आषाढी वारी : एक वृत्तांत

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

०. वारीची ओळख!

दरवर्षी वारीमध्ये ५ ते १० लाख माणसे भाग घेतात. यांतील ९० टक्के लोक शेतकरी असल्याने पावसाच्या आगमनावर यांचे वारीत येणे अवलंबून असते. या वर्षी पाऊस उशीरा आणि वारी लवकर असल्याने वारीत गर्दी (नेहमीच्या मानाने) खूप कमी होती. एवढ्या लोकांची सोय करण्यासाठी आळंदी ज्ञानेश्वर संस्थान तर्फे एक श्रीज्ञानेश्वर पालखी सोहळा समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारी चालू असते. पालखी सोहळ्याच्या समितीकडे सर्व अधिकृत दिंड्यांची नोदणी केलेली असते. काही दिंड्या पालखी सोहळ्याच्या सुरुवातीपासून आजतागायत सतत चालू आहेत. नोंदणी केलेल्या सर्व दिंड्यांना समितीतर्फे माउलींच्या रथाचा आधार घेऊन एक नंबर दिला जातो (उदाहरणार्थ ‘रथासमोर ३ किंवा रथामागे १९५) आणि त्यांना आपापल्या क्रमांकानुसार वारीमध्ये चालावे लागते. त्यामुळे एक दिंडी दुसऱ्या दिंडीच्या पुढे जाऊ शकत नाही. जर समोरील दिंडी थांबली असेल तर मागच्या सर्व दिंड्या आपले स्थान सांभाळून उभ्या राहतात. याशिवाय अनेक माणसे कुठल्याही दिंडीत सामील न होता स्वतः चालत असतात. त्यांना क्रमाने चालण्याचे बंधन नसते. ते बाजूबाजूने चालत सर्वांच्या पुढे जाऊ शकतात. याशिवाय अधिकृत मान्यताप्राप्त दिंड्या व्यतिरीक्त काही दिंड्या पालखी सोहळ्यात भाग घेतात. अधिकृत दिंडी नसलेल्यांना सर्व नंबर असलेल्या दिंड्यांच्या मागे रहावे लागते. आमची दिंडी या सर्वांच्या मागे रहाणाऱ्यांपैकी आहे.

१. वारीतील दिनक्रम:

आमची दिंडी फलटणला पालखी सोहळ्यात भाग घेते. आळंदीहून नाही. आम्ही दररोज साधरणपणे ६ वाजता उठायचो. सर्वांच्या शेवटी चालत जाण्याच्या नियमाचा ‘उशीरा उठू शकणे’ हा एक फायदा आहे! ज्या दिंड्या रथापुढे आहेत त्यांना रथाचे प्रस्थान व्हायच्या दोन तास आधी (म्हणजे सकाळी ३ वाजता वगैरे) निघावे लागते पण आम्ही आरामात ६ वाजता उठून ७.३० ते ८ पर्यंत रस्त्यावर येतो. सकाळी उठल्यावर प्रत्येकाने ‘सकाळची कामे’ जिथे जागा मिळेल तिथे आटपायची असतात. जर तंबू शेतात असतील तर सकाळी शेताला पाणी देतात त्या पाईपावर आंघोळ आणि शेतात घुसून इतर कार्यक्रम उरकावे लागतात. बायकांकरीता आंघोळीसाठी तात्पुरता आडोसा तयार केलेला असतो पण बाकी कार्यक्रम त्यांनासुद्धा शेतातच उरकावे लागतात. त्यामुळे त्या साधारणपणे एक-दोन तास आधी उठून आपले सर्व आवरुन बसतात. नंतर चहा घेऊन चालायला सुरुवात होते. साधारणपणे दररोज १८ ते २० किलोमीटर चालावे लागते. पहिल्या ४ की. नंतर आधी सांगून ठेवलेला टप्पा येतो आणि तेथे आम्हाला नाश्टा देण्यात येतो (एक दिवस पोहे आणि दुसऱ्या दिवशी उप्पीट असे चक्र चालू असते). मग जेवणाचा टप्पा अजून ५-६ की. नंतर येतो (पोळी-भाजी, भात-आमटी) आणि तिथे असेच रस्त्याच्या कडेला जशी जागा मिळेल तिथे लोक एक तासभर विश्रांती घेतात आणि मग आपापल्या गतीने रात्रीच्या मुक्कामाची जागा गाठतात. तिथे स्वयंसेवकांनी आधी पोहोचून तंबू उभे केलेले असतात. प्रत्येकाचे सामान दिंडीच्या ट्रकातून नेले जाते. त्यामुळे चालताना एक पाण्याच्या बाटलीशिवाय काही बाळगायची जरुरी नसते. वारकरींच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर महाराष्ट्र सरकारतर्फे पुरविले जातात. त्याशिवाय, ज्यांना परवडू शकेल अशांकरीता खाजगी कंपन्या पाण्याच्या बाटल्या सवलतीच्या दरात विकत असतात. त्यामुळे पाण्याची बाटलीसुद्धा जवळ हवीच असे बंधन नसते. (अर्थात, काही लोक सकाळी धुतलेले कपडे चालता चालता स्वतःच्या खांद्यावर वा डोक्यावर लपेटून वाळवायचा प्रयत्न करतात ते एक बॅग जवळ ठेवतात.) संध्याकाळी ट्रकातून खाली काढून ठेवलेल्या बॅगांमधून स्वतःची शोधून आपणास दिलेल्या तंबूत जाऊन फ्रेश झाले की हरिपाठ म्हणण्याचा कार्यक्रमात भाग घेता येतो. मग नंतर दिंडीच्या चालकांचे प्रवचन होते आणि रात्रीचे जेवण देण्यात येते. मग आपण झोपायला मोकळे.

