Haripath 1: Advice to Householders

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानदेव हरिपाठ — अभंग १

 

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्‍ति चारी साधियेल्या ॥ १ ॥

 

हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी? ॥ २ ॥

 

असुनि संसारी जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥

 

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरी ॥ ४ ॥

 

श्री ज्ञानदेव महाराजांच्या हरिपाठाची सुरुवात आज निरुपणाला घेतलेल्या अतिशय सुंदर अभंगाने होते. ह्या अभंगात माउली म्हणत आहे: एखाद्या व्यक्‍तीने अगदी क्षणमात्र जरी भगवंताचे दर्शन घेतले तरी त्याच्या जीवनातील चारी अवस्थांपासून (बालपण, तारुण्य, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम) त्याची सुटका होते. (म्हणून) तोंडाने हरिनामाचा गजर, त्यापासून काही पुण्य होत आहे याची जाणीव विसरुन, निरंतर करा. ज्याने संसारात राहून सतत हरिनाम घेतले (`जिव्हे वेगु केला’) आणि शास्त्रानुसार आचरण केले (`वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा’) त्याच्या घरी (ज्याप्रमाणे भगवंत पांडवांघरी होते, त्याचप्रमाणे) प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सदा निवास करतील असे श्री ज्ञानदेव व्यासकथित महाभारताचा आधार घेऊन सांगत आहेत (जे प्रतिपादन माउली आणि जगद्‌गुरु व्यासमुनी या दोघांनी मिळून केले आहे ते निःसंदेह, निर्विवाद आणि शाश्वत सत्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही!!).’

वरील अभंगातील पद्य क्रमांक तीन आणि चार एक उपदेश, पहिल्या ओवीतील आश्वासनातून प्रगती ओळखायची खूण आणि या सर्वांचा पाया कशावर उभारायला हवा हे स्पष्ट करायला दुसरे चरण अशा तीन वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्‍न ज्ञानेश्वर महाराज करीत आहेत असे आज वाटत आहे. बघू या की मनातील विचार स्पष्टपणे मांडणे जमते की नाही. प्रतिपादन जमले आहे की नाही हे कळण्यास आपल्या मनातील आनंद ही एकच खूण आहे. (माझ्यासकट) आपणा सर्वांना हा कारणविरहीत आनंद प्राप्त होवो अशी प्रार्थना सद्‌गुरुचरणी करतो.

 

किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकी

 

काही साधक गुरुंकडे प्रापंचिक आपत्तींच्या निवारणाकरीता जातात. तरुण वयात परीक्षेत जास्त यश मिळावे ह्या इच्छेने आपण मारुतीरायांच्या वा गणपतिच्या देवळात जायचो तशीच ही अवस्था आहे. खूप कष्ट घेऊनसुध्दा जेव्हा अपेक्षेप्रमाणे फळ प्राप्त होत नाही तेव्हा स्वतःच्या प्रयत्‍नांवर जो स्वानुभवाने विश्वास बसलेला असतो त्याला धक्का बसतो. कुठलीतरी उच्च शक्‍ती आपल्या प्रगतीला बाधा निर्माण करीत आहे याची जाणीव अशावेळी होते. त्यावेळी कुठल्या गुरुंचे मार्गदर्शन लाभून इच्छित फळ पदरात पडले की आपली खात्री होते की त्या अतिंद्रिय शक्‍तीला सामोरे जाण्याकरीता गुरुंचे पाठबळ जरुरी आहे. त्यांनी सांगितलेल्या साधना शक्य तितक्या प्रामाणिकपणे करुन आपण त्या शक्‍तिवर प्रभुत्व मिळवायचा प्रयत्‍न करु लागतो. साधना करुन काय मिळवायचे आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला असते. असा काही काळ गेल्यावर जेव्हा गुरुंना आपण जवळून बघतो तेव्हा गुरुंच्या मनातील कधीही न ढळणाऱ्या शांतिबद्दल आत्मीयता निर्माण होते व आपण विचार करु लागतो की ही अचळ अवस्था प्राप्त केलेली बरी. मग आपल्या साधनेच्या ध्येयामध्ये बदल व्हायला लागतो. सांसारीक लाभाबद्दलची ओढ कमी होऊन (कारण प्रापंचिक प्रगती बऱ्यापैकी झालेली असतेच!!) पारमार्थिक तत्वाची जवळीक करावीशी वाटते. जीवनातील ह्या अवस्थेत आपण सध्याच्या अस्तित्वातून दुसऱ्या, अधिक भव्य, व्यापक अशा अवस्थेत संक्रमण करीत असतो. अशावेळी साधकांनी कसे वागावे याचा सल्ला देणारा आजचा अभंग आहे. माऊली म्हणत आहे की `असुनि संसारी जिव्हे वेगु करी … द्वारकेचा राणा तयाघरी’. पारमार्थिक प्रगती करण्याचा एक जलद मार्ग म्हणजे संसारातील जबाबदारींचा त्याग करणे अशी आपली समजूत व्हायची जी शक्यता आहे तीचे निराकरण करण्यास ही चरणे अत्यंत उपयुक्‍त आहेत.

