ओवी १० ते १५ : शब्दांचे तोकडेपण

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

एवढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वानू मी कवणे ।

का सूर्याचिया आंगा उटणे । लागत असे ॥ १०:१० ॥

केऊता कल्पतरुवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ।

कवणे वासी कापुरा । सुवासु देवो ॥ ११:१० ॥

चंदनाते कायसेनि चर्चावे । अमृताते केऊते रांधावे ।

गगनावरी उभवावे । घडे केवीं ॥ १२:१० ॥

तैसे श्रीगुरुचे महिमान । आकळिते के असे साधन ।

हे जाणोनिया नमन । निवांत केले ॥ १३:१० ॥

जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरुसामर्थ्य रुप करु म्हणे ।

तरी ते मोतिया भिंग देणे । तैसे होईल ॥ १४:१० ॥

का साडेपंधरया रजतवणी । तैसी स्तुतींची बोलणी ।

उगियाचि माथा ठेविजे चरणी । हेचि भलें ॥ १५:१० ॥

जेव्हा एखादा हिमनग समुद्रामध्ये दिसतो तेव्हा आपणांस त्याचा फक्त एक अष्टमांश हिस्सा दिसत असतो. बाकीचा मोठा आकार पाण्याखाली दडलेला असतो. सद्‍गुरुंच्या शक्तीचा आपणांस जाणविलेला भाग असाच त्यांच्यातील शक्तीचा एक अतिशय छोटासा हिस्सा असतो. सत्शिष्याच्या जीवनात साधना करण्यात संकटे आली तरच त्या शक्तीची जाणीव होते. म्हणजे काय, तर प्रतिकूल परीस्थितीतही साधकाच्या मनातील समतोल न ढळण्यात त्या कृपेचा प्रभाव आपणांस दिसून येतो. परंतु, ज्याप्रमाणे खिडकीतून आलेल्या सूर्यकिरणांवरुन आपण सूर्याची संपूर्ण शक्ती जाणू शकत नाही त्याचप्रमाणे स्वानुभवात आलेल्या गुरुकृपेच्या दर्शनांतून सद्‍गुरुंच्या महिमेचे संपूर्ण ज्ञान आपणांस होत नाही.

वरील दहाव्या अध्यायातील सद्‍गुरुस्तवनातील अंतिम ओव्या याच वस्तुस्थितीला दर्शवित आहेत. पहिल्या नऊ ओव्यांमध्ये सद्‌गुरुंच्या कृपेचा साधकाच्या जीवनावर किती सखोल परीणाम होतो याचे वर्णन केल्यावरही माऊलींना पूर्ण जाणीव आहे की सद्‍गुरुकृपा याहून कितीतरी अधिक शक्तीशाली आहे. ती केवळ संकटांच्या वेळीच कार्यरत असते असे नाही तर दैनंदिन घटनांतही साधकाला योग्य निर्णय घ्यायची बुद्धी होण्यात तीचाच हातभाग असतो. शिष्याच्या प्रारब्धामध्ये सध्या केलेल्या कर्मांमुळे अधिक भर पडू नये याकरीता गुरुकृपा सतत जागृत असते. दिवसाच्या चोविस तासात प्रभावशाली असणाऱ्या या शक्तीचे कोण वर्णन करु शकणार? म्हणूनच वरीन ओव्यांतून माऊली म्हणत आहेत की “अमर्याद असलेल्या गुरुमहिमेचे कर्तृत्व शब्दांमध्ये मी कसे बांधू? ज्याप्रमाणे सूर्याच्या कांतीला उटणे लावून तेजस्वी करणे हास्यास्पद आहे, कल्पतरुला इच्छापूर्तीसाठी पूजा बांधणे मूर्खपणा आहे, क्षीरसागरातील दुधाची गोडी स्वयंपाक करून वाढविण्याचा प्रयत्‍न करणे निरर्थक आहे, कापुराला अत्तर लावून सुवास देण्याचा प्रयत्‍न करणे, चंदनाला उटी लावणे, अमृताला फोडणी देणे वा आकाशापेक्षाही उंच होण्याचा प्रयत्‍न करणे ज्याप्रमाणे फोल आहे, त्याचप्रमाणे श्रीगुरुंचे माहात्म्य पूर्णपणे जाणून घेण्याची क्षमता कशात (वा कोणात) आहे? हे कळल्याने मी मौन होऊन नतमस्तक झालो आहे. (१०-१३). आणि यावरही कोणी आपल्या बुद्धीचा वापर करुन गुरुसामर्थ्याचे वर्णन करीन असे म्हणेल तर ते सुंदर मोत्याला भोक पाडण्यासारखे वा संपूर्ण शुद्ध सोन्याला चांदीचे पाणी देण्यासारखे (म्हणजे मूळ वस्तूची किंमत कमी केल्यासारखे) होईल. म्हणून मुकाट्याने गुरुंच्या पायावर माथा ठेवणे हेच उत्तम आहे (असे मी समजतो)(१४-१५)