२. वारीतील कष्ट

या दिनक्रमात असे दिसून येते की त्रास होण्याची मुख्य कारणे म्हणजे रात्री जमिनीवर झोपणे (प्रत्येकाने स्वतःचे अंथरुण-पांघरुण आणि खाली घालायला एक प्लास्टीक आणायचे असते (ओल्या जमिनीवरसुद्धा झोपता यावे म्हणून), काहीजण अगदी जाड अंथरुण आणतात कारण शेवटी हे सर्व सामान ट्रकातूनच जायचे असते!), उठल्यावर बाथरुमची सोय नसल्यान शेतात जावे लागणे, दिवसभर चालणे आणि ठराविक खाणे खावे लागणे ही असू शकतात. त्यातील दिवसभराच्या चालण्यामुळे रात्री कुठेही झोप येते आणि काहीही खायला मिळाले तरी चालते. तेव्हा भर उन्हात चालावे लागणे आणि ‘सकाळचे कार्यक्रम’ कसेतरी उरकावे लागणे या दोन मुख्य तक्रारी वारीत येणाऱ्यांच्या असतात. (विशेषतः शहरात वाढलेल्या बायकांच्या). परंतु आजूबाजूची सर्वच माणसे या परीस्थितीला तोंड देत आहेत हे बघून हा त्रास सहन करण्याची एक शक्ती आपोआप मनात निर्माण होते आणि सर्व कष्ट खूप कमी होतात. ही गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय पटणारी नाही!

३. वारीतील वातावरण.

