श्लोक (११+१२)/५: साधना केव्हा थांबवावी?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

कायेन मनसा बुध्द्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वाऽत्मशुध्दये ॥ गीता ११:५ ॥

युक्‍तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्‌ ।

अयुक्‍तः कामकारेण फले सक्‍तो निबध्द्यते ॥ गीता १२:५ ॥

साधक आणि सिध्द या दोघांमध्ये काय फरक असतो? जीवनामध्ये असा एक क्षण येतो का की ज्याआधी मनुष्य साधक असतो आणि त्या वेळेनंतर सिध्द झालेला असतो. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या एकदिवशीय सामन्यात शेवटी विजयी धाव घेतल्यावरच जय प्राप्त होतो तसे काही साधकाच्या जीवनात होते का? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी साधना सुरु करणे म्हणजे खेळ केव्हा संपणार याची माहिती करुन न घेता खेळणे सुरु करणे होय. परंतु आपल्यापैकी कुणीही या प्रश्नाचा विचार करुन मग साधना सुरु केलेली दिसत नाही. जीवनातील फार थोड्या गोष्टी आपण पुढचा विचार करुन सुरु करतो आणि आपले परमार्थाच्या मार्गावरील पदार्पणही असेच सहजपणे होते. सर्वसाधारणपणे असे आढळून येते की एखाद्या व्यक्‍तीच्या प्रभावाखाली येऊन आपण साधना करण्यास उद्युक्त होतो किंवा जीवनामधील एखाद्या आणिबाणीच्या प्रसंगातून सुटका मिळण्यासाठी साधना सुरु करतो. एकदा आपल्या प्रामाणिक साधनेला सुरुवात झाली की काही छान अनुभव येतात आणि साधना सोडावी असे वाटत नाही. साधना सोडण्याचा विचार करणेसुध्दा अयोग्य वाटू लागते, गुरुंशी प्रतारणा केल्यासारखे वाटते. त्यामुळे साधना थांबविणे डोक्यात आले तरी अपराधीपणाची भावना मनात येऊन आपण तो विचार दूर सारतो.

खरी गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे दुधाचे दही केव्हा होते हे कळत नाही त्याप्रमाणे साधक सिध्द होतो. ज्याप्रमाणे बालकाच्या शरीराची वाढ नकळत होते त्याप्रमाणे साधकाचे सिध्दावस्थेत रुपांतर होते. आणि दही लागल्यानंतर आंबट होऊ नये म्हणून शीतगृहात ठेवतात त्याप्रमाणे सिध्द झाल्यावर साधनेच्या अट्‍टाहासापासून मनुष्याला अलिप्त व्हावे लागते. एकदा सहज जीवन जगायची कला प्राप्त झाली की साधनेचेसुध्दा बंधनच होते. परमार्थातील हे अत्यंत मूलभूत उत्तर फार कमी सांगतात असे दिसून येते. श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्रीज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायात असे स्पष्ट सांगितले आहे की ‘ज्याप्रमाणे गंगेचा आवेग सागराजवळ आल्यावर थंड होतो वा पत्‍नी पतीसमीप आल्यावर स्थिरावते वा एखादा मार्ग गावाजवळ आल्यावर सरळ न जाता वळण घेतो त्याप्रमाणे साधकाला आत्मसाक्षात्कार झाला की तो साधनेचे हत्यार हळूवारपणे खाली ठेवतो (पहा ओव्या १०८१ ते १०८३, अध्याय १८). बहुतेक गुरु ‘तुम्ही साधना सुरु करा आणि तुम्हाला अनुभव यायला लागतील’ असेच सांगतात आणि त्या शब्दांवर आपण संतुष्ट राहतो. अनुभव आल्यावर पुढे काय असे विचारण्याचे जो धारीष्ट्य दाखवितो त्याला ‘ते तेव्हा कळेल’ या उत्तरावर समाधान मानावे लागते.

