Shloka 3/15: Removal of the `Bhavavriksh’

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न रुपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।

अश्वत्थमेनं सूविरुढमूलसंगशस्त्रेण दृढेन छित्वा ॥ भगवद्गीता, श्लोक ३:१५ ॥

भगवद्गीतेतील सातशे श्लोक अठरा अध्यायात वाटले आहेत. त्यातील प्रत्येक अध्यायामध्ये साधनेचा एक-एक मार्ग सांगितला आहे आणि वर्णन केलेल्या मार्गायोगे मिळणाऱ्या सर्वोच्च स्थितीचे वर्णन केले आहे, ती ठराविक साधना स्वतःच्या अंगात संपूर्णपणे भिनवून जगात वावरणाऱ्या सिध्द पुरुषाचे वर्णन केले आहे. भिन्न अध्यायांतील मार्ग भिन्न असले तरी त्यांच्यावर मार्गक्रमण करुन जे ज्ञान प्राप्त करायचे आहे ते एकच असल्याने आपणास सर्वप्रकारच्या सिध्द माणसांमध्ये एक साम्य दिसते. प्रत्येकाचा मार्ग भिन्न असेल, अनुभव निरनिराळे असतील व सांगायची पध्दत वेगळी असेल. त्यामुळे जे ज्ञान मिळाले आहे त्याचे वर्णन करताना वापरलेले शब्द भिन्न असतील पण सर्व संतांच्या विचारप्रणालीत एक समानता आहे हे भगवद्गीता वाचल्यावर प्रकर्षाने जाणविते. केवळ आपलाच मार्ग प्रगतीला योग्य आहे, आपलेच श्रीगुरु सर्वश्रेष्ठ आहेत अशा भावना ज्यांच्या मनात उत्पन्न झाल्या आहेत त्यांना, सत्यपरिस्थितीचे ज्ञान हवे असेल तर, भगवद्गीतेवर चिंतन आणि मनन करण्यासारखा अन्य रामबाण उपाय नाही! सर्व मार्गांतील ही एक गूढ समानता स्पष्ट करण्याकरीता अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज मागील सतरा अध्यायांचा परामर्ष घेत असताना म्हणतात: `सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देव बोलिले एक । जे दुजें नाही ॥५८:१८॥’. भिन्न मार्ग दर्शविण्याचा एक परिणाम म्हणजे गीतेतील एकेक अध्यायात ज्या योगाचे वर्णन करायचे आहे त्यानुसार शब्द वापरले आहेत. ज्याप्रमाणे संस्कृत भाषेत `जीवन’, `सलिल’, `तोय’, `जल’ इत्यादी शब्दांनी एकच वस्तू (पाणि) संबोधिले जाते तशी ही गोष्ट आहे. म्हणूनच गीतेमध्ये आपल्या भोवतालच्या भौतिक व मानसिक जगाचे वर्णन करताना अनेक वेगवेगळे शब्द गीतेमध्ये वापरले आहेत. कधी या जगाला `माया’ म्हटले आहे तर कधी `प्रकृती’ तर कधी `क्षेत्र’.

आज निरुपणाला घेतलेल्या पंधराव्या अध्यायात पुरुषोत्तम योगाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये भगवंत जगाचे वर्णन करताना एका अशा झाडाची उपमा देतात की जो क्षणोक्षणी नाश पावत आहे आणि निमिषार्धात परत उत्पन्न होत आहे. एकही क्षण स्थिर न राहणारा म्हणून या झाडाचे नाव `अश्वत्थ’ असे ठेविले आहे. (खरे म्हणजे पिंपळाच्या झाडालाही अश्वत्थ असे नाव आहे पण माऊलींच्या सांगण्याप्रमाणे भगवंताना तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. महाराज स्पष्टपणे म्हणतात: `आणि अश्वत्थ येणे नांवे । पिंपळ म्हणती स्वभावे । परि तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥११५:१५॥’.) या वृक्षाचे वर्णन करीत असताना भगवंत म्हणतात की याचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत. आणि फक्‍त शाखाच खाली आहेत असे नाहीत तर खालीसुध्दा मूळे आहेतच. अत्यंत घनदाट फोफावलेला हा वृक्ष क्षणोक्षणी नाश पावतो आहे आणि तेव्हढ्याच जोमाने (किंबहुना जास्त उमेदीने) परत जन्म घेत आहे. हे इतके जलद घडत आहे की तो वृक्ष नुसता वाढतोच आहे असे भासत आहे. ज्याप्रमाणे चित्रपटातील एखादे छायाचित्र जाते आणि त्याची प्रतिमा मनातून निघून जाईपर्यंत दुसरे पुढे येते आणि त्यायोगे चित्रांमध्ये सातत्य दिसते तशी ही घटना आहे. किंवा माउली म्हणते की समुद्र आपणास पूर्ण भरलेलाच दिसतो. परंतु वस्तुस्थितीमध्ये तो क्षणोक्षणी सूर्याच्या तापाने बाष्पीरुप होऊन नाश पावत आहे आणि त्या बाष्पातूनच उत्पन्न झालेल्या पर्जन्याच्या आधारे निर्माण झालेल्या नद्यांच्या ओघांमुळे परत भरत आहे. ह्या दोन्ही घटना इतक्या जलद होत आहेत की आपणास त्याच्या दृष्यरुपात फरक जाणवित नाही त्याप्रमाणे हा वृक्ष आपणास सतत आहेच असे वाटत आहे. जोपर्यंत साधक ह्या अनादि वृक्षाचा संपूर्ण नाश करीत नाही तोपर्यंत तो भगवंतापासून वंचित राहणार आहे असे भगवंतांनी स्पष्ट केले आहे. ह्या वृक्षाला जाणून घेऊन त्याला नष्ट करणे हा एक साधनेचा मार्ग आहे आणि त्यायोगे जी उच्चतम अवस्था प्राप्त होते त्या सिध्दाला पुरुषोत्तम असे नाव आहे.

