केला तरी पटेल.

ह्या ओवीचा आपल्या जीवनात कसा उपयोग करुन घ्यावा हे आता आपण पाहू. साधना करताना ती चांगली चालू आहे की नाही याबद्दल आपण सर्वजण साशंक असतो. याचे कारण असे की ज्याप्रमाणे शाळेत दुसरी इयत्ता पास झाली हे आपण तिसरीत गेल्याने सर्वांना समजते त्याप्रमाणे साधनेत अशी कुठलीही गोष्ट नाही की ती झाली तरच प्रगती आहे असे सर्वांनी समजावे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या साधनेतील प्रगतीचा अनुभव वेगवेगळा येत असतो. एकाला दिव्य प्रकाश दिसला, मला दिसला नाही म्हणून माझी प्रगती कमी आहे असे मानायचे काहीही कारण नाही. तुमच्या जीवनात तो दिव्य प्रकाशाचा अनुभव येईलच अशी काही खात्री नाही. मग साधना व्यवस्थित सुरु आहे हे निःसंदेह ओळखावे कसे हा मोठा प्रश्न साधकाच्या मनापुढे उभा राहतो. आपण `मानायचे’ कसे की आपली प्रगती चांगली आहे? जी माणसे ज्ञानेश्वरीची उपासक आहेत त्यांना ह्या ओवीवरुन स्वतःच्या साधनेची खरी ओळख करुन घेता येईल.

हे कसे ते आता बघू: कुठल्याही व्यक्‍तीला आपण आपले मानतो, तीच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्या वागण्यात त्या व्यक्‍तीचे गुण उतरु लागतात. आपण बघतो की कित्येक वर्षांच्या सहवासाने नवरा-बायको एकमेकांसारखे वागायला लागतात (केव्हा केव्हा तर ते दिसायलासुध्दा सारखे दिसतात). आपल्या साधनेचे ध्येय ज्ञानेश्वरांच्या जवळ जाणे हे आहे. म्हणजे साधना यशस्वी होत आहे याचा निकष आपण ज्ञानेश्वरमाउलींच्या किती जवळ गेलो आहोत हा होतो. आपण त्यांच्या खरेखुरे जवळ गेलो आहोत की नाही हे कळायला एकच मार्ग म्हणजे आपल्यात ज्ञानेश्वरांचे किती गुण उतरले आहेत हे बघावे. कुठलाही माणूस ज्या काही क्रिया करीत असतो त्यामध्ये तो आपल्या व्यक्‍तिमत्वाची छाप सोडत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे व्यक्‍तिमत्व बघण्याकरीता त्यांच्या कर्तुत्वाकडे बघणे हा आपल्याकडे एकच पर्याय आहे. ज्ञानेश्वरांनी जे काही काम केले आहे त्यामधूनच त्यांचे व्यक्‍तिमत्व आपण शोधले पाहीजे. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी ही कवितेच्या रुपात लिहीली आहे. त्यात सर्व अलंकारांचा फार सुंदर उपयोग केला आहे. यावरुन आपण अशी कल्पना करु शकतो की त्यांना सौंदर्याची आवड होती, कुठलीही गोष्ट केवळ करायची म्हणून त्यांनी करुन टाकली आहे असे दिसत नाही. त्या करण्यामध्ये ती गोष्ट चारी बाजूनी चांगली दिसली पाहीजे असा त्यांचा विचार असणार. ज्ञानेश्वरीतील उदाहरणे अगदी नेहमीच्या जगण्यातील आहेत. म्हणजे ह्या तत्वज्ञानाचा वापर रोजच्या जीवनात करायला हवा, साधना करायला कुठे जंगलात जायची जरुरी नाही असेच त्यांना सुचवायचे असेल. अशा रीतीने त्यांचे व्यक्‍तिमत्व आपण जाणून घेऊन आपल्यात ते किती गुण उतरायला लागले आहेत हे बघावे.

