SG5: Bravely face the truth

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


संजीवनी गाथा, अभंग ५


सद्‌गुरु गणनाथ उदार समर्थ । घाली नयनांत ज्ञानांजन ॥ १ ॥


सहज-समाधि सापडले धन । लांचाविले मन तया ठायी ॥ २ ॥


चालता बोलता न ढळे आसन । न भंगे ते मौन, कदा काळी ॥ ३ ॥


स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद । लागलासे छंद स्वरुपाचा ॥ ४ ॥


स्वामी स्वरुपानंदकृत संजीवनीगाथेमध्ये सद्‌गुरुस्तवनपर अनेक अभंग आहेत. आज निरुपणाला घेतलेला अभंग त्यापैकीलच एक आहे. सद्‌गुरुंचा महिमा खऱ्या अर्थाने कळायला स्वतः गुरुत्व गाठणे जरुरी आहे असे मला फार वाटते. व्यावहारिक जगातील संकटांना तोंड देण्यास एक मजबूत आधार ह्या रुपात आपल्या गुरुंना बघणे म्हणजे लाखमोलाच्या गोष्टीतून कवडीची प्राप्ती होते म्हणून आनंदून जाण्यासारखे आहे. अरे, हाती आलेल्या अलभ्य गोष्टीतून लाखो रुपये कमवा आणि मग त्या वस्तूचा महिमा लोकांना सांगा! परंतु स्वतःच्या जीवनात श्रीगुरुंना उच्च स्थान देऊन त्यांच्याभोवती कोंडाळे करुन फिरणाऱ्यांमध्ये फारच थोड्या लोकांचा गुरुशक्‍तीचा निकष संकट आले तरी मन शांत रहावे ही शक्‍ती मिळावी असा असतो. आलेले संकट निघून कसे गेले यामध्येच ते गुरुंचा महिमा मानतात. आपले सध्याचे अस्तित्व आहे त्यापेक्षा अधिक परिपूर्ण गुरुंमुळे कसे झाले या कृतज्ञतेमध्ये त्यांच्याकडून गुरुंच्या खऱ्या सामर्थ्याची उपेक्षा होत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. गुरुंचा तो (एकमेव!) पुरुषार्थ म्हणजे आपली सध्याची प्रतिमा पूर्णपणे वितळवून त्याच सामग्रीतून एक नवीन मूर्ती घडविण्याची शक्‍ती त्यांच्यामध्ये आहे हा होय. वाल्या कोळ्याच्या अस्तित्वाचे दहन करुन तिथे वाल्मिकी ऋषींच्या परमसुखदायी मूर्तीची प्रतिष्ठापना करुन दाखविणे या नारदमुनींच्या शक्‍तीपेक्षा अधिक दैदिप्यमान कर्तृत्व कुठे दिसून आले आहे असे मला वाटत नाही. वरील अभंगामध्ये आपल्या गुरुंचे हे कर्तृत्व स्वानुभवाने जाणून घेऊन स्वामी म्हणत आहेत: ‘ माझे सद्‌गुरु गणनाथ (श्रीसंत गणेश ‘बाबा’ वैद्य) ह्यांनी माझ्या नयनांमध्ये ज्ञानरुपी अंजन घालून आपला समर्थपणा आणि उदारपणा दाखविला आहे. (त्या अंजनाद्वारे) मला सहज-समाधि हे (स्वतःमध्येच खोल पुरलेले) धन सापडले आहे आणि माझे मन त्याचा उपभोग घेण्यासाठी ललचावले आहे. (संसारामध्ये) चालताना आणि बोलताना माझी योगावस्था अचळ आहे आणि स्वरुपामध्ये मग्न राहण्याच्या स्थितीच्या छंदात मी कधीही कमी न होणारा आनंद उपभोगीत आहे.’


