(1to6)/16: Go near your innerself

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।

अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आता ॥ १:१६ ॥


जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां ।

जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ २:१६ ॥


जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।

सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी ॥ ३: १६ ॥


लिंगदेह कमळाचा । पोटीं वेचतया चिद्‌भ्रमराचा ।

बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥ ४:१६ ॥


शब्दाचिया आसकडी । भेदनदीच्या दोहीं थडी ।

आरडाते विरहवेडी । बुध्दीबोधु ॥ ५:१६ ॥


तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान ।

भोगवी जो चिद्गगन- । भवनदिवा ॥ ६:१६ ॥


आपल्या सद्‌गुरुंना सूर्याची उपमा देऊन ती किती सार्थक आहे याचे वर्णन करणाऱ्या ह्या सोळाव्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनाच्या ओव्या जितक्या गूढ अर्थाने परिपूर्ण आहेत तितक्याच साहित्यिक सौदर्याने नटलेल्या आहेत. तसे पहायला गेले तर सर्व संतांना निःशंक आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि त्यामुळे त्यांच्या साहित्यिक कृतींमध्ये बोध संपूर्णपणे ठासून भरलेला असतो यात शंका नाही. उदाहरणार्थ, तुम्ही गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचा वा एकनाथी भागवताचे पठण करा. तुकारामांच्या गाथेतील अभंग बघा वा श्रेष्ठ संत श्री रामदासांचा दासबोधाचे अध्ययन करा. या सर्वांमध्ये आपणाला आत्मज्ञान करुन घेता येईल असा बोध ठासून भरलेला आहे. परंतु श्री ज्ञानेश्वरीची गोष्ट काही वेगळीच आहे. निव्वळ बोध प्रदान करणाऱ्या ह्या ओव्या नसून यामध्ये साहित्याचे सर्व रंग दडलेले आहेत. ही प्रतिभा इतकी असामान्य आहे की या कृतीच्या जनकाला आपोआपच ज्ञानेश्वर ही पदवी प्राप्त होते. खरोखर, मराठी साहित्यामध्ये अशी दुसरी कृती दिसत नाही. आणि ज्ञानेश्वरीतही जेव्हा आपल्या सर्व प्रतिभेला पणाला लावून ज्ञानेश्वर महाराज सद्‌गुरुस्तवन करतात तेव्हा साहित्यिक सौंदर्य पराकोटीचे खुलून येते. मग ते चौदाव्या अध्यायात ‘कीं पुढिलांची दृष्टी चोरिजे । हा दृष्टीबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें। जे आपणपें चोरे॥’ असे उद्‌गारतात आणि ‘आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥, तयापरी श्रीगुरु । करिती जे अंगिकारु । तै होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा॥’ अशी ग्वाही देतात. आपल्या प्रतिभेला संपूर्णपणे मोकळिक देऊन त्यांनी केलेल्या सद्‌गुरुस्तवनांतील गूढार्थ जाणून घेणे अतिशय अवघड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ‘अतिशयोक्ती’ या अलंकाराने पूरेपूर भरलेली ही स्तवने वस्तुस्थितीमध्ये सत्याच्या पायावर उभी आहेत. यातील एकही शब्द सत्याला सोडून नाही. परंतु आपली दृष्टीच एवढी भव्य नाही की या अलंकारीक भाषेमागील सत्य आपण बघू शकू. असे बघा, आपल्यासमोर कुणी हिरे-माणकांचा हिमालयाएवढा डोंगर जरी उभा केला तर त्याची संपूर्ण भव्यता पाहणे आपणास शक्य आहे का? मग तो घरी घेऊन जायची बातच सोडा. आपल्याला ओंजळीत उचलता येईल इतकीच रत्ने आपण घरी नेऊ शकतो. त्याचप्रमाणे, सद्‌गुरुस्तवनाद्वारे जी अप्रतिम कृती आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवली आहे तीचे संपूर्ण आकलन करणे कुणाला शक्य आहे? आपल्या संकुचित दृष्टीकोणामुळे संपूर्ण चित्र आपण बघूच शकत नाही. त्यामुळे एका मोठ्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी चितारलेल्या चित्रातील कुठल्यातरी एका कोपऱ्यावरचा काळा रंग बघून काय घाण आहे असा निष्कर्ष आपण काढू लागतो. म्हणूनच जगामध्ये सर्वकाही योग्य घडत आहे या सत्य परिस्थितीची ग्वाही सर्व संतांनी दिलेली असली तरी आपल्या नजरेस फक्‍त आपलेच विश्व दिसत अस्ल्याने मनात ‘या जगात किती अन्याय होत असताना संत असे कसे म्हणू शकतात’ हीच भावना उद्भवते! असो.