त्याचप्रमाणे वरील ओवीत ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्‍तिमत्वाचा एक पैलू आपल्याला कळला. तो म्हणजे त्यांना जगातील सर्व लोकांबद्दल आपुलकी होती हा होय. मग आपण किती लोकांना आपले मानत आहोत हे स्वतः बघावे. जर साधना सुरु करताना जो नंबर होता त्यात वाढ झाली असेल तर निश्चित आपली साधना चांगली सुरु आहे असे समजावे. आपले माणूस असे आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या सुखाकरीता स्वतःला त्रास सोसायची आपली तयारी असते (एखादी गृहीणी आवडत्या माणसाकरीता खूप कष्ट घेऊन स्वयंपाक करते). म्हणजे साधना चांगली सुरु आहे की नाही हे बघण्याचा एक निकष असा होतो की या जगातील किती लोकांच्या सुखाकरीता तुम्ही स्वतःला दुःख द्यायला तयार आहात? जर ही संख्या वाढत असेल तर प्रगती, कमी होत असेल तर अधोगती व स्थिर असेल तर साधनेने आपल्यात काहीही फरक पडला नाही असे आपण खुशाल समजावे. आज ह्या ओव्यांचे हेच सांगणे आहे असे वाटते.

 

सर्वारंभपरित्यागी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?

 

आज निरुपणाला नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरीची एखादी ओवी घेतलेली नाही. दररोजच्या वाचनात ज्ञानेश्वरी असल्याने नेहमी काही ओव्या वाचनात असतात, व त्यातीलच एखादी निरुपणाला घेतो. ज्ञानेश्वरी वाचताना आधी गीतेचा श्लोक वाचून मग त्यावरील ओव्या वाचाव्यात असा नियम आहे. सध्या चौदावा अध्याय वाचनात असल्याने त्यामधील तिन्ही गुणांच्या पलिकडे गेलेल्या माणसाचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्णांनी जे शब्द वापरले आहेत त्यांतील एका शब्दावर विचार करावासा आज वाटत आहे. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलिकडे गेलेला, (म्हणजेच गुणातीत) माणूस कसा असतो याचे वर्णन करताना भगवान म्हणतात की: जो `समदुःखसुख’ (दुःख आणि सुख यांना समान मानतो), `समलोष्टाश्मकांचनः’ (सोने आणि दगड यांत फरक मानत नाही) इत्यादी. सर्वांत शेवटी ते म्हणतात `सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥२५-१४॥’. सर्वारंभपरित्यागी हा शब्द बाराव्या अध्यायातील आवडत्या भक्‍तांचे वर्णन करतानासुध्दा भगवंतांनी वापरला आहे. म्हणून ह्या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, तो आपल्या जीवनात कसा वापरावा, हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाल्याने आज काय अर्थ आपल्यासमोर येत आहे हे बघूया. शाब्दीकरीत्या सर्वारंभपरित्यागीचा अर्थ `जो कुठल्याही गोष्टीचा आरंभ करीत नाही’ असा आहे.

यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे आपल्या जीवनात बऱ्याचशा गोष्टींची आपण सुरुवात करीत नाही. उदाहरणार्थ, आपल्या बायको-मुलांची काळजी घेणे, वृध्द पालकांची जबाबदारी घेणे या गोष्टी आधी कुठल्यातरी गोष्टींच्या सुरुवातीमध्ये आलेल्या असतात. कारण, लग्न केल्यावर बायको-मुलांची काळजी घेणे आले आणि जन्माला आल्यावर आई-वडिलांची जबाबदारी उचलणे येतेच, त्याकरीता परत नव्या प्रारंभाची जरुरी नसते. म्हणून अशा गोष्टींची सुरुवात आपण केली असे आपण म्हणू शकत नाही. याउलट आज मला पुलाव खावासा वाटतो, त्याच्या करीता बासमती तांदूळ आणायला हवेत वगैरे गोष्टी आपण स्वतः सुरु करीत असतो. अजून एक उदाहरण म्हणजे केवळ जबाबदारी म्हणून आपल्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घेण्याऐवजी आपल्या मनाला आवडते त्याप्रमाणे त्यांची काळजी घेणे असे आपण केले तर त्या गोष्टीची सुरुवात आपण केली आहे असे होईल. तेव्हा सारासार विचार करुनच आपण असे ठरवावे की कुठल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वतःहून केली आहे. नाहीतर अंगावरच्या जबाबदारीला `मी सर्वारंभपरित्यागी आहे’ असा विचार करुन झटकून टाकायला आपण मागेपुढे करणार नाही!