एकदा साधनेच्या मार्गाला लागलो की आयुष्यभर साधना करावीच लागणार या खात्रीमुळे कित्येकजण साधना सुरु करण्यासच धजावत नाहीत! कारण आयुष्यभर आपण एक ठराविक गोष्ट करु शकू याबद्दल त्यांना खात्री नसते. परमार्थात नक्की कुठली गोष्ट मिळवायची आहे हे न कळल्याने साधकाच्या मनात गोंधळ झालेला असतो. या गोंधळामुळे प्रत्येकाच्या मनात साधनेच्या परिपूर्णतेची वेगवेगळी व्याख्या असते. प्रत्यक्ष अर्जुनाच्या मनातही हा संदेह दिसून येतो म्हणूनच साधनेच्या अंतिम स्थितीत पोहोचलेल्या साधकाची अवस्था कशी असते असे अर्जुन गीतेमध्ये वारंवार विचारतो असे दिसते. आणि भगवान श्रीकृष्ण त्याला कधी स्थितप्रज्ञ माणसाची तर कधी ज्ञानी मनुष्याची तर कधी आदर्श भक्‍ताची लक्षणे सांगतात कारण त्यांना सर्व साधकांच्या मनातील या मूलभूत प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकातही भगवान अर्जुनाला संन्यासयोगाची पूर्णता प्राप्त करुन घेतलेल्या सिध्दाची लक्षणे सांगत आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत: ‘शरीराने, मनाने, बुध्दीपूर्वक आणि निव्वळ इंद्रियांतर्फे जी कर्मे होतात ती सर्व योगी करताना दिसतो परंतु स्वरुपाच्या जाणीवेत असल्याने त्या कर्मांचा ‘मी कर्ता आहे’ या समजुतीतून ते मुक्‍त असतात. (कर्तेपणा सोडल्याने उत्पन्न झालेल्या) कर्मफलाच्या निरिच्छतेमुळे योग्यांच्या मनातील शांति शाश्वत असते. कर्तेपणापासून मुक्‍तता प्राप्त न करता कर्मे केल्याने कर्मफलाची अपेक्षा निर्माण होते व मनुष्य बांधला जातो.’ सिध्द आणि साधक यातील फरक त्याच्या जीवनात कुठल्या घटना घडतात यावर अवलंबून नसून ज्या काही गोष्टी घडतात त्यांच्याकडे पहायची दृष्टी कशी आहे यावर अवलंबून आहे हे या श्लोकांतून सिध्द होते.

साधना करा आणि अनुभव मिळवा असे जेव्हा गुरुमुखातून ऐकायला येते तेव्हा आपण काही दिव्य अनुभवाची वाट पहात बसतो. आणि ज्याची वाट बघतो ते मिळतेच! तेव्हा, कधीनाकधी ध्यानात आपणास निळसर प्रकाश दिसणार आणि अनाहत नाद ऐकायला येणार यात शंका नाही. अशा अनुभवांनी साधक सिध्द बनत नसतो तर दररोजच्या जीवनातील नेहमीच्या घटना घडत असताना त्या आपोआप घडत आहेत आणि आपले देह-मनाचे संकुल निव्वळ निमित्तमात्र आहे याची स्पष्ट जाणीव सतत होत राहणे यात सिध्दावस्था प्रगट होत असते. गुरुपोदिष्ट साधनाही आपोआप घडत आहे, आपला त्यात काहीही सहभाग नाही ही जाणीव जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा साधना सोडायला हरकत नाही असे भगवान आपणास सांगत आहेत असे वाटते. ज्या लोकांना अशी भिती आहे की एकदा साधनेचा अंगिकार केला की ती आयुष्यभर करायचे ओझे डोक्यावर येईल त्यांनी हा विचार जरुर मनात ठेवावा. निव्वळ साधना करण्यात जीवन गेले तर जीवनातील सत्य कधीही आपल्या हातात येणार नाही. कारण जे सत्य आहे ते साचेबध्द आणि रहाटगाडग्यासारखे नियमित नसते तर नित्यनूतन आणि स्वयंभू असते, कुणावरही अवलंबून नसते. त्यामुळे ते रहाटगाडग्यासारख्या चाकोरीबध्द साधनेच्या हातात सापडेल याची सुतराम शक्यता नसते.