एक गोष्ट अत्यंत खरी आहे की संसारापासून मुक्‍त झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होणे शक्य नाही. परंतु ही मुक्‍त अवस्था शारीरीक नसते तर आंतरीक असते, सूक्ष्म असते. संसाराचा त्याग करणे म्हणजे सर्व सोडून गुरुंच्या मठात राहणे असते तर जी माणसे सतत गुरुंबरोबरच आहेत त्यांना भगवंतदर्शन झाले असते व त्यांचे जीवन सदोदीत आनंदमय राहीले असते. परंतु संतांच्या जवळ वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक शांति दिसतेच असे नाही. असे असते तर परमेश्वराची प्राप्ती होण्याकरीता आपले सर्व बँकांमधील खाती दुसऱ्याच्या नावावर करुन चंबळच्या खोऱ्यातील जंगलात जाणे ही एक सोपी साधना सांगण्यात आली असती. याउलट देवीमाहात्म्यात समाधी नावाच्या वैश्य घरातील लोकांनी बाहेर काढल्यामुळे निष्कांचन अवस्थेत मेधा मुनींच्या आश्रमात रहात होता तरी त्याला ज्ञानप्राप्ती झाली नव्हती. मनाने तो अजूनही प्रपंचातच अडकलेला होता. त्या मायेपासून त्याची मुक्‍ती देवीची उपासना केल्यावरच झाली हे आपण वाचले असेलच. तेव्हा संसारातील आकर्षणांच्या पलिकडे आपणास जायचे आहे हे जरी खरे असले तरी तिकडे जाण्याचा मार्ग जे जवळ आहे त्याचा भौतिक दृष्टीने त्याग करणे हा होत नाही. आपणास संसारापासून दूर व्हायचे आहे ते मानसिक पातळीवर, शारीरीक नाही हे लक्षात घ्या. फारच थोड्या भाग्यवान माणसांच्या प्रारब्धात भौतिक दृष्टीनेसुध्दा प्रपंचापासून मुक्‍ती लिहिलेली असते. अशी माणसे देवाने स्वतः निवडलेली असतात. स्वामी विवेकानंदादी संन्यासी शिष्य फार थोडे असतात. खूप शतकांमध्ये एखादे वासुदेवानंद सरस्वती `टेंबे’ महाराज जन्म घेतात! आपला त्याग तेवढा असता तर आत्तापर्यंत आपण केव्हाच त्या मार्गावर चालायला सुरुवात केली असती! असो. तेव्हा सांगायची गोष्ट अशी की संसारात राहून मनाने निवृत्त व्हायचे असेल तर मार्ग कुठला तर सतत हरिनामाचा गजर चालू ठेवणे होय. परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की `आपले दुःख मानसिक आहे. त्यावर लागणारे औषधही जिथे जखम आहे तिथे म्हणजे मनाला लावले पाहिजे. म्हणून रामनाम घ्या.’ संसारातील सर्व गोष्टी करताना जो हरीचे स्मरण ठेवतो आणि शास्त्रानुसार वर्तन ठेवतो (हरीचे स्मरण ठेवल्यावर जे काही वर्तन होईल ते शास्त्रानुसारच होणार यात संदेह कुठला? परंतु सुरुवातीला देवाचे स्मरण सतत रहात नाही. त्यामुळे आपल्या मनाला शास्त्रानुसार वागायचे वळण लावलेले बरे असा याचा अर्थ आहे.) त्याला सर्वात उच्चतम पारमार्थिक लक्ष्याची प्राप्ती होईल असे माउली का सांगत आहे हे स्पष्ट होईल.