म्हणून आधी कुठल्या गोष्टींची सुरुवात आपण स्वतः करतो हे पहायला हवे. नेहमी ज्या गोष्टींपासून आपल्याला आवडणारे फळ मिळणार आहे अशा गोष्टींचीच सुरुवात आपण करतो. त्यातसुध्दा आपल्याला आवडणारी अनेक फळे असतात, त्या सर्वांच्या प्राप्तीसाठी काही आपण प्रयत्‍न सुरु करीत नाही. एखादे फळ जवळ असावे ही भावना प्रबळ झाल्यावरच त्याच्या प्राप्तीचे उद्योग सुरु होतात. म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीची इच्छा हीसुध्दा त्या गोष्टीला मिळविण्यास लागणाऱ्या कार्याची सुरुवात करायला जरुरी आहे. म्हणजे १) वस्तूची आवड आणि २) त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा या दोन गोष्टींमुळे आपण स्वतःहून एखाद्या कार्याचा प्रारंभ करतो. याचप्रमाणे या दोन गोष्टींपैकी एखादी नसेल तर आपण वस्तूप्राप्तीकरीता आपले प्रयत्‍न सुरु करत नाही. तेव्हा आपल्याला जर सर्वारंभपरित्यागी व्हायचे असेल तर वरीलपैकी एकतरी गोष्ट आपण काढून टाकली पाहीजे. म्हणजे सर्वारंभपरित्यागी आपण तेव्हाच होऊ जेव्हा एकतर आपल्याला कुठलीही गोष्ट आत्यंतिकरित्या आवडणे थांबले पाहीजे किंवा आपण अत्यंत आवडती गोष्टसुध्दा मिळालीच पाहीजे असा हट्ट आपल्या जीवनातून नाहीसा केला पाहीजे.

अशा रीतीने सर्वारंभपरित्यागी होण्याकरीता काय केले पाहीजे हे कळले. आता ते आचरणात कसे आणावे हे पाहू. असे आपण का करावे? मला असे वाटते की गीतेमध्ये परमेश्वराची प्राप्ती केलेल्या माणसांची जी जी लक्षणे सांगितली आहेत ती सर्व लक्षणे म्हणजे स्वतः ज्ञानी होण्याकरीता असलेला मार्ग आहेत. असे बघा, स्वयंपाक तयार झाला हे केव्हा कळते, तर तयार झालेल्या पदार्थाचे गुण (म्हणजे पदार्थाचा सुवास, नरमपणा इत्यादी) आपल्याला दिसायला लागतात तेव्हा. मग चव न घेताच तो पदार्थ शिजवायचे आपण बंद करतो. त्याचप्रमाणे ज्या माणसात ज्ञानी मानवाचे, गुणांच्या पलिकडे गेलेल्या माणसाचे वा एखाद्या आदर्श भक्‍ताची लक्षणे दिसायला लागतात तेव्हा त्याच्यात ते गुण आहेत असेच मानायला हवेत. या लक्षणांच्या मार्गे आपण आत घुसून तो गुण प्राप्त करु शकतो. लोक म्हणतात की लक्षणे ही ज्ञानी लोकांना ओळखायला सांगितली आहेत. हा त्या लक्षणांचा अत्यंत दुय्यम, हलक्या प्रतीचा उपयोग आहे. कारण समजा तुम्हाला ज्ञानी कोण हे ओळखायला यायला लागले पण म्हणून तुमच्यामध्ये काय फरक पडला? शेवटी आपण स्वतः ज्ञानी माणसाप्रमाणे वागलो तरच आपल्या मनाला समाधान मिळेल. आता आपण दादासाहेबांना गुरु केले आहे ते का? एखाद्या संगणकासारखे ते आपल्याला वाटतात का? कुठलाही प्रश्न निर्माण झाला की तो ह्या संगणकात घाला आणि उत्तर बघा! हा आपल्या गुरुंचा अत्यंत दुय्यम प्रतीचा उपयोग आहे. तुम्ही त्यांना गुरु मानल्यावर, ते स्वतः कसे गुरुपदावर पोहोचले, त्यांची साधना काय होती हे बघावे. त्यांनी आपल्याला जी साधना सांगितली आहे ती व्यवस्थित करुन आपण स्वतः गुरुपदाला पोहोचायचा प्रयत्‍न करावा यातच त्यांना गुरु केल्याचा खरा उपयोग आहे. आपल्याला जे गुरु भेटतात त्यांची आपल्याकडून अशी अपेक्षा असते की आपण स्वतः आपल्या पायावर उभे रहावे. त्यांना नमस्कार करुन मग आपल्याला पाहीजे तेच वागावे असा त्यांचा उपयोग करणे हे अत्यंत चुकीचे आहे. तुमचे गुरु पूर्ण ब्रह्मज्ञानी आहेत अशी तुमची खात्री आहे पण तुम्ही त्यांना आपल्या साधनेबद्दल न विचारता व्यवहारातील प्रश्न विचारता हे चुकीचे आहे. असे प्रश्न विचारायला ब्रह्मज्ञानी गुरु कशाला पाहीजे? योगसिध्दी असलेला गुरुच बरा. एखादा अत्यंत आधुनिक संगणक घेऊन फक्‍त ई-मेल बघण्याकरीता वापरला तर त्याचा पूर्ण उपयोग आपण करुन घेत नाही तशीच ही गोष्ट आहे. तुमच्या गुरुंचा खरा फायदा केव्हा होतो तर जेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागायला लागतो तेव्हाच.