सांगायची गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीतील एकही ओवी वस्तुस्थिती सोडून नाही हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. वरील ओवींमागील सत्यता जाणून घ्यायचा एक प्रयत्‍न आज आपण करुया. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत “विश्वाचा आभास मावळवीत नवलपूर्ण सूर्य उगविला आहे, अद्वैत कमळाचा विकास करणाऱ्या ह्या अद्‌भुत सूर्याला (आपण) वंदन करुया. जो अविद्यारुपी रात्रीला नष्ट करुन (त्यातील चमचमणाऱ्या) ज्ञान आणि अज्ञान ह्या चांदण्या गिळून टाकतो आणि ज्ञानीजनांना आत्मबोधाचा प्रकाश दाखवून सुदिन उजाडवतो, ज्याच्या उदयाने झालेल्या पहाटेच्या प्रकाशामुळे जीवरुपी पक्षी ‘मी म्हणजे देह’ ह्या अहंकाराचे घरटे सोडतात (स्वतःच्या देह-मनाच्या संकुलाशी आत्मीयता नष्ट होते) आणि आपल्या ‘चित’रुपी अस्तित्वाचा भ्रमर ज्या मन आणि देहाच्या कमळामध्ये बंदिस्त झाला होता त्याची (सूर्य उगविल्यावर कमळे उमलतात म्हणून) त्या बंदिवासापासून सुटका होते. ‘शब्दांचा आधार घेऊन जग जाणणे’ ह्या भूमिकेत अडकल्याने निर्माण झालेल्या द्वैतरुपी अस्तित्वाच्या नदीच्या दोन तीरांवर ‘बुध्दी’ आणि ‘बोध’ ही चक्रवाक पक्षांची जोडी विरहाने आरडाओरड करीत होती त्यांचे ‘सर्वांभूती समभाव’ ह्या रुपाचे मिथुन आपल्या चिद्‌गगनामध्ये उदयलेल्या दिव्याने होते (बुध्दी जगात फरक दर्शविते आणि अंतर्स्फूर्ती परमेश्वराचे अस्तित्व जगात दाखविते या दोघांतील विसंगती नष्ट होऊन त्यांच्या ऐक्याचा ‘योग’ सद्‌गुरुंचे अस्तित्व जाणविण्याने होतो).’

जेव्हा जीव आणि शिव यांचे मिलन होते तेव्हा अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हणतात. हे ऐक्य घडण्याचे ठिकाण म्हणजे आपल्या माथ्यावर असलेले सहस्त्ररा चक्र होय. या चक्राला योगशास्त्र सहस्त्र पाकळ्यांच्या कमळाच्या रुपात पाहते. म्हणून पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत ‘अद्वब्जिनिविकाशु’. एकदा या बोधाचा उदय झाला की अज्ञान तर मावळतेच परंतु अज्ञानरुपी नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ज्ञान हे ही लोप पावते. म्हणून एकदा अद्वयत्वाचा उदय झाला की ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नष्ट होतात.

चक्रवाक पक्षी अव्यभिचारी प्रेम करतात असे म्हणतात. जोडीमधील एका पक्ष्याचे निर्वाण झाले तर दुसरा पक्षी अन्नत्याग करून आपल्या जीवनाचा अंत करतो अशी दंतकथा आहे. विरहाचा दाह दाखविण्याकरीता त्यांच्या जबरदस्तीने (एका नदीच्या दोन तीरांवरील खड्यात अडकून पडले आहेत ही कल्पना केली आहे) झालेल्या वियोगापेक्षा सुंदर उपमा असू शकेल काय? आणि त्यांच्या शब्दांचा उपयोग बघा. सद्‌गुरुकृपेने त्यांचे नुसते ‘मीलन’ होत नाही तर ‘मिथुन’ होते! मीलन हा शब्द यमक जुळवायला योग्य असला तरी ‘एकमेकांमध्ये संपूर्ण मिसळून गेले आहेत’ या सत्य परिस्थितीचे वर्णन करण्यास अपुरा होता हे जाणून त्यांनी ‘मिथुन’ ह्या शब्दाचा प्रयोग केला आहे. इतकी सूक्ष्म दृष्टी, इतके चपखल शब्दप्रयोग श्रीज्ञानेश्वरीत पदोपदी आहेत. सर्व संत ज्ञानी आहेत पण ज्ञानेश्वरांना त्या सर्वांचे ईश्वर का म्हणतात हे ज्ञानेश्वरी बघितल्यावर स्पष्ट होते!