काहीजण असे म्हणतात की वारीमध्ये अतिशय दिव्य वातावरण असते. तिथे गेल्यावर आपल्या दैनंदिन जीवनातील काळज्या आपोआप दूर होतात आणि आपण भगवंताच्या भक्तित रमून जातो. या गोष्टी निश्चितच सत्य आहेत पण फार सूक्ष्मरीतीने. वरवर बघायला गेलो तर वारीमध्येसुद्धा आपले मित्र शोधून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बाकीच्या मित्रांबद्दल चर्चा करीतच लोक बहुतांशी चालतात असे दिसून येते! याशिवाय प्रत्येकाजवळ मोबाईल असतोच. त्यामुळे आपण जरी मागे सोडायचा प्रयत्‍न केला तरी आपले नेहमीचे आयुष्य फोनवरुन संपर्क साधून असतेच. परंतु अशी माणसेसुद्धा सबंध दिवसामध्ये कधीतरी का होईना पण दुसऱ्याच्या खांद्यावरचा हात काढून टाळ्या वाजवित भजन म्हणतात हेसुद्धा खरे आहे!! आणि वारी संपल्यावर त्यांच्या स्मृतीमध्ये मित्राबरोबरच्या गप्पा नाही तर केलेले भजन लक्षात रहाते. तेव्हा त्यांनासुद्धा कुठेतरी भक्तिचा स्पर्श झाला आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या दृष्टीने बघितल्यास वारीमुळे मनात भक्ति निर्माण होते असे आपण म्हणू शकतो. वारीतील ‘सुशिक्षित’ लोकांची वृत्ती स्वतः भजन म्हणण्याची कमी आणि परीटघडीचे स्वच्छ कपडे घालून भजन म्हणणाऱ्यांकडे कुतुहलपूर्वक बघण्याची जास्त असते. माझ्याबद्दल सांगायचे झाले तर स्वतःचे शिक्षण संपूर्ण विसरुन केवळ एक माणूस म्हणून वारीत सहभागी होण्याचा माझा प्रयत्‍न असतो. त्यामुळे दिंडीतील भजनीमंडळींजवळ जाऊन भजनाचे शब्द आणि म्हणण्याची कला शिकण्याचा मी प्रयत्न करीत असतो. भजनाचे शब्द अत्यंत साधे आणि त्याला कवितेसारखी लयबद्धता नसल्याने भजन म्हणणे माझ्यासारख्याला अतिशय अवघड आहे. (वारकरी लोकांच्या चाली रेकॉर्डवरील चालींपेक्षा वेगळ्या असतात) याशिवाय बंगलोरला परत आल्यावर भजनांशी काहीही संपर्क नसल्याने सराव करता येत नाही. गेल्या सात वर्षांनंतर आत्ता कुठे मला काही भजने म्हणता येऊ लागली आहेत. एकदा भजन म्हणायला लागले की वातावरण प्रचंड भावपूर्ण होते यात शंका नाही. भजन नुसते ऐकणे आणि ते स्वतः म्हणणे यातील फरक शब्दांत सांगणे अशक्य आहे. तो अनुभवायलाच हवा. (श्री रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना स्वतः टाळ्या वाजवित भजन म्हणायला का लावायचे हे वारीत आल्यावर मला कळले.) या अनुभवांकरीता वारीत येणे जरुरी आहे.

आणि मग वारीत चालताना कधी अचानक दुरुन माउलींच्या रथावरील चांदीच्या कळसांचे दर्शन होते! श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आपल्या जवळ आल्या आहेत या जाणीवेने शरीरात एक निराळेच चैतन्य निर्माण होते. खरोखर, त्या रथातील पादुकांचे दर्शन घेणे हा एक अतिशय हृद्य अनुभव आहे. आत्ता त्याबद्दल लिहीतानासुद्धा माझे डोळे भरुन आले आहेत! तेथील चैतन्य, शेजारील लोकांचा उत्साह आणि अचानक मिळालेला पादुकांवरील फूल-फळाचा प्रसाद याने जो शक्तिप्रवाह आपल्या शरीरात संक्रमित होतो तो या जन्मात एकदातरी अनुभवावा. वारकरी लोक एकादशीला फक्त पंढरपूरच्या देऊळाच्या कळसाचेच दर्शन मिळाले तरी अतिशय सुखी का असतात याचे कारण म्हणजे त्यांनी वारीत अनुभविलेले श्रीज्ञानेश्वर महाराजांचे अस्तित्व होय. वारीमध्ये जाण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तेथील अतिशय स्पष्टपणे जाणविणारे संतांचे अस्तित्व होय. इतक्या मोठमोठ्या संतांच्या समाधिस्थळापासून आलेल्या पालख्या तिथे असतात की कुणाचीतरी कृपादृष्टी आपल्यावर पडतेच आणि आपल्या बुद्धीला समजले नाही तरी आतून एक निराळी शांती मनात उत्पन्न होते यात अजिबात शंका नाही.

४. वारीतील माझे अनुभव.