यामधूनच असेही स्पष्ट होते की पुण्याची गणना करीत देवाचे नाम घेण्यामध्ये आपली पारमार्थिक प्रगती होणे कठीण आहे. पुण्याची आवश्यकता का भासते? तर इह वा परलोकातील सुखाच्या प्राप्तीकरीता. हे दोन्ही लोक संसारातच सामाविष्ट आहेत. म्हणून हरीनामाचा गजर आपले जीवन पुण्यमय होईल या भावनेने केला तर मनातील अशांतीरुपी जखमेला औषध न लागता कुपथ्य केलेल्या रोग्याप्रमाणे आपल्या व्यथा वाढायला लागतील. त्या व्यथा कधी कधी पुण्य वाढलेले आहे या गर्वाच्या रुपात आपल्यासमोर येतील वा इतके करुनही आपली प्रगती मनासारखी का होत नाही या शंकेच्या रुपात भेडसावतील. जर अचुंबित शांति हवी असेल तर कुठल्याही कारणाशिवाय भगवंताचे स्मरण करणे हाच एक उपाय आहे. असे आपले निर्हेतुक नाम घेण्यास व्यावहारिक इच्छा मनात ठेवणे घातक आहे हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीत कदाचित म्हणूनच पसायदान मागताना `भजिजो आदिपुरुषी, अखंडित’ असे म्हणायच्या आधी माऊली `किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकी’ असे म्हणते असे वाटते.

 

सद्‌बुध्दी हे थेंकुटी, म्हणो नये

 

आता आपण पहिल्या पदाबद्दल विचार करु. माउली म्हणत आहे की जो गृहस्थ केवळ एक क्षणभर देवाच्या दारात उभा राहतो त्याच्या जीवनाचे कल्याण होते. आपण आधी बघितलेच आहे की पारमार्थिक प्रगतीमध्येच आपल्या जीवनाचे सार आहे. मनातील चिरकाळ तेवणाऱ्या शांतीच्या ज्योतीत आपले आयुष्य बघत राहणे हे आपल्या साधनेचे ध्येय आहे असे आपण मानण्यास हरकत नाही. केवळ एका क्षणाच्या देवाच्या सान्निध्याने हे ध्येय कसे प्राप्त होईल हा संदेह आपल्या मनात उद्‌भवला नाही तरच नवल. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की मनातील शंका ह्या वळलेल्या धाग्यातून बाहेर आलेल्या सुताप्रमाणे असतात. एक जरी सुत बाहेर असले तर सुईतून धागा ओवता येत नाही. मनातील संदेहाबद्दल ज्ञानेश्वरीत महाराज म्हणतात: `मग संशयी जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९:४॥. तेव्हा आपल्या मनातील शंकेला दाबून न ठेवता, तीचे निराकरण करुनच आपल्याला साधनेत प्रगती करता येते हे सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे.

वास्तविक पाहता, आपण व्यवहारातही असे अनुभव घेतो की मोक्याच्या क्षणी केलेले अल्प कर्म फार मोठे फळ देऊन जाते. उदाहरणार्थ, जेव्हा सबंध शरीराला नखशिखांत ज्वर व्यापून असतो तेव्हा औषध म्हणून एक छोटीशी मात्रा आपण घेतो व त्यामुळे संपूर्ण आजाराचे निरसन होते. होमीओपाथीमध्ये तर असे मानतात की औषधाची मात्रा जेव्हढी कमी तेव्हढे ते जास्त परीणामकारक असते. अगदी अध्यात्माची गोष्ट घेतली तरी आपण सर्वजण तिरुपतीच्या दर्शनाला जातो तेव्हा कितीकाळ दर्शन होते? देवाच्या द्वाराशी पोचेपोचेपर्यंत तेथील पुजारी आपणांस हात धरुन पुढे खेचतात. त्या अत्यंत क्षणिक दर्शनाकरीता आपण किती कष्ट घेतलेले असतात याची गणना नसते. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून ठराविक दिवस बाजूला काढण्यापासून रांगेत उभे राहून धक्के खाण्यापर्यंतचे त्रास सहन करुन शेवटी निमिषमात्र दर्शन होते त्यात आपण समाधान मानतोच ना? कधी आपल्यासमोर कोणाची डोकी येतात व त्यावरुन अर्धवटच दर्शन होते तरी आपण दुःख करीत नाही. मग कधी आपल्यासमोर कोणी नसते तेव्हा हाताने खेचून बाहेर फेकले जाण्याआधी संपूर्ण मूर्ती दिसते तेव्हा तर अतिशय सुंदर दर्शन आज झाले असे म्हणतच आपण दररोजच्या जीवनात व्यस्त होतो. तेव्हा क्षणिक कर्माचे अनंत फल मिळू शकते हे तत्वतः मान्य करण्यास काहीच हरकत नाही.

