SG36: To err is human!

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

स्वामी स्वरुपानंदकृत संजीवनी गाथा – अभंग ३६

 

राम-नाम धरा कंठी । पाप जाय उठाउठीं ॥ १ ॥

 

नामें पाषाण तारिले । नामे पापी उध्दरिले ॥ २ ॥

 

नाम जपे वाल्या कोळी । धन्य झाला भू-मंडळीं ॥ ३ ॥

 

नामें तारिली पिंगळा । अजामीळ मुक्‍त केला ॥ ४ ॥

 

राम-नाम बीज-मंत्र । स्वामी जपे अहोरात्र ॥ ५ ॥

 

आज निरुपणाला स्वामी स्वरुपानंदांचा एक अभंग घेतला आहे. श्री स्वामी स्वरुपानंदांचा जन्म कोकणातील पावस या गावी इसवी सन १९०३ मध्ये झाला. श्री रमण महर्षींना लहानपणी आपण मृत्यु पावलो आहोत असा अनुभव आला व त्यामुळे त्यांना व्यावहारीक जगाचा वीट येऊन त्यांनी संन्यास घेतला. त्याचप्रमाणे स्वामींना सन १९३४-३५ मध्ये मृत्युच्या भयाचा प्रचंड आघात बसला व त्यांचे शरीर त्या आघाताने क्षीण होऊन गेले. आघातानंतरच्या काळात त्यांना संपूर्णपणे जाणविले की गुरुपोदिष्ट `सोऽहं’ मंत्राचे ध्यानच त्यांचा एकमेव आधार आहे. `साधना करीत राहणे’ हेच केवळ मानवाचे परमोच्च ध्येय आहे या दृढ भावनेने त्यांनी यापुढील आपले सर्व जीवन त्या ध्यानात तन्मय होऊन व्यतीत केले. त्यांनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी आपला देह ठेवला व त्यांच्या सूचनेप्रमाणे पावसला नाथ-संप्रदायानुसार बांधल्या गेलेल्या समाधिमंदिरात त्यांचा देह ठेवण्यात आला आहे. तेथिल समाधिसान्निध्यात असलेल्या ध्यानगुंफेत ध्यान करण्याचा आनंद काय आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे.

श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ज्याप्रमाणे फुल उमलले की आपोआप भुंगे त्यापाशी येतात त्याचप्रमाणे साधकाला दृष्टांत होऊन परमेश्वराचे नित्य सान्निध्य लाभले की साधनेत रस असणाऱ्या व्यक्‍ती आपणहुन जवळ येतात. स्वामी स्वरुपानंदांच्या जीवनात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. स्वतःची प्रकृती अत्यंत तोळामासा असल्याने त्यांनी १९३५ ते १९७४ रत्‍नागिरी जिल्ह्यातील पावस हे खेडेगाव सोडले नाही. एकाच ठिकाणी अजगरवृत्तीने राहून अथक साधना केली. परंतु तरीसुध्दा त्यांची प्रसिध्दी संपूर्ण भारतवर्षात पसरली (इतकी की त्यांच्या नावाचा स्टँपसुध्दा भारत सरकारने प्रसिध्द केला). स्वामींचे जीवन म्हणजे स्वतःच्या साधनेत रमून आयुष्य कसे घालवावे याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

वरील अभंगात ते म्हणत आहेत: `राम-नामाचा जप केल्यावर पाप आपोआप नष्ट होते. या नामाचा आधार घेऊन राम-सेतूमध्ये पाषाणसुध्दा तरले, या नामाच्या जपाने वाल्या कोळ्याचा वाल्मीकी ऋषी झाला. पिंगलाला व अजामीळा नामक पाप्याला नामानेच मुक्‍ती मिळाली. अशा राम-नामाचा जप स्वामी (स्वरुपानंद) अहोरात्र करीत आहेत.’

 

पूर्वकर्मांबद्दल फार विचार न करीता साधना चालू ठेवा

 

स्वामी स्वरुपानंदांचा संप्रदाय नाथ-संप्रदाय होय. त्यांचे गुरु म्हणजे श्री बाबा महाराज वैद्य, पुणे हे होत व त्यांची परंपरा आदिनाथ श्री शंकरांपासून चालत आलेली आहे. अद्वैत प्रणालीला उचलून धरणाऱ्या नाथ-परंपरेत स्वप्रचीतीयुक्‍त ज्ञानाला महत्व देण्यात येते (बौध्दीक ज्ञानाला नाही) व ते प्राप्त करण्याचे मुख्य साधन म्हणजे गुरुंनी दिलेल्या बीज-मंत्रावर नित्यनैमित्तिक ध्यान करणे असे मानले जाते. ह्या पार्श्वभूमीवर स्वामींनी मी राम-नामाचा जप करीतो असे म्हणणे थोडेसे आश्चर्यजनक वाटण्याचा संभव आहे. परंतु वरील अभंगातील चवथ्या पदातील अजामीळाने राम-नाम कधीही जपले नव्हते. आयुष्यभर पापे करुन जीवनाच्या अंतिम क्षणी प्राण पणाला लावून त्याने (आपल्या मुलाचे) `नारायण’ असे नाम म्हटले आणि त्याच्यासमोर प्रत्यक्ष भगवान विष्णू उभे राहिले अशी कथा आहे. तेव्हा राम-नाम ह्या शब्दाने स्वामींना केवळ रामाचा त्रयोदशाक्षरी बीज-मंत्र अभिप्रेत आहे असे आपण म्हणू शकत नाही. याउलट पाचव्या पदात `मी स्वतः राम-नामच म्हटले आहे’ असे सांगून स्वामींना त्या शब्दांनी `परमार्थातील आपली सर्व साधना’ सूचित करायची आहे असे वाटते. एकदा असा विचार केला की वरील अभंगाचा भावार्थ पुढीलप्रमाणे होतो: `तुमची परमार्थाची साधना सुरु झाली की आधीची सर्व पापे नाहीशी होतात. जगातील सर्वांत पापी माणसाला देवाजवळ नेण्याचे सामर्थ्य प्रामाणिक साधनेत आहे. मी (स्वामी स्वरुपानंद) केवळ अथक साधनेमुळेच देवाजवळ पोहोचलो आहे.’