म्हणूनच आपण प्रत्येकवेळी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा खोल अर्थ आपण का बघतो तर त्याप्रमाणे वागायचा आपण प्रयत्‍न करायला हवा म्हणून. केवळ स्वतःची बौध्दीक क्षमता दाखवावी म्हणून नव्हे. प्रत्येक ओवीतून आपल्याला एक वेगळा मार्ग दिसतो. यातील आपल्याला जो आवडेल तो स्वीकारुन त्याप्रमाणे आयुष्यभर वागायचा प्रयत्‍न केला तर अजून वेगळी अशी साधना करायची आवश्यकताच नाही. ही गोष्ट स्पष्ट करायला साड्यांच्या दुकानाचे उदाहरण बघा. आपण जेव्हा दुकानात साड्या घ्यायला जातो तेव्हा दुकानदार चांगला असेल तर तो एकापुढे एक साड्या ठेवत जातो. आपले `बजेट’ काय आहे हे सांगितले तरी तो म्हणतो की `बघायला पैसे पडत नाहीत, निदान बघा तरी!’. अनेक साड्या दाखविल्यानंतर एखादी पसंत पडली तर ती आपण घेतो. कुठलीच पसंत नाही पडली तर उठून निघून जातो. पण दुसऱ्या दिवशी परत त्याच दुकानात गेलो तरि तो मालक काल नुसते बघून गेलात म्हणून आज कमी साड्या दाखवित नाही. तर अजून दुप्पट उत्साहाने नवनवीन साड्या दाखवून आपल्याला त्यातील एकतरी घ्यायला लावतोच. ह्या उदाहरणातील दुकानाचा मालक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी आपल्यापुढे नऊ हजार साड्यांचे दुकान उघडले आहे. ज्ञानेश्वरी वाचणे म्हणजे त्या दुकानाला भेट देणे. दरवेळी त्याच उत्साहाने आपल्यापुढे नवीन साड्या (म्हणजे ओव्या, साड्यांचे रंग म्हणजे त्या ओव्यांचे नित्यनूतन अर्थ) येत असतात. परंतु आपले आयुष्य समृध्द केव्हा होईल? जेव्हा दुकानातून एखादी साडी घरी नेऊन सर्वांना नेसवून दाखवू तेव्हाच ना! म्हणजे एखादी ओवी तरी आपल्या मनाला एवढी भावली पाहीजे की त्या ओवीच्या अर्थात आपले जीवन रंगवून टाकायची आपली तयारी झाली पाहीजे. परंतु आपण फक्‍त त्या दुकानाचेच कौतुक करत बसतो. काय छान ए.सी. लावला आहे (म्हणजे ओव्यांचे साहीत्यिक कौतुक), मालक किती चांगला आणि सज्जन आहे (म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेचे कौतुक) असे आपण म्हणत परत परत त्या दुकानात जातो (ज्ञानेश्वरीची पारायणे करतो,सारखे सारखे ध्यान करतो) पण महत्वाची गोष्ट म्हणजे साडी विकत घेणे (म्हणजे एखाद्या ओवीनुसार आपले सर्व जीवन जगणे) तेवढे करीत नाही. म्हणून आपण आहात तसेच राहतो, आपल्या जीवनात तत्वतः काहीच फरक पडत नाही. आपल्या जीवनात मूलभूत फरक पडण्याकरीता एखाद्या ओवीला ह्रुदयी कवटाळून घेणे आवश्यक आहे व त्याकरीता त्या ओवीचा एखादा गर्भित अर्थ ध्यानात येणे जरुरी आहे. केवळ या विचाराने आपण ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा खोल विचार करायचा प्रयत्‍न करतो. आता आज आपल्याला `सर्वारंभपरित्यागी’ या साडीची ठेवण नीट बघायची आहे. ती आवडली तर घरी घेऊन जाण्याकरीता. नुसती छान आहे असे म्हणायला नाही. असो.