काही प्राण्यांमध्ये एखाद्या इंद्रियाची उत्क्रांती मानवापेक्षा जास्त (उदा. गरुडाची नजर, श्वानाचे घ्राणेंद्रिय इत्यादी) झाली असली तरी या जगातील सर्व जीवजंतूंमध्ये मानवाची बुद्धी सर्वात जास्त विकसित आहे. आपल्या जीवनात घडलेल्या घटनांवर विचार करुन त्यातून धडा शिकणे सर्व प्राण्यांत आपणांस सर्वात चांगले जमते. असे असले तरीसुद्धा आपली बुद्धी इंद्रियांतर्फे जाणविलेल्या संवेदनावरच कार्य करु शकते. जर आपल्या डोळ्यांनी बघितलेच नाही, कानांनी ऐकलेच नाही तर आपण कशावर विचार करणार? म्हणून प्रगल्भ बुद्धीसुद्धा फक्त ढोबळ गोष्टीच जाणू शकतो. ज्या गोष्टी ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या अतीत आहेत त्यावर आपली बुद्धी चालू शकत नाही. आपल्या मनात एखादा पूर्णपणे नवीन विचार अचानक उत्पन्न होणे ही गोष्ट मन आणि इंद्रियांपलिकडील आहे. असा नवीन विचार जाणविल्यावर स्वतःच्या बुद्धीने आपण तो कसा बरोबर आहे याचे स्पष्टीकरण देऊ शकतो पण तो निर्माण कसा झाला (आणि त्याचवेळी का झाला) याचे ज्ञान आपणांस कधीही होत नाही. जास्तीतजास्त आपण त्याबद्दल अंदाज बांधू शकतो. आयुष्याला नवीन वळण देणारा प्रत्येक विचार गुरुकृपेतूनच उत्पन्न होत असतो आणि त्यांच्या कृपेनेच आपणांत झालेल्या नवदृष्टीनुसार जीवन जगण्याचे धैर्य प्राप्त होते. जीवनाला कलाटणी देणारे सर्व विचार गुरुकृपेने येतात हे सर्वांच्या जीवनातील शाश्वत सत्य आहे. लक्षात घ्या की असे विचार अतिशय व्यक्तिगत असतात कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असल्याने एकच उत्तर सर्वांना लागू होत नाही. ज्याप्रमाणे एकच वैद्य अनेक रुग्णांना वेगवेगळी आओषधे देतो त्याप्रमाणे एकच शक्ती प्रत्येकाच्या जीवनात विभिन्न परीणाम घडवून आणत आहे. अशा शक्तीचे संपूर्ण आकलन कुणा एका व्यक्तीला होणे कसे शक्य आहे? आणि ही निव्वळ आपणांस जाणविलेल्या विचारांची गोष्ट आहे. कित्येकवेळा आपण नकळत एखादे वर्तन करतो ज्याने आपले आयुष्य बदलून जाते. त्यावेळी हेसुद्धा कळत नाही की कशाच्या प्रभावाखाली आपण असे वागलो. अशा तऱ्हेने आपल्या सर्वांच्या जीवनाला वळण देणाऱ्या शक्तीचे वर्णन आपण करु शकू हे म्हणणे किती वेडेपणा आहे हे वेगळे सांगायची जरुरी नाही!

परंतु ती शक्ती कळली नाही तरी अशा शक्तीची जाणीव ठेऊन त्यातून येणाऱ्या स्फुर्तीशी सुसंगत जीवन जगण्याचा प्रयत्‍न करणे आपल्या हातात आहे. असे करणे म्हणजेच ‘उगियाचि माथा ठेविजे चरणी’ करणे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व दूर ठेऊन मनात नाविन्याने प्रकाशित होणाऱ्या स्फूर्तीनुसार आपल्या आयुष्यात वर्तन करणे ज्याला जमले त्याने खरे सद्‌गुरुस्तवन केले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. माऊलींनी स्वतःच्या आयुष्यात असे आचरण केले होते म्हणूनच श्रीनिवृत्तीनाथांनि त्यांच्याबद्दल ‘माझ्या आज्ञेबाहेर कधीही गेला नाही’ असे उद्‍गार काढले होते. आपणांस गुरुंचा महिमा कळणार नाही पण त्या शक्तीसमोर नतमस्तक होण्याची कला शिकता आली तर आयुष्याचे सार्थक होईल असे माऊलींचे वरील ओवींतील सांगणे आहे असे वाटते. इति.

॥ हरि ॐ ॥