वरील भावार्थाचा आपल्या जीवनात एक मोठा आधार कसा मिळू शकतो ते आता आपण पाहूया. भगवंताच्या प्राप्तीशिवाय स्वतःला लाभलेल्या मानवीजन्माचे सार्थक होणार नाही याची मनाला पूर्ण खात्री पटून आपण जरी परमार्थाच्या मार्गावर चालायचा प्रामाणिक प्रयत्‍न केला तरी आपल्या हातून सतत साधना होतेच असे नाही. कधीकधी आपल्या हातून (आपल्या मते) अक्षम्य अपराधही घडायचा संभव असतो. समजा आपल्या हातून जाणिवपूर्वक पाप घडले तर आपल्या मनाची अवस्था कशी होते? आपल्या गुरुंना तोंड दाखवायच्या लायकीचे आपण राहीलो नाही, वा इतकी साधना केली तरी आपल्या हातून असे कर्म घडत असेल तर साधनेचा काय उपयोग? असेच विचार सर्वसाधारणपणे साधकाला भेडसावयाला लागतात. वरील अभंगात आपणा सर्वांना धीर येईल असे सांगणे आहे. स्वामी म्हणत आहेत की `राम-नाम धरा कंठी, पाप जाय उठाउठी’. आपल्या हातून झालेल्या अपराधाबद्दल, पापाबद्दल खंत वाटणे साहजिकच आहे पण त्याने खचून न जाता आपण अजून जोरात साधना करायला शिकले पाहिजे. प्रामाणिकपणे गुरुपोदिष्ट साधना करताना मनात ठाम विश्वास ठेवा की ह्या क्षणापूर्वी केलेली सर्व पापे आता नष्ट झालेली आहेत आणि माझ्या साधनेने मला भगवंताचे सान्निध्य प्राप्त होणार आहे. श्री रामकृष्ण परमहंसांपुढे कुणी `मी पापी आहे, माझे कसे होणार?’ असे म्हटले की ते म्हणायचे की `तू देवाचे नाव घेतोस आणि परत मी पापी आहे असेही म्हणतोस. हे कसे शक्य आहे?’ उगाच पूर्वकर्मांबद्दल बाऊ करुन हताश होऊ नका असे ह्या अभंगाचे सांगणे आहे असे वाटते. आपले जीवन प्रत्येक क्षणी नवीन असते. काल केलेल्या कर्मांपासून आपण केवळ आपल्या सवयीने मुक्‍त होत नाही. ती कर्मे करणारी व्यक्‍ती आज साधना करणाऱ्या व्यक्‍तीपेक्षा भिन्न होती. जोपर्यंत तुम्ही साधनेत मग्न आहात तोपर्यंत पापी व्यक्‍तीचे आणि तुमचे काहीही नाते नाही हे ध्यानात घ्या. एखादा अपराधी ज्या देशात अपराध केला आहे तो देश सोडून दुसऱ्या देशात घुसला की आधीच्या देशातील पोलीस त्याला नव्या देशाच्या चालकाच्या परवानगीशिवाय पकडू शकत नाहीत. त्याचप्रमाणे तुमची पापे ज्या व्यावहारिक जगात तुम्ही केली आहेत ते जग सोडून साधनेच्या विश्वात तुम्ही घुसला की कर्मफळाचे कुठलेही नियम तुम्हांला लागू होत नाहीत हे ध्यानात घ्या. मग तुमची साधना तुम्ही थांबविली की परत तुम्ही तुमच्या दुःखदायक व्यक्‍तिमत्वात घुसता, अपराध केलेल्या देशात परत येता. तेथील पोलीस तुमची वाटच बघत असतात!!

तेव्हा सतत साधना करीत राहणे हा एकच उपाय आपल्यासारख्यांच्या जीवनात आहे हे मनावर पूर्णपणे ठसवा. हातून दुष्कर्मे घडल्यावर हताश होण्यापेक्षा आपण अजून जोरात साधना केली पाहिजे. गुरुंच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. असे न करिता, आपण पापी आहोत, गुरुंच्या जवळ जाण्याच्या लायकीचे नाही असे म्हणणे संपूर्ण चुकीचे आहे. गुरुंकडे जायला `त्यांच्याकडे जायला हवे’ ह्या भावनेशिवाय दुसऱ्या कशाची गरज नसते. ठराविक पातळीवर आल्यावरच गुरुंकडे जायचे असले तर गुरु ह्या शब्दाला अर्थच रहात नाही. इथे अर्थात हे लक्षात घ्या की `आपण गुरुंच्या जवळ जायचा सतत प्रयत्‍न केला पाहिजे’ ह्या वाक्यामध्ये गुरु आपल्याला (बाह्यदृष्टीने) जवळ करतीलच याची खात्री दिलेली नाही! त्यांनी काय करायचे हे केवळ तेच ठरवू शकतात. त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही. आपल्या हातात जे काही आहे तेच आपण करु शकतो. आणि ते म्हणजे आपण त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्‍न सतत करीत राहणे. म्हणजे काय तर आपली साधना (स्वतःच्या चुकांसकट) प्रामाणिकपणे करीत राहणे. शेवटी गुरु हे कृपासिंधू आहेत. कधीनाकधी ते आपणहून आपल्या जवळ येतीलच!

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रवचनावर आधारित.)