Shloka11/13: Signs Of Knower18-DnyeyDarshan

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १८

 

अवकाशयानाला मुक्तपणे अवकाशात भ्रमण करण्याआधी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून सुटणे अपरिहार्य असते आणि त्याकरीता त्याला स्वतःच्या पृष्ठभागी धगधगीत आगीची जीवघेणी झळ काही काळ सहन करावीच लागते. त्याचप्रमाणे साधकाला भगवंताजवळ जाण्यासाठी प्रखर वैराग्याचा ताप सहन करावा लागतो. व्यावहारिक जगातील मोह त्याला गुरुत्वाकर्षणासारखेच ओढून घेत असतात आणि त्यांपासून संपूर्ण सुटका हवी असेल तर वैराग्याच्या आगीत सर्व मोहबंध जाळून टाकण्याशिवाय साधकाला पर्याय नसतो. आणि ही वैराग्याची आग सातत्याने काही काळ मनात प्रज्वलित ठेवावी लागते. स्मशानवैराग्यासारखे (स्मशानात गेल्यावर सर्वांनाच आपल्या आयुष्याच्या नश्वरतेची स्वसंवेदनांनी खात्री पटते व जगात पुढे यायच्या आपल्या धडपडीबद्दल उपहास वाटतो. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. हे फक्‍त स्वतःच्या घरी येण्यापर्यंतच टिकते!) क्षणिक वैराग्य परमार्थात आपणास फार पुढे नेऊ शकत नाही. परंतु नुसत्या वैराग्यामुळे झालेल्या प्रगतीलाही सीमा असते. कितीही प्रखर आणि प्रदीर्घ वैराग्य साधकाच्या मनात जागृत झाले तरी व्यावहारिक जगातील मोहाचे मूळ संपूर्ण नष्ट होत नाही. ते नष्ट होण्यासाठी साधकाचे आणि सद्‍गुरुंचे संपूर्ण मीलन होणे जरुरी असते. भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायात अर्जुनाच्या मनात आपल्या राज्य मिळविण्याच्या धडपडीबद्दल अतीव खेद निर्माण झाला आणि स्वतःच्या ध्येयांबद्दल वैराग्य जागृत होऊन त्याच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडले. ह्या दुःखाच्या धगीमुळेच त्याला गीतातत्व प्राप्त झाले. मग अठराव्या अध्यायात जेव्हा भगवान तेव्हा त्याला विचारतात की अर्जुना आतातरी तुझ्या मनातील स्वजनांबद्दलचा मोह गेला की नाही? तेव्हा त्याचे उत्तर अतिशय मार्मिक आणि गूढ आहे. तो म्हणतो:

 

आता मोह असे की नाही । हे ऐसे जे पुससी काई ।

कृतकृत्य जाहलो पाही । तुझेपणे ॥ १५६२:१८ ॥

गुंतलो होतो अर्जुनपणे । तो मुक्‍त झालो तुझेपणे ।

आता पुसणे सांगणे । दोन्ही नाही ॥ १५६३:१८ ॥

मी तुझेनि प्रसादे । लाधलेनि आत्मबोधे ।

मोहाचे तया कांदे । नेदीच उरो ॥ १५६४:१८ ॥

 

जेव्हा अर्जुनाचा मीपणा जाऊन त्याचे भगवान श्रीकृष्णांशी मिलन झाले तेव्हाच त्याच्या मनातील मोहाचे कांदे (म्हणजे त्यांचे मूळ) नष्ट झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. वैराग्यातून उत्पन्न झालेल्या निव्वळ बौध्दीक ज्ञानाने वा तत्वज्ञान श्रवण करण्याने साधकाची संसारातून मुक्‍तता होत नाही. इथे भक्तीमार्गियांच्या शब्दांत भगवंताशी एकरूप होणे वा नाथपंथियांच्या भाषेत जीव आणि शिव यांचे मिलन होणे जरुरी आहे. ज्ञानी माणसाने स्वतःच्या जीवनात ही पराकोटीची प्रीती, हा अंतिम योग आणि त्यांचे उपरीनिर्दिष्ट फळ प्राप्त केले असते. हा त्याच्या ज्ञानीपणाचा अंतिम गुण आहे. साधकाने ह्या गुणाकडे सतत नजर ठेवून आपली साधना निरंतर चालू ठेवली पाहिजे.