जेव्हा आपण एखादे उदाहरण देतो तेव्हा त्या उपमानाच्या प्रमुख बाबी मूळ गोष्टीला लागू करतो. उपमा देण्याचा उद्देश्यच हा असतो. जर जगाला वृक्षाची उपमा लावली आहे आणि त्याचा नाश कर असा सल्ला दिला आहे तर अर्जुनाच्या मनात त्या झाडाला मूळापासून उखडले पाहिजे ही भावना उत्पन्न झाली. मग त्याच्या लक्षात आले की या वृक्षाचे मूळ तर माझ्या हाताबाहेर खूप वर आहे. माझा हात तिथे कसा पोहोचणार? म्हणून त्याच्या मनात हे कार्य आपण करु शकू का नाही याबद्दल शंका निर्माण झाली. त्या शंकेचे निरसन करण्याकरीता वरील श्लोक भगवंतांनी उच्चारला आहे. नुसते `वृक्षाचा नाश कर’ असा सल्ला देऊन आपण मोकळे होणारे सल्लागार भगवंत कधीच नव्हते! वृक्ष नष्ट कसा करावा याचे निरुपण ते लगेच करतात. ही बाब म्हणजे गीतेचे एक खास वैशिष्ट्य आहे. केवळ `या चराचरात ईश्वर भरलेला आहे’ हे तत्व सांगून भगवद्गीतेचे समाधान होत नाही! ही गोष्ट स्वसंवेदनांनी जाणून घेण्याकरीता आवश्यक असलेल्या प्रक्रियेचा (म्हणजे साधनेचा) मार्गही गीतामाऊली आपणास सांगते. एक प्रचंड अमूर्त तत्वज्ञान (अद्वैत प्रणाली) दररोजच्या धकाधकीच्या जीवनात कसे उपयोगी आणावे हे आपणास भगवद्गीता शिकविते. हीच अमूर्त तत्वज्ञानाला व्यावहारिक जीवनात अंमलात आणू शकण्याचे रुप देण्याची गोष्ट श्रीज्ञानेश्वरीत अजूनही सहजगम्य होईल अशी सांगितली आहे.

कमलपत्र जैसे जलात । रहा तैसे जगात ।

संसर्गातही रहा अलिप्त । `असंगशस्त्रेण’ जिंका भगवंत ॥

`असंगशस्त्रेण दृढेन छित्वा’. भगवंतांचा उपदेश काय आहे? संग सोडा आणि या वृक्षाचा नाश करा. आता सहवास आणि संग हे व्यवहारात समानार्थी शब्द असले तरी इथे असंग म्हणजे प्रत्यक्ष सहवास सोडणे अभिप्रेत नाही. का म्हणून असेल? तो अर्थ जर भगवंतांच्या मनात असता तर नंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला `उठ युध्दाला सुरुवात कर’ असा सल्ला दिला नसता! देहाने कुरुक्षेत्रापासून दूर रहा हा असंग शब्दाचा अर्थ नाही तर मनाने स्वतः केलेल्या क्रियांमध्ये गुंतू नकोस असे भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे. या शब्दाची फोड करताना माउली म्हणते:

आपुलिया अज्ञानासाठी । नव्हता थांवला किरीटी ।

तरि आता आत्मज्ञानाच्या लोटी । खांडेनि गा ॥ २४८:१५॥

वांचूनि ज्ञानेंविण एकें । उपाय करिसी जितुकें ।

तिहीं गुंफसी अधिकें । रुखीं इये ॥ २४९:१५ ॥

`आपल्या अज्ञानापायी हा वृक्ष फोफावत आहे म्हणून आत्मज्ञानाने याला तोड. (आत्म)ज्ञानावाचून जे काही उपाय करशील त्या सर्वांनी या रुखातच अजून गुंतशील.’ असे महाराज म्हणत आहेत.