आता आपल्याला हे कळले की सर्वारंभपरित्यागी जीवनात आचरणात आणायला एकतर आपल्या जीवनातील कुठल्याही गोष्टीची आवड नाहीशी झाली पाहीजे किंवा आवडणाऱ्या गोष्टींबद्दलचा हपापलेपणा नष्ट झाला पाहीजे.

खरे म्हणजे आपल्या जीवनातून एखादी गोष्ट काढून टाकणे कसे शक्य आहे? तत्वतः विचार केला तर जी गोष्ट आपली आहे तीच आपण नष्ट करु शकतो. परंतु आपले स्वस्वरुप एवढे सूक्ष्म आहे, अमूर्त आहे की आपली स्वतःची अशी एकही वस्तू या जगात नाही. अगदी आपल्या मनातील विचारसुध्दा आपले आहेत असे आपण म्हणू शकत नाही, ते कुठल्यातरी प्रभावाखालीच येत असतात व म्हणून बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहेत. तेव्हा जीवनातून एखादी भावना बाहेर करणे कसे शक्य आहे? या शंकेला पुष्टीदायक दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत आपण कधीतरी मनातून काढून टाकले आहे का? आपण नवनवीन विचार जवळ करण्यामध्येच आजपर्यंत आपली प्रगल्भता बघत आहोत. तेव्हा सर्वारंभपरित्यागी होणे आपल्याला कसे शक्य आहे असे वाटेल.

या शंकेला उत्तर द्यायला उदाहरण म्हणून सिगारेट पिणे सोडणे बघा. काही लोक सिगारेट पिणे सोडू शकतात असे आपण बघतो. त्या माणसांना यश तेव्हाच मिळाले, जेव्हा त्यांनी सिगारेट पिणे चुकीचे आहे ही भावना जवळ केली तेव्हा. गोड खाणे चुकीचे आहे हे तात्विकरीत्या बुध्दीला पटले तरी गोड खाणे सुटते केव्हा, तर स्वतःला त्या गोड खाण्याने काही रोग झाला तरच! अशावेळी स्वसंवेदनाने अशी जाणीव निर्माण होते की गोड खाणे माझ्याकरीता चुकीचे आहे, मग साखर खाणे सोडून द्यायला वेगळा प्रयत्‍न करावा लागत नाही. म्हणून सर्वारंभपरित्यागी व्हायला आधी आपल्या मनात अशी जाणीव निर्माण झाली पाहीजे की गोष्टींचा आपणहून आरंभ करणे चुकीचे आहे. तर आणि तरच आपली आवडणाऱ्या वस्तू प्राप्त करण्याची आयुष्यभर चाललेली धडपड बंद होईल.

