गीता श्लोक (१५ ते १७)/७: भक्‍तीचे प्रकार

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यंते नराधमाः ।

माययाऽपह्रुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ गीता १५:७ ॥

चतुर्विधां भजंते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरर्थाथी ज्ञानी च भरतर्षभ ॥ गीता १६:७ ॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्‍त एकभक्‍तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ गीता १७:७ ॥

कलियुगामध्ये भक्‍तिमार्ग सहजसाध्य आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ‘तुम्ही फक्‍त रामनाम घ्या. बाकी सर्व आपोआप होईल’. आपणा सर्वांनाच या सुलभ उपायाचा मोह होतो. एवढेच नव्हे तर भक्‍तीमार्ग सर्वात सोपा आहे हे मान्य केल्याने आपण स्वतःची अध्यात्ममार्गावर चालण्याची क्षमता बघण्यास ‘मनात किती भक्‍ती आहे’ हेच प्रमाण वापरतो. सर्वसाधारणपणे उच्चशिक्षित वर्ग स्वतःला परमार्थाच्या मार्गावर चालण्यास असमर्थ ठरवितात ते स्वतःमध्ये भगवंतावर भक्‍ती वा विश्वास नाही या निकषावरच. (‘अध्यात्म आपणास जमणार नाही कारण भगवंतावर विश्वास आहे असे मी म्हणू शकत नाही’ असे आपण सर्वांनी ऐकलेले आहे)

खरी गोष्ट अशी आहे की या जगातील सर्वच मार्ग भगवंताकडेच जातात. भगवंतावर अविश्वास असणाऱ्यांनी आपल्या संशयी स्वभावाला दोष न देता त्याचा फायदा घेतला पाहिजे. तुम्ही भगवंतावर अविश्वास दाखविता तर तोच संशय व्यवहारातील प्रगतीच्या धडपडीबद्दल, स्वतःच्या नातेवाईकांच्या प्रेमाबद्दल, अगदी आपल्या स्वतःच्या वर्तनामागील हेतूंबद्दलसुध्दा जागृत ठेवा! जगातील कुठल्याच गोष्टींवर विश्वास न ठेवता जगा. असा पराकोटीचा संशयी स्वभावसुध्दा तुम्हाला भगवंताजवळच घेऊन जाइल. आपली चुक अशी होते की आपण देवावर विश्वास ठेवत नाही पण व्यायाम केला की आपण तंदुरुस्त राहू यावर कितीही विरोधाभासी उदाहरणे डोळ्यासमोर आली तरी विश्वास ठेवतो. आपला संशयीपणा संधीसाधू आहे. ज्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही तरी काही बिघडत नाही (उदाहरणार्थ, भगवंताचे अस्तित्व) अशा गोष्टींबाबत तात्विक उहापोह करुन आपला अविश्वास आपण दर्शवितो. आणि स्वतःच्या पत्नीच्या प्रेमाबद्दल अविश्वास दाखविला तर रोजच्या जेवणाची पंचाईत होईल हे माहित असल्याने त्यावर विश्वास ठेवतो! अशा सोयीस्कर वागण्याचा आपणास परमार्थामध्ये तोटा होतो. भगवंतावर श्रध्दा नाही याचा ज्यांना खेद होतो त्यांनी जरा विचार करावा की आपली कुणावर श्रध्दा आहे आणि ती का आहे? सर्व जगाबद्दल संशय निर्माण झाला की आपोआप भगवंतावर विश्वास बसेल यात शंका नाही! असो. तेव्हा साधकाच्या मनात सुरुवातीपासून भगवंताबद्दल भक्‍ती असायलाच हवी अशी कुणाही संतांची मागणी नाही, भगवंताची तर नाहीच नाही. साधकाच्या मनात सत्य जाणून घ्यायची ओढ असली तरी पुरेसे आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भक्‍तीची आवश्यकता तात्पुरती मान्य केली तरी ‘भक्‍ती’ या शब्दाचा खरा अर्थ सगळ्यांना ज्ञात असतोच असे नाही. ज्या भक्‍तीबद्दल आपणा सर्वांच्या मनात आस्था आहे ती एकसंध नाही. भक्‍तीचे अनेक प्रकार आहेत आणि चुकीची भक्‍ती मनात असली तर भगवंताजवळ जाणे असंभव आहे. आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकांमधून भगवंत आपणास चार प्रमुख प्रकारच्या भक्‍तांची ओळख करुन देत आहेत. सर्वसाधारणपणे या चारपैकी पहिल्या तीन प्रकारांचे एक मिश्रण करुन प्रत्येकाची भक्‍ती असते. ज्याप्रमाणे तीन मूळ रंगांच्या वेगवेगळ्या मिश्रणाने सर्व रंग तयार होतात त्याचप्रमाणे ‘आर्त’, ‘अर्थार्थी’ आणि ‘जिज्ञासू’ यांच्या मिश्रणातून सामान्य साधकाची भक्‍ती उत्पन्न झालेली असते. म्हणून भगवंत भक्‍तांचे वर्गीकरण केवळ चार भागांत करीत आहेत. भगवान श्रीकृष्ण वरील श्लोकांतून अर्जुनास म्हणत आहेत: ‘माझ्या मायेमध्ये गुंतल्याने मतीमंद झालेले अविवेकी पुरुष पापाचरण करुन आसुरी प्रवृत्तीला बळी पडतात व मला शरण येत नाहीत (१५). अर्जुना, मला शरण येणाऱ्या पुण्यशील माणसांचे ‘आर्त’, ‘जिज्ञासु’, ‘अर्थार्थी’ आणि ‘ज्ञानी’ असे चार प्रकार असतात (१६). या चौघांमध्ये निव्वळ ज्ञानी भक्‍त माझे अखंड भजन करतो कारण माझ्यावरील प्रेमाशिवाय त्याच्या जीवनात दुसरे काही शिल्लकच राहीलेले नसते. म्हणून तो सर्वांत श्रेष्ठ आहे. त्याला केवळ मीच प्रिय असल्याने तो मला अतिशय प्रिय असतो (१७).’