ज्ञानांजन पडता नयना । होती असह्य वेदना ।

म्हणून सोडाल स्वसाधना । गमवाल सहजसमाधि धना ॥


सद्‌गुरु उदार आणि समर्थ का आहेत? स्वामींनी गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्‍त करण्याकरीता ठेवलेला निकष व्यावहारिक आपत्तींपासून सुटका झाली हा ठेवलेला आढळून येत नाही. स्वामी गणनाथांना उदार आणि समर्थ म्हणत आहेत कारण त्यांनी डोळ्यांत ज्ञानरुपी अंजन घातले म्हणून. हे दिव्य अप्राप्य अंजन त्यांच्याकडे मुबलक उपलब्ध आहे म्हणून ते समर्थ आहेत आणि त्यांनी माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता मला त्याचे दान केले म्हणून उदार आहेत. पावस या आडगावातील एका अंधाऱ्या दहा बाय दहा आकाराच्या खोलीत आयुष्याची चाळीस वर्षे व्यतीत करुनदेखील त्यांच्या मनातील गुरुंबद्दलची कृतज्ञता कमी न होता वृध्दींगत होत गेली! याचे कारण काय तर तिथेच बसल्याजागी त्यांना अवीट आनंदाचा ठेवा सांपडला होता. लौकीक दृष्टीने स्वामींचे आयुष्य दिव्य न होता उलटे संकूचितच झाले होते. अशावेळी मी गुरुकरुनही माझ्यावर अनाकलनीय व्याधीची आपत्ती कशी कोसळली हा दुर्विचार त्यांच्या मनात न येता त्या व्याधीचा आधार घेऊन त्यांनी व्यावहारीक जगातून आपले मन संपूर्णपणे काढून घेतले व भगवंताच्या स्मरणात, सोऽहम्‌ साधनेच्या छंदात, ते मग्न झाले. अंगावर आलेली व्याधीसुध्दा गुरुकृपाच आहे अशी त्यांची खात्री होती. त्यांच्या या अविचलीत श्रध्देमुळे आपल्यावर आलेल्या संकटामागचा भगवंताचा उद्देश्य त्यांना ज्ञात झाला व आपल्या सद्‌गुरुंच्याबद्दलची त्यांची कृतज्ञता वृध्दींगत झाली. म्हणजे ज्या घटनेने आपल्यासारखे सर्वसामान्य जन गुरुंच्या कृपेबद्दल साशंक होतात त्याच घटनेद्वारे त्यांना खरी गुरुकृपा म्हणजे काय याचे दर्शन घडले. श्रीगोंदवलेकर महाराजांकडे एक भक्‍त आले आणि तक्रार करु लागले की ‘अहो, तुम्ही रामनाम घ्या म्हणून सांगितलेत आणि त्याप्रमाणे वागू लागलो तर संसारातील आसक्‍ती निघून जायला लागली. म्हणून मी रामनाम घेणेच आता थांबविले आहे!’ गुरुंकडे संसारात उन्नती व्हावी म्हणून गेले असल्याने त्यांना गुरुमंत्राचा हा परिणाम योग्य वाटला नाही. गुरु आपल्या पाठीमागे असूनही संसारात सुख मिळाले नाही की बहुतांशी साधकांची श्रध्दा विचलीत होते कारण त्यांनी संसारातील सुख सध्यापेक्षा व्यापकपणे भोगायला मिळण्याचे एक साधन म्हणून गुरु केलेला असतो. संसारात पुढे जाण्याकरीता ज्याप्रमाणे आपण शाळा-कॉलेजात जाऊन पदवी प्राप्त करतो त्याचप्रमाणे बहुतांशी लोक गुरु करतात. गुरुंवर विश्वास बसायला हे प्राथमिक कारण असेल तर काहीही चूक नाही. परंतु मग आयुष्यभर आपल्या संसारातील प्रत्येक आपत्तीचे निवारण सद्‌गुरुंनी करावे ही भावना मनात राहीली तर धोका उत्पन्न होतो. सुरुवातीला कुठल्याही कारणाने गुरुंवर विश्वास बसला की नंतर आपण त्यांना आपल्या जीवनाची नौका कशीही चालवायची मुभा दिली पाहीजे. भवसागराच्या पैलतीरावर आपणास नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आणि त्याचवेळी संसारात दुःख येऊ नये ही प्रार्थना करायची हे संयुक्‍तीक नाही.

