(५६ ते ६२)/१: ज्ञानेश्वरी कशी वाचावी?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जैसे शारदीचिये चंद्रकळें- । माजि अमृतकण कोवळें ।

ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे ॥ ५६:१ ॥

तियांपरी श्रोतां । अनुभवावी हे कथां ।

अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ॥ ५७:१ ॥

हे शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।

बोलाआधी झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८:१ ॥

जैसे भ्रमर पराग नेती । परी कमळदळे नेणती ।

तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९:१ ॥

कां आपुला ठाय न सांडिता । आलिंगिजे चंद्र प्रगटता ।

हा अनुराग भोगिता । कुमुदिनी जाणे ॥ ६०:१ ॥

ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंतःकरणे ।

आथिला तोचि जाणे । मानू इये ॥ ६१:१ ॥

अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणिया योग्य होती ।

तिहीं कृपा करुनि संती । अवधान द्यावे ॥ ६२:१ ॥

श्रीज्ञानेश्वरी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्गमयी मूर्ती आहे यात शंका नाही. महाराजांच्या संपूर्ण व्यक्‍तीमत्वाचे सुंदर चित्र या ग्रंथराजामधून साकार होते असे वाटते. माउलींचा आपल्या गुरुंप्रती असलेला अतीव आदर, त्यांची पराकोटीची नम्रता, समाजाकडे प्रेमाने पहायची नजर आणि भोंदूगिरीबद्दलचा तिटकारा इत्यादी सर्व गोष्टींचे स्पष्ट प्रतिबिंब श्रीज्ञानेश्वरीमध्ये पहावयास मिळते. या ग्रंथाद्वारे प्रत्यक्ष श्रीज्ञानेश्वर महाराजच आपणास परमार्थाचे गुह्य उकलून सांगावयास जवळ येत आहेत अशी कित्येक साधकांची अनुभूती आहे. या ग्रंथाचे नित्यपठण जो करील त्याला परमार्थ गवसेल यात अजिबात संदेह नाही. परंतु अशी वस्तुस्थिती असताना देखील आपण दररोजच्या व्यवहारामध्ये असे बघतो की अनेक साधक वर्षोनुवर्षे श्रीज्ञानेश्वरीची पारायणे करुनही कोरडेच राहिले आहेत. चराचरातील सर्व जीवमात्रांबद्दलची सहिष्णुता त्यांच्या अंगात भिनण्याऐवजी स्वतःला एका पंथाचे कट्‍टर अनुयायी बनवून इतरपंथीय लोकांवर टीका करण्यात त्यांना धन्यता वाटत आहे असे दिसून येते. श्रीज्ञानेश्वरीसारखा अमृतमयी ग्रंथ हातात असूनही स्वतःची साधना सहज बनविण्याऐवजी अधिकाधिक रीतीरिवाजांनी बाधण्यात त्यांना धन्यता वाटत आहे असे का आढळते यावर आज विचार करु.

असे बघा, घराबाहेरील गोठ्यात कामधेनूवत दुभती गाय बांधलेली आहे, पोटात भूक प्रज्वलित झालेली आहे आणि दूध पिण्याची अनिवार इच्छा झालेली आहे या अवस्थेतसुध्दा जर दूध काढण्याची हातोटी नसली तर उपाशी रहावे लागते. त्याचप्रमाणे, मनात जिज्ञासा जागृत झालेली आहे, गुरुंनी अनुग्रह देऊन परंपरेमध्ये सामाविष्ट केलेले आहे आणि हातात अमृतमयी श्रीज्ञानेश्वरी आहे अशा शुभ घटनांनतरही श्रीज्ञानेश्वरी कशी वाचावी हे माहिती नसले तर परमार्थ आपल्यापासून दूरच राहतो. श्रीज्ञानेश्वरीचे पठण कसे करावे याबाबत आज निरुपणाला घेतलेल्या ओव्यांमधून माउली आपणास असे सांगत आहे की : ‘ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील जीवनोपयोगी अमृत चकोरपक्षी (तन आणि मन पणाला लावून) एकाग्रतेने चाखतो (५६). त्याचप्रमाणे श्रोत्यांनी हा ग्रंथ मनाला तल्लीनत्व आणून अलगद अनुभवावा (म्हणजे निव्वळ शाब्दीक ज्ञान नको) (५७). यातील तत्वे शब्दांमध्ये सापडतील अशी अपेक्षा न करीता (म्हणजे निव्वळ श्रवणेंद्रिये वा नेत्रांद्वारे इकडे बघू नका) उच्चारलेल्या शब्दांमागील अभिप्रेत असलेल्या अर्थाकडे सतत नजर ठेवा (५८). ज्याप्रमाणे भुंगा कमळातील परागकण चोरुन नेतो हे कमळाच्या पाकळ्यांना जाणवित देखील नाही त्याचप्रमाणे या ग्रंथातील अर्थाचे सेवन करता आले पाहीजे (५९). किंवा आपले स्थान न सोडता, फूल चंद्राच्या किरणांचा आस्वाद कसा घ्यायचा हे जाणते (म्हणजे चांदण्यात कळी पूर्ण विकसित होते) (६०). त्याप्रमाणे आपल्या मनाला एकाग्र करुन, ही एकच आपल्या आयुष्याला उज्जीवन करणारी गोष्ट आहे या नजरेने जो पाहील त्यालाच परमार्थ दिसेल (६१). अहो, थोडक्यात सांगायचे झाले तर असे की अर्जुनाने ज्या पातळीवर गीता ऐकली त्याच पातळीवर जाऊन आपण हा ग्रंथ बघितला तरच जीवनाचे सार्थक होईल (६२).’