बँकेत जसे पैसे ठेवतो । आपण तशी साधना करतो ।

उपयुक्‍ततेची अपेक्षा जो ठेवतो । व्यवहार त्याने सोडलेला नसतो ॥

साधनाफलाची अपेक्षा जो सोडेल । खरा परमार्थ तोच करेल ॥

आपल्या मनात सुखाची एक व्याख्या असते. जी माणसे भौतिक जगात रस घेणारी असतात त्यांना सुख या शब्दात संसारातील गोष्टींचा समुचय दिसतो आणि जी माणसे ‘उच्च’ पातळीवर विचार करतात त्यांना सामाजिक सुविधांमध्ये वा ‘भगवंत प्राप्तीमध्ये’ सुख दिसते. सुख मिळण्याआधीच ते कसे असावे याची पूर्ण कल्पना या दोन्ही तऱ्हेच्या माणसांना असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये तत्वतः काही फरक आहे असे वाटत नाही. सुख काय हे स्पष्ट असल्याने त्यांना सुखप्राप्तीचे मार्गसुध्दा साफ दिसत असतात. व्यावहारिक मनुष्य पैसे जमवायचा प्रयत्‍न करतो आणि पारमार्थिक गृहस्थ गुरुंच्या अनुकरणामध्ये धन्यता मानतो. या सर्वांना आपल्या मार्गाने गेल्यावर सुख मिळणार आहे याची खात्री असते पण हा मार्ग आपण एकटे चालू शकू का नाही याबद्दल शंका असते. सर्वसाधारणपणे साधक श्रीगुरुंकडे आपल्यातील न्यूनत्व पूर्ण करणारी शक्‍ती अशा नजरेने बघत असतात. परंतु कुठलीतरी शक्‍ती जवळ बाळगल्याने आपले न्यूनत्व नाहीसे होत नाही हे लक्षात घ्या. हातात आलेल्या उपकरणाचा उपयोग करुन आपण फारतर आपल्या कमतरतेचे दुष्परिणाम कमी करु शकतो, कमतरता नाहीशी करु शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कमजोर माणसाने बलवान मनुष्याला अंगरक्षक म्हणून नेमला तर त्याची कमजोरी कमी होत नाही पण कमजोरीचा फायदा घेऊन त्रास देणारी माणसे दूर जातात. तेव्हा गुरु आपल्याबरोबर आहेत म्हणून आपली दुर्बलता दूर होत नाही तर त्या दुर्बलतेचा फायदा उठविणाऱ्या दुष्ट शक्‍ती आपल्यापासून दूर होतात. आपल्या साधनेत अडथळे आणणाऱ्या घटनांवर नियंत्रण येते. परंतु त्यामुळे आपल्यात सत्यता जाणून घ्यायची शक्‍ती निर्माण होऊ शकत नाही.

सांगायचा मुद्दा असा की साधनेमुळे वा श्रीगुरुंमुळे आपण साध्य प्राप्त करायची लायकी मिळवत नाही तर ध्येयप्राप्तीतील अडथळे दूर सारण्याचे सामर्थ्य मिळवितो. ध्येय मिळवायचे सामर्थ्य आपणा सर्वांमध्ये उपजतच असते. आपणापैकी प्रत्येकाकडे भगवंतप्राप्ती करायचे बळ आहे. हे बळ म्हणजेच आपल्यामध्ये असलेले भगवंताचे प्रतिबिंब होय. कारण केवळ भगवंतच भगवंताला भेटू शकतो. समान पातळीवरील गोष्टींचाच एकमेकांशी संयोग होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्याकुणाला भगवंताला भेटायची इच्छा आहे त्याने आपणामध्ये भगवंत आहे हे जाणले पाहीजे. नाहीतर आपली इच्छा पुरी होऊच शकणार नाही. गुरुंना जवळ केल्याने आपली भगवंताशी भेट होईल असे मानणे संयुक्‍तिक का नाही याचे हे विश्लेषण आहे. म्हणूनच संतांच्या कुटुंबियांना भगवंत भेटणारच अशी खात्री आपण देऊ शकत नाही.

वरील विवेचनावर सखोल विचार करुन एकदा आपली स्वतःमध्ये असलेल्या भगवंताच्या प्रतिबिंबाबद्दल निःसंदेह खात्री झाली की आपण त्या छबीला आपले स्वरुप मानायला लागतो. ही घटना साधकाच्या आयुष्यात घडल्याशिवाय कर्मफळाची आसक्‍ती दूर होणार नाही असे भगवंत आपणास सांगत आहेत. दुसऱ्या व्यक्‍तीचा आधार न घेता आपल्यामधील भगवंताचे रुप जेव्हा दिसते तेव्हा साधकाची सर्व धडपड संपूर्णपणे थांबते आणि तो सहज अवस्थेत आपले जीवन जगायला लागतो. त्या सहजतेमध्येच शाश्वत सुखाचा पाया आहे. आपल्या कुठल्याही प्रयत्‍नांनी उत्पन्न होणाऱ्या गोष्टीमध्ये शाश्वत सुख असणे शक्यच नाही कारण आपले प्रयत्‍नच अशाश्वत आहेत. आणि अशाश्वत गोष्टीवर उभारलेल्या गोष्टी कशा निरंतर राहतील? एकदा साधकाला आपल्या आत्मरुपाची गोडी लागली की बाकी कुठल्याही शक्‍तीची त्याला जरुरी लागत नाही. स्वतःच्या पायावर सहजपणे उभ्या राहीलेल्या साधकाच्या मनातील शांतीचे वर्णन करणे कुणाला शक्य आहे? आणि ही एकनाथांसारखी कधीही न ढळणारी शांतीच साधनेची परिपूर्णता झाली की नाही याचे परीमाण आहे.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर, दिनांक २० डिसेंबर २००९)