SG6: Redefine the goal

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


संजीवनी गाथा, अभंग ६


शरण जाता रमावरा । सर्व सुखें आली घरा ॥ १ ॥


ऋध्दी सिध्दी उभ्या दासी । सदा सादर सेवेसी ॥ २ ॥


धन्य जाहलो संसारी । हरि-रुप नर-नारी ॥ ३ ॥


स्वामी म्हणे सौख्यकंद । वसे अंतरी गोविंद ॥ ४ ॥


कोकणातील रत्‍नागिरीजवळ असलेल्या पावस या छोट्या गावामध्ये संजीवन समाधीत स्थित असलेल्या श्रीसंत स्वामी स्वरुपानंदांच्या अभंगावर आज आपण विचार करु. अत्यंत भावपूर्ण असलेल्या या अभंगामध्ये स्वामी आपणास साधनेचा एक मार्ग, त्या मार्गावर पदक्रमण करण्याचे उद्दिष्ट्य, आणि ते ध्येय प्राप्त झाले की काय होते हे सर्व स्पष्ट करुन सांगत आहेत. वरील अभंगामध्ये स्वामी स्वरुपानंद म्हणत आहेत: ‘लक्ष्मीपती विष्णूला शरण गेल्यावर सर्व सुखे माझ्या घरी आली. ऋध्दी आणि सिध्दी सतत माझ्यापाशी सेवेला सादर आहेत. संसारात राहून मी धन्य झालो आहे कारण सर्व भूतमात्रांमधील देव मला गोचर झाला आहे. स्वामी म्हणतात की सर्व सुखाचा उगम ज्यातून होतो तो गोविंद माझ्या अंतरात आहे याची निःसंशय जाणीव मला झाली आहे.’