येता संसार-नदी तटी । सहज होई सद्‌गुरु भेटी ।

आतुरतेने मारीता मिठी । अंतरी भगवंत दिसे दृष्टी ॥

मावळवीत विश्वाभासू. हे सर्व जग केवळ आभास आहे हे वाक्य हजारवेळा आपण सर्वांनी ऐकलेले आहे. जेव्हा केव्हा आपले मन आसक्‍तीविरहित असते तेव्हा त्यांच्यावर आपला विश्वासही बसला आहे. परंतु पुढच्याच क्षणी कुठलीतरी आसक्‍ती मनात निर्माण होऊन आपण त्यात गुंगून जातो आणि आपल्या आकर्षणाचे कारण मायावी आहे हे विसरतो. अनेकवेळा सत्संग घडूनही आपल्या मनात वैराग्याची ज्वाळा धगधगत का नाही याचे कारण म्हणजे आपली संसारातून मन काढून घेण्याबद्दलची अनास्था होय. संसाराला जर नदीची उपमा दिली तर त्या नदीच्या तटावर आपले सद्‌गुरु उभे आहेत असे दिसेल. नव्हे, नव्हे. ते नुसते नदीच्या तटावर उभे आहेत असे नसून त्या नदीचे दोन्ही तट म्हणजेच आपले सद्‌गुरु होय! आपल्या जीवननदीला आकार देणारे, तीला मार्ग दर्शविणारे व ठराविक मर्यादेबाहेर वाहू न देणारे दुसरे कुणी नसून आपले सद्‌गुरुच आहेत. भावनांच्या महापूरात मर्यादेच्या तटाला विसरून आपण भलतीकडे वहात जातो तेव्हा आपल्या सद्‌गुरुंचे उल्लंघन आपण करीत असतो हे लक्षात घ्या! आपल्या नकळत ते आपणास भगवंताच्या विश्वरुपी सागराकडे नेत आहेत. म्हणूनच असे म्हणतात की आपल्या सर्वांना कधीनाकधी मोक्ष मिळणार आहे यात शंका नाही. सर्व नद्या जशा समुद्रातच विलीन होतात तशीच ही गोष्ट आहे. परंतु आपण स्वतःहून जर संसारनदीच्या प्रवाहातून बाहेर यायचा प्रयत्‍न केला तर या जन्मातच सागराशी मिलन होईल. नाहीतर विविध आकर्षणांचे बांध घालून आपण आपल्या नैसर्गिक प्रवाहाला थांबवितो आणि सागराचे मिलन दूर ढकलतो. अगदी मिलन नाही झाले तरी निदान त्या अथांग समुद्राचा घनगंभीर आवाज तर आपल्या कानात गुंजायला लागेल यात शंका नाही. सद्‌गुरु विश्वाभास मावळतील आणि आपले कल्याण होईल हे खरे असले तरी आपल्या मनात वैराग्य उत्पन्न केले तर सद्‌गुरुंची भेट लवकर होते. संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न करायला या जगातील एकही गोष्ट कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही आणि हातात आलेले कुठलेही फळ नासल्याशिवाय रहात नाही हे तुम्ही निःसंदेह पटवून घ्या. संसाराबद्दलची विरक्‍ती केव्हा तुमच्या मनात उत्पन्न होईल? जेव्हा आसक्‍तीचे तोटे जाणवायला लागतील तेव्हा. जोपर्यंत तुम्ही सध्याच्या जीवनातच रममाण होऊन ते अधिक चांगले करायच्या प्रयत्‍नात आहात तोपर्यंत विरक्‍ती अंगात कशी येईल? वैराग्य हवे असे न म्हणता जवळ असलेली आसक्‍ती नको असे आधी म्हणा. संसारातील प्रगतीलाच प्राधान्य देणे हळूहळू थांबवा.