वरकरणी आपण भगवंताच्या जवळ जाण्याची इच्छा मनात धरुन आपल्या गुरुंकडे जातो असे दिसले तरी भगवंतप्राप्तीकरीता काय मोल द्यायची आपली तयारी आहे? समजा गुरुंच्या कृपेने तुमचा व्यवसायच बंद पडला तर तुम्हाला खरे म्हणजे आता साधना करायला जास्त वेळ मिळणार याबद्दल आनंद व्हायला हवा पण तसे होते का? श्रीसंत तुकाराम महाराजांचा वाणी व्यवसाय मंदीत आल्यावर ते अजून दुसरा व्यवसाय काढण्याच्या फंदात न पडता भगवंतस्मरणात मग्न झाले तसे आपले होत नाही याचे कारण अजून आपल्या मनातील संसाराची आसक्‍ती समूळ नष्ट झाली नाही हे आहे. कुठेतरी सूक्ष्मपणे का होईना आपणास असे वाटत आहे की संसार एवढा वाईट नाही. काळकूट जहर मिसळलेल्या अन्नावरुन आपले मन उडते तसे संसारावरून उडलेले नाही ही वस्तुस्थिती आपणास भगवंताजवळ जाऊ देत नाही. भगवंताकडे जाण्याकरीता अंगात संसाराबद्दल वैराग्य बाणणे अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे लहान मुलाला आपले दात सांभाळण्याकरीता गोड वस्तूंचा अतिरेकी नाद सोडणे जरूरी आहे त्याचप्रमाणे आपले स्वहित गाठण्याकरीता पर गोष्टींचा त्याग करणे जरुरी आहे. सद्‌गुरुंना याची जाणीव आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला धाक दाखवून ( ते पुरेसे नसेल तर दोन फटके देऊन!) गोड वस्तूंपासून दूर करते त्याचप्रमाणे आपले सद्‌गुरुही आपणास संसाराचे सत्य स्वरुप दाखवायला सुरुवात करतात. आपण आपल्या अज्ञानात सुखी असतो पण ते सुख सद्‌गुरुंना आवडत नाही ते आपणास सत्य परीस्थितीचे ज्ञान देतातच. म्हणून स्वामी म्हणत आहे ‘घाली नयनात ज्ञानांजन’. आपले डोळे भोवतालची परीस्थिती आहे तशी बघण्यास समर्थ बनविण्याचे कौशल्य आपल्या गुरुंच्या हातात आहे. सत्य परीस्थिती भयावह असल्याने सत्य कळले की आपल्याला सुख न होता वेदना जाणवितात. म्हणून या ज्ञानाला ‘अंजन’ असे म्हटले आहे. सत्याचे ज्ञान हे गुलाबपाण्यासारखे शीतल, सुखावह नसून एखाद्या औषधाप्रमाणे झणझणणारे आहे. आणि फक्‍त बाह्य जगातील दोष आपणास दिसायला लागतात असे नव्हे तर आपले स्वतःचे दोषदेखील स्पष्टपणे कळायला लागतात. गोंदवलेकर महाराजांकडे दुसरा एक भक्‍त अशी तक्रार घेऊन आला की रामनाम घ्यायला लागल्यापासून त्याचा क्रोध वाढला आहे. त्याला गोंदवलेकर महाराज म्हणाले की क्रोध वाढला आहे असे नसून तुझ्यातला क्रोध आता तुला दिसू लागला आहे! खरोखर, फर थोड्या भाविकांना अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवण्याआधी स्वतःबद्दलचे खरे ज्ञान असते. बहुतांशी लोक स्वतःला एखाद्या प्रतिमेत घालून तीच्याशी सुसंगत असणारे आपले व्यक्‍तिमत्वच बघत असतात. उदाहरणार्थ, स्वतःला आई या रुपात बघितले की आठवड्यातील चार दिवस मुलांकरीता स्वयंपाक करायचा कंटाळा येतो या सत्याकडे दुर्लक्ष करुन एका दिवशी केलेल्या खास जेवणाची आठवणच आपण ठेवतो वा कचेरीत काम करीत असताना अनेकवेळा केलेल्या चालढकलीच्या स्मृती दूर सारून स्वतःला कर्तबगार कर्मचारीच मानतो. जेव्हा या पळवाटा बंद होतात आणि स्वतःचे आयुष्य आहे तसे डोळ्यासमोर दिसायला लागते तेव्हा आपली जी मानसिक कुचंबणा होते ती सहन करण्याचे धैर्य सगळ्यांत असतेच असे नाही. मग डोळ्यात घातलेले हे ज्ञानांजन आपण काढून टाकतो आणि एव्हढी साधना करुनही मनाची शांति मिळत नाही तर काय उपयोग असा विचार करुन दुसऱ्या गुरुंच्या मागे लागतो. संतांत आणि आपणात महत्वाचा फरक काय असेल तर हे झणझणीत ज्ञानांजन सहन करण्याची त्यांची ताकद आपल्यात नसते हा होय.