डोळे संपूर्ण उघडा । कल्पनाशक्‍तीला मोकळे सोडा ।

आयुष्याचे ध्येय उलगडा । भगवंताचा लळा लावा ॥


अभंगात स्वामींनी फार सुंदररीत्या सांगितले आहे की त्यांच्या आयुष्याचे ध्येय काय होते. ते म्हणत आहेत ‘धन्य जाहलो संसारी/ हरिरुप नरनारी’. संसारात धन्य होणे म्हणजे काय हा प्रश्न आपणास विचारला तर काय डोक्यात येईल? भरपूर पैसे आहेत, चांगले मित्र आहेत आणि मनासारखे नातेवाईक आहेत. आणि ह्यासर्वांत आपले आरोग्य चांगले आहे आणि सर्व सुखाचा उपभोग घेत आयुष्य मजेत जात आहे हेच आपल्या डोक्यात येते ना. लहानपणापासून आपण ज्यांचा आदर करीत आलो आहोत त्या सर्व व्यक्‍ती अशाच ध्येयामागे जात असलेल्या आपण बघत आलो आहोत. त्यामुळे आपल्या मनातसुध्दा हाच विचार यावा यात नवल ते काय? परंतु ह्या सर्व गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ते सुखी आहेत असे आपण म्हणू शकतो का? सुखाची कल्पना वरीलप्रमाणे ठेवण्यातील चूक ते ज्या पायावर उभे आहे तो डळमळीत आहे या वस्तुस्थितीमध्ये आहे. हे कसे ते बघा. आत्ता आपल्याजवळ असलेली ही सुखाची साधने केव्हाही हातातून निसटून जातील याची जाणीव आपणास सतत असते. उदाहरणार्थ, आज असलेला पैसा अचानक आलेल्या आपत्तीचा सामना करण्यात नष्ट होऊ शकतो वा आजच्या जिवलग मित्राबरोबर कुठल्यातरी क्षुल्लक कारणामुळे उद्या कलह होऊन विसंवाद निर्माण होऊ शकतो किंवा आजच्या आरोग्याचे उद्या रोगात रुपांतर होऊ शकते. आपल्या अंतर्मनात ह्या गोष्टींची जाणीव असल्याने आजच्या सुखाच्या क्षणीदेखील आपले मन सूक्ष्मरीत्या अस्वस्थच असते. म्हणजे एका अर्थाने ही सुखेच आपल्या अशाश्वतेमुळे दुःखाला कारणीभूत झाली आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच सर्व संतजन संसारी सुखाला मासा पकडण्यासाठी गळाला आमीष म्हणून लावलेल्या अन्नाची उपमा देतात. ते अन्न चवदार असले तरी ते खाण्यातच माशाचा अंत आहे त्याचप्रमाणे या सुखांचे सेवन करण्यातच पुढील दुःखाचे आगमन होणार आहे हे त्यांना सुचवायचे असते. त्यामुळेच आपण बघतो की ‘आता माझे जीवन कृतार्थ झाले आहे, मी कुठल्याही क्षणी आपल्या जीवनाचा अंत करायला आनंदाने तयार आहे’ ही वृत्ती असलेला एकही मनुष्य आपल्या माहितीत नाही. तुम्ही अगदी अत्यंत यशस्वी माणसांची चरीत्रे जर बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला जाणवेल. ती म्हणजे जगात इतका मान-सन्मान असून, जवळ प्रचंड संपत्ती असूनही कुणीही खासगी जीवनात फक्‍त सुखीच होता असे दिसत नाही. ज्याप्रमाणे आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांच्या जीवनात सुख आणि दुःखाचे कवडसे अखंड उमटत असतात त्याचप्रमाणे ह्या जगन्मान्य व्यक्‍तीसुध्दा एका दुःखातून दुसऱ्या दुःखाकडे पराधीनतेने खेचल्या जात आहेत ही वस्तुस्थिती डोळ्यात भरते. खरोखर, आत्तापर्यंत एकाही थोर समजल्या गेलेल्या माणसाचे चरीत्र वाचून हा गृहस्थ निर्विवादपणे सुखीच होता असे मी म्हणू शकलो नाही. याउलट जेव्हढी माणसे मोठी होतात तेव्हढी त्यांची दुःखेसुध्दा मोठी होतात असे दिसून येते. मग का म्हणून आपण त्यांच्या जवळ असलेल्या मान-सन्मानाची, संपत्तीची अभिलाषा धरावी? ह्या गोष्टींमुळे निव्वळ सुख मिळणे अशक्य आहे हे आपण बुध्दीने जाणून घेतले आणि डोळ्यांनी जगात तसेच घडते हे बघितले. मग तरीसुध्दा का आपण ह्यांमध्ये अडकतो? खरी गोष्ट अशी आहे की केवळ सवयीने आपण आपले ध्येय समाजात पुढे यायचे आहे असे ठरविले आहे.

आपण स्वतःला फार धोरणी समजतो. प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित समजून-उमजून करतो याचा आपणास अभिमान आहे पण खरे पहायला गेले तर जीवनातील सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे (ती म्हणजे आपल्या जगण्याचे ध्येय) तिथेच आपण आपला स्वतःचा विचार लावत नाही, बुध्दीचा उपयोग करीत नाही. आज मी माझ्या ऑफीसमध्ये वरीष्ठाला कसे ठणकावून उत्तर दिले याच्या अभिमानात आपण त्याला आपला वरीष्ठ का मानला आहे याचाच विचार करीत नाही! मूळ मुद्दा बाजूला सारून आपली सर्व बुध्दी छोट्या-छोट्या, निरर्थक गोष्टींवर खर्च करुन आपण स्वतःला हुशार मानतो यापेक्षा आश्चर्यजनक गोष्ट या जगात दुसरी कुठली नाही असे वाटते. सारांश असा की आपल्या जीवनाचा पाया म्हणजे जीवन जगायचे ध्येय, जन्म घेतल्याचे सार्थक झाले हे म्हणण्याचा आपला निकष हाच मुळी दुसऱ्याकडून उधार घेतलेला आहे. तिथे आपली बुध्दी लावली आहे असे जे आपणास भासते ते केवळ वरवरचे खरे आहे. पूर्णपणे खरे नाही.