वारीतील आमच्या दिंडीतील फार थोड्या लोकांशी माझा संपर्क असतो. सुशिक्षीत उच्चभ्रूपणाचा मला कंटाळा असल्याने मी स्वतःच्या तंद्रीतच जास्त असतो. गावात रहाणाऱ्या आणि दिंडीत प्रेमाने भजन म्हणणाऱ्या लोकांबरोबर राहून नाश्ट्यापर्यंत भजन म्हटले की मी एकटा किंवा समविचार असलेल्या एक-दोघांबरोबर काही न बोलता चालतो. त्यात कुणी एखाद्या भजनाचा अर्थ मला विचारला (कारण मी प्रवचन देतो हे त्यांना माहीत आहे!) तर जो सुचेल तो अर्थ त्यांना सांगतो इतकेच. स्वतःच्या मनाकडे तटस्थपणे बघणे हाच एक प्रयत्न माझा चालू असतो. पहिली काही वर्षे मी इतर भाविकांशी बोलून स्फूर्ती मिळवायचा प्रयत्न करायचो. (काही वृद्ध माणसे अशी आहेत की ती गेली ५० वर्षे वारी करीत आहेत. किंवा कुणी आपल्या थकलेल्या आईला खांद्यावर घेऊन वारीला आला आहे. अशी दृष्ये बघून स्वतःच्या पारमार्थिक प्रयत्नांचा उथळपणा मला लक्षात यायचा.) परंतु माझ्या लवकरच लक्षात आले की अशा लोकांशी बोलण्याचा संबंध ठेवणे योग्य नाही. उच्च शिक्षण घेतलेल्यांना प्रत्येक अनुभव शब्दांच्या फायलीमध्ये घालून स्मृतीच्या कपाटात बंदीस्त करायची जी सवय असते तीचा या लोकांना पत्तासुद्धा नसतो! त्यामुळे कसे वाटते? काय अनुभव येतात? या प्रश्नांना त्यांचे ‘वारीत आले तर चांगले वाटते, नाही आले तर बरे वाटत नाही’ एव्हढेच उत्तर असते. आलेला अनुभव ते केवळ उपभोगतात आणि त्याला शब्दांत सांगता यावे असे रुप देत बसत नाहीत. हे कळल्यावर मी आता अशा लोकांकडे निव्वळ बघतो आणि अशी आशा करतो की त्यांच्या उपस्थितीने माझ्यामध्ये काही फरक पडू दे. त्यामुळे वारीत जायचे आणि स्वतःच्या तंद्रीत राहून परत यायचे असेच सध्या चालू आहे. पालखी सोहळ्यातील सकल संतांच्या उपस्थितीचा माझ्यावर जो काही परीणाम व्हायचा असेल तो होऊ दे अशी भावना ठेऊन मी वारीत जातो. वारीत गेल्यानंतर मनाचे निरंतर समाधान रहाते असे मीतरी प्रामाणिकपणे सांगू शकत नाही. परंतु जे समोर आहे त्या जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन निश्चितच बदलतो हे नक्की खरे आहे. (अर्थात्‌, हा कदाचित वाढत्या वयाचा परीणाम असायची शक्यता आहे!) परंतु मूळ गोष्ट अशी की वारीत जाऊन काही मिळवायचे ही कल्पना हळूहळू नष्ट व्हायला लागली आहे. वारीत जायचे म्हणून वारीत जायचे असे म्हणावेसे वाटू लागत आहे. हा विचार हळूहळू जीवनातील सर्व गोष्टींबद्दल व्हावा ही इच्छासुद्धा आता प्रबळ होऊ लागली आहे.

याशिवाय ढोबळपणे बघायचे झाले तर कित्येकवेळा मला भजन म्हणत असताना अतिशय चांगले वाटून डोळ्यांतून आनंदाश्रू येतात. माउलींच्या रथाशी गेले की मनात एक स्तब्धता निर्माण होते ज्यात समोर घडत असलेल्या गोष्टी एखाद्या सिनेमासारख्या वाटू लागतात. परंतु या गोष्टी चांगल्या वाटल्या तरी त्या अतिशय थोडावेळ टिकणाऱ्या आहेत. आणि जे शाश्वत नाही त्याकडे दुर्लक्ष करणेच बरे. स्वतःचा संकुचित स्वभाव मूलतः बदलणे हा खरा चमत्कार वारीत येऊन घडू शकतो याची पूर्ण खात्री मला आहे. बघू या की या बाबतीत ‘मेरा नंबर कब आयेगा!’

असो. वारीबद्दल लिहायचे तेव्हढे थोडे आहे. इथे मी जे सुचेल तेव्हढे लिहायचा प्रयत्न केला आहे. मूळ वारी शंभर टक्के मानली तर हे एक वर्णन एक शतांश टक्कासुद्धा नाही! वाचकाकडून एकदातरी वारी व्हावी आणि स्वतःचा अनुभव त्यांनी घ्यावा अशी माउलींपाशी प्रार्थना!

॥ हरिः ॐ ॥