ज्ञानाला अंजन म्हणण्याचे अजून एक कारण म्हणजे डोळ्यात एखादे विशिष्ट अंजन घातले की जमिनीत पुरुन ठेवलेले गुप्तधन दिसायला लागते हा अंजनाचा गुण ज्ञानालासुध्दा लागू होतो. डोळ्यातील ते खास अंजन नसलेले धन तयार करुन आणू शकत नाही, तर सतत जवळ असलेले परंतु जमिनीत दडून बसलेले धन दाखविते. त्याचप्रमाणे ज्ञानप्राप्ती काही नवीन निर्माण करीत नाही तर आपल्याजवळ सतत असलेल्या परमसुखाचा ठेवा उघड करते. स्वामी म्हणत आहेत की ‘सहजसमाधी’ या रुपातील धन मला ज्ञानांजनाद्वारे सापडले. ज्याप्रमाणे वडिलोपार्जित पुरुन ठेवलेल्या धनाच्या रक्षणाकरीता त्या हंड्यावर सर्प वा संमंध ठाण देऊन बसलेला असतो त्याचप्रमाणे स्वतःचे दोष दिसणे हे भूत आणि सध्याच्या आयुष्याबद्दल वैराग्याची धग आपल्यात आणि सहजसमाधीमध्ये उभे आहे. दोष दिसणे हे भूत आहे कारण त्याला खरे अस्तित्व नाही आहे. आधी भूताचा सामना करा आणि मग स्वतःला जसे आहे तसे स्वीकारा. कुठल्याही प्रतिमेत स्वतःला न गाडता, त्या कुबडीचा आश्रय न घेता जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघाल आणि क्षणोक्षणी बघतच रहाल तर सहजसमाधी आपोआप पावाल. ही बघण्याची क्रिया सतत चालू राहिली पाहिजे कारण कालचे आपण आज नसतो आणि आजचे उद्या नसणार. वर्तमानकाळात सतत जगत राहण्याची चटक लागणे म्हणजे ‘लागलासे छंद स्वरुपाचा’. ज्याप्रमाणे एखादा सुंदर सूर्योदय सतत बघावा लागतो कारण काही क्षणांपूर्वीचे त्याचे रुप आणि आत्ताचे रुप यात फरक असतो त्याचप्रमाणे स्वतःचे स्वरुप हे नित्यनूतन आहे, अवीट आहे. कारण वीट येण्याकरीता जरुरी असणारे सातत्य आपल्या स्वरुपात नाही आहे. सहलीला गेलो की एखाद्या सनसेट पॉईंट वर जाऊन बसतो आणि सूर्यास्त बघत बसतो, दुसरे काही करीत नाही तसेच स्वतःला एका अनिर्वाच्य जागी ठेवून आपल्या देह आणि मनाचे खेळ तटस्थपणे बघत रहायची चटक ज्याला लागली त्याने बाजी मारली. मग त्याचे ते आसन ‘चालता-बोलता’ ढळणार नाही, त्याचे मौन सुटणार नाही. ही सहजसमाधीची अवस्था ज्यांनी सतत चाळीस वर्षे उपभोगिली ते श्रीसंत सद्‌गुरु स्वामी स्वरुपानंद म्हणत आहेत ‘लाभे अवीट आनंद/ लागलासे छंद स्वरुपाचा.’

स्वतःच्या सद्‌गुरुंबद्दलची खरी कृतज्ञता अंगी बाळगावयाची असेल तर चला आपणही सहन करू ज्ञानांजनाचा चटका आणि होऊ याच जन्मात कृतार्थ.


॥ हरि ॐ ॥

(कोल्हापूर, दिनांक २७ जानेवारी २००९)