वस्तूंची आवड नष्ट करणे खूप कठीण आहे, त्यापेक्षा आवडत्या वस्तूबद्दलचा हवेपणा कमी करणे सोपे आहे. हा हव्यास कमी करायला त्या हव्यासाचे दुष्परीणाम आपल्याला स्वसंवेदनाने जाणविले पाहीजेत. त्या दुष्परीणामाच्या जाणीवेमध्येच आपल्या अतृप्तीचा नाश आहे. ज्याप्रमाणे युध्दात आपली माणसे मरण पावतील हे अर्जुनाला जाणविल्याबरोबर त्याची युध्द करायची इच्छा आपोआप नाश पावली (त्याला युध्द करायला नको अशी वेगळी भावना निर्माण करावी लागली नाही) त्याप्रमाणे आपल्या आवडीच्या वस्तू आपल्यापाशी हव्याच ही इच्छा नाहीशी करायला त्या इच्छेमुळे नाश पावणारी एखादी आवडती वस्तू आपल्याला दिसायला हवी. अशी कोणती वस्तू आहे की जीचा नाश आपल्या हव्यासामध्ये आहे?

एखादी गोष्ट हवीच असे ठरविण्याचा प्रचंड मोठा दुष्परीणाम म्हणजे आपल्या मनाच्या शांतीचा नाश. आपण सर्वजण म्हणतो की मला माझ्या जीवनात शांति हवी, बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा मनःशांति लाभणे हे चांगले आहे. किंबहुना असे म्हणता येईल की आपल्या बाकीच्या सर्व इच्छा या एका मनःशांतीच्या इच्छेमुळेच निर्माण झाल्या आहेत. मन शांत असावे, ते ताणाखाली नको असे आपण सतत म्हणत असतो पण असलेला ताण कमी होण्याकरीता आपण काय प्रयत्‍न करतो? माझा मुलगा चांगला शिकला तर ताण कमी होईल, माझी सून चांगली वागली तर बरे वाटेल, थोडे पैसे मिळाले तर मानसिक शांति मिळेल असे आपण मानून त्या गोष्टींच्या प्राप्तीकरीता प्रयत्‍न करण्यामध्येच आपल्या मानसिक अशांतीचा नाश आपण अपेक्षित असतो. परंतु प्रत्यक्षात तसे घडते का? या जगाच्या संपूर्ण इतिहासात तुम्हांला एकतरी माणूस माहीती आहे का की ज्याने ह्या गोष्टींमार्फत आपले मन चिंतामुक्‍त केले आहे? याउलट ज्यांचे मन शांत आहे असे सर्व संत आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर जायला सांगत आहेत! पण तरी आपण आपले व्यावहारीक प्रयत्‍न सुरुच ठेवतो याला काय म्हणावे?

मानसिक शांतीबद्दल श्री निसर्गदत्त महाराजांनी फार चांगले सांगितले आहे. त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला होता की `आपल्या सर्वांना शांति का मिळत नाही? आपल्या सर्वांचा ह्या शांतीवर जन्मसिध्द हक्कच आहे, तरी ती का मिळत नाही?’ यावर त्यांनी उत्तर दिले की जी माणसे आपल्या शांतीला आपणहून ढवळत नाहीत त्यांनाच आपल्या जन्मजात मानसिक शांतीवर अधिकार आहे. या फार सुंदर वाक्याचा अर्थ असा की आपणच आपल्या शांतीला त्रास देतो व मग ती का निघून गेली याबद्दल तक्रार करीत राहतो. आपण स्वतःहूनच शांत पाण्यात दगडे टाकायची व नंतर का एवढे तरंग आले म्हणून तक्रार करायची असे आपले जीवन चालले आहे. म्हणजे आपले मन शांत हवे असेल तर आधी ते अशांत करणे आपण सोडले पाहीजे हो. हे अशांत करणे सोडले तर आपोआप शांति आपल्याकडे येईल. तर हे आपले मन आपणच अशांत करणे म्हणजे काय? तर आपल्या मनात एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा करणे, या इच्छेची पूर्ती होईपर्यंत आपले मन अस्वस्थ असते.