हे जग केव्हा आहे? जेव्हा ते आहे हे बघायला मी आहे तेव्हा. आज बंगलोरमध्ये बसून अमेरीकेतील शिकागो शहरातील एका रस्त्यावर कुठल्या घडामोडी होत आहेत हे कुणाला माहिती आहे? आपल्या दुनियेत त्या घटना अस्तित्वातच नाहीत. कधीकाळी आपण वर्तमानपत्रात वा इतर कुठेतरी वाचले की अमुक दिवशी अमुक वेळी शिकागोमध्ये असे-असे घडले होते तरच त्या घटना आपल्या जीवनात अस्तित्वात येतात. आता तो पेपर घरी असूनही आपण वाचलाच नाही वा पेपर वाचूनही ती ठराविक बातमी वाचली नाही तरी तीचे अस्तित्व कुठे आहे? ज्यांना तीच्याबद्दल माहिती आहे त्यांच्याकडे ती घटना गेली आहे, ती एक शाखा त्यांच्या जीवनरुपी वृक्षावर फोफावली आहे. परत विस्मरणाने नष्ट! तोपर्यंत दुसरी बातमी वाचलेली आहे. म्हणजे दुसरी फांदी! जीवनवृक्ष तसाच मोठा, किंवा आधीपेक्षा अधिकच मोठा कारण काल वाचलेले सर्वकाही आज विसरलेले नसते. दूरवरच्या शिकागोमधील घटना सोडा, त्यामुळे आपल्या जीवनात फारसा फरक पडणार नसतो. पण स्वतःच्या घरातील आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्‍तीच्या मनात काही विचार धुमसत आहेत आणि तुम्हाला त्याची जाणीव नाही तर त्यांची ती मानसिक स्थिती तुमच्याकरीता अस्तित्वात आहे का? वेळ आल्यावर `मला केव्हापासून ही गोष्ट सांगायची होती’ असे त्यांच्याकडून ऐकल्यावर आश्चर्य वाटते ना. आपण आपल्या मानलेल्या व्यक्‍तीनेही स्वतःचे मन आपल्याजवळ मोकळे का केले नाही ही जाणीव उत्पन्न होते ना? अशी कटु वस्तुस्थितीची जाणीव होणे म्हणजे असंगशस्त्र तयार करायला सामग्री मिळणे आहे! अहो, वाल्याकोळ्याने अश्याच सामग्रीचा उपयोग करुन स्वतःच्या हातात जगापासूनच्या संपूर्ण अलिप्ततेचे शस्त्र मिळविले होते. ज्या कुटुंबाकरीता अतोनात पापे त्याने आयुष्यभर केली होती त्या सर्वांनी त्या पापांच्या फळात भागीदार होण्यास नकार प्रत्यक्ष ऐकायला आल्यावर त्याच्या जीवनात एक नवीन शाखा उत्पन्न झाली. त्याच्या कुटुंबियांच्या मनात ही भावना आधीपासून होतीच की. काही न करीता घनघोर जंगलात हा गृहस्थ इतका पैसा कसा मिळवितो असा विचार त्यांच्या मनात आला नसणार का? परंतु ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ तो भोगेल ही भावना त्यांच्या मनात असणारच. स्वतःचा मुलगा अचानक छानछोकीत रहायला लागला, घरी खूप पैसे आणून द्यायला लागला की गरीब पालकांना कळत नसेल का की ही संपत्ती संपूर्णपणे योग्य मार्गावर चालून आलेली नाही. पण उघडपणे कोण विचारतो? मध्ये एकदा दूरदर्शनवर `मोटोरोला’ कंपनीच्या मोबाईलची जाहीरात असेच करायचे. रात्रीच्या जेवायच्या वेळी वडिल घाबरत विचारताहेत की `तुझ्या आईला विचारायचे आहे की एवढा भारी फोन कसा घेतलास.’ अत्यंत योग्य प्रश्न स्वतःचे वडिलही आईची ढाल पुढे करुन घाबरत विचारताहेत! समाजाची अवस्था अशी आहे. आपली अवस्था अशी आहे. कारण आपण आणि समाज यात काही फरक नाही. रस्त्यावरून चालत असतो तेव्हा उघडपणे सिगारेट ओढायला आपणास कमीपणा वाटत नाही पण मोठ्याने देवाचे नाव घ्यायला आपले मन चाचरते! तेव्हा, आपल्या जीवनातील दररोज घडणारे प्रसंगच आपणास साधना सुरु करण्याची शक्ती देत असतात. विशेषतः डोळे उघडवणारे प्रसंग आले की कळते की कुठल्याही परिस्थितीत आपली स्वतःची काळजी करणे हे जीवनाचे मुख्य ध्येय असलेला या जगात फक्‍त मी आहे! आपल्यावर अत्यंत प्रेम करीत असणारे लोकही शेवटी त्यांच्या जीवनातील सर्व गोष्टी आपणास सांगत नाहीत कारण त्या सांगितल्यामुळे आपणास फायदा झाला असता तरी त्यांना तोटा होता. म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात दुरावा आहेच. या जगाची रीतच अशी आहे की प्रत्येकजण स्वतःचा विचार करण्यात मग्न आहे. केव्हाही, कधीही, कुठल्याही कारणाने जवळच्या माणसांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो ही येथील वस्तुस्थिती आहे. अगदी आई आणि मुलात जर दुरावा उत्पन्न होऊ शकतो (आणि मुलाने लग्न केल्यावर तो नव्व्याणव टक्के होतोच!) तर बाकीच्या नात्यांची गोष्ट कशाला करायला हवी?

