श्लोक ३४ : राजविद्या साधनेचा पुनरुच्चार

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्यैवमात्मानं मत्परायणः ॥ गीता ३४:९ ॥

आधीच्या दोन श्लोकांतून नवव्या अध्यायातील साधना या विश्वातील कुणीही करु शकतो असे आश्वासन दिल्यानंतर आता भगवान या साधनेचे मर्म परत स्पष्ट करीत आहेत. ते म्हणत आहेत की :

 (अर्जुना) मलाच तुझ्या जीवनातील सर्वात महत्वाची वस्तू ठरव त्यायोगे तुझे मन आणि सर्व क्रिया माझ्या इच्छेप्रमाणे कर. विश्वात सर्व ठिकाणी मलाच बघ. तुझ्यात ही अंतर्गत स्थिरता आली की तू माझ्यात विलीन होशील (माझी प्राप्ती होईल).”

प्रत्येकाच्या जीवनात कुठलीतरी वस्तू महत्वाची असते. आपण काय ध्येय ठरविले आहे यावरुन आपल्या आयुष्याला दिशा मिळत असते. कारण जेव्हा आपल्यासमोर एखादा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपण असाच निर्णय घेतो की ज्यायोगे आपले ध्येय गाठण्यास अडचण येणार नाही. परंतु जेव्हा आपल्यासमोर अशी वेळ येते की आपण काहीही केले तरी चालेल तेव्हाआपले ध्येय आपणांस नक्की दिशा दाखवू शकत नाही. उदाहरणार्थ, जर समाजात पुढे जायचे आहे हे ध्येय असेल तर प्रतिष्ठित व्यक्तींसमोर आपण आपोआप स्वतःच्या मनाला मुरड घालून चांगले वागतो कारण त्यांच्या संगतीने आपले ध्येय प्राप्त होण्यास मदत होईल असे वाटत असते. परंतु हे ध्येय आपणांस स्वतःच्या घरी खाजगीत कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करु शकत नाही कारण तिथे कसेही वागले तरी त्याने आपल्या बाहेरील प्रतिमेला धक्का लागणार नाही याची जाणीव असते. अशावेळी आईचे वा पत्‍नीचे मन सांभाळणे असे ध्येय उपयोगी पडते. म्हणजे काय, तर आपल्या एखाद्या ध्येयाशी संबधित नसलेली घटना जर आपल्यासमोर आली तर तिथे कसे वागाचे याचा निर्णय घेण्यास आपणांस दुसरे ध्येय सुनिश्चित करावे लागते. या विश्वातील प्रत्येक गोष्ट मर्यादीत असल्याने, कुठलेही व्यावहारीक ध्येय आपणांस दिवसाचे चोवीस तास कसे वागायला हवे याबद्दल दिशा देऊ शकत नाही. म्हणून आपणांस असे दिसून येते की सर्वसाधारणपणे लोकांच्या जीवनात एकापेक्षा जास्त गोष्टी महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ, आपणांस पैसे मिळवायचे असतात शिवाय घरी,दारी मान हवा असतो आणि तब्येत चांगली हवी असते व मनाप्रमाणे वागायला हवे असते. एकाचवेळी आपण या सर्व गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्‍न करीत असतो. अशी तारेवरची कसरत करण्यात आपण इतके गुंग झालेलो असतो की जगण्यातील नैसर्गिक सुंदरतेने भारावून जाण्यास आपल्याकडे वेळ नसतो. आणि भगवंताची भक्ति करणे म्हणजे दररोजच्या जीवनातील अद्भुत सौदर्याचा सतत आस्वाद घेणे असल्याने वरील विवेचनाने असे स्पष्ट होते की भक्ति करण्यास आपल्याकडे वेळ नसतो.

अशा रीतीने आपण स्वतःसमोर निरनिराळ्या ध्येयांची आलोभने ठेऊन भगवंतापासून वंचित होत असतो असे स्पष्ट होते. यातून सुटण्याचा एक हमखास मार्ग म्हणजे “बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ज्ञानदेव हरिपाठ-१३॥” अशी भावना मनात निर्माण होणे होय. स्वतःच्या जीवनात भगवंतप्राप्ती हे एक आणि एकच ध्येय ठेवणे जरुरी आहे हे स्पष्ट झाल्यावर तेव्हढेच करणे पुरेसेसुद्धा आहे असे भगवान वरील श्लोकातून म्हणत आहेत. हा योग इतका सोपा आणि सरळ आहे की यावर विश्वास बसणे कठीण आहे म्हणून तो डोळ्यासमोर असूनही गुप्त झालेला आहे. अर्थात, या मार्गात एक बाब लक्षात ठेवणे जरुरी आहे ती म्हणजे, भगवंतांच्या एखाद्या अवताराला महत्वाचे मानायचे नसून मूळ (निर्गुणी) भगवंतांना जीवनात आद्यस्थान द्यायचे आहे. याचे कारण असे की भगवंतांचा प्रत्येक अवतार या विश्वात जन्माला आलेला असल्याने मर्यादीत आहे. त्यामुळे सतत कुठल्याही परिस्थितीत त्याचे दर्शन होणे कठीण आहे. उदाहरणार्थ रामनवमीला श्रीरामांचे अस्तित्व आपणांस जाणवेल पण त्यानंतर दशमीला ते दिसेलच असे नाही. किंवा, महाशिवरात्रीची साधना संपली की आपले जीवन परत नेहमीप्रमाणेच सुरु व्हायला लागते. म्हणून निर्गुणी भगवंतांची साधना करणे अत्यावश्यक आहे. आणि ही साधना कशी असते हे या श्लोकातून स्पष्ट केले आहे. आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रसंगाला आणि विचाराला भगवंताचे रुप मानून सामोरे जाणे आणि या क्रियेमध्येच संपूर्णपणे मग्न होण्याने आपल्या संकुचित व्यक्तिमत्वाच्या मागण्यांकडे आपोआप दुर्लक्ष होणे असे या भक्तीचे रुप आहे. माउलींच्या शब्दांत सांगायचे तर:

तू मन हे मीचि करी । माझिया भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥५१७:९॥

माझेनि अनुसंधाने देख । संकल्प जाळणे निःशेख । मद्याजी चोख । याचि नाव ॥ ५१८॥

ऐसा मिया आथिलां होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी। … 

नवमीच्या या पूर्णोद्गारात भगवंतांनी सगळी साधना परत एकदा सांगून आपल्या जीवनाचे ध्येय काय असायला हवे हे स्पष्ट केले आहे. ही गोष्ट कळणे इतके जरुरी आहे की भगवंतांनी अठराव्या अध्यायातील पासस्ठाव्या श्लोकात वरील श्लोकाला जवळजवळ शब्दशः परत सांगितले आहे (असा दुसरा कुठलाही श्लोक गीतेत नाही). इति.

श्रीसद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांच्या कृपाशिर्वादाने नवव्या अध्यायातील श्लोकांचे विवरण करण्याची सेवा अशा रीतीने संपूर्ण झाली. “भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां ओवियां फुलें मोकळी । अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्वरुपाच्या ॥ ज्ञानेश्वरी ७०८:११॥

॥ हरि ॐ ॥