अतिशय सुंदर शब्दांमध्ये माउलींनी वाचकाच्या मनाची अवस्था कशी असावी याचे वर्णन केलेले आहे. श्रीज्ञानेश्वरांची दृष्टी अत्यंत सकारात्मक आहे म्हणून आपण काय करु नये याचे वर्णन करण्याऐवजी त्यांनी आपण काय करावे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या या सांगण्यामध्येच ‘अशा मनस्थितीशिवाय केलेली सर्व धडपड व्यर्थ आहे’ हा इशारा दडलेला आहे हे आपण विसरता कामा नये. श्रीज्ञानेश्वरी वा एकनाथी भागवत किंवा श्रीसमर्थ रामदासकृत दासबोध अशा ग्रंथाची अनेक पारायणे करुनही आपल्यात काहीच बदल कसा होत नाही अशी पृच्छा ज्या साधकांच्या मनात उद्भवली असेल त्यांनी ‘आपले प्रारब्ध नसेल’ या पळवाटेत उत्तर शोधू नये. कारण या सर्व ग्रंथांमध्ये आपल्या सर्व कर्मांचा विनाश करण्याची शक्‍ती असल्याने पूर्वकर्मांचे फळ म्हणून ग्रंथ कळत नाही असे म्हणणे अनुचित वाटते. या ओव्यांकडे लक्ष देऊन पहावे की आपण यांतील कसोट्यांना उतरतो की नाही.

झटकुनि आशेचा लेप । करुनि व्यक्‍तिमत्वाचा लोप ।

करावे अंतःकरण निर्लेप । घ्याल ज्ञानेश्वरीतून भगवंताकडे झेप ॥

‘आमची श्रीज्ञानेश्वरीवर असीम श्रध्दा आहे. जेव्हा आम्हाला काही प्रश्न भेडसावतात तेव्हा आम्ही तो प्रश्न डोक्यात ठेवून हा ग्रंथ उघडतो आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर सापडते असा आमचा नेहमीचा अनुभव आहे.’ हे शब्द उच्चारणाऱ्या साधकाच्या डोळ्यात माउलींबद्दलचे प्रेम भरुन ओसंडत होते आणि कृतज्ञतेचे हसू मुखावर होते. आयुष्यभर हा ग्रंथ सोडणार नाही अशी मनाची ठेवण या शब्दांवरुन स्पष्ट होत होती.

आपल्यापैकी अनेक साधक आपल्या गुरुंकडे वा दैवयोगाने हाती आलेल्या पारमार्थिक ग्रंथांकडे स्वतःच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यास उपयोगी वस्तू या नजरेने पहात असतात. अध्यात्माच्या मार्गावर येण्याकरीता त्यांचा हेतू ‘आहे त्या जीवनाला अधिक सुंदर बनविणे’ हा असतो. याचा अर्थ असा की त्यांना व्यावहारिक जीवनाचा उद्वेग आलेला नसतो तर संसारातील (स्वतःला जाणविलेल्या) न्यूनतेंना भरुन काढण्याचा प्रयत्‍नांचाच ‘अध्यात्म’ हा एक मार्ग असतो. हा उद्देश्य मनात ठेवून जो श्रीज्ञानेश्वरीकडे बघतो त्याला परमार्थाची गवसणी कशी होणार? माउली म्हणत आहे की अर्जुनाने गीता जशी ऐकली तशी आपण ऐकावी. अर्जुनाची योग्यता अंगी येण्यासाठी प्रथम आपण आपल्या हातातील व्यावहारिक प्रगतीचे गांडीव धनुष्य टाकून दिले पाहिजे आणि मग भगवंतांना सांगायला हवे की मी तुम्ही जसे सांगाल तसे करीन. याउलट आपण हातातील धनुष्याचीच नवी आणि सुधारीत आवृत्ती मिळविण्यासाठी भगवंताकडे जातो!!