जगाची ही रीत संपूर्णपणे जाणून घेणे जे ज्ञान होय. एक गोष्ट लक्षात घ्या. ही बाब बौध्दीकरीत्या सर्वांनाच माहिती आहे. ते ज्ञान नाही. आयुष्यात दरवेळी, क्षणोक्षणी, आत्ता आहे ती गोष्ट कधीही नष्ट होऊ शकेल ही वस्तुस्थिती मनात ठेवणे केवळ बौध्दीक ज्ञानाने जमत नाही कारण आपण जगताना बुध्दीचा उपयोग वर्तमानात कधीच करीत नाही. बुध्दी केवळ भूतकाळातील गोष्टींचा विचार करु शकते. गोष्ट घडल्यावर बुध्दी त्यावर प्रक्रिया करु शकते, आधी नाही. आणि आपण जगत असतो वर्तमानकाळात. भूत आणि भविष्य हे दोन्ही काळ काल्पनिक आहेत, कल्पनांवर आधारलेले आहेत. म्हणून बुध्दीचा उपयोग आपण आयुष्य जगताना करु शकत नाही. जरा विचार केल्यावर कळेल की आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया बुध्दीच्या पलिकडून आलेल्या असतात. उत्स्फूर्त हा शब्दच बुध्दीपासून अलिप्तता दाखवितो. तेव्हा जगाच्या सत्य स्थितीचे ज्ञान इतके खोल रुजले पाहिजे की दररोजच्या जीवनात दिसले पाहिजे. आता जी गोष्ट आपली नाही हे ज्याला माहिती आहे त्याला तीच्याबद्दल स्वामीत्वाची भावना उत्पन्न होईल का? त्याचप्रमाणे जगातील सर्व गोष्टी, सर्व आप्त आपल्यापासून दूर आहेत के कळल्यावर अलिप्तता आपोआप उत्पन्न होतो. असंगशस्त्र निर्माण होते. म्हणून माऊली म्हणत आहे की केवळ ज्ञानानेच या भववृक्षाचे खांडन होईल.

बघा ज्ञानेश्वरी किती दयाळू आहे. नुसते असंग म्हणजे अलिप्तता हा शाब्दिक अर्थ सांगून या माउलीचे समाधान होत नाही. ही अलिप्तता कशी बाणवावी हेसुध्दा ती आपणास शिकवित आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक खडतर प्रसंगामध्ये आपणात व्यावहारिक जगापासून अलिप्त व्हायला शक्‍ती मिळत असते. दुःखद क्षणी परमेश्वर आठवितोच ना! परंतु आपण या शक्‍तीचा अपव्यय करतो. जुन्या गोष्टी टाकून देतो हे खरे पण परत नव्या गोष्टी जमविण्यातच आयुष्याचे सार्थक मानतो. ही भावनिक लिप्तता भववृक्षाला परत नवीन जोमाने निर्माण करते आणि आपणास त्याच्या फांद्यांमध्ये अजून गुंतविते. सोडा तो जगन्मान्यतेचा मोह आणि व्हा अलिप्त. मग बघा हा भलामोठा वृक्ष कसा आपोआप नष्ट होतो ते.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक २ नोव्हेंबर २००८)