जाता भगवंताला शरण । मनात असेल काही कारण ।

नव्हे ती भक्‍ती हे जाण । निखळ प्रेम हीच भक्‍तीची खूण ॥

‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ अशी मराठीत एक म्हण आहे. जीवनात आपल्याला जो मदत करु शकतो त्यालाच आपण नमस्कार करतो या वस्तुस्थितीचे परखड वर्णन करणाऱ्या या म्हणीमध्ये भगवंतही जमा होतो! जरा विचार करुन बघा की आपला भगवंतावर विश्वास आहे असे आपण म्हणतो ते त्या विश्वासाला पाठींबा देणाऱ्या अनेक घटना आपल्या जीवनात घडलेल्या असल्याशिवाय नाही. आणि आपल्या मनाविरुध्द घटना घडली की आपण लगेच देव असून असे कसे घडते असे विचारतो. कुठलातरी हेतू मनात ठेवूनच आपण भगवंताची आराधना करतो यातच आपल्या मनातील चमत्काराची अपेक्षा स्पष्ट होते. प्रत्येकाची कारणे निराळी असतील. कुणी स्वतःच्या प्रगतीकरीता भगवंताला प्रसाद देत असेल तर कुणी जिवलग माणसाच्या भल्याकरीता नवस बोलत असेल. कुणी समाजाच्या भल्याकरीता यज्ञ करीत असेल तर कुणी आपल्या शत्रूंचा नायनाट करण्यास भगवंताची उपासना करीत असेल. यांमधील योग्य हेतू कुठले आणि अयोग्य कुठले याचा निर्णय सामाजिक वा नैतिक दृष्टीने घेता येईल. पण पारमार्थिक नजरेने बघितल्यास सर्व हेतू चुकीचे आहेत असे भगवंत या श्लोकांतून म्हणत आहेत. कारण जो मनुष्य कुठल्याही कारणाशिवाय भगवंताची भक्‍ती करतो तोच एक भगवंताला प्रिय आहे त्यांनी उघडपणे म्हटले आहे. त्यांची नजर फक्‍त साधकाच्या मनातील प्रेमावर असते. ज्याच्या मनात भगवंताबद्दल प्रेम आहे त्याचे भजन कारणविरहीत असते कारण प्रेम करायला हेतू लागत नाही. ज्याप्रमाणे आपले स्वतःच्या अस्तित्वावर कारणविरहित प्रेम आहे त्याचप्रमाणे ज्ञानी भक्‍ताच्या मनात देवाबद्दल आस्था आहे. असा भक्‍त भगवंताचे गुण गातो तो स्वतःच्या प्रेमाचे समर्थन करण्यासाठी नाही तर ह्रुदय फोडून बाहेर येणाऱ्या प्रेमाला व्यक्‍त करण्यासाठी. त्याच्या जीवनातील नमस्कार चमत्कारावर आधारित नसतो तर स्वयंभू निर्माण झालेला असतो. तेव्हा भक्‍ती मनात आहे असे म्हणणाऱ्यांनी विचार करायला हवा की आपल्या मनातील भगवंताबद्दलची आस्था एका ठराविक चमत्काराच्या अपेक्षेने झालेली आहे की ती पूर्णपणे निर्हेतूक आहे.