तुम्हाला काय वाटते? संत जन्मापासूनच निराळे असतात की आपली बुध्दी वापरुन ते संत बनतात? श्री विनोबा भावे म्हणायचे, ‘सर्वसामान्य लोक म्हणतात की गीता वाचणे आपल्याकरीता नाही. ते फक्‍त संत महात्म्यांसाठी आहे. म्हणजे काय वाघ, सिंह इत्यादी प्राण्यांप्रमाणे ‘संत’ ही काय एका वेगळ्या प्राण्याचे नाव आहे का?’ मी संत प्राणी नाही हा शिक्का तुमच्यावर कुणी मारला? संत बनण्यासाठी आवश्यकता कशाची आहे तर आपले जीवनाचे ध्येय बदलण्याची. उघडा आपले डोळे आणि पहा या संसाराची अवस्था. इथला सूर्य मावळण्यासाठीच जन्माला येतो, इथली पुराणे किती माणसे कुणी मारली याचा हिशेब सांगतात आणि जेव्हढे आयुष्य कमी होईल, तुमची प्रज्ञा जिरुन जाईल तेव्हढे जास्त लोक तुमच्या पायी लागतात (वय वाढल्यावर नमस्कार मिळतो ना!). हे मी म्हणत नाही. ही सर्व वाक्ये ज्ञानेश्वरीतील आहेत. (पहा नवव्या अध्यायातील अर्जुनाला केलेला उपदेश, ओवी क्रमांक ५०१ ते ५१५) केवळ आपल्या मर्यादीत कल्पनाशक्‍तीने आपण या जगात अडकलो आहोत. अतिंद्रिय सुख म्हणजे काय याची कल्पनासुध्दा आपणास नाही. हवी असलेली गोष्ट ताब्यात आल्यावर मिळालेले समाधान माहीत आहे पण हवी असलेली गोष्ट आपणहून दुसऱ्याला देण्यात असलेले सुख कुणाला माहीत आहे?

संतांचे आपल्यावर थोर उपकार आहेत कारण ते आपल्या कल्पनाशक्‍तीला भरारी मारायला एक नवीन विश्व देतात. कुठल्याही इंद्रियांच्या मदतीशिवाय आनंद उपभोगू शकतो याची जाणीव ते आपणास देतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांनी जो शाश्वत आनंद उपभोगला त्याकडे जायचा मार्ग ते आपणास दाखवितात. त्यांचे अस्तित्व नसते तर असेही आपण जीवन जगू शकतो याची जाणीवसुध्दा आपल्याला झाली नसती. मग त्याप्रमाणे जीवन जगणे खूप दूरच राहीले.

तेव्हा एक क्षण जरा आपल्या नेहमीच्या आयुष्यातून काढा आणि विचार करा की सुख सतत आपल्याबरोबर आहे असे होऊ शकते! विश्वास ठेवा ह्या अफाट कल्पनेवर आणि बघा की स्वतःचे प्रयत्‍न त्या ध्येयाची प्राप्ती करण्याच्या दिशेने चालले आहेत का नाही. सध्याच्या जीवनशैलीचा परीणाम काय होणार आहे हे जरा नजर विस्फारुन बघा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या पालकांप्रमाणेच तुमची अवस्था आयुष्याच्या संध्याकाळी होणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या वयस्कर पालकांशी संबंध ‘कर्तव्य’ म्हणून ठेवत आहात त्याचप्रमाणे तुमच्याशी लोक वागणार आहेत. प्रेम, आनंद, सुख यांच्यात वृध्दी होण्याऐवजी घटच होण्याची शक्यता जास्त आहे. हे जाणविल्यावर मग आत्ताच मिळेल तेव्हढे सुख ओरबाडून काढण्याच्या मोहात तुम्ही पडलात तर सगळे संपलेच! थांबा. जरा अजून विचार करा. वेळ हातची गेलेली नाही. अजूनही तुम्हाला आपली जीवनशैली प्रगल्भ करता येईल. इतकी व्यापक दृष्टी ठेवता येईल की जसजसा काळाचा ओघ वहात जाईल तसतसे सुख अजून खोल, सुंदर आणि विश्वव्यापक होईल. का म्हणून तुम्ही-आम्ही हा विचार करु नये? आपल्यात काय कमी आहे की हे ध्येय आपल्या आवाक्याबाहेर आहे? एकदा हा विचार तुमच्या मनात घुसला की तुमचे निम्मे काम झाले असे समजा! जीवनाचे ध्येय बाह्य जगावर नियंत्रण मिळविणे असे न ठेवता स्वतःमध्ये दडलेला आनंद शोधून काढणे हे ठेवले की सर्व जग तुमची मदत करायला धावून येते हे तुमच्या लक्षात यायला लागेल. संसारी धन्य होणे म्हणजे या जगातील प्रत्येक भूतमात्रामध्ये ईश्वर पाहणे होय. आणि हीच गोष्ट आपल्याला स्वामी वरील अभंगातून शिकवित आहेत.