उदाहरण द्यायचे झाले तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य आपला जन्मसिध्द हक्क आहे असे आपण ठरवून ते राखण्याकरीता तैनाती फौज बोलवितो तेव्हा नकळत आपले स्वातंत्र्य आपण गमावित असतो हे आपल्या ध्यानात येत नाही तशीच ही गोष्ट आहे. जवळच्या शत्रूचा नाश करण्याकरीता लांबच्या राजाचे सैन्य आणण्यात खरे स्वातंत्र्य नाही हे जसे लक्षात घेतले पाहीजे त्याचप्रमाणे आपल्या मनाची सध्याची अशांतता काढण्याकरीता एखाद्या वस्तूच्या प्राप्तीकरीता जीवापाड प्रयत्‍न करणे चुकीचे आहे हे नीट जाणून घेऊन त्यावर विश्वास ठेवला पाहीजे.

सध्या आपल्या जीवनाची व्याख्याच अशी आहे की जेवढे भौतिक सुख आहे तेवढे बरे. माणसाच्या जीवनाचे सार्थक त्याने चार घरे बांधली आहेत, भरपूर पैसे आहेत, त्याला जगात मान आहे वगैरे गोष्टीत आपण मानत असतो. परंतु याचबरोबर मानसिक शांति मिळाली पाहीजे हे जीवनाचे ध्येय आहे असेसुध्दा आपण गृहीत धरत असतो. एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच भौतिक गोष्टी जवळ असणे ही इच्छा व मानसिक शांति असणे ही इच्छा या दोन्ही गोष्टी एकाचवेळी अस्तित्वात राहणे शक्य नाही. या जगातील कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, (गाडी केव्हाही बिघडू शकते, मुलांचे वागणे केव्हाही विचित्र होऊ शकते, पैसे अचानक जातात). या अशाश्वततेची जाणीव कुठेतरी आपल्या मनात असतेच म्हणूनच या गोष्टींच्या प्राप्तीमध्ये शांति न लाभता आता आहे ती स्थिती सतत कशी राहील याचा ध्यास आपल्याला लागतो व शांति मिळत नाही. म्हणून शांति हवी असेल तर व्यवहारातील गोष्टींच्या प्राप्तीकरीता आपला जो खटाटोप आहे तो कमी झाला पाहीजे.

याचा अर्थ कृपया असा घेऊ नका की आत्ता लगेच सर्व गोष्टींचा त्याग करुन जंगलात जायला हवे. एक म्हणजे शारीरीक त्याग दुय्यम असतो, खरा त्याग हा मानसिक असतो. म्हणून संसार सोडून तुम्ही जंगलात जरी गेलात तरी मानसिक शांति मिळेल याची काही खात्री नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही आपण अतिरेकीपणा करु नये. ज्ञानेश्वरीत, किंवा अध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या इतर कुठल्याही ग्रंथांकडे आपण बघितले तर अतिरेकीपणाला प्राधान्य दिलेले आढळत नाही. उलट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मानवाने हळूहळू प्रयत्‍न केले पाहीजेत. ज्याप्रमाणे एक एक फांदी चढत शेवटी झाडावरचे फळ हातात येते त्याप्रमाणे आपण प्रयत्‍न केले पाहीजेत (ज्ञानेश्वरी: अध्याय तीन, ओव्या ४१ व ४२). प्रत्येक गोष्ट अत्यंत छोट्या छोट्या पावलांनी आपण गाठली पाहीजे.