वरील श्लोकांवरुन अजून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे भगवंत अर्जुनाला असे सांगत नाहीत की हे चार प्रकार म्हणजे भक्‍तीच्या पायऱ्या आहेत की ज्या चढून तू माझ्याजवळ येशील. तेव्हा आपण ‘सध्या तू आर्त भक्‍ती करीत आहेस, ती हळू हळू ज्ञानी माणसाच्या भक्‍तीमध्ये रुपांतरीत होईल’ असे म्हणून स्वतःला गोंजारु शकत नाही हे लक्षात घ्या! याचे कारण असे की पहिल्या तीन्ही प्रकारच्या भक्‍तींमध्ये अहंकार दडलेला आहे. आपल्या संकुचित अस्तित्वाला पुढे ठेवल्यानेच आपल्या मनात ‘आर्तता’ वा ‘विषयपूर्तीची तळमळ’ वा ‘बुध्दीच्या मागणीला पूर्ण करण्याची इच्छा’ निर्माण होते. निव्वळ प्रेमामध्येच स्वतःच्या अस्तित्वाचा विनाश होतो. आपल्या बाकी सर्व खटाटोपींने स्वतःच्या अहंकाराचे वर्धनच होते. माउलींच्या अद्वितीय भाषेत सांगायचे म्हणजे ‘एखादा स्फटीक पाण्यात बुडवून ठेवला तर तो पाण्यासारखाच दिसतो, पण त्याचे मूळ रुप बदलत नाही. पाण्यातून बाहेर काढल्यावर परत तो आहे तसाच होतो.’ आपण जोपर्यंत भगवंताची आराधना करतो तोपर्यंत आपल्यात आणि ज्ञानी माणसाच्या भक्‍तीत काही फरक नाही. पण जेव्हा आपण स्वतःला भक्‍तीच्या पाण्यातून बाहेर काढतो (म्हणजे गुरुगृहातून वा देवळातून घरी परत जातो) तेव्हा आपले मूलरुप परत बाहेर येते! आपल्या अहंकाराचा स्फटीक आहे तसाच राहतो. ज्ञानी मनुष्याने स्वतःला भक्‍तीच्या मधुर रसात संपूर्णपणे विरघळविले असल्याने तो त्यातून बाहेर येऊच शकत नाही! अशा भक्‍ताचे वर्णन कसे होऊ शकते? पहा:

परी आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटीकचि भासे उदक ।

तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगता तो ॥ ११३:७ ॥

जैसा वारा गगनी विरे । मग वारेपण वेगळे नुरे ।

तेवीं भक्‍त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४:७ ॥

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणे । मी आत्मा ऐसे तो जाणे ।

म्हणऊनि मीही तैसेचि म्हणे । उचंबळलासांता ॥ ११७:७ ॥

सांगायचा मुद्दा असा आहे की स्वतःला भक्‍त म्हणऊन घेताना आपण फार सावध असायला हवे आणि आपण भक्‍त नाही असे वाटले तरी न्यूनगंड बाळगला नाही पाहीजे. आपल्या कुठल्याही क्रियांनी आपण भगवंताकडेच खेचले जात आहोत यात शंका नाही. आपली परमार्थामध्ये प्रगती होत नाही ती स्वतःच्या अहंकाराचा त्याग न केल्याने, आपल्या मनात भगवंतावर किती श्रध्दा आहे याचा त्याच्याशी संबंध नाही. संतांनी एखादा मार्ग सोपा म्हटला असेल पण त्यांचे ते वाक्य आपणास लागू असेलच असे नाही. बाकीच्यांना सोपी वाटणारी गोष्ट आपणास कठीण असू शकते आणि आपण सहज करतो ती गोष्ट बाकी लोकांना करण्यास अशक्य असेल. आपण जसे आहोत तसे भगवंताकडे जायला पात्र आहोत परंतु आपले संकुचित अस्तित्व बहूमूल्य स्फटिकाप्रमाणे जपून ठेवायची आपली धडपड पूर्ण थांबल्याशिवाय आपल्यातील नैसर्गिक कुवतीचा आपण फायदा उठवू शकणार नाही.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे संकेतस्थल

(बंगलोर, दिनांक २८ मार्च २०१०)