 

१८. ज्ञेयदर्शन

 

मी या जगापासून भिन्न आहे आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांपैकी एकही मला स्पर्श करु शकत नाही ही जाणीव जेव्हा साधकाला होते तेव्हा त्याला ज्ञान झाले आहे असे समजायला हरकत नाही. परंतु हे ज्ञानदेखील अर्धवट आहे, अपूर्ण आहे. यामध्ये आपले अस्तित्व आणि भासणारे जग यांमध्ये द्वैत आहेच. ह्या जगापासून मी भिन्न आहे ही भावना आपल्या आधीच्या या जगामध्ये जे माझे अस्तित्व आहे तोच मी आहे ह्या हट्‍टाचीच प्रतिक्रिया आहे. आधी तुम्ही स्वतःला जगातलेच मानत होता आणि आता जगाबाहेरचे मानत आहात. या दोन्ही जाणीवेंमध्ये आपण आणि जग यांत द्वैत आहेच. आणि जगाला परके मानल्यावर मनात त्याबद्दल प्रीती उत्पन्न होत नाही तर दुरावा निर्माण होतो. यानंतर जेव्हा स्वहृदयी स्थित असलेल्या सद्‍गुरुंचे दर्शन होते तेव्हा मी जगापासून वेगळा आहे ही भावनाही नष्ट होऊन स्वतःचे आणि सद्‍गुरुंचे अभिन्नपण जाणविते आणि सर्व वस्तू एकसंध आहेत या सत्यतेची खात्री पटते. माझे स्वतंत्र अस्तित्व आणि दृष्य जग हे दोन्ही एकाच परिपूर्ण अस्तित्वाचे दोन अवयव आहेत आणि मी आणि ते अकल्पनीय अस्तित्व यात फरक नाही हे मनावर बिंबते. त्यामुळे सर्व जीवमात्रांविषयी एक आत्यंतिक आणि निरपेक्ष प्रेमभाव उत्पन्न होतो. ज्ञानी मनुष्य तत्वज्ञानाचे विवेचन करणारा, प्रवचन आणि समाजप्रबोधनाचे कार्य करणारा शुष्क मानव नसतो तर मधाच्या पोळ्यासारखा आत-बाहेर प्रेमरसाने ओथंबून भरलेला महामानव असतो. खऱ्या ज्ञानी माणसाकडे सर्व माणसे आकर्षित होतात याचे कारण म्हणजे त्याच्या सहवासातील हा गोडवा होय. आपल्या आईबद्दल सर्वांनांच प्रेम वाटते तसे संतांबद्दल सर्व जगाला आपलेपणा वाटतो याचे कारण त्यांचा प्रेममय सौ‍म्यपणा होय. ज्ञानी माणसाने ज्ञेय प्राप्त केले आहे या गुणाच्या महत्वाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात:

 

आणि तत्वज्ञान निर्मळ । फळे जे एक फळ ।

ते ज्ञेयही वरी सरळ । दिठी हे जया ॥ ६२५:१३ ॥

येऱ्हवी बोधा आलेनि ज्ञाने । जरी ज्ञेय न दिसेचि मनें ।

तरी ज्ञानलाभही न मने । झाला सांता ॥ ६२६:१३ ॥

आंधळेनी हाती दिवा । घेऊनि काय करावा ।

तैसा ज्ञाननिश्चय आघवा । वायांचि जाय ॥ ६२७:१३ ॥

जरी ज्ञानाचेनि प्रकाशे । परतत्वी दिठी न पैसे ।

ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनि ॥ ६२८:१३ ॥

जेव्हढी ज्ञानाची वृध्दी । तेव्हढी जयाची मती ।

तो ज्ञान हे शब्दी । करणे न लगे ॥ ६३१:१३ ॥

पै ज्ञानाचिये प्रभेसवे । जयाची मती ज्ञेयी पावे ।

तो हातधरणिया शिवे । परतत्वाते ॥ ६३२:१३ ॥

तोचि ज्ञान हे बोलता । विस्मयो कवण पांडुसुता ।

काय सवितयाते सविता । म्हणावे असे ॥ ६३३:१३ ॥

 

स्वतःच्या आनंदात मग्न राहून जगातील घटनांबद्दल निर्विकार राहू शकणे ही ज्ञानप्राप्तीची खूण आहे. परंतु यानंतरची ज्ञेयप्राप्ती म्हणजे जग आणि आपण एकाच अस्तित्वाचे दोन अवयव आहोत असे दिसून भिन्नत्वातही एक सूक्ष्म अशी एकरुपता दिसणे होय. साधकाच्या मनात खरे प्रेम उत्पन्न होण्यासाठी सर्वांभूती समभाव जागृत होणे अपरिहार्य आहे. व्यावहारिक जगाबद्दल तटस्थता प्राप्त झाली म्हणून साधना न थांबविता तटस्थतेचे रुपांतर प्रेमात होत नाही तोपर्यंत आपली पूर्ण प्रगती झाली नाही, भगवंताशी भेट झाली नाही, हेच खरे मानून साधकाने सद्‍गुरुंशी एकरुप होण्याचा आपला ध्यास कधीही सोडू नये.

 

॥ हरि ॐ ॥