एकदा अध्यात्माच्या मार्गावर तुम्ही वरील ध्येय ठवून आलात की भोवतालच्या जगातील प्रचंड गदारोळ, अव्यवस्था कधी निघून गेली हे तुमच्या लक्षातसुध्दा येणार नाही. आतबाहेर एक प्रकारचे वेगळेच समाधान भरुन राहीलेले आहे, जे काही होत आहे ते सर्व योग्यच होत आहे याची निःसंदेह जाणीव सतत तुमच्या मनात जागृत राहील. या अवीट आनंदाचा कंद, म्हणजे ज्या मूळातून हे अनुभव प्रसवतात ते मूळ तुमच्याजवळच होते आणि आहे याची स्वानुभवयुक्‍त प्रचीती तुम्हाला येईल आणि तुम्हीसुध्दा स्वामींसारखे ‘अंतरी वसे सौख्यकंद गोविंद’ असे म्हणत चिरंतन आनंदात मग्न व्हाल. तेव्हा सोडा तुमच्या दृष्टीला बांधलेली समाजमान्यतेची झापडे आणि करा स्वयंभू विचार. बाकी सर्व आहे अनुकरणाचा दुर्विचार.

एकदा आपले नवीन ध्येय कळले की ते प्राप्त करण्याचा मार्ग काय आहे हेसुध्दा आपणास स्वामींनी सांगितले आहे. ‘शरण जाता रमावरा/सर्वसुखे आली घरा’. मला काय करावे हे कळत नाही. काय पाहीजे हे कळत आहे. ते कसे प्राप्त करावे याचा मार्ग तूच मला दाखव ही प्रार्थना करणे यात शरणागतीची सुरुवात असते आणि या प्रार्थनेशी सुसंगत जीवन जगणे हा शेवट असतो. सुसंगत जीवन जगणे म्हणजे काय हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणजे जे काही आपल्या जीवनात घडत आहे त्यातच आपले सारसर्वस्व न मानणे हे होय. याचे कारण असे की एकदा आपण मान्य केले की मला काही कळत नाही, तूच मला मार्ग दाखव की स्वतःबद्दलचा अनाठायी, दुराग्रही, आत्मविश्वास निघून जायला हवा. कुठल्याही क्षणी मी चुकीचा असू शकेन ही शक्यता आपल्या मनात प्रज्वलीत असायला हवी. ह्या शक्यतेमुळे अंगात नम्रता येते, संपूर्ण जगाकडून धडे शिकायची शक्‍ती येते. ‘तू कोण मला सांगणारा’ हे वाक्य आपल्या जीवनातून निघून जाते. ही समदृष्टी प्राप्त करणे म्हणजे जाणणे की ‘हरि-रुप नर-नारी’. काय कठीण आहे यात? चला आपण सर्वजण खऱ्या अर्थाने भगवंताला शरण जाऊ आणि सर्व सुखे सदासर्वकाळ प्राप्त करु!


॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक १७ जानेवारी २००९)