आता साधनेतील क्षणिक दर्शन म्हणजे काय? असे बघा आपल्या ह्रुदयात सतत सद्‌गुरु वास करीत आहेत. माउली म्हणते `मज ह्रुदयी सद्‌गुरु । जेणे तारीलो संसारपुरु ..’. परंतु असे असूनसुध्दा दरवेळी त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपणांस होतेच असे नाही. सर्व जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला दृष्टीआड करण्यास डोळ्याजवळची एक करांगुली पुरेशी असते. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीसमोर व्यवहाराची साधने आल्यामुळे निरंतर प्रकाशित, सच्चिदानंदरुपी ज्ञानसूर्य आपल्या जवळ असूनही नजरेस गोचर होत नाही. परंतु ज्याप्रमाणे डोळ्यासमोर बोट धरल्याने सूर्य दिसला नाही तरी त्याचा प्रकाश आपणास जाणवितो त्याचप्रमाणे ह्रुदयी स्थित असलेला सद्‌गुरुचे अस्तित्व आपणास जाणविते ते आपल्या सद्‍सद्‍विवेक बुध्दीने. अचानक अंतर्स्फुरण होते की जीवनात कसे वागायला हवे. एकदा पंढरपुरच्या आषाढी वारीत सकाळचि कर्मे घाईघाईत उरकत असताना माझा मित्र म्हणाला की `खरोखर या जगात आपण फक्‍त खातो आणि विसर्जन करतो. दुसरे काय करतो?’ त्याच्या मनातील हे क्षणिक वैराग्य म्हणजेच ह्रुदयातील सद्‌गुरुंच्या अस्तित्वाची त्याला झालेली जाणीव होय. देवाच्या द्वारी क्षणभरी उभे राहणे म्हणजे असे अध्यात्मपर विचार मनात आले आहेत याचे ज्ञान होणे. आपल्याच मनातील सर्व खळबळ आपणास कळतेच असे नाही तेव्हा नुसतेच सात्विक विचार मनात येणे पुरेसे नसते, त्यांचे यथार्थ ज्ञान होणे जरुरी असते. ते विचार ज्या मूळ अमूर्त, अगम अशा स्त्रोतातून उद्‌भवले आहेत त्या उगमस्थानाचे मूर्तरुप म्हणून आपण त्यांच्याकडे पहायला हवे. असे बघणे म्हणजेच `देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ ही अवस्था होय असे समजा. मग नंतर झालेल्या बोधानुसार वर्तन करायचे की नाही हे स्वातंत्र्य सद्‌गुरु आपणांस देतात. जर त्यांच्या आज्ञेप्रमाणे वर्तणुक झाली तर प्रसन्न होऊन वारंवार दर्शन देतात व या प्रक्रियेची अंतिम अवस्था म्हणजे ह्रुदयातील सद्‌गुरुंशी असलेले नित्य सान्निध्य. तेव्हा आपणांस `मुक्‍ती चारी’ साधतात. हा आपला मार्ग जेव्हा सुरु होतो तो केवळ क्षणिक सात्विक वृत्तीच्या प्रभावाने होतो असेच कदाचित माउलींना सांगायचे असेल. म्हणून आपणांस झालेल्या क्षणिक ज्ञानाला महत्व द्यायला आपण या अभंगातून शिकले पाहिजे. त्यातच आपल्या पुढील प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

 

॥ हरि ॐ ॥

(बंगलोरमध्ये दिनांक २६ जानेवारीस झालेल्या प्रवचनावर आधारित.)