सद्‌गुरुंची भेट व्हायला हवी असेल तर संसाराबद्दलची आसक्‍ती सोडायला हवे हे जरी कळले तरी हे संसाराचे बंधन तोडणे सोपे नाही. याचे कारण असे की एकाच प्रचंड मोठ्या दोराने आपण बांधलेलो नाही तर अनंत छोट्या छोट्या नात्यांमध्ये आपण गुंतलो गेलो आहोत. रेशमी किड्याचा कोश नाजूक धाग्यांनी विणलेला असतो हे जरी खरे असले तरी त्यामध्ये फसलेल्या किड्याचा अंतच त्यात गुंफलेला असतो तशी ही गोष्ट आहे. पैसा, मान-सन्मान, जमीन-जुमला, बायको-मुले इत्यादी पाश तोडायला अवघड असायचे कारण म्हणजे यातील एकही बंधन एकसंध नाही तर अनेक सूक्ष्म धाग्यांनी तयार केलेले आहे. आपल्या लहानपणापासून आपल्यावर आजूबाजूच्या लोकांमुळे जे संस्कार झालेले आहेत ते सर्व आपल्या सध्याच्या बंधनांना कारणीभूत आहेत. त्यावर आणि आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेतच. त्यामुळे संसारातून दूर जाऊनही आपली बंधने सुटतीलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. तेव्हा वैराग्य अंगी बाणवायला भौतिक त्याग फारसा उपयोगी नाही. आणि वैराग्य म्हणजे घृणा नव्हे. तिटकाराही नव्हे. वैराग्य अजिबात नकारात्मक भावना नाही. याउलट, सर्वांत सकारात्मक भावना आपल्या जीवनात कुठली असेल तर खरे वैराग्य. एखाद्या गोष्टीबद्दल असलेली नकारात्मक भावना त्या गोष्टीबद्दलचे वैराग्य दर्शवित नाही तर नावड दाखविते. तेव्हा आधी लक्षात घ्या की संसाराबद्दल वैराग्य हवे असेल तर त्याकरीता संसाराबद्दल राग मनात उत्पन्न करु नका. मग करायचे काय? तर संसारातील गोष्टी आहेत तशा बघायची प्रवृत्ती. एखादी गोष्ट अहे तशी बघायचे सामर्थ्य फार कमी जणांच्या भाग्यात लिहीलेले असते! आपण सर्व जण घडणाऱ्या गोष्टीकडे “यातून मला काय मिळणार आहे” या दृष्टीकोणातूनच पहात असतो. जगाकडे तटस्थपणे पहायची सवय आपण मनाला लावली पाहिजे. असे करायचा प्रामाणिक प्रयत्‍न तरी आपण केला पाहिजे. जे काही आपल्या अवतीभवती घडत आहे त्याकडे कुठलाही दृष्टीकोण ठेवून, पूर्वग्रह ठेवून, पहायची आपली जी सवय आहे तीला आपण सोडायची तयारी दर्शविली पाहिजे. ही तयारी ठेवणे म्हणजेच संसारनदीच्या तटावर जायची आपली धडपड होय.

ज्य बुध्दीचा उपयोग करुन आपण या जगात प्रगती केली आहे तीचा आता सदुपयोग करुन जगाबाहेर जायची धडपड आपण करायला हवी. आपल्या हातात नित्यनिरंतर सारासार विचार करणे आहे. आपल्या बाह्य कृतींमधून आपणास अंतर्गत झालेला बोध दिसत आहे का नाही याची पर्वा नकरीता दररोज उत्साहाने आपण नित्यानित्यतेचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. या जगात कुठलीही गोष्ट नित्य नाही हे जेव्हा जाणवेल तेव्हा दुःख प्रदर्शित न करीता झालेल्या बोधाबद्दल आनंद मानायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्या दुःखाची नव्वद टक्के कारणे नाहीशी झाली आहेत हे तुम्हाला जाणवेल. दुःख निरसन व्हायला लागले की मनाला सारासार विचार करायची चटकच लागते मग प्रत्येक गोष्टीकडे ते निरपेक्ष नजरेने बघायला शिकते. व्यवहारात सतत जवळ असणारी तटस्थता म्हणजेच आपले सद्‌गुरुंशी झालेले एकत्व होय. ज्याठिकाणी उभे राहून तुम्ही जगाकडे तटस्थतेने बघता ती जागा म्हणजे सद्‌गुरु. तिथे आपण पोहोचलो म्हणजेच त्यांचा आपल्या जीवनात प्रवेश झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि एकदा सद्‌गुरुरुपी सूर्याचा उदय झाला की काय होते याचे वर्णन करणाऱ्या वरील ओव्यांची सत्यता तुम्हाला पटायला वेळ लागणार नाही.


॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक १० जानेवारी २००९)