मी काय करु की ज्यामुळे माझ्या इच्छा कमी होतील? काही करु नका! फक्‍त विचार करा की या इच्छेने मला काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होणार आहे? माझ्या मनःशांतीला या इच्छेचा काय फायदा होणार आहे याचा जरा विचार करा. जर तुम्हांला फक्‍त फायदेच फायदे दिसतील तर जरुर त्या इच्छेच्या पूर्तीकरीता जिवापाड प्रयत्‍न करा. पण जर तोटे जास्त आढळतील तर ती इच्छा कमी करायचा प्रयत्‍न करा. एवढेच करणे खूप आहे. ती इच्छा नाहीशी करणे काही आपल्या हातात नाही. फक्‍त त्यावर सारासार विचाराचा लेप लावणे आपल्या हातात आहे. असे बघा, एखादा कागद खूप गोंद लावून चिकटविला असेल तर तो काढायला त्याला थोडे पाणी लावून ठेवणे जरुरी असते. मग त्या पाण्यामुळे तो गोंद पातळ होतो, त्याचा चिकटपणा कमी होतो व कागद हलकेच काढता येतो. आपल्या बुध्दीला आपल्या इच्छांचे अनेक कागद चिकटले आहेत ते इतके घट्ट चिकटले आहेत की निघणे कठीण आहे. पण जर विवेकाचे पाणी त्या इच्छांना सतत लावले तर त्या निघणे सोपे होईल. घाई करुन कागद काढायला गेलो तर त्याचे छोटे छोटे तुकडे निघतात, तो पूर्ण निघत नाही त्याचप्रमाणे अचानक सगळ्या इच्छांचा नाश करायला आपण निघालो तर यश येत नाही. इच्छा ठेवण्यामध्ये मनःशांतीचा नाश आहे हे ज्ञान आपण आपल्या बुध्दीवर लावलेल्या सर्व इच्छांच्या `स्टिकर्स’ ना लावले पाहीजे. हा ज्ञानाचा लेप लावून आपले जीवन आहे तसेच ठेवा. आपोआपच तुमच्या इच्छा कमी होतील. तुमच्या इच्छेंचे तुमच्यावरचे प्रभुत्व कमी झाले आहे हे तुम्हाला जाणवायला लागेल. तुमच्या क्षुल्लक इच्छा (नीट न चिकटलेले कागद) लगेचच जातील, पण ज्या खूप दृढ इच्छा आहेत त्या जायला वेळ लागतो. काही काळाने तुम्हाला अचानक जाणवेल की `अरे, इच्छांचे आपल्याला एवढे ओझे वाटत नाही’. आधी जिथे `असे वागायलाच हवे’ वा `असे करायलाच हवे’ असे वाटत होते त्याऐवजी `असे वागायला हवे’, `करायला हवे’ असे वाटायला लागेल. तुमच्या जीवनातला हा जो `च’ लावलेला आहे (करायलाच हवे, वागायलाच हवे इत्यादी) तो निघून जायला लागेल! मग अजून थोड्यावेळाने `असे वागले तर बरे’ असे वाटायला लागेल. सर्वांत शेवटी `ठीक आहे, अमुक एक झाले तर बरेच आहे पण नाही झाले तरी चालेल’ असे वाटायला लागेल. जेवढे असे वाटेल तेवढे तुम्ही सर्वारंभपरित्यागी झाला आहात असे समजावे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या दुकानातील सर्वारंभपरित्यागी ही साडी घरी न्यायची असेल तर असे वागायला हवे. यातसुध्दा एक सुंदर गोष्ट आहे. तुम्ही असे म्हणाल की नाही, मला ही साडी आवडली नाही, मी दुसरी साडी घेईन. उदाहरणार्थ `समदुःखसुख’ व्हायचा प्रयत्‍न करीन. तर तसा प्रयत्‍न करुन ज्यावेळी तुम्ही ह्या अवस्थेजवळ पोहोचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण सर्वारंभपरित्यागी सुध्दा झालो आहोत! म्हणून लक्षणांनी दर्शविलेले साधनेचे मार्ग सुरुवातीला जरी भिन्न वाटले तरी एकाच ज्ञानी माणसाची, एकाच भक्‍ताची ही लक्षणे असल्याने एक लक्षण पूर्णरुपात आत्मसात झाले तर बाकीची लक्षणेसुध्दा प्राप्त होतात. जीवनामध्ये सत्य असे एकच आहे. कुठल्याही मार्गाने ते जर तुमच्या हातात आले तर त्याचे सर्व गुण तुमच्या हातात येतात. एका झाडाला अनेक फळे आहेत पण तुम्हाला चवथ्या फांदीवरचे पिवळे झालेले फळ आवडून त्याच्या प्राप्तीकरीता प्रयत्‍न करीत असताना सर्व झाडच हातात आले तर कसे होईल, तशी ही गोष्ट आहे! तेव्हा सर्व साड्यांचे दुकानच आपल्या घरी येण्याची वाट बघत आहे हे लक्षात घेऊन आपण आत्ता या क्षणी प्रयत्‍न सुरु करायला हवे. मग आपले जीवन इतके सुंदर व नाविन्यपूर्ण होईल की अमुक एक वस्तू असावीच हा हट्ट कधी निघून जाईल हे कळणार नाही.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोरमध्ये दिनांक १० मार्च २००७ रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)