माउली म्हणत आहे ‘भ्रमर पराग नेती/ परि कमळदळे नेणती’ स्वतःच्या शरीराचा एक अंशसुध्दा फुलाला न टेकविता अलगदपणे भुंगा परागकण घेऊन जातो त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या व्यक्‍तीमत्वाचा थोडासासुध्दा अंश मनात न ठेवता श्रीज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणजे काय, तर ‘मी एक अमुक-अमुक व्यक्‍ती आहे, माझ्या फलाण्या इच्छा आहेत, मनात अमुक प्रश्न आहेत’ इत्यादी भावनांचा संपूर्ण त्याग करुन आपण हा ग्रंथ उघडला पाहीजे. मनात प्रश्न ठेवून जे हा ग्रंथ उघडतात त्यांना माउलींना अभिप्रेत असलेला अर्थ कळणार का आपल्याच इच्छांचे प्रतिबिंब दिसणार या प्रश्नाचे उत्तर वेगळे सांगायची गरज नाही. माउलींच्या दुसऱ्या उदाहरणातील कळी स्वतःच्या संकुचित जीवनाला बसल्या ठिकाणी तिलांजली देऊन उगविलेल्या चंद्राच्या प्रकाशात उमलून फूल होते. त्याचप्रमाणे आपण मनात अत्यंत प्रेम ठेवून निव्वळ त्या प्रेमाखातीर श्रीज्ञानेश्वरीचे वाचन केले तर का होणार नाही आपल्या जीवनात आमुलाग्र बदल? एखाद्या मेळ्यामध्ये गेल्यावर आपणास कधी चित्रविचित्र आरसे असणारा तंबू दिसतो. आपल्या शरीराचे वेगवेगळे बेढब रुप त्यामधून दिसते. श्रीज्ञानेश्वरी म्हणजे असा एक निर्मळ, स्फटीक आरसा आहे की आपले खरे रुप त्यामध्ये दिसू शकते. प्रत्येक साधकाला जो अर्थ परमार्थाच्या मार्गावर चालायला उपयुक्‍त असतो तोच श्रीज्ञानेश्वरी त्याला दाखविते. परमार्थाच्या सर्व मार्गांचे सुप्त रुप माउलींच्या ओव्यांत साठलेले आहे. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात की ‘म्हणऊनि महाभारती नाही । ते नोहें लोकीं तिहीं । येणेकारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७:१॥’. परंतु हेच उद्गार श्रीज्ञानेश्वरीलाही परमार्थाबाबत लागू होतात. प्रत्येकाच्या दृष्टीस जे पडेल तेच त्याच्या प्रगतीला सहाय्य करेल. परंतु त्यासाठी स्वतःची दृष्टी स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे. आपण स्वतःच्या डोळ्यावर काळा चष्मा लावून अंधार झाला आहे अशी तक्रार करणे ज्याप्रमाणे निरर्थक असते त्याचप्रमाणे व्यावहारिक दृष्टीला बाजूला न करीता गुरुंकडे जाणे परमार्थाच्या दृष्टीकोनातून अर्थहीन आहे.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मनातील ‘सर्व’ महत्वाकांक्षांचा लोप केल्याखेरीज आपली नजर साफ होत नाही. इथे आपली इच्छा ‘ज्ञानेश्वरीचा अर्थ जाणून घ्यावा’ अशी पारमार्थिक असली वा ‘कचेरीतील विचित्र स्वभावाच्या सहकाऱ्याकडून सहकार्य कसे मिळवावे’ अशी व्यावहारिक असली तरी त्या दोहींचा परीणाम ज्ञानेश्वरीतील तत्वे न दिसण्यातच होतो हे साधकाने लक्षात ठेवले पाहीजे. सर्व इच्छा चुकीच्या आहेत. पारमार्थिक इच्छा मनात ठेवल्याने व्यावहारिक वासनांचा विनाश करणे हे काट्याने काटा काढण्यासारखे आहे. एकदा रुतलेला काटा निघाला की आपण हातातील काटाही बाजूला ठेवतो त्याचप्रमाणे साधकाला अध्यात्मिक इच्छांनासुध्दा काढावे लागते. मनाला सकृतदर्शनी पारमार्थिक इच्छांमध्ये गुंतविणे हा इच्छांमधून बाहेर पडण्याचा मार्गच होऊ शकत नाही. आणि जो पर्यंत मनात इच्छा जागृत आहेत तो पर्यंत आपले स्वतःचे वजन आपण ग्रंथावर टाकत आहोत, अलगद त्याचा स्वाद घेण्यास अपात्र होत आहोत हे ध्यानात घ्या. अशा निःसंदेह जाणीवेतच सर्व इच्छांचे निरसन करण्याचे सामर्थ्य आहे. ज्याप्रमाणे जगण्याची अनिवार ओढ असल्याने स्वतःला हृदरोगाचा झटका बसला की आपोआप धूम्रपानाचे व्यसन सुटते त्याचप्रमाणे एकदा इच्छा ठेवल्याने भगवंत मिळणे अशक्य आहे हे कळले की आपोआप इच्छा नष्ट होऊन मन निर्लेप बनते. परंतु याआधी चकोराला ज्याप्रमाणे शरदीय पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशाबद्दल अतीव प्रेम असते त्याचप्रमाणे परमार्थाला गवसणी घालण्याबद्दलचे प्रेम आपल्या मनात असणे जरुरी आहे. आणि एकदा हे प्रेम मनात उद्भवले की श्रीज्ञानेश्वरी स्वतः साधकाचा हात धरुन भगवंताकडे घेऊन जाते यात संदेह नाही. माउलींनी हे वचनच आपणास दिलेले आहे!!

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थळ

(बंगलोर, दिनांक ३१ जानेवारी २०१०)